दुसरी बाजू
प्रकाश सावंत
दसरा आला की रावणाचे पुतळे उभे राहतात, बाण सुटतो आणि क्षणार्धात रावण जळून खाक होतो. टाळ्यांचा कडकडाट होतो. वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याचा आनंद साजरा केला जातो. मात्र, दुसऱ्याच दिवशी अन्याय, भ्रष्टाचार, भेदभाव आणि सत्तेचा उन्माद पुन्हा आपल्यासमोर उभा राहतो. रावण जळतो, पण रावणी मनोवृत्ती जिवंत राहते. मग हा उत्सव नेमका कशाचा? पुतळ्याच्या दहनाने वाईटाचा अंत होत असेल, तर समाजातील अन्यायाची मुळे दिवसेंदिवस खोलवर का जात आहेत? खरा प्रश्न रावणाच्या उंचीचा नाही, तर आपण आपल्या वर्तनातून त्याला किती जिवंत ठेवले, याचा आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिरात चोरी झाल्याची घटना आणि लोकशाहीच्या मंदिरात मतचोरी झाल्याचे आरोप या स्वरूपाने वेगळ्या बाबी आहेत. त्यांची तुलना करताना तथ्यांचे भान आवश्यक आहे. मात्र, दोन्ही प्रकरणांत एक मूलभूत अपेक्षा समान आहे- सत्य समोर आले पाहिजे. आरोपांची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित संस्थांनी पारदर्शकपणे उत्तरे दिली पाहिजेत. आरोप म्हणजे गुन्हा सिद्ध होणे नव्हे; पण प्रश्न विचारणाऱ्यांचीच विश्वासार्हता संशयाच्या भोवऱ्यात ढकलून मूळ प्रश्न टाळणेही योग्य नाही. श्रद्धेच्या स्थळावरील सुरक्षा असो किंवा निवडणूक प्रक्रियेची शुचिता, जनतेचा विश्वास हा व्यवस्थेचा सर्वांत मोठा आधार असतो. तो टिकवायचा असेल, तर केवळ दावे करून चालत नाही; कृतीतून प्रामाणिकपणा सिद्ध करावा लागतो.
लोकशाहीत मत म्हणजे नागरिकाच्या स्वाभिमानाचा आणि सत्तेच्या मर्यादा ठरविण्याचा अधिकार आहे. मतदार याद्यांतील त्रुटी, कथित निवडणूक अनियमितता किंवा विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेविषयी शंका उपस्थित झाल्यास त्यांचे निरसन करणे ही संबंधित यंत्रणांची जबाबदारी आहे. निवडणूक सुधारणांची मागणी असो किंवा मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी, तिचे मूल्यमापन तथ्ये आणि घटनात्मक तरतुदींच्या आधारे झाले पाहिजे. आंदोलनकर्त्यांची प्रत्येक भूमिका योग्य असेलच असे नाही; परंतु प्रश्न विचारण्याचा अधिकार नाकारून लोकशाही बळकट होत नाही. उलट, सत्तेला प्रश्नांची उत्तरे देण्याची सवय लागणे, हेच सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे.
आजच्या तरुणाईचा असंतोषही याच वास्तवातून निर्माण होतो. पदवी मिळवूनही रोजगारासाठी भटकणारा तरुण, वर्षानुवर्षे परीक्षांची तयारी करून भरती प्रक्रियेतील अनिश्चिततेने हताश होणारा विद्यार्थी, गुणवत्तेपेक्षा वशिल्याला महत्त्व मिळत असल्याची भावना मनात बाळगणारा नोकरीइच्छुक उमेदवार आणि महागाईत संसाराचा गाडा ओढणारी सामान्य गृहिणी यांना केवळ आश्वासनांनी समाधान मिळणार नाही. त्यांना संधी, पारदर्शकता आणि न्याय हवा आहे. विकासाच्या घोषणा आणि जाहिराती कितीही आकर्षक असल्या, तरी त्यांचा अर्थ सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडतो तेव्हाच सिद्ध होतो. तरुणांच्या प्रश्नांना उर्मटपणा ठरविणे सोपे आहे; पण त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने निर्माण होणारी निराशा दूर करणे कठीण आहे.
आजच्या रावणाला दहा नव्हे, तर असंख्य तोंडे आहेत. जातीवरून माणसाची पात्रता ठरविणारा जातीयवाद, धर्माच्या नावाखाली द्वेष पसरविणारी धर्मांधता, भाषा आणि प्रांताच्या आधारे माणसांत भिंती उभ्या करणारा संकुचितवाद, स्त्री-पुरुष भेदभाव आणि आर्थिक शोषण ही त्याची विविध रूपे आहेत. भ्रष्टाचार, वशिलेबाजी, सावकारी, कृत्रिम टंचाई आणि सत्तेचा उन्माद त्याला अधिक बळ देतात. शिक्षणाच्या नावाखाली पालकांची पिळवणूक होते, वैद्यकीय उपचारांच्या गरजेचा गैरफायदा घेतला जातो आणि सरकारी कार्यालयांत सामान्य माणसाला कामासाठी हेलपाटे मारावे लागतात. कायद्यासमोर सर्व समान असल्याचे सांगितले जाते; पण व्यवहारात पैसा, ओळख आणि राजकीय जवळीक यांना प्राधान्य मिळत असेल, तर समानतेच्या घोषणांचा उपयोग काय?
