
पाऊलखुणा
एखादी संस्कृती का विकास पावते? कालांतराने ती का संपते? एका शब्दात याचं उत्तर ‘पर्यावरण’ हे आहे. अनुकूल पर्यावरण लाभलं की संस्कृती घडते आणि प्रतिकूल पर्यावरण लाभलं की संस्कृती संपते. इतिहासात डोकावून पाहिलं तर अशा अनेक संपलेल्या संस्कृती आपल्याला दिसतात.
भारताचा इतिहास खूप समृद्ध आणि गौरवशाली आहे, असं आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं. प्राचीन काळात भारतात इतकं वैभव होतं की, ‘इथे सोन्याचा धूर निघायचा’ असं म्हटलं जातं, हे ऐकून आपल्याला खूप अभिमान वाटतो. पण मोठं झाल्यावर मनात प्रश्न उभा राहतो - हे सगळं वैभव गेलं कुठे? ती श्रीमंत शहरे कुठे गेली? जर ती काळाच्या ओघात नाहीशी झाली असतील, तर ती पुरातत्त्व उत्खननात तरी सापडायला हवीत. पण जर त्याचं जसं वैभव होतं तशीच ती सापडली नाहीत, तर? महाभारतात उल्लेख असलेल्या काही स्थळांवर उत्खनन केल्यावर असं आढळून आलं की, ती ठिकाणं खूप मोठी किंवा वैभवशाली नसून लहान गावं किंवा खेडी होती - अगदी हस्तिनापूरदेखील. भगवान श्रीकृष्णाचं द्वारका शहर समुद्रात बुडालं, हे आपण मान्य करतो. पण हे का झालं? यामागे इतर कारणं असली तरी सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पर्यावरणातील बदल.
सुमारे २० लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर मानवी जीवनाला सुरुवात झाली आणि तेव्हापासून मानव आणि पर्यावरण यांचे संबंध परस्परावलंबी राहिले आहेत. पर्यावरणात कितीही बदल झाले, कितीही मोठे संकट आले, तरी माणूस पूर्णपणे नाहीसा झाला नाही. उलट त्याने संकटांना धैर्याने तोंड दिले. कारण निसर्गाने त्याला एक विशेष देणगी दिली आहे - कोणत्याही प्रकारच्या वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता. मग तो दुष्काळ असो, त्सुनामीसारखा पूर असो किंवा हिमयुगासारखी थंडी असो, माणूस जुळवून घेतो आणि पुढे जातो. त्यामुळेच त्याच्यात बदलही घडतात आणि हे बदल होणे अपरिहार्य असते. ही जुळवून घेण्याची कला माणसाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्राण्याला किंवा वनस्पतीला मिळालेली नाही. इतर प्राणी आणि झाडे फक्त अनुकूल वातावरणातच जगू शकतात. जर वातावरण बदलले, तर ते टिकत नाहीत. उदा. पंचवीस हजार वर्षांपूर्वी भारतात शहामृग होते, पण नवाश्मयुगात हवामान बदलल्यामुळे ते नाहीसे झाले. आपल्याकडे असलेली म्हैस युरोपच्या थंड हवामानात जगू शकत नाही आणि तिकडचा रेनडिअर भारतातल्या गरम, दमट हवामानात तग धरू शकत नाही. हेच वनस्पतींच्याही बाबतीत लागू पडतं. जसं की, भातशेती फक्त भरपूर पावसाच्या भागातच शक्य होते. यावरून हे स्पष्ट होतं की, माणूस कोणत्याही वातावरणात जगण्यासाठी आपली जीवनपद्धती, घरं, हत्यारं यामध्ये बदल घडवतो. जसं वातावरण, तशी संस्कृती. म्हणूनच पर्यावरणात बदल झाला, की सांस्कृतिक बदल होणं अटळ असतं. त्यामुळे कोणत्याही संस्कृतीचा अभ्यास करताना त्या भागाच्या पर्यावरणाचा अभ्यास करणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
मानवी संस्कृतीच्या विकासात पर्यावरणाचं स्थान किती महत्त्वाचं आहे, हे सर्वप्रथम थोर पुरातत्त्वज्ञ गॉर्डन चाइल्ड यांनी दाखवून दिलं. मानवी इतिहासातील सर्वप्रथम क्रांती म्हणजे शेतीचा शोध. अन्नाच्या शोधात वणवण करण्यात त्याची लाखो वर्षे गेली, शेतीच्या शोधामुळे ती थांबली. त्याला स्थिरजीवन लाभलं, घरं बांधून तो राहू लागला, गायी-गुरे, शेळ्या-मेंढ्या पाळू लागला. ते त्याचे अन्नच होते. पाहिजे तेव्हा ते खाता येत होतं. हा क्रांतिकारी बदल पर्यावरणामुळे कसा घडून आला, हे चाइल्ड यांनी दाखवून दिलं. त्यांच्या मते पर्यावरणात सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी बदल घडून येऊ लागला होता. पश्चिम आशियात हवामान हळूहळू शुष्क होऊ लागलं. त्यामुळे छोटे जलाशय निर्माण झाले. साहजिकच पाण्यासाठी माणूस आणि प्राणी एकमेकांजवळ आले. मानवाने प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांना माणसाळवण्यास सुरुवात केली आणि त्यातून पुढे गाय-बैल, शेळी-मेंढी इत्यादी प्राणी पाळण्यास सुरुवात झाली आणि स्थिर जीवन शक्य झालं. शेती करणंही यामुळेच शक्य झालं. एका ठिकाणी काही काळ वस्ती केल्यामुळे माणूस निसर्गात उगवणाऱ्या धान्याची अन्नासाठी लागवड करू लागला. पश्चिम आशियात गहू, बार्ली ही धान्ये निसर्गतः उगवतात. खाण्यासाठी मानवाने त्यांचा उपयोग केला. दर मोसमात धान्याचे दाणे जमिनीवर पडून उगवतात, हे पाहून तो धान्य पेरू लागला. शेतीची सुरुवात अशी झाली. ही मानवी जीवनातील आद्य क्रांती होय. पर्यावरणातील बदलामुळे ती घडून आली.
