ऊर्जेची लागवड

झाडांची लागवड करून फळे, फुले मिळतात; पण इंधनही मिळू शकते! आहे ना गंमत? चला, ऊर्जेच्या लागवडीची ही अनोखी पद्धत जाणून घेऊया!
ऊर्जेची लागवड
ऊर्जेची लागवड'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

नवलनगरी

सोनाली कोलारकर-सोनार

झाडांची लागवड करून फळे, फुले मिळतात; पण इंधनही मिळू शकते! आहे ना गंमत? चला, ऊर्जेच्या लागवडीची ही अनोखी पद्धत जाणून घेऊया!

आमच्या एका मैत्रिणीच्या घरी सगळीकडे दिवे आणि पंखे सौरऊर्जेवर चालतात. सर्वत्र किती मस्त उजेड पसरतो! तिने घराचे छप्परच सौरऊर्जा पॅनलचे बांधून घेतले आहे. ‘ही ऊर्जेची लागवड आहे,’ असे ती गमतीने म्हणते! आता ऊर्जेची लागवड होऊ शकते का? तर हो, नक्की होऊ शकते! सौरऊर्जेची लागवड जशी तिने केली, तशी लागवड जमिनीतही करता येऊ शकते का? निश्चित करता येते! भविष्यात ऊर्जेची निर्माण होणारी चणचण आणि त्यावरचे उपाय हा शास्त्रज्ञांना सातत्याने गांभीर्याने संशोधन करायला लावणारा विषय झाला आहे. पृथ्वीच्या पोटात साठलेले तेल, कोळसा आणि गॅस हे ऊर्जा निर्मितीतील प्रमुख घटक हळूहळू वापरून एक ना एक दिवस संपुष्टात येणार आहेत. या गोष्टींची निर्मिती व्हायला कित्येक वर्षे लागतात आणि यांचा अवास्तव वापर होत असल्याने धोक्याची घंटा सतत वाजत असते. इंधनाची गरज माणसाला पदोपदी असणारच, मग काय करता येईल? गॅसच्या शेगडीचा शोध लागला आणि स्वच्छ व झटपट मिळणाऱ्या या सुविधेमुळे ती अत्यंत लोकप्रिय झाली. आता इंधन बचत करायची असेल, तर या शेगड्यांपेक्षा अधिक सोयीच्या परंतु गॅस वाचवणाऱ्या अशा नव्या शेगड्या निघाल्या तरच इंधन आणि ऊर्जेचा प्रश्न बऱ्याच अंशी मार्गी लागेल.

खेडेगावात तर अजूनही इंधनासाठी कुठलीही झाडे तोडली जातात. इंधनासाठी जंगलतोड मोठ्या प्रमाणात होते. गॅस शेगडीचा खर्च परवडत नाही आणि लाकूडफाटा जवळ असल्याने सहज उपलब्ध असल्यामुळे लाकडाचे इंधन वापरात येते. परंतु यात ज्या झाडांचे उष्मांक मूल्य किंवा कॅलोरिफिक व्हॅल्यू कमी आहे, अशी झाडे तोडली जातात. परिणामी लाकूडफाटा जास्त लागतो. खरी गोष्ट म्हणजे, अशी अनेक झाडे आहेत ज्यांची उष्णतोत्पादक क्षमता प्रचंड आणि उष्मांक मूल्य अतिशय चांगले असते. अशा झाडांची जाणीवपूर्वक खास ऊर्जेसाठी आणि इंधनासाठी सुनियोजित लागवड करून त्यांचाच वापर करणे म्हणजेच ऊर्जेची लागवड करणे! याला शास्त्रीय भाषेत ‘एनर्जी प्लांटेशन’ म्हणतात. कुठलेही झाड तोडून चुलीत सरपण म्हणून वापरण्यापेक्षा ही खास आणि भरपूर ऊर्जा देणारी झाडे सामाजिक वनीकरणाअंतर्गत व खासगीरीत्या लावायची आणि खेडी ऊर्जेबाबत स्वयंपूर्ण करायची. असे जर आपण केले नाही, तर उरले-सुरले जंगलदेखील नष्ट होईल.

