

विचारभान
संध्या नरे-पवार
दरवर्षी रक्षाबंधनाचा सण येतो आणि बहीण-भावाच्या प्रेमाच्या कथा अधोरेखित करतो. या कथा पुरुषसत्ताक व्यवस्थेतल्या आहेत. मातृसत्ताक व्यवस्थेतल्या कथा कदाचित आणखी वेगळ्या असतील. स्त्री-पुरुष समतावादी व्यवस्थेत या कथा अधिक मानवी, अधिक सखोल होतील. असं असलं तरी बहीण-भावाच्या प्रेमाची कथा म्हटली, की भारतीय जनमानसाला दोन नावं हमखास आठवतात.
ती कृष्णा..तो कृष्ण..
ती पाच पतींची पत्नी..तोही अनेक पत्नींचा पती. शिवाय अनेक गोपिकांचा प्रियकर, प्रिय पुरुषोत्तम.
पण तरी तिचा जीव त्याच्यात आणि त्याचा जीव तिच्यात गुंतलेला. एक वेगळं सख्य होतं दोघांमध्ये. या मनीचे भाव त्या मनी सहज कळत होते. पाच पतींची पत्नी आणि पाच पुत्रांची माता, पांचालांची राजकन्या आणि कुरूंची स्नुषा असलेल्या आपल्या तेजस्वी सखीच्या हृदयात नेमकं कसलं शल्य आहे हे कृष्णाला नेमकं उमगत होतं, तर अर्जुनासारखा सखा, सुभद्रेसारखी भगिनी, रुक्मिणी-सत्यभामासारख्या सहचारिणी आणि राधेसारखी प्रेयसी असतानाही कृष्णाच्या मनी आपल्याला विशेष स्थान आहे, हे द्रौपदी जाणून होती.
जगरहाटीने या दोघांमधल्या अनोख्या नात्याला, त्यांच्यातल्या सख्यत्वाला बंधु-भगिनीच्या नात्याचं नाव दिलं.
“द्रौपदीस बंधु शोभे सखा नारायण..”
असं म्हटलं गेलं किंवा
“चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला..”
असं म्हणत सुभद्रेच्या आणि द्रौपदीच्या भगिनीप्रेमाची तुलना केली गेली. लोकमानसात द्रौपदीच्या भगिनीप्रेमाची ही कथा आजही जिवंत आहे. एकदा श्रीकृष्णाची करंगळी कापते. तो सुभद्रेच्या महाली जातो. त्यावेळी सुभद्रा करंगळीला बांधायला चिंधी काढण्यासाठी आपल्या साड्या पाहू लागते. अमूक साडी अमूक प्रसंगी घेतलेली, ती मोलाची, ती कशी फाडायची? अमूक साडीत अमूक आठवण गुंतलेली, तीही महत्त्वाची, ती कशी फाडायची? सुभद्रा या विचारात असताना द्रौपदीला कृष्णाच्या करंगळीला जखम झालेली कळते आणि ती मागचा पुढचा विचार न करता आपल्या अंगावरची साडी फाडून त्याची चिंधी काढते आणि ती कृष्णाच्या बोटाला बांधते. लोकमानसात जिवंत असलेली ही कथाच गीताच्या रूपात व्यक्त झाली.
द्रौपदीने हरीच्या बोटाला बांधलेली चिंधी ही रक्षाबंधनाच्या धाग्यापेक्षाही अधिक मोलाची असावी. कारण त्यात निरपेक्ष प्रेम होतं. भाऊबहिणीच्या नात्याचं प्रतीक असलेली चिंधी, हेच कदाचित राखीच्या धाग्याचं मूळ असावं. कारण अगदी आजही राखी बांधताना त्या बदल्यात भावाने आपल्याला काही द्यावं, अगदी आपलं रक्षण वगैरे करावं, ही भावना बहुतेक बहिणींच्या मनात नसते. आयुष्याची वाट चालताना, माथ्यावरचं ओझं जड झालं तर हाक मारायला मागचा-पुढचा भाऊ असावा, मुळात आपलं असं हक्काचं माणूस या भूतलावर असावं, एवढीच अपेक्षा असते. एखाद्या बहिणीचं आपल्या भावावर किती प्रेम असू शकतं? आपल्या भावावरच्या तिच्या प्रेमाची कसोटी काय? असे प्रश्न लोकमानसाला कधी ना कधी पडलेच आणि ते एखाद्या गोष्टीच्या रूपातून व्यक्तही झाले.