मानव जसं आपलं जीवन टिकवण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहिला, तसेच निसर्गही त्याच्या संतुलनासाठी मानवाच्या कृतींवर अवलंबून राहिला आहे. परंतु औद्योगिकीकरण, शहरांचा विस्तार, जंगलतोड, वायू आणि जलप्रदूषण, यांसारख्या मानवी कृतींमुळे पर्यावरणाची झपाट्याने हानी होत चालली आहे. या बदलांचा फटका केवळ हवामान किंवा नैसर्गिक परिसंस्थेलाच बसत नाही, तर मानवी संस्कृतींच्याही अस्तित्वावर त्याचा गंभीर परिणाम होतो. इतिहासाच्या पानांत डोकावून पाहिल्यास असं स्पष्ट दिसतं की, जगातील अनेक बलाढ्य आणि प्रगत संस्कृती केवळ पर्यावरणीय बदलांमुळे नष्ट झाल्या आहेत. हडप्पा, मेसोपोटेमिया संस्कृतींचा ऱ्हास ही याची ठळक उदाहरणं आहेत. जलव्यवस्थेतील बदल, पूर, दुष्काळ, जमिनीचा क्षय आणि हवामानातील तीव्र बदल यामुळे त्या संस्कृतीचा ऱ्हास झाला, हे संशोधनातून उघड झाले आहे.
आजचे इराक, सीरिया हे देश तसेच इराणचा पश्चिमेकडील प्रदेश आणि तुर्कस्तानचा आग्नेयकडील प्रदेश यांचा प्राचीन मेसोपोटेमियामध्ये समावेश होतो. पर्यावरणाचा ऱ्हास हे जसे मेसोपोटेमियातील संस्कृतीच्या ऱ्हासाच्या प्रमुख कारणांपैकी होते, त्याप्रमाणे हवामानात घडून आलले बदल आणि पर्यावरणाचा ऱ्हास ही हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाच्या प्रमुख कारणांपैकी होती. इसवी सनापूर्वी २००० च्या सुमारास हवामान शुष्क होऊन वारंवार दुष्काळ पडू लागले, पिकाऊ जमिनींची प्रत खालावत गेली. सरस्वती नदी म्हणजेच घग्गर आणि हाक्रा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नद्या. त्यांच्या खोऱ्यात हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे मिळालेली आहेत. याच काळात हडप्पा संस्कृतीची नगरे आणि त्यांच्या आर्थिक-सामाजिक जीवनाचा डोलारा सांभाळणाऱ्या गाव-वसाहतींमधील परस्परसंबंधांचा समतोल ढासळला. सरस्वतीच्या खोऱ्यात घडून आलेला प्रचंड मोठा भूकंप, हे त्यामागील प्रमुख कारण होते. त्या भूकंपामुळे सरस्वतीचे पात्र उंचावले जाऊन तिला मिळणाऱ्या सतलज आणि यमुना या तिच्या प्रमुख उपनद्यांच्या पात्रांनी दिशा बदलली. परिणामी सरस्वतीचं पात्र कोरडं पडलं. त्यामुळे हडप्पा संस्कृतीच्या लोकांना स्थलांतर करावं लागलं. हडप्पाच्या नगरांना उतरती कळा लागली. नागरी हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासामुळे लोकांना स्थलांतर करावं लागलं. नागरी हडप्पा आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक जिथे-जिथे पोहोचले तेथील स्थानिक संस्कृतींमध्ये ते मिसळून गेले आणि त्या ठिकाणी नवीन वसाहतींच्या रुपाने नवीन संस्कृती उदयाला आल्या.
rakeshvijaymore@gmail.com