

विशेष
अजित जोशी
देशाची अर्थव्यवस्था वाढतेय, कंपन्यांचा नफा विक्रमी स्तरावर पोहोचतोय; पण या वाढीतून सामान्य माणसासाठी रोजगार आणि उत्पन्नाच्या संधी किती निर्माण होत आहेत? रोजगारनिर्मितीचा प्रश्न केवळ सरकारच्या धोरणांपुरता मर्यादित नसून उद्योगांची कार्यपद्धती, शिक्षणव्यवस्था आणि विकासाच्या मॉडेलमधील त्रुटीही त्याला कारणीभूत आहेत. मग रोजगारनिर्मितीचे हे कोडे सोडवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची?
आठ दहा दिवसांपूर्वी म्हणजे १९ तारखेला भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाच्या (फिक्की) शताब्दी वार्षिक अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण हे कदाचित त्यांच्या बारा वर्षांच्या पंतप्रधान कारकीर्दीच्या कालखंडातील सगळ्यात लक्षणीय भाषण आहे असं म्हणायला हवं. गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून उद्योगस्नेही अशी ओळख असणाऱ्या पंतप्रधानांनी उद्योगपतींनाच काही परखड प्रश्न विचारले. “१०० साल हो गए, लेकिन १९३० में गांधी आपके यहाँ आकर के यही कह के गए थे और आज इतने साल के बाद भी मुझे वही कहना पड़ रहा है - यह आपकी सफलता है कि विफलता है” अशा घणाघाती शब्दांनी सुरुवात करून भांडवलदारी कंपन्यांच्या अनेक त्रुटींवर त्यांनी बोट ठेवलं. यामध्ये आयातीला पर्याय शोधण्यातलं अपयश उद्योगात पुरेशी गुंतवणूक नसणं शेती क्षेत्रात जाण्यासाठी उद्योजकांचे अपयश, तंत्रज्ञानामध्ये इतर देशांवर असलेलं अवलंबित्व अशा अनेक मुद्द्यांना कोणताही आड पडदा न ठेवता त्यांनी हात घातला. पण त्यांच्या टीकेतला एक अत्यंत महत्त्वाचा भाग रोजगार निर्मितीमधल्या उणिवा हा होता. “क्या आपने अपने यहाँ एम्प्लॉई का तनख्वाह बढ़ाया क्या? क्या आपने अपने एम्प्लॉई की संख्या बढ़ाई क्या?” हे त्यातले कळीचे प्रश्न होते. शिवाय सरकारने मात्र कंपन्यांवरील कर कमी केले, पायाभूत सुविधांवर मोठी गुंतवणूक केली, उद्योगांना विविध सवलती दिल्या; याची आठवणही त्यांनी करून दिली.
पंतप्रधानांची ही टीका अनाठाई नव्हती. २०१९-२० ते २०२५-२६ या कालावधीत निफ्टी ५०० निर्देशांकातील कंपन्यांच्या नफ्यात दरवर्षी सरासरी २८.७ टक्क्यांची चक्रवाढ झाली. या कंपन्यांचा एकत्रित नफा देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) ५.२ टक्क्यांपर्यंत पोहोचला. दुसरीकडे २०१७ ते २०२४ या कालावधीत नियमित वेतनधारी कर्मचाऱ्यांचा सरासरी मासिक पगार १६,५३८ रुपयांवरून २१,१०३ रुपयांवर पोहोचला. महागाई विचारात घेतली तर या कर्मचाऱ्यांच्या पगाराची क्रयशक्ती सुमारे साडेआठ टक्क्यांनी घटली. मुंबई शेअर बाजाराच्या बीएसई ५०० निर्देशांकातील कंपन्यांच्या आकडेवारीच्या आधारे ‘मिंट’ने केलेल्या विश्लेषणानुसार, २०२५-२६ मध्ये संचालकांच्या मानधनात ३८ टक्क्यांची वाढ झाली, तर इतर कर्मचाऱ्यांच्या एकत्रित वेतनखर्चात अवघी एक टक्का वाढ झाली.