तर मंडळी, अशी ऊर्जेची लागवड अतिशय उत्तमरीत्या करता येते. सगळ्या प्रांतांत त्या त्या गावांच्या हवामानानुसार टिकणाऱ्या अनेक झाडांच्या जाती आहेत, ज्यांचे उष्मांक मूल्य प्रचंड असते; जसे की खाडशेरानी, ज्वारी, बाजरी, निलगिरी, अर्जुन, अगरत्ता, शोमी आणि जोजोबा. चार हजार दोनशे ते पाच हजार किलो कॅलरीज प्रति किलोग्रॅम एवढी प्रचंड उष्णतोत्पादक क्षमता या झाडांमध्ये असते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार निलगिरीचे झाड भारतात तीन वर्षांत पंधरा मीटरच्या आसपास वाढते. ज्वारी आणि बाजरी यांचे पीक नित्य नेमाने घेतले जाते आणि त्यांचा भुसा व बडगी यांचे उष्मांक मूल्य मोठे असते. अशा झाडांचा आणि भुश्याचा वापर करून ‘वनचुली’ तयार करण्यात आल्या आहेत. चूल एकदा पेटली की खूप वेळ विनाधूर धगधगत राहते आणि भरपूर स्वयंपाक विनाप्रदूषण या चुलीवर सहज करता येतो.

अशा प्रकारच्या चुली व्यावसायिक पातळीवर मोठ्या प्रमाणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. सहज वापरता येणाऱ्या अशा छोट्या सुबक चुली सर्वत्र उपलब्ध झाल्या, तर या ऊर्जेच्या लागवडीमुळे पर्यावरणाचा समतोल सहज राखला जाईल. झाडांमध्ये शून्य पूर्णांक एक टक्क्यापेक्षाही कमी प्रमाणात सल्फर असते. त्यामुळे चुलीतून निघणाऱ्या धुरात सल्फर डायऑक्साइडचे प्रमाण अत्यल्प असल्याने प्रदूषण होणार नाही. ज्या प्रमाणात झाडांनी कार्बन डायऑक्साइड वापरला असेल, त्याच प्रमाणात तो बाहेर टाकला जाईल. इतर इंधनांच्या जळण्यात हे प्रमाण फार असते. आता तर संशोधनात नवीन प्रकारच्या चुलीत असे आढळले आहे, की एकदा पेट घेतला की काही वेळाने धूर नाहीसा होऊन छानशा गॅसच्या शेगडीसारखी ही चूल धगधगत राहते. शिवाय चुलीतील राख उत्तम खत म्हणून वापरता येते.

सुरुवातीला या सुबक चुलीमुळे मोठ्या प्रमाणात इंधनाचा प्रश्न निकालात निघतो. ऊर्जेच्या लागवडीमुळे जंगलतोड थांबून गावे स्वयंपूर्ण होतात. निसर्गाने ऊर्जेचीदेखील लागवड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि या नैसर्गिक चुलींमुळे प्रदूषण रोखता येईल. बस्स, फक्त सामूहिकरीत्या ही लागवड करण्याची तीव्र इच्छा हवी! सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता फक्त झाडांच्या लागवडीचीच नाही, तर आपण वेगळ्या प्रकाराने घरच्या घरी ऊर्जेची लागवड करू शकतो. कशी? तर घरातील उरलेला कचरा आणि अन्न यापासून गॅस तयार करता येतो आणि चूल पेटू शकते. डॉक्टर आनंद आणि प्रियदर्शनी कर्वे यांच्या ‘आरती’ नावाच्या संस्थेने शिळ्या अन्नाला आणि कचऱ्याला वापरून पेटणारी चूल तयार केली आहे. घराच्या बाल्कनीत ही शेगडी ठेवता येते, ज्यामुळे घरच्या घरी इंधन तयार होते आणि अन्नाची नासाडी थांबते! त्यांच्या या प्रयोगाला पर्यावरण क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा ‘ॲशडेन’ पुरस्कार मिळाला आहे. आपल्याला ऊर्जेची बचतच नाही, तर चक्क लागवडच करता येते. मग काय, होणार ना आपणही निसर्गमित्र?

पर्यावरण शिक्षक, प्रकाशक-संपादक

sonalikolarkarsonar@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in