हॉबी हॉर्स ते बायसिकल!

पेडल नसलेल्या ‘हॉबी हॉर्स’ ते आजच्या स्मार्ट ‘इलेक्ट्रिक’ रूपापर्यंतचा सायकलचा अत्यंत रंजक प्रवास...
हॉबी हॉर्स ते बायसिकल!
हॉबी हॉर्स ते बायसिकल!
Published on

नवलनगरी

सोनाली कोलारकर-सोनार

पेडल नसलेल्या ‘हॉबी हॉर्स’ ते आजच्या स्मार्ट ‘इलेक्ट्रिक’ रूपापर्यंतचा सायकलचा अत्यंत रंजक प्रवास...

मित्रांनो, तुमच्यापैकी किती जणांना सायकल चालवायला येते? आणि किती जणांचे पाय अजून पेडलपर्यंत नीट पोहोचायला धडपडत आहेत? नुकताच ३ जून हा दिवस संपूर्ण जगभरात ‘जागतिक सायकल दिन’ म्हणून खूप उत्साहात साजरा झाला. सायकल ही आपल्या सगळ्यांचीच अगदी लहानपणापासूनच लाडकीची आणि अत्यंत उपयोगी! ३ वर्षांच्या छोटुकल्या बालकापासून ते अगदी ७०-७५ वर्षांच्या आजोबांपर्यंत सगळे जण अगदी आनंदानं सायकल चालवू शकतात.

या वाहनाची सगळ्यात भारी गोष्ट कोणती माहिती आहे का?- तर ना आरटीओ (RTO) मध्ये जाऊन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची कटकट, ना महागड्या पेट्रोल, डिझेल किंवा गॅसची गरज! बस, दोन्ही चाकांमध्ये गच्च हवा भरली की निघाली आपली स्वारी! यामुळे एकीकडे पैशांची मोठी बचत होते, तर दुसरीकडे पर्यावरणाचं रक्षण होतं. कसलंही प्रदूषण न करता धावणारं हे एकमेव वाहन आहे.

सायकल चालवण्यामुळे आपल्या शरीराचा उत्तम व्यायाम होतो, पाय मजबूत होतात आणि तब्येत एकदम झकास राहते. शिवाय, घराबाहेर पार्किंगसाठी खूप जास्त जागाही लागत नाही आणि तिची किंमतही आपल्या खिशाला परवडणारी असते. पण मित्रांनो, आज आपण जी भारी, रंगीबेरंगी आणि स्टायलिश सायकल चालवतो, ती शेकडो वर्षांपूर्वी अशी नव्हती हं!

सुरुवातीची लाकडाची सायकल, पेडल नसलेली सायकल, मग चक्क चार फूट उंच चाकावर बसवलेली पेडल असलेली सायकल ते आताची आधुनिक गियरची सायकल... असा या दोन चाकांचा प्रवास मोठा मनोरंजक आणि थरारक आहे. अशी ही बहुपयोगी सायकल नक्की कोणी शोधून काढली, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?

सुमारे दोनशे वर्षांपूर्वी, म्हणजे १८१७-१८ च्या काळात पहिल्यांदा जर्मनीच्या कार्ल ड्रिस या माणसाने एक सायकल तयार करून पाहिली. पण त्या काळी या प्रकाराकडे फक्त ‘हौस’ किंवा एक ‘हॉबी-हॉर्स’(खेळण्यातील घोडा) आणि ‘रर्निंग मशीन’ म्हणूनच पाहिलं गेलं. कारण काय तर, या सायकलला पेडलच नव्हते! कार्लने सायकलचा शोध हा चक्क एक साहसी खेळ म्हणून लावला होता. काहीतरी भन्नाट करायचं म्हणून त्याने एका भल्या मोठ्या चाकाची सायकल तयार केली. आता हिला पेडल नसल्यामुळे सायकलवर बसून पायानेच जमिनीला मागे ढकलत, धावत धावत तिला चालवावं लागायचं. लोकांना सुरुवातीला ही धमाल वाटली. कार्लच्या आधी तर लोकांनी लाकडाची सायकल बनवण्याचा प्रयत्न केला होता, पण तिचे अपघात वाढल्यामुळे लाकडाची सायकल गायब झाली. कार्लची सायकल अनेकांनी हौसेनं चालवली, पण खूप कष्ट पडत लागत असल्याने लोकांनी तिचा नाद सोडला. कार्ल ड्रिसला या सायकलवरून अवघे ७ किलोमीटर अंतर पार करायला चक्क एक तास लागला होता!