एका स्त्रीचा पती, पुत्र आणि बंधु असे तिघेही राजाच्या कैदेत असतात. राजाने तिघांनाही मृत्युदंडाची शिक्षा ठोठावलेली असते. स्त्री राजाची करुणा भाकते. तिघांना सोडायला सांगते. त्यावेळी राजा तिला सांगतो की, तुला एकाचीच मुक्तता करता येईल. या तिघांपैकी कोणाला सोडायचे ते तू ठरव. उपस्थित सगळ्यांना वाटलं की ती स्त्री आपल्या मुलाची मुक्तता करायला राजाला सांगेल. कोणाला वाटलं, ती पतीची सुटका करायला सांगेल. पण त्या स्त्रीने सगळ्यांना आश्चर्यचकित करत आपल्या भावाची सुटका करायला सांगितलं. राजालाही आश्चर्य वाटलं. त्याने त्या स्त्रीला ‘असं का?’ असं विचारलं. त्यावेळी त्या स्त्रीने सांगितलं, ते भाऊ-बहिणीच्या नात्याची अनन्यता स्पष्ट करणारं आहे. ती म्हणाली, “मी पुन्हा लग्न केलं तर मला दुसरा पती मिळेल. मला दुसरा पती मिळाला तर मला दुसरा मुलगा होईल. पण मला एकच भाऊ आहे. तो मला पुन्हा मिळणार नाही. म्हणून मला भावासाठी जीवदान हवं.”
बहिणीच्या आयुष्यातील भावाचं हे अनन्य स्थान द्रौपदीच्या आयुष्यातही पावलोपावली दिसून येतं. भावाला ‘सहोदर’ म्हटलं जातं. एकाच आईच्या पोटी, एकाच उदरातून जन्माला आलेले म्हणून सहोदर. द्रौपदीच्या आणि कृष्णाच्या अनोख्या नात्याची आजवर वेगवेगळ्या अभ्यासकांनी, समीक्षकांनी खूप चर्चा केली आहे. जनमानसालाही या नात्याचं खूप अप्रूप आहे. पण द्रौपदीचा सहोदर असलेला धृष्टद्युम्न आणि द्रौपदी यांच्या नात्याविषयी मात्र फारसं बोललं जात नाही. दोघंही एका वेगळ्या अर्थाने सहोदर आहेत. पांचालांचा राजा द्रुपद आणि कौरवांचे आचार्य द्रोण यांच्यात वितुष्ट येतं. तेव्हा द्रोणाचार्यांच्या पराभवासाठी आपल्याला एक पराक्रमी पुत्र व्हावा म्हणून द्रुपद राजा यज्ञ करतो. या यज्ञातील अग्नीमधून एक तेजस्वी युवक बाहेर येतो. अग्नीतून अवतरलेल्या आपल्या पुत्राचं तेज पाहून द्रुपद राजा त्याचं नाव धृष्टद्युम्न असं ठेवतो. धृष्ट म्हणजे निर्भिड, तर द्युम्न म्हणजे प्रकाश, ऊर्जा, तेज. या निर्भिड, तेजस्वी युवकाच्या पाठोपाठ त्या यज्ञकुंडातून एक लखलखीत रूपाची युवतीही बाहेर येते. ती वर्णाने काळीसावळी होती. त्यामुळे आपल्या कृष्णवर्णीय मुलीचं नाव द्रुपदाने ‘कृष्णा’ असं ठेवलं. ती द्रुपदाची कन्या म्हणून तिला ‘द्रौपदी’ संबोधलं गेलं, तर यज्ञातून जन्मली म्हणून ‘यज्ञसेनी’ असंही तिला म्हटलं जातं. द्रुपद राजाचं यज्ञसेन हेही एक नाव आहे. त्यामुळे द्रौपदीला ‘याज्ञसेनी’ असंही म्हटलं जातं, तर पांचालांची राजकन्या म्हणून तिला ‘पांचाली’ असंही म्हटलं जातं. द्रौपदीच्या या विविध नावांमधून तिचं तत्कालीन महत्त्व स्पष्ट होतं. आपल्यासह यज्ञातून जन्माला आलेल्या आपल्या बहिणीचं आगळं स्थान धृष्टद्युम्नालाही माहीत होतंच. त्याचमुळे अर्जुनाने स्वयंवराचा पण जिंकल्यानंतर, द्रौपदीला घेऊन ब्राह्मण वेषातले पाच पांडव (त्यावेळी ते अज्ञातवासात होते) स्वयंवर मंडपातून बाहेर पडल्यावर धृष्टद्युम्न गुपचुप त्या सहाजणांचा पाठलाग करतो. आपल्या बहिणीच्या स्वयंवरातील ‘पण’ कोणी जिंकला, तिला कुठे नेलं जात आहे, हे त्याला माहीत करून घ्यायचं आहे. शेवटी हे पाच ब्राह्मण वेषातले तरुण म्हणजे पाच पांडव आहेत, हे तो शोधतो. नंतरच्या काळात तो सतत आपल्या बहिणीच्या पाठीशी ठामपणे उभा असलेला दिसतो. महाभारत युद्ध कौरव-पांडवांमध्ये लढलं गेलं, असं म्हटलं जातं. पण या युद्धात पांडवांच्या बाजूने त्वेषाने लढत होतं ते पांचालांचं सैन्य आणि पांचालांचा राजपुत्र धृष्टद्युम्न. पांचालीच्या अपमानाचा बदला घेण्याचं उत्तरदायित्व त्यांच्यावरच होतं. पांडव लढत होते ते धर्मासाठी, राज्यासाठी, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात. पण पांचाल लढत होते ते द्रौपदीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी. महाभारत युद्धात धृष्टद्युम्न हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पांडवांचा सेनापती होता. कौरवांचे सेनापती असलेल्या द्रोणाचार्यांचा त्याने वध केला, तर द्रौपदीचा दुसरा भाऊ शिखंडी (मूळची शिखंडीनी ही मुलगी, द्रुपद राजाने मुलगा मानून शिखंडी म्हणून वाढवली आणि नंतर शिखंडीने यक्षाकडून पौरुषत्व उसनं घेतलं.) याच्या आडून शरसंधान करून भीष्माचार्यांचा वध करण्यात आला.(शिखंडी हा मूळचा स्त्री असल्याने भीष्मांनी त्याच्यावर स्त्री म्हणून शस्त्र चालवले नाही.)