गेल्या बारा वर्षांत भारतात रोजगार वाढलेच नाहीत असं म्हणणं चुकीचं ठरेल. सरकारी आकडेवारीनुसार श्रमबाजारातील लोकांचा सहभाग वाढला आहे आणि बेरोजगारीच्या दरातही घट झाली आहे. खरा प्रश्न आहे तो निर्माण झालेल्या रोजगारांच्या स्वरूपाचा. २०११-१२ मध्ये देशातील एकूण रोजगारांपैकी १२.५ टक्के रोजगार वस्तुनिर्मिती क्षेत्रात होते. २०२३-२४ मध्ये हे प्रमाण ११.४ टक्क्यांवर आलं. याच कालावधीत बांधकाम क्षेत्रातील रोजगारांचं प्रमाण १०.६ टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत वाढलं. २०१८-१९ मध्ये शेतीवर अवलंबून असणाऱ्या कामगारांचं प्रमाण ४२.४ टक्के होतं. २०२३-२४ मध्ये ते पुन्हा ४६.१ टक्क्यांपर्यंत वाढलं. खरंतर कोणत्याही समाजाची प्रगती ही वर उल्लेख केलेल्या क्षेत्रातील रोजगारांचे प्रमाण कमी होत जातो तेव्हा होत असते. पण आपली आकडेवारी उलट सांगते आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने गेल्या बारा वर्षांत मोठी प्रगती केली. या क्षेत्रातील रोजगारांची संख्या २१ लाखांवरून ७२ लाखांपर्यंत पोहोचली. असं असलं तरी माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा या सर्व क्षेत्रांत मिळून देशातील एकूण रोजगारांच्या केवळ २.२ टक्के रोजगार आहेत.
पण आता यातला एक अत्यंत कळीचा प्रश्न येतो तो म्हणजे याला जबाबदार कोण? पंतप्रधानांची टीका १००% बरोबर असली तरी सुद्धा हे नाकारता येत नाही की गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने आपल्या खर्चाचा मुख्य फोकस हा रस्ते मेट्रो ऊर्जा इत्यादी सर्व प्रकारच्या बांधकाम केंद्रित हार्ड इन्फ्रास्ट्रक्चरवर ठेवलेला आहे. रोजगार निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या शिक्षण तंत्रज्ञान संशोधन यासारख्या सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चरकडे मात्र दुर्लक्ष केलेलं आहे. २०१४-१५ मध्ये केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातील १२.६ टक्के रक्कम भांडवली खर्चासाठी, तर ४.६ टक्के रक्कम शिक्षण मंत्रालयासाठी राखून ठेवली होती. २०२६-२७ मध्ये भांडवली खर्चाचं प्रमाण २२.९ टक्क्यांपर्यंत वाढलं, तर शिक्षणाचा वाटा २.६ टक्क्यांपर्यंत घटला. आज केंद्र सरकारचा भांडवली खर्च १२.२२ लाख कोटी रुपये आहे, तर शिक्षण आणि वैज्ञानिक विभागांसाठी मिळून अवघे १.९५ लाख कोटी रुपयांची तरतूद आहे. बारा वर्षांपूर्वीचं शिक्षणाचं प्रमाण कायम ठेवलं असतं, तर आज शिक्षणासाठी दरवर्षी आणखी एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम उपलब्ध झाली असती. रस्ते, रेल्वे, बंदरं उभारणं आवश्यक आहेच; पण या सुविधांचा उत्पादक वापर करण्यासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ आणि तंत्रज्ञान विकसित करण्याला आपण त्याच प्रमाणात प्राधान्य दिलं का?
