अंड्यातून जन्मणारे सस्तन प्राणी

उत्क्रांतीच्या महाप्रवासात निसर्गाने अनेक विलोभनीय जीव निर्माण केले, पण 'प्लॅटिपस' आणि 'इचिडना' यांसारखे प्राणी विज्ञानालाही कोड्यात टाकतात. सस्तन असूनही अंडी घालणाऱ्या या 'मोनोट्रेमाटा' गटातील प्राण्यांचे अस्तित्व म्हणजे निसर्गातील एक दुर्मिळ आणि आश्चर्यकारक चमत्कार आहे. चला, या आगळ्यावेगळ्या जीवसृष्टीचा वेध घेऊया.
अंड्यातून जन्मणारे सस्तन प्राणी
Published on

अजब निसर्ग

मकरंद जोशी

उत्क्रांतीच्या महाप्रवासात निसर्गाने अनेक विलोभनीय जीव निर्माण केले, पण 'प्लॅटिपस' आणि 'इचिडना' यांसारखे प्राणी विज्ञानालाही कोड्यात टाकतात. सस्तन असूनही अंडी घालणाऱ्या या 'मोनोट्रेमाटा' गटातील प्राण्यांचे अस्तित्व म्हणजे निसर्गातील एक दुर्मिळ आणि आश्चर्यकारक चमत्कार आहे. चला, या आगळ्यावेगळ्या जीवसृष्टीचा वेध घेऊया.

आपल्या पृथ्वीवर करोडो वर्षांपूर्वी जीवसृष्टीचा उगम झाला. पुढे लाखो वर्षं त्या जीवांमध्ये जगण्यासाठी अनुकूल असे बदल घडत गेले आणि जमीन-आकाश-पाणी व्यापणारे वेगवेगळे जीव आकाराला आले. या उत्क्रांतीच्या चक्रात जगण्यास श्रेष्ठ तोच टिकून राहील या न्यायाने जितके जीव तगले, टिकले त्यापेक्षा अधिक नष्ट झाले. पण याच प्रवासात जीवसृष्टीतले घटक वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले गेले. त्या त्या गटाची नैसर्गिक वैशिष्ट्ये, गुणधर्म हे त्या गटाचा सभासद असल्याची मोठी खूण ठरली. म्हणजे कीटकही उडतात आणि पक्षीही उडतात, पण पक्ष्यांचं शरीर पिसांनी बनलेलं असतं तर किटकांचं कायटिननं. पक्षी अंडी घालतात तसेच सरपटणारे प्राणीही अंडी घालतात, पण सरपटणारे प्राणी थंड रक्ताचे असतात व पक्षी उष्ण रक्ताचे असतात. पक्ष्यांप्रमाणेच सस्तन प्राणीही उष्ण रक्ताचे असतात परंतु ते पक्ष्यांसारखे आकाशात उडू शकत नाहीत. सस्तन प्राण्यांमधले काही प्राणी सागरातही राहतात पण सागरातील माशांप्रमाणे कल्ल्यांनी श्वास घेत नाहीत तर इतर सस्तन प्राण्यांप्रमाणे त्यांना फुफ्फुसे असतात. अशा फरकांमुळेच त्या त्या जीवाची ओळख पक्की होते. मात्र या अजब निसर्गात कधी कधी असेही चमत्कार बघायला मिळतात की ज्यामुळे गोंधळून जायला होतं.

असाच एक बुचकळ्यात टाकणारा प्राणी १८ वे शतक संपता संपता युरोपमधल्या प्राणी तज्ज्ञांच्या समोर आला, तोही थेट ऑस्ट्रेलिया येथून. तो पाहिल्यावर युरोपमधील प्राणी शास्त्रज्ञांचा भलताच गोंधळ उडाला. अनेकांना तो नमुना म्हणजे काहीतरी फसवणुकीचा प्रकारच वाटला. कारण तो नमुना होताच तसा विचित्र. बिव्हरसारख्या प्राण्याला बदकाची चोच जोडली आणि त्याच्या पायांना कातडी पडदे लावले तर जसं दिसेल तसा तो प्राणी दिसत होता. नंतर काही काळाने त्या प्राण्याचा जिवंत नमुना पाहिल्यावर मात्र निसर्गात खरोखरच असा अगदीच आगळावेगळा प्राणी असल्याची खात्री पटली. या प्राण्याला त्याच्या सपाट, फताड्या पंज्यांवरून ‘प्लॅटिपस’ म्हणजे सपाट पायाचा असेच नाव मिळाले. त्याच्या बदकासारख्या चोचीमुळे ‘डकबिल प्लॅटिपस’ असेही म्हणतात. या प्राण्याचा अधिक अभ्यास केल्यावर लक्षात आले की, हा खरोखरच जगावेगळा प्राणी आहे. कारण हा सस्तन प्राणी असूनही अंडी घालतो. वीणीचा हंगाम वगळता प्लॅटिपस नदी किंवा जलाशयाच्या काठावर पाण्याच्या पातळीच्या सुमारे एक फूट वरती बिळ करून राहतात. अंडी द्यायची वेळ येते तेव्हा मादी अंड्यांसाठी वेगळे बिळ खोदते जे ६०-६५ फूट लांब असते. जलाशयाच्या पाण्याची पातळी वाढलीच तर सगळे पाणी आत शिरू नये म्हणून, त्यात अंतरा अंतरावर अडथळे उभारलेले असतात. प्लॅटिपसची मादी आधी सुमारे २८ दिवस आपल्या पोटातच अंडी उबवते आणि नंतर बाहेर काढून सुमारे १० दिवस पुन्हा उबवते. अंड्यातून बाहेर आलेली पिल्ले अतिशय नाजूक असतात, त्यांना दृष्टी नसते, त्यांच्या अंगावर केस नसतात. साधारण चार महिने प्लॅटिपसची मादी त्या बिळात आपल्या पिल्लांना वाढवते, मग ते बाहेर येऊन स्वतंत्रपणे जगू लागतात.

