दुरून डोंगर साजरे!

मार्गारेट मांजर मावशी आणि रॉबिन्सन उंदीर मामा या दोघांना रात्री चंद्रदर्शन करायला फार आवडायचं. मालकीनबाई झोपल्या की, दोघं हळूच खिडकीतून बाहेर पडत नि टेरेसवर जाऊन चांदोबाकडे टक लावून बघत...
दुरून डोंगर साजरे!
Published on

बालमैफल

सुरेश वांदिले

मार्गारेट मांजर मावशी आणि रॉबिन्सन उंदीर मामा या दोघांना रात्री चंद्रदर्शन करायला फार आवडायचं. मालकीनबाई झोपल्या की, दोघं हळूच खिडकीतून बाहेर पडत नि टेरेसवर जाऊन चांदोबाकडे टक लावून बघत. चांदोबावर जाता आलं तर काय धम्माल येईल असं रॉबिन्सनला नेहमी वाटे. तो प्रत्येक वेळी मार्गारेट मावशीला याविषयी बोलायचा. मावशी मात्र त्याच्या इच्छेला हसण्यावारी न्यायची. तिचं एकच पालूपद, “चांदोबा आपल्यापासून खूप दूर आहे. त्यामुळे तिकडे जाण्यासाठी जादूचा झाडूच लागेल. त्यावर बसायचं नि जायचं उडत उडत.”

“मग, हा झाडू तू शोधत का नाहीस?” असं रॉबिन्सनने विचारलं तर ती म्हणे,

“तो केवळ हॅरी पॉटरकडे असतो.”

त्याला जाऊन भेटू म्हंटल तर मावशी म्हणे, “तो राहतो गुप्त ठिकाणी.”

ते गुप्त ठिकाण केवळ मालकीणबाईंनाच ठाऊक असल्याचं मावशीने एकदा डोळा बारीक करुन सांगितलं. आपल्याला मार्गेटलीच्याच गळ्यात घंटा बांधणं अशक्य, मालकीणबाई म्हणजे मार्गेटलीच्या पाच हजार पट मोठ्या. त्यात पुन्हा महाखडूस. त्यामुळे त्यांच्या गळ्यात घंटा बांधणं अशक्यप्राय असल्याचं, रॉबिन्सनला लक्षात आल्याने त्याने नंतर चंद्रावर जाण्याची आपली इच्छा दाबून टाकली. मात्र चंद्राचं निरीक्षण करणं काही कमी केलं नाही.

या निरीक्षणातूनच त्याच्या लक्षात आलं की, आपल्यापासून खूप दूरवर असणाऱ्या आभाळातल्या चांदोबाच्या प्रकाशाला इकडे पृथ्वीपर्यंत येण्यासाठी खूप मोठा प्रवास करावा लागत असेल.

“बरोबरना मावशे.” त्याने आपल्या मनातला विचार मावशीला स्पष्टपणे

बोलून दाखवला.

“रॉब्या, अगदी बरोबर, त्याशिवाय का हा प्रकाश आपल्यापर्यंत आलाय? ही काही जादूबिदू नाही.”

“मग काय?”

“याचं शास्त्र आहे.”

“म्हणजे भा न ग ड! ” रॉबिन्सन जिभ चाचरत म्हणाला.

“रॉबेटल्या, शास्त्र म्हंटलं की तुला भानगडच दिसते का? अरे, हा मनुष्यप्राणी शास्त्राच्या वाटेला जातो म्हणूनच

त्याला नव्यानव्या गोष्टी कळतात. आपल्याला नाही.”

“सॉरी मावशे, चुकलच माझं. तसं तर नेहमीच चुकतं म्हणा. आता या माझ्या चुकीवर पांघरुन घालून मला सांग, आपल्या पृथ्वीपासून खूप खूप लांब असलेल्या चांदोबाचा प्रकाश आपल्यापर्यंत येण्यासाठी किती वेळ लागत असेल?

याचा शोध या उपदव्‍यापी माणसांनी घेतलाच असेलना.”

“घेतला की. त्यातून त्यांच्या लक्षात आलं की, चंद्रापासून निघालेला प्रकाश

हा काही त्याक्षणी आपल्या पृथ्वीपर्यंत

येत नाही.”

