''हत्तींना त्यांचे घर द्या''; एलिफंट व्हिस्पररची मागणी

प्राण्यांचं जग आणि माणसांचं जग यामधला दुरावा जणू ‌वाढतोय, अशा घटना आजूबाजूला घडत आहेत. दिल्ली शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्रात कबुतरं आणि कोल्हापूरची माहेरवाशीण असलेली माधुरी हत्तीण यामुळे वादविवाद सुरू आहे.
''हत्तींना त्यांचे घर द्या''; एलिफंट व्हिस्पररची मागणी
Published on

भवताल

रिटा कदम-पालांडे

प्राण्यांचं जग आणि माणसांचं जग यामधला दुरावा जणू ‌वाढतोय, अशा घटना आजूबाजूला घडत आहेत. दिल्ली शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्रात कबुतरं आणि कोल्हापूरची माहेरवाशीण असलेली माधुरी हत्तीण यामुळे वादविवाद सुरू आहे. अशा वेळी प्राण्यांच्या जगात वावरत त्यांची भाषा शिकून घेणं, त्यांच्याशी संवाद साधणं ही अनोखी बाब आहे. आज अशा संवादाची अधिकाधिक गरज असताना हत्ती संवादक आनंद शिंदे काय म्हणतात ते समजून घेणं आवश्यक आहे.

प्रत्येक प्राण्याची स्वतःची अशी एक भाषा असते. जशी माणसाची स्वत:ची भाषा आहे, तशी ती प्रत्येक पशुपक्ष्याजवळ असते. गरज असते ती पशूपक्ष्यांची भाषा समजून घेण्याची. सर्वसाधारणपणे माणसांना प्राण्यांची भाषा समजत नाही. मात्र जगात अशी काही माणसं आहेत, जी प्राण्यांशी अगदी माणसांप्रमाणे संवाद साधतात. अगदी आपल्या मातृभाषेतून, मराठीमधूनही संवाद साधतात. त्यापैकीच एक आहेत आनंद शिंदे.

हत्तीसोबतचं आनंद शिंदे यांचं काम खरंच खूप अचंबित करणारं आहे. ठाण्यातील एक तरुण फोटोग्राफर १०-१५ वर्षांतील आपल्या कामातून आपला वेगळेपण जपतो. फोटो काढता काढता हत्तींचा दोस्त बनतो आणि हळूहळू त्यांची भाषाही समजून घेतो. ‘एलिफंट व्हिस्परर’ म्हणून ओळख मिळवतो. एका फोटो प्रोजेक्टच्या निमित्ताने आनंद शिंदे यांची हत्तींसोबत रोज भेट होऊ लागली. हत्तींचे फोटो काढायचे, व्हिडीओ काढायचे. नंतर घरी जाऊन ते नीट पाहायचे. यातून त्यांना हत्ती समजत गेला. हत्तींना बोलतं करणाऱ्या आनंद शिंदे यांना खास ‘अक्षररंग’साठी बोलतं केलं आहे.

तुम्ही हत्तींसोबत संवाद कसा साधता?

सुरुवातीला हत्तीचे जे रंब्लिंग (rumble) पॅटर्न्स असतात, गडगडाटी आवाज करण्याच्या ज्या पद्धती असतात त्या मी समजून घेतल्या. खरं तर अजूनही ते सगळे पॅटर्न मी समजून घेतोय. हत्ती जे काही वेगवेगळे आवाज काढतात ते आपल्याला काढता येतील का, असे वाटून मी तसे आवाज काढण्याचा प्रयत्न करू लागलो. हत्ती स्टमक रंब्लिंग करतात. त्यांच्या एवढ्या मोठ्या पोटातून येणारा आवाज हा घुमारायुक्त असतो, गडगडाटी असतो. आपण माणसं घशातून आवाज काढतो. सुरुवातीला मी स्वतःच्या पोटाला त्रास देत पोटातून आवाज काढण्याचा प्रयत्न केला. पण घशातून येणारा आवाज आणि पोटातून येणारा आवाज या दोन्ही आवाजांमध्ये फरक आहे. हळूहळू हत्तींचं आणि माझं कम्युनिकेशन होत होतं आणि एका पॉइंटला माझ्या लक्षात आलं की, मला रंब्लिंग करण्याची गरज नाही. हत्तीला माझी भाषा समजतेय आणि त्याला मला काय म्हणायचंय हे समजतंय. त्यामुळे मी मराठी बोलायला सुरुवात केली आणि त्यालाही त्या हत्तीने छान प्रतिसाद दिला.

नुकताच १२ ऑगस्टला जागतिक हत्ती दिन झाला. शिवाय सध्या महाराष्ट्रात माधुरी हत्तीणीच्या निमित्ताने वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तुम्ही हत्तींविषयी काय सांगाल?

