प्रज्ञाशील करुणेचा दीपस्तंभ

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती रक्तहीन क्रांती आहे. शांततेवर आधारलेली क्रांती आहे. सत्याग्रहावर आधारलेली क्रांती आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा मानव मुक्तीचा लढा आहे. माणसाला केंद्र मानून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानवी हक्कासाठी लढा लढला. सामाजिक न्याय, समतेचा संगर उभारला.
प्रज्ञाशील करुणेचा दीपस्तंभ
प्रज्ञाशील करुणेचा दीपस्तंभ
Published on

विशेष

रामदास आठवले

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती रक्तहीन क्रांती आहे. शांततेवर आधारलेली क्रांती आहे. सत्याग्रहावर आधारलेली क्रांती आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा मानव मुक्तीचा लढा आहे. माणसाला केंद्र मानून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानवी हक्कासाठी लढा लढला. सामाजिक न्याय, समतेचा संगर उभारला.

विषमतेच्या विषवल्लीने ग्रासलेल्या संस्कृतीला समतेची संजीवनी देणारे भारताचे भाग्यविधाते विश्वरत्न, प्रज्ञासूर्य ज्ञानाचा अथांग सागर असणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा यंदा १३५ वा जयंती महोत्सव साजरा होत आहे. या भीमजयंती दिनी समस्त भारतीयांना हार्दिक शुभेच्छा! महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपूर्ण जगात साजरी होते. आपल्या महाराष्ट्रात एप्रिल, मे आणि जून अशी तीन महिने विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमातून भीमजयंती साजरी केली जाते. यंदाची भीमजयंती ही ज्ञानाचा, शांततेचा आणि अंधश्रद्धेवर मात करणाऱ्या प्रज्ञेचा उत्सव ठरली पाहिजे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत बिकट परिस्थितीतून उच्च शिक्षण घेऊन संपूर्ण जगासमोर एक आदर्श उभा केला. कोट्यवधी लोक मिळून जे काम करू शकत नाहीत ते काम एकट्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखवले. शेकडो जन्मात ज्यांना जे कार्य करता येणार नाही ती क्रांती महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या एका आयुष्यात करून दाखवली.

एका कवीने म्हटले, तुला शतकाचही आयुष्य लाभले नाही. परंतु तू हजारो वर्षांच्या भेदासुराचा नाश केला आणि तूच उद्गाता ठरला निरक्त क्रांती पर्वाचा. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती रक्तहीन क्रांती आहे. शांततेवर आधारलेली क्रांती आहे. सत्याग्रहावर आधारलेली क्रांती आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा मानव मुक्तीचा लढा आहे. माणसाला केंद्र मानून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानवी हक्कासाठी लढा लढला. सामाजिक न्याय, समतेचा संगर उभारला.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९ आणि २० मार्च १९२७ रोजी चवदार तळे सत्याग्रह केला. महाडच्या क्रांतिभूमीमध्ये महाड चवदार तळे आहे. त्या चवदार तळ्यावर पाण्याचा सत्याग्रह केला. हा जगातला पहिला मानवी हक्काचा लढा होता. हा चवदार तळ्याचा सत्याग्रह आज जगभर मानवी हक्काची ज्योत पेटवणारा, मानवी हक्काच्या लढ्याला प्रेरणा देणारी ती क्रांती आहे. म्हणून महाडला क्रांतिभूमी म्हटले जाते. त्या क्रांतिभूमीतून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानवमुक्तीच्या लढ्याचा आरंभ केला. त्यामुळे त्यांनी महाड क्रांतीला फ्रेंच राज्यक्रांतीचा दर्जा दिला आहे. आज संपूर्ण जगामध्ये जे मानवी हक्काचे लढा लढणारे कार्यकर्ते आहेत, चळवळी आहेत, त्या सर्व चळवळींना मानवी हक्काच्या लढ्याची प्रेरणा देणारा प्रेरणास्रोत हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचा शताब्दी महोत्सव आपण यावर्षी साजरा करत आहोत. यंदाचे वर्ष समतेचे पर्व आहे. महात्मा फुले यांच्या जयंतीची यंदा द्विशताब्दी असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची यंदा १३५ वी जयंती आहे. चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्ष आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानवी हक्काचा जो लढा सुरू केला आहे त्यांनी आपल्या संपूर्ण चळवळीला माणूस हे केंद्र मानले. माणसाला त्याची सदसद्विवेकबुद्धी जागृत करणारी, त्याच्या ठायी प्रज्ञा असावी. प्रज्ञा, शील, करुणेची शिकवण देणारी चळवळ त्यांनी सुरू केली. ज्ञानाशिवाय पर्याय नाही. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मंत्र आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अनमोल संदेश आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने बोधिसत्व आहेत. त्यांनी महाकारुणिक भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा वारसा आपल्या जीवनात अंगिकारला. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन सम्राट अशोकानंतर भारतातील सर्वात मोठे धम्मचक्रप्रवर्तित केले. भगवान बुद्धांनी दिलेला बौद्ध धम्म हा सर्व मानवजातीसाठी आदर्श जीवनमार्ग आहे. बौद्ध धम्मानेच जगाला सर्वप्रथम ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’चे तत्त्व सांगून लोकशाहीला जन्म दिला आहे. समता, मानवता, बंधुता, अहिंसा आणि विश्वशांतीचा विचार बौद्ध धम्माने दिला आहे. या विचारांचा आदर्श घेऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात सामाजिक क्रांती केली.