“मग? त्याला कुणी पळवतं की, तो जरा वाट वाकडी करतो?” मामाने आश्चर्यानं विचारलं.

“तसं काही नाही रे गधड्या. चंद्रापासून प्रकाश निघाला की, त्याला इथे आपल्यापर्यंत पोहोचायला वेळ लागतो.”

“खूप वेळ लागतो का?”

“नाही रे, फक्त १.३ सेकंद!”

“हात्तिच्या, इतका कमी वेळ!”

“ रॉब्या, हा वेग तुला कमी वाटत असला तरी तसा तो नाहीय. कारण प्रकाशाचा वेग सेकंदाला ३ लाख किलोमीटर इतका प्रचंड असतो!”

“ बापरे, हे कोणी शोधलं?”

“अल्बर्ट मायकलसन या शास्त्रज्ञाने

हा प्रकाशाचा वेग मोजला आणि आईनस्टाईन या महान शास्त्रज्ञाने सांगितलं की, प्रकाशापेक्षा या जगात काहीच

वेगवान नसतं.”

“म्हणजे आपण जो चंद्र पाहतो,

तो १.३ सेकंद जुना असतो, असं म्हणायचंय का तुला?”

“बरोबर!”

“मावशे, हे अंतर या मनुष्यप्राण्यानं मोजलं कसं?”

“अरे, या मनुष्यप्राण्याची बुध्दी फार तेज चालते ना. त्याने या तेजबुध्दीच्या साहाय्यानं दोन प्रयोग केले.”

“कोणते गं?”

“पहिल्या प्रयोगात ‘अपोलो ११, १४ आणि १५’ या चंद्र मोहिमांच्या वेळी चंद्राच्या पृष्ठभागावर काही विशेष आरसे (रेट्रो रिफ्लेक्टर्स) ठेवले. पृथ्वीवरून लेझरचा किरण त्या आरशांवर सोडला. ते किरण चंद्रावर जाऊन परत पृथ्वीवर यायला २.५१ सेकंद लागले. म्हणजे जाण्यासाठी १.२५ ते १.३ सेकंद नि परतीसाठीही तेव्हढाच वेळ.”

“समजलं. आता दुसऱ्या प्रयोगाबद्दलही सांगूनच टाक मावशे?”

“दुसऱ्या प्रयोगात मनुष्यप्राण्याने पृथ्वीवरुन चंद्रावर रेडिओ संदेश पाठवला नि त्याचा प्रतिध्वनी मोजला. या दोन्हीवरून सिद्ध झालं की, चंद्र आपल्यापासून साधारण ३ लाख ८४ हजार किलोमीटर दूर आहे. याला मनुष्यप्राणी शास्त्रीय भाषेत, चंद्र पृथ्वीपासून १.३ प्रकाश सेकंद दूर असल्याचं सांगतो. आता तुला कळलय ना, चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर यायला १.३ सेकंद का लागतात ते?”

“मावशे, आता अगदी स्पष्ट झालंय. मग इतर ताऱ्यांच्या प्रकाशाचं काय?”

“रॉब्या, प्रकाशाचा प्रवास निर्वात पोकळीतून होतो. काही तारे इतके लांब आहेत की त्यांचा प्रकाश पृथ्वीपर्यंत यायला कोट्यवधी वर्ष लागतात. म्हणजे आज आपण जो तारा बघतोय, तो कदाचित लाखो वर्षांपूर्वीचा असतो!”

“अबाबा!”

“बाबाबा! रॉब्या, दूरुन डोंगरे साजरे अशी एक म्हण आपण मालकीणबाईंच्या तोंडून नेहमी ऐकतो. या चांदोबासाठी ही म्हण अगदी फिट्ट बसते.”

“ती कशी?”

“अरे, चंद्राचा प्रकाश आपल्याला कितीही छान नि जादूई वाटत असला तरी चांदोबा तसा प्रत्यक्षात दगाडाधोंड्याचा नी धुळीने माखला आहे. त्यामुळे इथूनच त्याला बघायचं नी आनंद साजरा करायचा. कळलं.”

ज्येष्ठ बाल साहित्यिक.

logo
marathi.freepressjournal.in