हत्ती जितका मोठा आहे ना तितक्याच त्याच्या भावना मोठ्या, त्याचं दुःख मोठं आहे, त्याचा आनंद मोठा आहे. निसर्गामध्ये हत्तीचं जे स्थान आहे ते इतर प्राण्यांपेक्षा फार वरचं आणि वेगळं आहे. म्हणजे ज्यावेळी वाघाचं अस्तित्व जंगलात असतं त्यावेळी जंगलातले सगळे प्राणी सुदृढ आहेत, असं मानलं जातं. पण ज्यावेळी हत्ती जंगलात असतो त्यावेळी आपण असं ठामपणे म्हणू शकतो की, त्या जंगलाचं निसर्गचक्र सुदृढ आहे. पण माणसाने जंगलामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली आणि हत्तींचा स्ट्रगल सुरू झाला. माणसांमुळेच हत्तींचा स्ट्रगल वाढतोय, हे त्यांच्यासोबत गेली अनेक वर्षं केलेल्या कामातून लक्षात आलं. हा हस्तक्षेप कमीत कमी असावा, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे.

एलिफंट व्हिस्पररचा तुमचा हा प्रवास सुरू असताना सर्वात आधी कोणत्या हत्तीसोबत तुमची मैत्री झाली?

खरं तर ती पिल्लं होती. मोठे हत्ती हे नंतर आले. काही सेपरेटेड बेबीज् होत्या कळपापासून वेगळ्या झालेल्या. मी त्यांचे फोटो काढत होतो. त्यावेळी एका बाळ हत्तीने हळूच येऊन माझ्या कानाला स्पर्श केला होता. त्या बेबी एलिफंटसोबतच मी हत्तींच्या अनोख्या आणि भव्य-दिव्य विश्वात पाऊल ठेवलं.

हत्ती हा प्राणी कसा आहे? प्रेमळ का रागीट? ते शेतात येऊन नासधूस का करतात?

रागीट हत्ती तुम्ही पाहिले असतील. अनेक रागीट हत्ती मी शांत केले आहेत. पण हत्ती हा मुळात अतिशय प्रेमळ प्राणी आहे. हत्तीच्या रागीट ॲक्शन्स ही दुसऱ्याच्या तशाच ॲक्शनला दिलेली रिॲक्शन असते. हत्ती स्वतःहून उगाच कोणाला तरी ठार मारतोय, असं होत नाही. तो मांसाहारी नसल्यामुळे खाण्यासाठीही तो कोणाला मारत नाही. त्याला त्याचं जंगल सुदृढ मिळालं, म्हणजेच आपलं सुरक्षित घर मिळालं की तो त्या जंगलात, घरात राहायला बघतो. माणसांच्या शेतात यायचीही त्याची इच्छा नसते. पण जर जंगलात खायलाच काही राहिलं नाही, एडिबल फॉरेस्ट असं जे म्हटलं जातं, तसं एडिबल फॉरेस्ट राहिलं नसेल, तर पोट भरण्यासाठी त्याला नाइलाजाने बाहेर शेतात यावं लागतं. आपण जसं पोटासाठी गावातून शहरात, ठाण्यातून मुंबईला, मुंबईतून दिल्लीला जातो, दिल्लीतून लंडनला स्थलांतर करत असतो, तसंच स्थलांतर हत्ती पोटासाठी करत असतात. इथे मुख्य मुद्दा आहे तो एडिबल फॉरेस्ट कमी झाल्याचा. म्हणूनच हत्तीही जगला पाहिजे आणि शेतकरीही जगला पाहिजे, असा मधला मार्ग आपण काढला पाहिजे. कोल्हापूरमधील आजरा-चंदगडमध्ये यासाठी आम्ही काही प्रयत्न केले.

हत्ती खरंच रडतात का?

होय, हत्ती रडतात. दु:खाने त्यांचे डोळे भरून येतात. पण त्यांच्या डोळ्यांमधून जे सतत पाणी येत असतं ते म्हणजे त्यांचे अश्रू नाहीत. आपल्याला जसा घाम येतो, तसा हत्तीला घाम येत नाही. त्याच्या त्वचेला घर्मरंद्र नसतात. त्यामुळे त्यांच्या सोंडेचं टोक हे सदैव ओलं असतं आणि डोळ्यातून सतत पाणी पाझरतं. पण हत्ती जेव्हा भावनाविवश होतो, तेव्हा ते त्याच्या एकूण देहबोलीतूनही दिसतं आणि त्यावेळी त्याचे डोळेही भरून आलेले असतात. अर्थात माणूस जसा ढसाढसा रडतो तसा हत्ती रडत नाही. पण त्याचं रडणं आपल्याला जाणवतं.

तुम्ही हत्तींशी मराठीत बोलता, अगदी त्यांना मराठी अंगाई गीत गाऊन दाखवता. संवादासाठी माध्यम म्हणून तुम्ही मराठी भाषा कशी निवडली?