भगवान बुद्धांनी दिलेला अहिंसेचा, शांतीचा आणि बंधुतेचा विचार जगाला तारणारा आहे याची आजही आपल्याला खात्री पटते. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जग संकटात सापडले आहे. प्रत्येक युद्ध नको असे वाटत आहे. ज्या राष्ट्रप्रमुखांच्या मनात युद्धाचा विचार येतो त्यांच्या मनात जर बुद्धांचे विचार आले तर युद्ध होणार नाही. जगात शांती नांदेल. ट्रम्प हे अमेरिकेचे प्रमुख आहेत. त्यांच्या मनात ज्या क्षणी युद्धाचा विचार आला त्या क्षणी जर बुद्धांचे विचार त्यांना आठवले असते तर युद्धाकडे त्यांचे पाऊल वळले नसते. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांना युद्धाची नाही तर शांततेने प्रश्न सोडविण्यासाठी बुद्धांच्या विचारांची गरज आहे. सर्व जगाला युद्धाची नाही तर बुद्धांची गरज आहे. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांच्या विचारांचा पुरस्कार केला आहे.

भगवान बुद्धांनी माणसाला आणि माणसाच्या मनाला केंद्र मानून आपल्या धम्माची शिकवण दिली आहे. माणसाने जर मन जिंकले तर त्याने जग जिंकले असे होईल. मनाला जिंकण्याची शिकवण बौद्ध धम्म देतो. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रज्ञा, शील, करुणा या तत्त्वांना महत्त्व दिले आहे. व्यक्ती सुशिक्षित असो की अशिक्षित माणसाची प्रज्ञा जागी असेल तर त्याला कोणताही भोंदूबाबा फसवू शकत नाही. महाराष्ट्र राज्यात सध्या उघडकीस आलेले भोंदू खरात प्रकरण अत्यंत भयानक आहे. सामाजिक सुधारणा, सामाजिक परिवर्तनाची महाराष्ट्र ही भूमी जगाला प्रेरणा देणारी आहे. या भूमीला कलंक लावण्याचे काम भोंदू खरातसारखे लोक करतात. या भोंदूकडे फसलेले बहुसंख्य लोक हे शिकलेले आणि आर्थिक सुबत्ता असणारे लोक होते हे याबाबत आलेल्या बातम्यांमधून स्पष्ट होते. ज्या सुशिक्षित लोकांनी आपली प्रज्ञा जागृत केली नाही ते या भोंदूच्या फसवेगिरीला बळी पडले आहेत. माणसाच्या जीवनात प्रज्ञा, शील, करुणा या तत्त्वांना अंगिकारण्याची शिकवण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे.

महाड चवदार तळे सत्याग्रहानंतर नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह हा ऐतिहासिक होता. तत्कालीन सनातनी विचारांच्या हिंदू उच्चवर्णीयांनी काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश नाकारला. स्पृश्य-अस्पृश्यतेचा मानवतेला कलंक लावणारा भेदभाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याने संपवला. त्या काळात मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेच्या अमानुष भेदभावाचे चटके सोसले होते. हिंदू धर्मातील जातीभेदाने त्यांना छळले, परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मावर त्याचा राग काढला नाही. हिंदू धर्माचा सूड घेतला नाही. हिंदू धर्मात सुधारणा घडविणारे हिंदू कोड बिल महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मन करुणेने भरलेले होते. त्यांनी हिंदू धर्मातील दलितांना, महिलांना न्याय देण्यासाठी जुन्या कुप्रथा, अंधश्रद्धांवर प्रहार केले. समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी, समता स्थापण्यासाठी ते लढले. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे हिंदू धर्मात जन्मलो, परंतु हिंदू धर्मात मरणार नाही, अशी प्रतिज्ञा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली. ती प्रतिज्ञा त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धर्मांतराने खरी करून दाखवली.

विविधतेने नटलेल्या भारत देशाला राष्ट्रीय एकात्मतेच्या धाग्यात बांधून विश्वबंधुत्वाची शिकवण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानातून दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या प्रबंधातूनच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची संकल्पना मांडणारे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अपूर्व आहे. त्यांनी नदीजोड प्रकल्प देशाला सुचवला. त्यांनीच दामोदर व्हॅली उभी करून धरण आणि वीजनिर्मितीचा पहिला प्रयोग देशाला अर्पण केला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार युगप्रवर्तक आहेत. त्यांची जयंती ही विचारांचा उत्सव झाला पाहिजे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने देशात अनेक ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उत्कृष्ट स्मारकाचे काम केले आहे. त्यांनी सांगितलेल्या नदीजोडसारख्या संकल्पनांना आकार देण्याचे काम आम्ही करीत आहोत. संविधानातील समतावादी भारत साकार करण्याची भीमजयंती दिनी प्रतिज्ञा करूया! जय भीम!

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

logo
marathi.freepressjournal.in