पण प्रश्न फक्त शिक्षणावरच्या खर्चाचा आणि गुंतवणुकीचा नाही. आपण कोणत्या प्रकारचे शिक्षण देत आहोत हाही तेवढाच कळीचा प्रश्न आहे. १९८० च्या दशकात चीनने व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणाच्या विस्तारावर जाणीवपूर्वक भर दिला. १९९० पर्यंत चीनमधील उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास निम्मे विद्यार्थी व्यावसायिक शिक्षण घेत होते. तैवानने याही पुढे मजल मारली. १९८० च्या दशकात तिथल्या उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांपैकी जवळपास दोन तृतीयांश विद्यार्थी व्यावसायिक शिक्षण घेत होते. विशेष म्हणजे तैवानने उद्योगांच्या बदलत्या गरजांनुसार व्यावसायिक शिक्षणाचं स्वरूपही बदललं. १९५० ते १९८७ या काळात व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये औद्योगिक विषयांचं शिक्षण घेणाऱ्यांचं प्रमाण २६ टक्क्यांवरून ४९ टक्क्यांपर्यंत वाढलं. भारताच्या २०२३-२४ च्या नियतकालिक श्रमबल सर्वेक्षणानुसार १५ ते ५९ वयोगटातील केवळ ४.१ टक्के व्यक्तींनी औपचारिक व्यावसायिक अथवा तांत्रिक प्रशिक्षण घेतलं होतं. आणखी ३०.६ टक्के व्यक्तींनी अनौपचारिक पद्धतीने व्यावसायिक कौशल्यं मिळवली होती. २०२१ मध्ये भारतातील शिक्षणावरील खर्चापैकी अवघे तीन टक्के व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षणावर खर्च होत होते. आपल्याकडे अभियांत्रिकी महाविद्यालयं, व्यवस्थापन शिक्षण संस्था आणि विद्यापीठांची संख्या वाढली. पण औद्योगिक यंत्रं चालवणारे, त्यांची दुरुस्ती करणारे, वीज यंत्रणा हाताळणारे, जोडणीची कामं करणारे आणि उत्पादन प्रक्रियेवर देखरेख ठेवणारे प्रशिक्षित कर्मचारी तयार करण्यासाठी त्या प्रमाणात गुंतवणूक झाली का?
आर्थिक सर्वेक्षणानुसार देशाला दरवर्षी ७८.५ लाख अतिरिक्त बिगरशेती रोजगारांची आवश्यकता प्रत्यक्षात ही योजना जेमतेम साडेतीन लाख उमेदवार निर्माण करू शकली. म्हणूनच इतक्या योजना राबवूनही २०२३-२४ मध्ये देशातील १५ ते ५९ वयोगटातील केवळ ४.१ टक्के व्यक्तींनी औपचारिक व्यावसायिक प्रशिक्षण घेतलं होतं. म्हणजेच प्रश्न शिक्षणावरच्या एकूण खर्चाचा नाही तर त्या खर्चाच्या नियोजनाचाही आहे हे लक्षात येतं.
एकीकडे पदवीधर तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत आणि दुसरीकडे उद्योगांना आवश्यक कौशल्यं असलेले कर्मचारी मिळत नाहीत, हा विरोधाभास त्यातूनच निर्माण झाला असावा.
दुसरा मुद्दा भारतातल्या एकूण प्रगतीच्या रचनेचा सुद्धा आहे. महानगरे किंवा मोठी शहरी वगळता इतरत्र जर मोठ्या प्रमाणावर छोट्या मध्यम किंवा लघु उद्योग क्षेत्राची वाढ झाली तर हेच उद्योग सर्वाधिक नोकऱ्या निर्माण करतात, हा जगभरातला अनुभव आहे. १९७८ मध्ये चीनमधील ग्रामीण आणि निमशहरी उद्योगांमध्ये २.८३ कोटी लोक काम करत होते. १९९० पर्यंत ही संख्या ९.२६ कोटींवर पोहोचली. अवघ्या बारा वर्षांत अशा उद्योगांमध्ये सुमारे साडेसहा कोटी अतिरिक्त रोजगार निर्माण झाले. त्यात वस्तुनिर्मितीबरोबरच इतर बिगरशेती व्यवसायांचाही समावेश होता. भारतात मात्र संपत्ती उत्पादन आणि त्यातून निर्माण होणारी मालमत्ता याचा मोठ्या प्रमाणावर केंद्रीकरण होत आहे. २०११-१२ मध्ये देशातील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या वीस कंपन्यांचा एकत्रित कॉर्पोरेट नफ्यातील वाटा ५२ टक्के होता. २०२०-२१ मध्ये तो ६२.४ टक्क्यांपर्यंत वाढला. अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या अभ्यासानुसार २०२३-२४ मध्ये देशातील बिगरवित्तीय कंपन्यांच्या एकत्रित मालमत्तेपैकी जवळपास २४ टक्के मालमत्ता केवळ पाच उद्योगसमूहांकडे होती. दुसरीकडे गेल्या दशकात असंघटित उत्पादन उद्योगांच्या सरासरी स्थिर मालमत्तेच्या मूल्यात दरवर्षी अवघी तीन टक्के वाढ झाली. महागाईच्या तुलनेत ही वाढ कमी आहे.
