

प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी
खरं सांगू का? जेवणाखाण्याच्या कॉम्बिनेशन्सची आपल्याला एवढी सवय झालेली असते की त्या जागी दुसरं काही आलं तर ते आपल्याला रुचत नाही. म्हणजे बघा हं! मेथी किंवा लाल माठाची परतून केलेल्या खमंग भाजीचा दरवळ नाकात शिरताच पोटात भुकेने कालवाकालव सुरू होते. जोडीला तव्यावरची गरम ज्वारीची भाकरी, शेंगदाण्याची चटणी आणि त्यावर साईचं दही. काय बेत जमतो सांगू? पण हीच पालेभाजी, टोमॅटोचं सार, वाफाळलेला भात यासोबत पानात आली तर सगळाच मूड ऑफ होतो. भाकरीसोबत पालेभाजी खुलते, पण खमंग झुणका असेल तर काय सांगू महाराजा! तेल लावत गेली ती पंचपक्वान्न.
आमच्या सारस्वतात चण्याच्या डाळीची आमटी किंवा सोललेल्या मुगाच्या मुगागाठी करतात, पण कट्टर सारस्वताच्या घशातून ही दुरदुरीत रसदार आमटी नुसती उतरत नाही. त्यामध्ये काजुगर, ओल्या नारळाच्या कातळ्या पाहिजेतच. मऊ भात, त्यावर कढवलेल्या तुपाची धार, त्यावर भरपूर मेतकूट आणि तोंडी लावायला पोह्याचा पापड. अहो एवढ्या साध्या जेवणाचा काय मस्त बेत जमून जातो. सुख सुख म्हणजे दुसरं काय असतं?
उकडीचे मोदक हा पदार्थ ज्याने कुणी शोधलाय त्याचे मोदकासहीत पाय धरावे असं मला वाटतं. पण ती उकडही योग्य व्हायला हवी आणि हाताच्या तळव्यांना चटके खात ती व्यवस्थित मळायलाही हवी. आता त्याच्या कळ्याबिळ्या फार सुबक सुंदर असाव्यात या मताचा मी अजिबात नाही. मोदक दिसायला नाही चवीला सुंदर झाला पाहिजे. मऊ लुसलुशीत मोदकाची पारी, तिच्यात लिंबाएवढा गुळचुनाचा गोडमिष्ट गोळा आत गेला की, हातावर फिरवत फिरवत आणि सगळ्या पाकळ्यांना एकत्र करत तो छान गोंडस पांढऱ्या शुभ्र मोदकाचं रूप घेतो आणि उकडपात्रात स्थानापन्न होतो. स्वादासाठी पात्रात खाली हळदीचं पानही ठेवतात. सगळं जेवण झाल्यावर शेवटी खायला एक मोदक ठेवायचा. तो खाल्ल्यावर दुसरं काहीही तोंडात टाकायचं नाही. ती जिभेवरची चव जाऊ द्यायची नाही.
आता पुरणपोळी की गुळपोळी? यामध्ये प्रत्येकजण आपापली आवड सांगेल. पण मला म्हणाल तर गुळपोळीच भावते. फक्त इथे तिच्यासोबत कढवलेलं तूप न घेता, रवाळ घट्ट तुपाबरोबर गुळपोळीचा खुसखुशीत तुकडा लावून खायचा.
हल्ली ‘केरीनो रस’ या नावाखाली आयता विकत मिळणारा आमरस गल्लोगल्ली दुकानात मिळतो. मँगोलाची थोडी जाडसर आवृत्ती असं फारतर त्याला म्हणता येईल. रस काढल्यावर त्यातल्या गुठळ्या अज्जीबात मोडायच्या नाहीत. त्यात साखर आणि थोडं तूप (कढवलेलं) घालायचं. आता कुणी म्हणेल वेलचीपूड, मिरपूड? आपल्याला आमरस हाणायचाय. हे सगळं घालून औषधी चाटण करायचंय का? तर त्यावर म्हणतात, ‘मग बाधत नाही.’ माफ करा, पण बाधतो त्यांनी खाऊच नये.
दिवाळीच्या फराळात माझी आई बाकरवडी हा पदार्थ करायची. यामधलं सारण मात्र तिखट असायचं. ते एकदा करून ठेवलं की, वरच्या कव्हरसाठी कधीही पीठ मळून गरम गरम बाकरवड्या करता येत असत.
माझी बायको गाजर हलवा, दुधी हलवा दोन्ही बनवते. आता दोन्ही का? तर मुलगा गाजर हलवा खातो, दुधी हलव्याला शिवतही नाही तर माझी लेक दुधी हलवा चापून खाते आणि गाजर हलवा प्रसादासारखा हातावर घेते.
आता गाजर हलवा हा आमच्याकडे फक्त गाजर, तूप, साखर आणि दूध एवढ्या घटकांनीच बनतो आणि तसाच आवडतो. त्यामध्ये भरपूर सुका मेवा वगैरे कोंबून तो फक्त श्रीमंती होतो आणि मूळ गाजर आणि तुपाचा स्वादच हरवून जातो. तुपात गाजर शिजल्यावर त्यात घातलेल्या दुधाचा गाजर तुपासह जो स्वाद दरवळतो त्याशिवाय हलव्याला दुसऱ्या कशाचीही जरूरी नसते. पण दुधी हलव्याचं तसं नसतं. आधी दुधी कोवळा मिळायला हवा. तो जून असेल तर हलवा चवचवीत होतो. मावा, साखर आणि चारोळी बस्स. एवढ्यावर तो अगदी चविष्ट होतो.
