फुलांच्या ओंजळीत उमललेलं शिक्षकपण

शाळेच्या साध्या दारातून दररोज ज्ञानासोबतच मायेचा आणि संवेदनशीलतेचा सुगंधही उमलत असतो. फुलांच्या छोट्याशा ओंजळीतून लेकरांची मोठी मनं कशी खुलतात, याची ही हळवी गोष्ट.
फुलांच्या ओंजळीत उमललेलं शिक्षकपण
Published on

शिक्षणगुज

युवराज माने

शाळेच्या साध्या दारातून दररोज ज्ञानासोबतच मायेचा आणि संवेदनशीलतेचा सुगंधही उमलत असतो. फुलांच्या छोट्याशा ओंजळीतून लेकरांची मोठी मनं कशी खुलतात, याची ही हळवी गोष्ट.

‘शाळा म्हणजे लहान मुलांच्या जिज्ञासेचा दिवा पेटविण्याची प्रयोगशाळा… शिक्षकाने फक्त तो दिवा पेटवायचा; मग प्रत्येक मूल स्वतःच्या गतीने प्रगती करतं,’ असे समृद्ध विचार लिओ टॉलस्टॉय यांनी मांडले. टॉलस्टॉय काही काळ गुरुजी होते आणि त्यांच्या शाळेतली लेकरं त्यांना जीव की प्राण मानायची. एखादा गुरुजी मुलांच्या मनात इतका खोल कसा रुजतो, याचं मला नेहमीच अप्रूप वाटत राहिलं. म्हणूनच मी त्यांचं चरित्र वाचलं, त्यांच्या शैक्षणिक प्रयोगांचा अभ्यास केला…आणि एक सत्य उमगलं-लेकरं उगीच कोणालाही आपल्या मनात स्थान देत नाहीत; ते मन जिंकावं लागतं… प्रेमाने, सातत्याने आणि निरपेक्षपणे.

या विचारांच्या वाटेवर चालताना गेली अनेक वर्षं मी एक अनुभव घेतो आहे-लेकरांना मनापासून आपलंसं केलं की, त्यांच्या मनातलं सगळं आपोआप आपल्या ओंजळीत येतं. आपण थोडंसं दिलं, तरी ते ढीगभर परत देतात. निरागस असतात लेकरं अगदी ओंजळीतल्या फुलांसारखी!

माझी एक छोटीशी सवय- दररोज वर्गात येण्याआधी टेबलावर एखादं पान किंवा फूल ठेवायचो. त्या छोट्याशा कृतीतून दिवसाची सुरुवात सौंदर्याने आणि शांततेने व्हायची. लेकरं टीपकागदी असतात; गुरुजींचं प्रत्येक वागणं ते बारकाईने पाहतात. “हे असंच का?” “ते तसंच का?” असे प्रश्न विचारून मला कधी कधी भंडावून सोडतात. पण उत्तर मिळालं की त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारं समाधान म्हणजे माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार!

हळूहळू एक सुंदर बदल घडत गेला… मी विसरलो तरी करुणा, शीतल, खुशी, गुलशन, राधा, कल्याणी यांसारखी लेकरं न विसरता फुलं आणू लागली. त्यांच्या मनातली संवेदनशीलता, जिव्हाळा आणि जबाबदारी नकळत वाढत गेली.

आता तर शीतल ही या छोट्या परंपरेची जणू धडधडणारी नाडीच बनली आहे. शीतलचं व्यक्तिमत्त्व साधं, शांत; पण आतून अतिशय जागरूक आणि प्रेमळ. ती फार बोलत नाही; पण तिच्या कृतीतून तिचं मन सतत उमलत राहतं. शाळेत येताना रस्त्यात एखादं ताजं पान दिसलं की ती जपून उचलते… एखादं छोटंसं फूल सापडलं की तिच्या डोळ्यांत आनंद चमकतो- जणू ती गुरुजींसाठी खास भेट घेऊन चालली आहे.

मी वर्गात पोहोचायच्या आधीच ती टेबलावर फूल किंवा पान अलगद ठेवते… जणू दिवसाची सुरुवात तीच करत असते. तिच्या या छोट्याशा कृतीत एक वेगळीच ऊब असते- जबाबदारीची, जिव्हाळ्याची आणि निखळ प्रेमाची. शीतल अनुपस्थित असली, तर दुसरं लेकरू ही परंपरा न विसरता पुढे नेतं… हीच तर खरी शिकण्याची साखळी!

वर्गात येताच सर्वप्रथम त्या फुलाचं किंवा पानाचं दर्शन होतं. कितीही थकवा असो, मनात राग असो… त्या एका क्षणात सगळं हलकं होतं. निसर्गाची साधीशी भेट आणि लेकरांच्या निरागस मनाचा स्पर्श… यापेक्षा मोठी ऊर्जा शिक्षकाला कुठे मिळणार?

कधी कधी वाटतं- या छोट्या कृतीतून लेकरांनी मला शिकवलंय की शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकातलं ज्ञान नाही; तर एकमेकांच्या मनाला स्पर्श करणारी नाती आहेत. त्यांच्या हातातली फुलांची ओंजळ आणि त्यांच्या मनातील सुगंध… हेच एका गुरुजीचं खरं वैभव आहे.

आजही वर्ग रिकामा झाला की टेबलावर ठेवलेलं ते छोटंसं पान किंवा फूल माझ्याशी शांतपणे बोलत राहतं… “गुरुजी, आम्ही इथेच आहोत,” असं जणू लेकरांचं प्रेम कुजबुजत राहतं. शीतलसारख्या लेकरांनी शिकवलेली ही साधी सवय आता माझ्या श्वासाचा भाग झाली आहे. त्यांच्या छोट्याशा कृतीतून मला रोज नवं शिक्षकपण सापडतं… नवं माणूसपणही.

काळ पुढे जाईल… लेकरं मोठी होतील… आपापल्या वाटांनी दूर निघून जातील. पण त्यांच्या हातातली ती फुलांची ओंजळ, त्या सुगंधी मनांचा स्पर्श आणि वर्गात पसरलेली ती निरागस ऊब माझ्या आयुष्याच्या प्रत्येक पानावर कायम दरवळत राहील. कारण खरा शिक्षक तोच… ज्याच्या बंद ओंजळीत लेकरांचं प्रेम आयुष्यभर जपलेलं असतं… आणि जो त्या सुगंधात रोज नव्यानं जगत राहतो…

शिक्षणगूज : लेकरांच्या छोट्या कृतीत मोठं शिक्षण दडलेलं असतं. प्रेम, विश्वास आणि संवेदनशीलतेतूनच खऱ्या शिक्षणाची सुरुवात होते. शिक्षकाने फक्त जिज्ञासेचा दिवा पेटवायचा… पुढची वाट लेकरं स्वतः उजळतात. शीतलसारख्या विद्यार्थ्यांच्या निरागस मनातून नाती, जबाबदारी आणि सौंदर्य फुलतं. फुलांच्या ओंजळीतून उमलणारं हे नातंच शिक्षकाचं खरं वैभव ठरतं.

लेखक, प्रयोगशील शिक्षक आहेत.

‘आनंदाचं झाड’ या टोपणनावाने ते शिक्षणातील अनेक बाबींवर लेखन करतात.

yuvrajmane892@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in