मायेचं अथांग आभाळ!

हृदयाचे ठोके जेव्हा हळुवारपणे मंदावत होते आणि आता ता हे हृदय बंद पडतंय की काय अशी भीती वाटत होती, तेव्हाच मायेची एक फुंकर मिळाली आणि पुन्हा एकदा जगण्याची नवी उमेद जागृत झाली.
मायेचं अथांग आभाळ!
मायेचं अथांग आभाळ!
Published on

डॉ. तुषार प्रीती देशमुख

हृदयाचे ठोके जेव्हा हळुवारपणे मंदावत होते आणि आता ता हे हृदय बंद पडतंय की काय अशी भीती वाटत होती, तेव्हाच मायेची एक फुंकर मिळाली आणि पुन्हा एकदा जगण्याची नवी उमेद जागृत झाली. माझा जन्मच मुळी संघर्षातून झाला. मी जगेन की नाही याची शाश्वती स्वतः डॉक्टरांनाही नव्हती, पण माझ्या आईच्या विश्वासाने आणि तिने दगडूशेठ गणपती बाप्पाला घातलेल्या साकड्यामुळे मृत्यूच्या दाढेतून माझा प्रवास सुखरूप सुरू झाला.

लहानपणापासूनच मी आईचा पदर कधी सोडला नव्हता. आईवर आलेली भयंकर संकटं आणि तिने भोगलेल्या वेदना मी अगदी कोवळ्या वयात जवळून अनुभवल्या होत्या. वडिलांचा व्यवसाय बुडाल्यामुळे घरावर कर्जाचे डोंगर होते, त्या तणावातून वडिलांचा सगळा राग आईवर निघायचा. तिला होणारी मारहाण पाहून माझ्यात भयंकर चीड निर्माण व्हायची, पण माझी आई इतकी संयमी होती की ती नेहमी वडिलांची बाजू सावरून धरायची. "तुझ्या डॅडींचं आपल्यावर खूप प्रेम आहे," असे सांगून ती संसाराचा डोलारा सावरण्याचा प्रयत्न करायची. रात्री मला घट्ट मिठी मारून ती रडायची, तिला वाटायचं मी झोपलो आहे, पण तिच्या अश्रूचा प्रत्येक थेंब माझ्या मनावर कोरला जात होता. आई जिथे जायची तिथे मी सावलीसारखा तिच्यासोबत असायचो; मग ते मंडईत भाजी आणणं असो किंवा मच्छी मार्केट. तिच्या स्वयंपाकघरातील फोडणीचा स्वाद आणि ती ज्या मायेने पदार्थ बनवायची, तिथूनच नकळत माझं 'शेफ' होण्याचं प्रशिक्षण सुरू झालं होतं.

आईने घरकाम केलं, मुलांच्या शिकवण्या घेतल्या आणि शेकडो साड्यांना फॉल-बिडिंग करताना बोटं झिजेपर्यंत मेहनत घेतली, पण कधी कुणाकडे तक्रार केली नाही. संकट कितीही मोठं असो, न घाबरता त्याला धैर्याने सामोरं जाणं मी तिच्याकडूनच शिकलो. आम्ही जेव्हा दादरला राहायला आलो, तेव्हा परिस्थिती थोडी सुधारली होती. आईला जिंदाल मेंशनच्या कॅन्टीनमध्ये मॅनेजर म्हणून नोकरी मिळाली होती. पण सगळं काही सुरळीत असतानाच १२ मार्च १९९३ च्या बॉम्बस्फोटात आईचं दुर्दैवी निधन झालं आणि माझ्या आयुष्यातील रंगांचा बेरंग झाला. आईला शेवटची मिठी मारायची होती, तिला पाहायचं होतं, पण नियतीने ते सुखही हिरावून घेतलं. त्यानंतर वडिलांचं दुसरं लग्न आणि घरातील वादांमुळे मला घर सोडण्याची वेळ आली. सुलभशौचालयात आंघोळ करून आणि दिवसाला केवळ एक वडापाव खाऊन मी दिवस काढले. अनेक रात्री कॉलेजच्या कॅन्टीनबाहेर काढल्या. पण म्हणतात ना, देव एका आईचं छत्र हिरावतो तेव्हा दुसरी माऊली उभी करतो. माझ्या आयुष्यात ही 'यशोदा माता' म्हणून नीना काकी आल्या. त्यांनी मला पोटच्या मुलाप्रमाणे स्वीकारलं. माझ्या हातातील आईची फ्रेम पाहून त्यांनी जेव्हा माझ्या डोक्यावरून हात फिरवला, तेव्हा मला पुन्हा एकदा आईच्या मायेची उब मिळाली.

नीना काकींनी माझ्या पाककलेच्या आवडीला हक्काचं स्वयंपाकघर दिलं. त्यांच्याच सहकार्यामुळे मी टीव्हीवर पदार्थ सादर करू लागलो आणि महाराष्ट्रातील घराघरात 'शेफ' म्हणून ओळखला गेलो. २०१९ चं आजारपण असो किंवा कोरोनाचा काळ, काकी माझ्यासाठी ढाल बनून उभ्या राहिल्या. जेव्हा मला कोरोना झाला आणि बेड मिळत नव्हता, तेव्हा काकींनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तीन तास माझं डोकं मांडीवर घेऊन, डोक्यावरून हात फिरवत मला धीर दिला. आईच्या बाबतीत जे जे मला करता आलं नाही, ते सगळं करण्याची संधी मला काकींच्या रूपात मिळाली. आज आई आणि काकी दोघीही माझ्यासोबत नाहीत, पण माझ्या नावातील वडिलांचं नाव काढून आईचं नाव लावणं हा माझा त्यांना दिलेला सर्वात मोठा सन्मान आहे. आजही आईची नथ आणि काकींच्या साडीचा शेला जेव्हा मी वापरतो, तेव्हा या दोघीही माझ्या अवतीभवती असल्याची जाणीव मला बळ देते. आई असताना तिचं मोल ओळखा, तिला मिठी मारून तिचं प्रेम अनुभवा, कारण आईशिवाय हे जग खरोखरच पोरकं असतं. आईच्या मायेची ही सावली माझ्या 'शून्य बघितलेला माणूस' या आत्मचरित्रात कायमची जिवंत राहील.

logo
marathi.freepressjournal.in