मात्र ही सगळी जबाबदारी सरकारचीच आहे असं म्हणणं अन्यायकारक ठरेल. भारतातील खासगी क्षेत्राने ही संशोधन मनुष्यबळ विकास शिक्षण या गोष्टींकडे पुरेसं लक्ष दिलेलं नाही. २०२३-२४ मध्ये भारतीय खासगी क्षेत्राचा संशोधन आणि विकासावरील खर्च जीडीपीच्या तुलनेत अवघा ०.४४ टक्के आहे. चीनमध्ये व्यावसायिक उद्योगांचा संशोधनावरील खर्च जीडीपीच्या सुमारे दोन टक्के, तर दक्षिण कोरियात जवळपास चार टक्के आहे. याहीपेक्षा चिंताजनक बाब म्हणजे संशोधन करणाऱ्या उद्योगांचं प्रमाण. जागतिक बँकेने २०२२ मध्ये केलेल्या उद्योग सर्वेक्षणानुसार भारतातील केवळ ४.३ टक्के उद्योग संशोधनावर खर्च करत होते. निम्न-मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये हे प्रमाण सरासरी १७ टक्क्यांपेक्षा अधिक होतं. कर्मचारी प्रशिक्षणाच्या बाबतीतही अशीच स्थिती आहे. भारतातील सर्वेक्षणात सहभागी उद्योगांपैकी केवळ ७.७ टक्के उद्योग आपल्या कर्मचाऱ्यांना औपचारिक प्रशिक्षण देत होते. दक्षिण आशियातील हे सरासरी प्रमाण २५.२ टक्के, तर निम्न-मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये ३१.२ टक्के होतं. यात फक्त एकच मुद्दा येतो. भारतातील उद्योग प्रशिक्षण, संशोधन, उत्पादन विकास यावर फारशी मेहनत घेत नाही, असं लक्षात येतं. २०१९ साली सरकारने जेव्हा आयकरावर सवलत दिली किंवा जीएसटीमध्ये मोठ्या प्रमाणावर वस्तूंवरचे कर जेव्हा कमी करण्यात आले, तेव्हा उद्योजक आपल्याला झालेला फायदा, अधिक रोजगार आणि क्षमतेचा अधिक विकास यामध्ये रूपांतरित करतील का? याबद्दल साशंकता व्यक्त करण्यात आलेली होती. एका प्रकारे पंतप्रधानांच्या भाषणाने ही धोरणं अपेक्षित लक्ष्य साध्य करू शकलेली नाहीत याची तर कबुली मिळालेली आहे.
बांधकामावर आधारित पायाभूत सुविधा म्हणजे विकास हा गैरसमज आपल्या कॉर्पोरेट क्षेत्राने अनेक वर्षं पाळला आणि लोकांमध्ये पसरवला. भारतातल्या तथाकथित तंत्रज्ञान किंवा आयटी कंपन्या या प्रत्यक्षात तंत्रज्ञान विकासाकडे दुर्लक्ष करत होत्या हे बुद्धीवादी मंडळींच्या लक्षात आलं नाही. सरकारी धोरणामध्ये समाजासाठी महत्त्वाचं काय त्याकडे झालेलं दुर्लक्ष, खासगी क्षेत्राने संशोधन आणि प्रशिक्षणाकडे दाखवलेलं औदासिन्य आणि बुद्धिजीवी वर्गाला आर्थिक सूज आणि विकास यातील फरक करण्यात आलेलं अपयश या सर्वातून देशात कुरेशी रोजगारनिर्मिती होऊ शकलेली नाही असं म्हणायला हवं….