ऑस्ट्रेलिया खंडातील इतर प्राण्यांचा अभ्यास करताना प्लॅटिपसच्या प्रकारातील म्हणजे सस्तन असून अंडी घालणारा आणखी एक प्राणी आढळून आला, तो म्हणजे ‘इचिडना’. साळींदरासारखा दिसणारा हा लहानसा प्राणी ‘स्पायनी ॲन्ट इटर’ या नावानेही ओळखल जातो. या इचिडनच्या चार प्रजाती आणि प्लॅटिपस असे फक्त पाचच सस्तन प्राणी अंडी देतात. त्यांचा ‘मोनोट्रेमाटा’ असा वेगळाच गट मानला जातो. इचिडना हा प्राणी उत्क्रांतीच्या चक्रात सुमारे २० ते ५० दशलक्ष वर्षांपूर्वी जन्माला आला. याचे पूर्वज जलचर होते, मात्र आज आढळणारे इचिडना भूचर आहेत. भारतात मिळणाऱ्या साळींदरासारखा इचिडना दिसतो. रोमन भाषेतील ‘इखिनॉस’ म्हणजे ‘हेजहॉग सी अर्चिन’ या नावावरून इचिडना हे नाव पडल्याचे मानले जाते. प्रामुख्याने वाळवी, मुंग्या यावर गुजराण करणाऱ्या इचिडनाला तोंडात दात नसतात. जमिनीत बिळ खोदण्यासाठी मजबूत पाय आणि मोठ्या, ताकदवान नख्या असतात. इचिडना मादीच्या पोटावर एक पिशवी असते, ती आपले अंडे त्याच पिशवीत घालते. दहा दिवसांनंतर अंड्यातून जे पिल्लू बाहेर येते ते अतिशय नाजूक आणि अपुरी वाढ झालेले असते. ते पुढे ४५ ते ५५ दिवस याच पिशवीत राहते. नंतर आई त्याच्यासाठी मातीत एक खड्डा खणून पिल्लाला त्यात ठेवते. पिल्लू सात महिन्यांचे होईपर्यंत दर पाच दिवसांनी मादी त्याला दूध पाजायला येते.

हे अंड्यातून जन्माला येणारे सस्तन प्राणी आणि इतर सस्तन प्राणी यांच्यात काही फरक पाहायला मिळतात. प्लॅटिपस आणि इचिडनाला प्रौढावस्थेत इतर सस्तन प्राण्यांसारखे दात नसतात. इतर सस्तन प्राण्यांच्या तुलनेत यांचा चयापचयाचा वेगही अतिशय कमी असतो. याशिवाय प्लॅटिपस आणि इचिडना यांना मागच्या पायावर एक खुरासारखा अवयव असतो. इचिडनासाठी हा तसा निरुपयोगी अवयव असतो पण प्लॅटिपस मात्र या खुराच्या मदतीने आपले विष सोडतो. फक्त नर प्लॅटिपसनाच विष असते आणि त्याचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी, इतर नरांशी लढण्यासाठी केला जातो.

प्लॅटिपस आणि इचिडना या अंडी देणाऱ्या सस्तन प्राण्यांच्या ‘मोनोट्रेमाटा’ या गटाबद्दल १९ व्या शतकापर्यंत पुरेशी माहिती नव्हती आणि त्यामुळे काही गैरसमज प्रचलित होते. काही अभ्यासकांना असे वाटत होते की हे ‘अर्ध रेप्टाइल्स’ प्रकारचे प्राणी सस्तन प्राण्यांच्या गटात सगळ्यात शेवटी निर्माण झाले आहेत आणि अतिशय दुय्यम स्तरातले आहेत. मात्र ही समजूत चुकीची असल्याचे पुरावे फॉसिल्सच्या रूपाने मिळाले. ऑस्ट्रेलिया खंडात सुमारे ११० दशलक्ष वर्षांपूर्वीच्या मोनोट्रेमस प्रकारच्या प्राण्याचे जे फॉसिल्स मिळाले आहेत, त्यावरून हे कळतं की ते प्राणी आजच्या प्लॅटिपसपेक्षा वेगळे होते. प्लॅटिपसच्या संमिश्र शरीर वैशिष्ट्यांमुळे उत्क्रांतीचे दुवे शोधणाऱ्या संशोधकांना त्याचे संशोधन हे नेहमी आव्हान ठरत आले आहे.

निसर्गाच्या पसाऱ्यात प्रत्येक प्राण्याचे एक विशिष्ट असे स्थान आहे आणि त्यासाठीच तो प्राणी उत्क्रांतीच्या चक्रात निर्माण झालेला असतो. अंड्यातून जन्म घेणारे सस्तन प्राणी देखील याच नियमानुसार अस्तित्वात आले आहेत आणि एका विशिष्ट मर्यादित भूप्रदेशापुरते सीमित राहिलेले आहेत.

निसर्ग अभ्यासक व लेखक

makarandvj@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in