म्हणजेच पांडवांच्या दोन मुख्य सेनानींचा वध करण्यात द्रौपदीच्या दोन्ही भावांनी मुख्य भूमिका बजावली. या दोन्ही वधांना आधीच्या काही कथानकांची पार्श्वभूमी असली तरी एकूण महाभारत युद्धात पांडवांच्या बाजूने लढलेल्यांमध्ये धृष्टद्युम्न, शिखंडी हे महत्त्वाची भूमिका बजावतात आणि अखेरीस द्रौपदीच्या पाच पुत्रांसह अश्वत्थाम्याकडून मारलेही जातात. युद्ध संपल्यानंतर द्रौपदीचे पाच पुत्र आपल्या दोन्ही मामांसह शिबिरात झोपले असताना द्रोणांच्या वधाचा बदला घेण्यासाठी सूडाने पेटलेला अश्वत्थामा त्या शिबिरात येतो आणि द्रौपदीच्या पाच पुत्रांना आणि धृष्टद्युम्न व शिखंडी यांना मारतो. इथे द्रौपदीचे पाचही पुत्र आपल्या मामांसह शिबिरात झोपले होते, आपल्या वडिलांसह नाही, ही गोष्ट खूप बोलकी आहे. द्रौपदीच्या भावांचं द्रौपदीच्या आयुष्यातील स्थान स्पष्ट करणारी आहे. पांडवांसोबत अज्ञातवासात जातानाही द्रौपदीने आपले पाच पुत्र आपल्या माहेरी, आपल्या भावांकडेच सोपवले होते.
महाभारत युद्धाची सर्वाधिक किंमत द्रौपदीने दिली, हेही इथे दिसून येते. पाच पुत्र आणि दोन्ही भाऊ मारले गेले. उरले पाच पती, ज्यांच्या प्रत्येकाच्या स्वतंत्र पत्नी होत्या. पाच पुत्रांच्या कलेवरांवर द्रौपदी धाय मोकलून रडत असताना ते काही अंतरावर अलिप्तपणे उभे होते. त्या क्षणी द्रौपदी सर्वस्वी एकटी होती. तिचं हे दु:ख त्याक्षणी फक्त एकाच व्यक्तीला कळलं. तो होता कृष्ण. तिच्या एकाकीपणाची वेदना, अवहेलनेचं दु:ख त्यालाच उमगलं होतं. त्या एकाकीपणात तो तिची मूक सोबत करत होता.
म्हणूनच कृष्ण आणि कृष्णा हे नातं युगानुयुगे टिकून आहे. वस्त्रहरणाच्या प्रसंगी कृष्णाने द्रौपदीला साड्या पुरवल्या हे आजच्या पिढीसाठी एक कल्पित असेल. पण सासरच्या कुटुंबात प्रत्यक्ष वडिलधाऱ्यांसमोर, पाच पतींसमोर होणाऱ्या त्या वस्त्रहरणाच्या प्रसंगी कृष्णेने फक्त कृष्णाचाच धावा केला हेच पिढ्यान्पिढ्यांनी सत्य मानलं, एवढं खरं. भाऊबहिणीच्या प्रेमाचं कथानक म्हणून कधी द्रौपदीने कृष्णाला बांधलेल्या चिंधीच्या रूपात व्यक्त होतं, तर कधी कृष्णाने पुरवलेल्या साड्यांच्या कथानकात.
भावाबहिणीच्या प्रेमाचं हे कथानक आज कदाचित अधिक विसविशीत झालं आहे, पुरुषसत्ता अधिक निर्मम झाली आहे, तो कृष्णही आज राहिलेला नाही. म्हणूनच मग एखादा कवी म्हणतो,
उठो, द्रौपदी शस्त्र संभालो,
अब गोविंद ना आएंगे...
sandhyanarepawar@gmail.com