माझी मातृभाषा मराठी आहे. मी विचार मराठीत करतो. मला स्वप्न मराठीत पडतात. म्हणजे कुठलीही गोष्ट आधी मला इंग्रजीत सुचत नाही. ती मराठीत सुचते आणि माझ्यासाठी ती भाषा सोपी आहे, रोजच्या वापरातली आहे. त्यामुळे त्या भाषेत बोलणं मला जास्त सोयीचं वाटतं. शिवाय माझ्या जेव्हा लक्षात आलं की, हत्तींना तुमचे शब्द कमी कळतात, शब्दांपेक्षा त्यांना तुमच्या भावना अधिक उमगतात, तुमच्या बोलण्याचा जो हेल असतो, जो टोन असतो, तो त्यांना बरोबर समजतो. मुख्य म्हणजे तुमचं व्हायब्रेशन, तुमच्या शरीरातून जी कंपनं निघत असतात, ती कंपनं त्यांना समजतात. म्हणजे उद्या जर मी एखाद्या अस्तित्वात नसलेल्या भाषेतही त्यांच्याशी बोललो तरी ते त्यांना कळतं. मी हा प्रयोग केलेला आहे. मी काय बोलतोय हे लोकांना कळू नये, फक्त हत्तींनाच कळावं असं मला वाटत असेल तर मी असं करतो. मी आवाज काढून रंबल करतो. त्यांना ते कळतं आणि तेही प्रतिसाद देतात.

हत्तीचा अभ्यास करताना हत्ती चकवा देतात का?

एक तर हत्तीला जर तुमच्यासमोर यायचंच नसेल तर तो पाच फूट आत जवळच्या झाडीत असला तरी तुम्हाला तो कळणार नाही आणि आपल्याला यांच्यापासून धोका नाही असं जर त्याला वाटलं तर तो अगदी अचानकही तुमच्या समोर येतो. सतत त्याचा कोणी माग काढलेलं त्याला आवडत नाही. त्यांचं स्वत:चं जग आहे, त्यात त्यांनाही प्रायव्हसी हवी असते. आपला अभ्यास करताना त्यांना त्रास होणार नाही, याचं भान बाळगावं लागतं. अभ्यासाच्या काही शास्त्रीय पद्धती आहेत, त्या वापराव्या लागतात. अनुभवातूनही काही गोष्टी कळत जातात. मी १४ वर्षं हत्तींसोबत काम करतोय, पण या चौदा वर्षांत मला एकही अपघात झालेला नाही. हत्ती कसे चालतात, कळपाला कसे सांभाळतात हे समजून घेणारी बारीक नजर हवी.

फोटोग्राफर ते एलिफंट व्हिस्परर या तुमच्या प्रवासात तुम्हाला अधिकृत मान्यता कधी आणि कशी मिळाली?

२०१५ मध्ये माझा पहिला रिसर्च पेपर ‘कम्युनिकेटिंग विथ एलिफंट डिस्कव्हरी’ हा दिल्लीत झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मी मांडला आणि त्याला मान्यता मिळाली. खरं तर मी बायोलॉजिस्ट नाही, व्हेटरनरी डॉक्टर नाही, की झुओलॉजिस्ट नाही. पण मी जो अभ्यास केला त्याचा आधार त्या रिसर्च पेपरला होता. त्यानंतर आम्ही हत्तींचा जो कॉरिडोर रिस्टोर केला त्या कामावर मी पेपर लिहिला. तोही स्वीकारला गेला.

तुमच्या उपक्रमांविषयी काही सांगाल. त्यात सहभागी व्हायचं असेल तर काय करायला हवं?

आमचं पेज आहे. त्या पेजच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. trunkcallfoundation@gmail.com इथे ईमेल करू शकता. कॉरिडोर रेस्टोरेशनचं जे काम होत असतं त्यात तुम्ही सहभाग घेऊ शकता. मात्र आम्ही छोट्या प्रशिक्षित गटासोबतच काम करतो. अपघात होऊ नये म्हणून आम्हाला सगळी काळजी घ्यावी लागते.

हत्तींचं महत्त्व स्पष्ट करताना काय सांगाल?

एकच सांगेन, जर हत्ती जगला तरच निसर्गचक्र चांगल्या पद्धतीने चालू शकेल आणि निसर्ग वाचला तरच आपण जगू शकू. आज जो काही क्लायमेट चेंज होतोय त्याला हत्ती हे फार स्ट्राँग आणि वजनदार उत्तर आहे. जगातला सगळ्यात मोठा मेंदू आणि सगळ्यात मोठं हृदय हत्तीकडे आहे. जर तुम्ही हत्तीच्या हृदयात बसलात तर हत्तीच्या आकाराचं प्रेम मिळेल, पण जर तुम्ही त्याच्या मेंदूत बसलात तर हत्तीच्या आकाराचा राग मिळेल.

हत्तीसोबतचा असा कोणता क्षण आहे जो कायम लक्षात राहतो?

एखाद्या चिडलेल्या हत्तीला शांत केल्यावर आणि तो शांत झाल्यावर जो आनंद मिळतो, तो एखाद्या लाइफटाइम एक्सपिरिअन्ससारखा असतो.

reetapalande@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in