तांड्यावरचं शिक्षण

शिक्षणाची गाडी पकडणं आजही अनेक गावांमधल्या, भटके आयुष्य जगणाऱ्या तांड्यावरच्या मुलांसाठी सहजसोपं नाही. घरातली गरीबी त्यांच्या शिक्षणाच्या आड येते. पण तरीही शिक्षकांच्या प्रयत्नाने आणि या मुलांच्या अंगभूत जिद्दीने पैसे कमवता कमवता ही मुलं शिकत आहेत. २० नोव्हेंबरला जागतिक बाल दिन साजरा करताना कष्टकरी मुलांच्या या कर्तृत्वालाही सलाम करायलाच हवा.
तांड्यावरचं शिक्षण
Published on

बालविश्व

युवराज माने

शिक्षणाची गाडी पकडणं आजही अनेक गावांमधल्या, भटके आयुष्य जगणाऱ्या तांड्यावरच्या मुलांसाठी सहजसोपं नाही. घरातली गरीबी त्यांच्या शिक्षणाच्या आड येते. पण तरीही शिक्षकांच्या प्रयत्नाने आणि या मुलांच्या अंगभूत जिद्दीने पैसे कमवता कमवता ही मुलं शिकत आहेत. २० नोव्हेंबरला जागतिक बाल दिन साजरा करताना कष्टकरी मुलांच्या या कर्तृत्वालाही सलाम करायलाच हवा.

दसरा-दिवाळी असो की नाताळ असो, शहरांमध्ये दिव्यांच्या रोषणाईने घरं उजळून निघालेली असतात. पण आमच्या या छोट्याशा तांड्यावर मात्र त्या दिव्यांची चमक पोहोचतच नाही. येथे मुलांच्या हातात फुलबाज्या नसतात, तर कापसाच्या झुडपांवरून उचललेली पांढरी फुलं असतात. त्यातून मिळणाऱ्या पैशांनी ते स्वतःचं भविष्य उजळवतात.

मी या दुर्गम भागातील प्राथमिक शाळेचा शिक्षक. आमची शाळा म्हणजे रानातली एक जिद्दी फुलं फुलवणारी छोटी बागच जणू ! शाळेच्या भोवती मोकळं आभाळ, दूरवर साखर कारखान्यांच्या गाड्या, आणि हातात कोयते घेऊन जाणारी लेकरं. कोणतीही सुट्टी जवळ आली की माझ्या लेकरांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चिंता दिसते, "गुरुजी, आता काही दिवस भेट नाही"

ते बोलताना त्यांचा आवाज थरथरतो. मीही काही बोलू शकत नाही. फक्त एकच सांगतो, "कुठेही जा, पण शिकणं थांबवू नका !"

या दिवाळीच्या सुट्टीत कोण काय करणार याची चर्चा सुरु होती. प्रत्येकाने आपण कुठे जाणार, हे सांगितलं. इतर मुलं बोलत असताना आमच्या या तांड्यावरच्या मुलांनी सांगितलं, "गुरुजी, आम्ही कापूस वेचायला जाणार, सोयाबीन काढायला जाणार, मिळेल ते काम करणार." त्यांच्या आवाजात ना तक्रार, ना आळस.

फक्त एकच स्वप्न होतं - "कमवायचं आणि शिकायचं." -

त्या पैशातून काय काय करणार, हे सांगताना आमची ही मुलं म्हणाली, "गुरुजी, आम्ही स्पर्धा परीक्षेची फी भरू, सहलीला जाऊ"

ते ऐकताना माझ्या डोळ्यांत पाणी आलं.

या तांड्यावरच्या जगात शिक्षण म्हणजे फक्त अक्षरओळख नव्हे, तर आयुष्याचा अर्थ समजणं आहे. तांड्यावरुन शाळेपर्यंतचा प्रवास म्हणजे दररोजचा संघर्ष. काहींच्या घरी पुस्तकं नाहीत, वह्या नाहीत, पेन नाही.