या परिस्थितीला केवळ सरकार किंवा प्रशासनाला जबाबदार धरून समाज स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाही. भ्रष्टाचाराचा फायदा मिळत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणे; आपल्या जातीच्या व्यक्तीने अन्याय केला, तर त्याचे समर्थन करणे; आवडत्या नेत्याची चूक राजकीय अपरिहार्यता म्हणून स्वीकारणे आणि विरोधकाच्या त्याच चुकीला गुन्हा ठरविणे, हा सामाजिक दुटप्पीपणा आहे. अन्याय करणाऱ्याची ओळख पाहून आपली भूमिका ठरत असेल, तर तो विवेक नव्हे, स्वार्थ आहे. रावणाच्या पुतळ्याला आग लावण्यापूर्वी आपल्या मनातील पूर्वग्रह, द्वेष आणि चुकीच्या गोष्टींचे समर्थन करण्याची वृत्ती जाळण्याची तयारी आपण दाखवणार आहोत का, हा खरा प्रश्न आहे.
बहुमत मिळणे म्हणजे सत्तेला अमर्याद अधिकार मिळणे नव्हे. सरकारवर टीका करणे म्हणजे देशाचा अपमान करणेही नव्हे. देश म्हणजे केवळ सत्तेवर असलेल्या व्यक्ती नाहीत. देश म्हणजे नागरिकांचे अधिकार, स्वातंत्र्य, न्याय आणि संविधानाने दिलेली प्रतिष्ठा. संस्थांची स्वायत्तता, निर्भय पत्रकारिता, विरोधी मतांचा सन्मान आणि शांततापूर्ण आंदोलनांचा अधिकार हे लोकशाहीचे अविभाज्य घटक आहेत. कायद्याचे उल्लंघन झाल्यास पुराव्यांच्या आधारे, कायद्यानुसार आणि कोणताही दुजाभाव न करता कारवाई व्हायला हवी. असहमतीला शत्रुत्व समजणारी सत्ता आणि प्रत्येक विरोधाला देशविरोधी ठरविणारी मानसिकता लोकशाहीच्या मुळावर घाव घालते.
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा सांगताना समता, शिक्षण आणि सामाजिक न्याय ही मूल्ये प्रत्यक्ष जगावी लागतात. विद्यार्थ्याला गुणवत्तेच्या आधारे संधी मिळणे, शेतकऱ्याला न्याय्य मोबदला मिळणे, सामान्य नागरिकाचे काम लाचेशिवाय होणे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्याला राजकीय निष्ठेच्या कसोटीवर न मोजणे, यातूनच संविधान जिवंत राहते. सामाजिक परिवर्तनाची जबाबदारी केवळ महापुरुषांच्या विचारांचा जयघोष करण्याने पूर्ण होत नाही; त्या विचारांच्या आचरणातून होत असते.
यंदाच्या दसऱ्याचे सीमोल्लंघन केवळ परंपरेपुरते मर्यादित राहू नये. जात, धर्म, भाषा आणि प्रांताच्या भिंती ओलांडून माणुसकीला प्राधान्य देण्याचे ते निमित्त ठरावे. अफवांऐवजी तथ्ये, द्वेषाऐवजी विवेक आणि आंधळ्या समर्थनाऐवजी चिकित्सक विचार स्वीकारण्याचा निर्धार व्हावा. भ्रष्टाचाराचा निषेध करताना स्वतःच्या गैरव्यवहारांकडे डोळेझाक करायची नाही आणि लोकशाहीचा पुरस्कार करताना आपल्या मताविरुद्ध बोलणाऱ्याचा आवाजही दडपायचा नाही. बदलाची सुरुवात दुसऱ्याने करावी, अशी अपेक्षा ठेवणारा समाज स्वतः कधीच बदलत नाही.
रावणदहनाचा खरा अर्थ अन्यायाला आपल्या आयुष्यात कोणतीही जागा न देण्यात आहे. जेव्हा तरुणाला नोकरीसाठी वशिला लागणार नाही, शेतकऱ्याला सन्मानाने जगण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही, रुग्णाला उपचारांसाठी सर्वस्व पणाला लावावे लागणार नाही आणि नागरिकाला न्याय मागताना जात, धर्म किंवा राजकीय ओळख सांगावी लागणार नाही, तेव्हाच रावणी प्रवृत्तींच्या पराभवाची सुरुवात होईल. सत्तेने प्रश्नांना घाबरण्याऐवजी उत्तरे द्यावीत, समाजाने अन्यायाला ओळखीच्या आधारावर माफी देणे थांबवावे आणि प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या विवेकाशी प्रामाणिक राहावे. कारण रावणाचा पुतळा जाळणे हा उत्सव आहे; पण रावणाला जन्म देणारी मानसिकता जाळणे हे समाज परिवर्तन आहे. यंदा अग्नीच्या ज्वाळा केवळ पुतळ्यापर्यंत पोहोचू नयेत, त्या आपल्या पूर्वग्रहांपर्यंत, भ्रष्ट व्यवस्थेपर्यंत आणि सत्तेच्या अहंकारापर्यंत पोहोचल्या पाहिजेत; अन्यथा दरवर्षी रावण जळतच राहील.
prakashrsawant@gmail.com