त्यानंतर काही फ्रेंच संशोधकांनी यात आपलं डोकं चालवलं आणि १८६०-७० च्या काळात एक नवीन सायकल आणली. हिला एक भलं मोठं चाक आणि एक छोटं चाक होतं, आणि मोठ्या चाकाला पेडल जोडले होते. ही खऱ्या अर्थाने ‘बायसिकल’ होती. पण तिची रचना अशी होती की चालवताना माणसाची हाडं खिळखिळी व्हायची! आणि चार फुटांच्या उंचीवर बसून चालवताना भयंकर थरकाप उरायचा. म्हणून लोकांनी तिचं नावच ‘बोनशेकर’(हाडे हलवणारी) ठेवून दिलं! या सायकलची लोकप्रियता हळूहळू वाढू लागली आणि चक्क ‘बायसिकल क्लब’ सुरू झाले. थॉमस स्टीव्हनने तर ही सायकल घेऊन जगप्रवास करण्याचा धाडसी प्रयत्न केला. आतापर्यंत सायकल फक्त खेळ म्हणून वापरली जात होती, पण तिचा वापर रोजच्या प्रवासासाठी करता येईल का, असा विचार संशोधक करू लागले. तो काळ घोड्यांचा वापर करण्याचा होता. घोड्यांच्या जागी सायकल येईल का, या विचाराने मोठी क्रांती झाली! शेवटी १८८५ च्या आसपास जेम्स स्टारली यांच्या भाच्याने आजच्या सारखी अत्यंत सुरक्षित सायकल तयार केली. दोन्ही चाकं सारख्या आकाराची, कमी उंचीची, मजबूत चेन आणि पेडल असलेली ही सायकल खूप गाजली. आज आपण जी सायकल वापरतो, ती हीच आहे!

सायकलच्या काही भन्नाट आणि रंजक गोष्टी- सायकल चालवणारे लोक जगात ‘कूल ड्युड्स’ म्हणून प्रसिद्ध आहेत, कारण ते नेहमी हसतमुख असतात. २०१५ साली ऑस्ट्रेलियामध्ये चक्क १३५ फूट लांबीची सायकल बनवली गेली होती, तिची नोंद गिनीज बुकमध्ये झाली आहे. तर जगातील सर्वात महागडी सायकल तब्बल ५ लाख डॉलर्सची आहे! जर्मनीच्या एका पठ्ठ्याने तर १० फूट ९ इंच व्यासाच्या चाकाची सायकल बनवून ती चालवून दाखवली.

सायकलिंग करणं हे साध्या चालण्याच्या व्यायामापेक्षा तिप्पट वेगाने शरीराला फायदा करून देते. कोपनहेगन, टोकियो आणि बर्लिन या शहरांमध्ये लोक रोज सायकलनेच ऑफिसला जातात. तिथे सायकलींगसाठी ८ मजली पार्किंग आणि स्वतंत्र ट्रॅक आहेत. भूतानसारख्या डोंगराळ देशात सायकल चालवणाऱ्याला विशेष मान दिला जातो.

आपल्या भारतातील नागपूरचे डॉ. अमित समर्थ हे जगातील सर्वात कठीण ‘ट्रान्स सायबेरियन सायकल स्पर्धा’ पूर्ण करणारे आशियातील एकमेव सायकलपटू आहेत. पूर्वी आपलं ‘पुणे’ शहर सायकलींचं शहर म्हणून ओळखलं जायचं, तर आता पंजाबमधील लुधियाना शहरात मोठ्या प्रमाणात सायकली बनतात. मग वाट कसली बघताय? शून्य प्रदूषण करणाऱ्या आणि आपल्याला आरोग्य देणाऱ्या आपल्या या लाडक्या मित्राची स्वारी करायला आजच बाहेर पडा. शुभस्य शीघ्रम्!

पर्यावरण शिक्षक, प्रकाशक-संपादक

sonalikolarkarsonar@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in