कुणाची परीक्षा जवळ आली की फी भरण्याचेही पैसे नाहीत. सहल काढायची म्हटलं तर गाडीचं भाडंही नाही. पण तरीही या लेकरांच्या डोळ्यांत उजेड आहे.

पूर्वी शाळेत हजेरी कमी होती. ऊसतोडीला गेलेली लेकरं महिनोन् महिने परत येत नसत. पालकांसोबत तिथेच थांबत. शिक्षण त्यांना परकं, दूरवरचं वाटायचं. तेव्हा आम्ही शिक्षकांनी ठरवलं, काही झालं तरी या लेकरांना गमवायचं नाही.

आम्ही शाळेत 'आनंदाचं झाड' हा उपक्रम राबवला. या झाडाखाली आम्ही प्रत्येक लेकराला आपली जागा, आपली ओळख दिली. शिकण्यात आनंद आहे, हे पटवून दिलं. त्यांच्या छोट्या छोट्या प्रयत्नांचं कौतूक केलं.

थोडं गायलो, थोडं खेळलो, थोडं वाचलं. हळूहळू लेकरं शाळेत स्थिरावू लागली, पटावर टिकायला लागली.

कधी शाळेतून परतताना काहींच्या हातात वहीऐवजी कोयता असतो.

त्यांना मी विचारतो, "थकलास का रे?" तो हसून म्हणतो, "नाही गुरुजी, आज कमावलं. उद्या लिहायला शिकतो."

ही त्यांची जिद्द मला रोज नव्यानं शिकवते. कधी सहलीचा विषय निघाला की लेकरं म्हणतात, "गुरुजी, आम्ही स्वतःचे पैसे जमवतो. कापूस वेचून, जनावरं राखून. तेवढे पैसे जमवले तर तुम्ही घेऊन जाल का?"

त्यांच्या या प्रश्नातच त्यांची आत्मनिर्भरता, त्यांची किमया दडलेली असते. या लेकरांचं जगणं म्हणजे एक जिवंत धडा आहे. तो म्हणजे - अडचणी शिकवतात, पण आशा जगवतात. तांड्यावरच्या या मुलांचं शिक्षण म्हणजे शाळेच्या भिंतींतलं नाही, तर रानातलं, उन्हातलं, मातीमधलं शिक्षण आहे. पिक कसं उगवतं, धान्य कसं दळलं जातं, हे ते शिकतात आणि त्याचबरोबर आयुष्य कसं घडवलं जातं, हेही शिकतात.

कधी परीक्षा जवळ आली की काही लेकरं चप्पलशिवाय येतात. कुणी वही न मिळाल्यामुळे मागच्या पानावरच लिहितं.

पण तरीही शाळेच्या अंगणात हशा असतो. कारण या लेकरांना माहीत आहे, "शिक्षण हाच आमचा सण आहे."

या दुर्गम तांड्यावर पुस्तक उघडणं म्हणजे धैर्याचं काम आहे. पण माझी लेकरं रोज ते करतात. थकलेले हात धुऊन, धुळीने माखलेले कपडे झटकून ते वर्गात येतात आणि म्हणतात, "गुरुजी, वाचूया ना आज थोडं !"

हाच तर खरा बालदिन आहे, मुलांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने भरलेला.

तांड्यांवरचं ज्ञान म्हणजे मातीचा सुगंध, मेहनतीचं सोनं, आणि स्वप्नांची मशाल. या लेकरांसारखी मुलं म्हणजेच खरे हिरो - जे आयुष्याशी झगडतायत, पण हार मानत नाहीत.

त्यांची झुंजच त्यांचं शिक्षण आहे आणि त्यांचं भविष्यही!

जागतिक बाल दिनानिमित्त या मुलांना सलाम!

शिक्षण क्षेत्रातल्या विविध विषयांवर लेखन करणारे प्रयोगशील शिक्षक

logo
marathi.freepressjournal.in