केळ्याचं शिकरण हा प्रकार मला लहानपणापासून अगदी आज साठी पार केलीय तरी मनापासून आवडतो. पण याचं सुद्धा एक तंत्र आहे. दुधात भराभरा केळं कापून घातलं, साखर घातली झालं असा होत नाही, तर सर्वप्रथम लहानशा पण खोलगट भांड्यात दूध घेऊन त्यात आवडीनुसार साखर घालायची आणि ती पूर्ण विरघळेपर्यंत ढवळायची. नंतर पिकलेल्या केळ्याचे पातळ गोल काप मस्त चुरडून ते दुधात घालून पुन्हा एकदा चांगले ढवळावे. केळ्याचा गोडवा पूर्णपणे दुधात उतरल्यावर शिकरण ओरपण्याची मज्जा काही औरच आहे. माझी मामी केळ्याचं रसायण करायची. रसायण म्हणजे नारळाचं दूध काढून त्यामध्ये केळ्याचे काप घालून बनायचं. अर्थात त्यावेळी नारळ स्वस्तही होते आणि त्याच्या रसाला गोडी आणि दाटपणा असायचा. रसायणात साखर न घालता गूळ घातला तर फारच चवदार. तिसरा प्रकार केळ्याचं रायतं. दह्यात केळ्याचे काप, मिरची, साखर, मीठ घालून रायतं छान लागतं.
सारस्वतांच्या घरात बनणाऱ्या माशाच्या आमट्या म्हणजे काय सांगू महाराजा. नारळाच्या रसातल्या या कोळंबी, पापलेट, रावस या माशांची आमटी एकदा खाल्ल्यावर कुणीही आमटीच्या प्रेमात पडणारच.
पदार्थ रुचकर होतो तो त्यामधल्या सगळ्या घटकांमुळे नाही, तर तो पदार्थ बनवणाऱ्या गृहिणीच्या हातामुळे. त्या हाताला चव असते. हाताची चव आणि आपल्या माणसांना चविष्ट आणि पोटभर खाऊ घालण्याचा तिच्या मनातला भाव हे त्या पदार्थात उतरतात आणि तो पदार्थ चवदार होतो. अहो! नाहीतर पुस्तकात असतंच की लिहिलेलं अर्धा इंच आलं, पाव इंच अमुक, सव्वादोन चमचे तमुक. या सगळ्यातून एक काहीतरी आकाराला येतं खरं, पण ते खाल्ल्यावर वाह! मस्तच! हे मात्र उत्स्फूर्तपणे येत नाही.
बरेच लोक गोडाचा शिरा करतानाही त्यामध्ये बदाम, पिस्ते, काजूचे तुकडे असं काय काय घालतात. पण फक्त पिकलेलं केळं आणि वेलची पूड घालून केलेला गोडाचा शिरा यालाच काही प्रसादाचा शिराही म्हणतात. सकाळी केलेला शिरा संध्याकाळी आणखीन चविष्ट होतो, कारण केळं जसजसं त्यात मुरत जातं तसतशी शिऱ्याची चव आणखीनच यम्मी होते.
दूध-पोहे यासारखा पौष्टिक आहार नाही. कॉर्नफ्लेक्स किंवा ओट्स खाण्यापेक्षा दूध-पोहे खरच चांगले.
नारळीभात हा एक चविष्ट आणि खाल्ल्यावर प्रचंड सुस्ती आणणारा पदार्थ. माझी बहीण नारळीभात करते त्याला खरच तोड नाही. नारळी पौर्णिमेला तिच्या हातचा नारळीभात खाल्लेल्या प्रत्येकाला त्या दिवशी तिची आणि नारळीभाताची आठवण येणार नाही हे शक्यच नाही.
हे सगळं वाचल्यावर मी अट्टल गोडखाऊ आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल. खरं म्हणजे मी गौड सारस्वत ब्राह्मण. पण मला समिष आहार लहानपणापासून फारसा आवडलाच नाही. माझी मित्रमंडळी, नातेवाईक ‘तू सारस्वतांच्या नावाला काळिमा आहेस’ असं नेहमीच गमतीने म्हणायचे.
तर मुद्दा काय, खाताना पदार्थांचं व्यवस्थित कॉम्बिनेशन करून त्याचा आनंद घ्या. मित्रांनो, कोरोना काळात कित्येकांना दोन वेळचं जेवण मिळणंही कठीण झालं होतं. अनेक सुहृदानी आजूबाजूच्या गरीब भुकेल्या लोकांना खाऊ घातलं, आपल्या मनातलं सामाजिक भान जागं ठेवलं. थोडक्यात, आपली जी खाण्याची आवड असते ती जपावी. अन्नसेवन करताना मनात काय विचार असावेत हे सांगणाऱ्या एका श्लोकाने या लेखाची सांगता करतो.
मुखी घास घेता करावा विचार
कशासाठी हे अन्न मी सेवणार
घडो माझिया हातूनी देशसेवा
म्हणोनि मिळावी मला शक्ती देवा.
लेखक, निवेदक, कवी
kprasad1959@gmail.com