

डोळस भटकंती
मुक्ता नार्वेकर
पावसाने फिरवलेली पाठ आणि निसर्गाची अनोखी साथ अनुभवत, गोव्याच्या फोंडाजवळील खांडेपार गावातील प्राचीन मंदिरांच्या अद्भुत आणि शांत विश्वाचा घेतलेला हा एक नितांत सुंदर शोधप्रवास.
ऑक्टोबरचा महिना होता. गोव्यातल्या फोंडा शहरात माझा मुक्काम होता. शहराच्या एका शांत जागी असणाऱ्या Serendip बंगल्यामध्ये मी राहिले होते. बंगल्यात भरपूर झाडे असणारी बाग होती. बागेच्या मागेच हा दुमजली बंगला दडला होता. देशविदेशातील शोभेच्या वस्तूंनी बंगल्याचा कानाकोपरा सजला होता. बंगल्यात भरपूर खोल्या होत्या. स्वच्छ, टापटीप, प्रशस्त असा बंगला होता. मी राहिलेल्या खोलीत एक सुंदर बाल्कनी होती. तिथे उभं राहिलं की बागेचा आणि स्विमिंग पूलचा नयनरम्य नजारा दिसायचा. इथे राहून कोणती ठिकाणे बघायची याचा प्लॅन ठरलाच होता. दुसऱ्या दिवशीच्या सकाळपासून भटकंतीला सुरुवात करणार होते. त्या दिवशीची संध्याकाळ बंगल्यातच थांबून अगदी निवांत घालवली. रात्र होऊ लागली तसा गारवा जाणवू लागला. आकाशात चांदणे स्मित करत होते. उद्याचे वातावरण सुंदर असणार, भटकंती मस्त होणार याने मन उल्हासित झाले. गारव्याने डोळ्यावर झोप आणली आणि मी गाढ झोपी गेले.
सकाळी उठताना कानावर पावसाचा आवाज आला. मला विश्वासच बसेना. बाल्कनीचे पडदे उघडून पाहते तर पावसाची रिपरिप सुरू होती. ते पाहून मन खट्टू झालं. थोड्या वेळात पाऊस जाईल या हिशोबाने आवरून घेतलं, नाश्ता झाला पण पावसाने चांगला जोर धरला होता. अखंड कोसळत होता. उघडीप बिलकूल नव्हती. मला जिथे जायचे होते त्यांनी पावसामुळे प्लॅन रद्द झाल्याचे कळवले. बाहेर काळोखे आकाश पावसाचे गाणे गात होते आणि इकडे माझे मन त्या वातावरणात दुखी झाले होते. दुपारचे जेवण झाले. अजूनही पावसाचे गाणे सुरूच होते. अखेरीस त्याचा कार्यक्रम ४ वाजण्याच्या सुमारास थांबला. मग मी आणि माझ्या नवऱ्याने बाहेर जाऊन drive करून यायचे ठरवले. गुगल मॅप उघडला आणि फोंड्याच्या जवळच खांडेपार नावाचे गाव दिसले. तिथे नदीच्या काठी पुरातन मंदिर आहे असे दिसले. जाऊन बघुयात असे ठरवले आणि गाडी काढली. आम्ही हायवे सोडला आणि गाडी खांडेपार गावात वळवली. केवळ ६ किमीची drive करून आम्ही एका अत्यंत निसर्गसंपन्न परिसरात येऊन पोहोचलो.
आमच्या आजुबाजूला माडसुपारीची पुष्कळ झाडं होती. जास्वंदी, अबोली, मोगरा फुललेला होता. मंदिराकडे जायची वाटच अशी मोहक होती. हलके हलके सूर्यदर्शन होत होते. त्यांची सोनेरी किरणे पानावर थबकलेल्या जलबिंदूत अडकायची आणि त्या जलबिंदूने सोने प्राशन केले आहे असे वाटायचे. हे सारे पाहताना सकाळपासून माझ्या मनावर साठलेले मळभ हलके हलके दूर होऊ लागलं. पावलं आनंदने त्या ओल्या वाटेवरून मंदिराच्या दिशेने जाऊ लागली. इथे केवळ एक नाही तर तीन मंदिरे आहेत असे समजले. मग वाटेवर लागतील तशा क्रमाने मंदिरे बघायला आणि दर्शन घ्यायला सुरुवात केली.
पहिले मंदिर दिसले ते श्री केशवाचे. चिऱ्यात बांधलेले, लाकडी तुळया आणि कौलारू छप्पर असलेले हे सुंदरसे मंदिर. त्याची रचना पाहून थोडीफार हिमाचलमधल्या मंदिरांची आठवण आली. मंदिरात प्रवेश केल्यावर लाकडी खांब असणारा आटोपशीर, पण नेत्रदीपक सभामंडप दिसला. खांबावर सुबक कलाकुसर केली आहे. गाभाऱ्यात श्री केशवाची मूर्ती विराजमान आहे. शंख, चक्र, गदा पद्म त्यांनी धारलेले आहेत. खाली गरूडही आहे. जास्वंदीच्या ताज्या टवटवीत फुलांनी त्यांची पूजा केली होती. फार प्रसन्न वाटत होते तिथे. श्री केशवांचे दर्शन घेऊन पुन्हा त्या निसर्गसंपन्न वाटेवर आलो.
पुढे आल्यावर पाहते तर माझ्या उजव्या हाताला दत्तमंदिर होते. समोर खांडेपार नदी मोकळीढाकळी वाहत होती. पाऊस प्रचंड पडून गेला होता त्यामुळे नदीचे पाणी गढूळ झाले होते. हे दत्तमंदिर, नदीचे पात्र, घाट हे सारे अगदी नरसोबाच्या वाडीसारखेच होते. हे लक्षात आल्याने ठिकाण मग अगदी जवळचे वाटू लागले. मंदिरात जाऊन दत्तगुरूंचे अगदी मनोभावे दर्शन घेतले. तिथे उभे राहून नदीचा नजारा पाहत बसावा असा आहे.
या दत्तमंदिराच्या बाजूने खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्या उतरताना डाव्या बाजूला एक मोठे पुरातन मंदिर दिसू लागते. ते मंदिर पाहत उतरताना एका वेगळ्या विश्वात प्रवेश केल्यासारखा वाटतो. पायऱ्या उतरून खांडेपार नदीच्या घाटावर आले. मंदिरासमोर उभी राहिले आणि मंदिराची बांधणी पाहून थक्क होऊन गेले. हे मंदिर आहे सप्तकोटेश्वराचे. हे मंदिर मध्ययुगीन काळात बांधले आहे असे समजले. संपूर्ण चिऱ्यात (जांभ्यात) हे मंदिर बांधलेले आहे. म्हणजे मंदिराच्या भिंती तर चिऱ्यात आहेतच, शिवाय मंदिराचे उतरते छतसुद्धा चिऱ्याचेच आहे. त्याच्या पाठी कळीच्या आकारातील कळस आहे. कळसाच्या थोडे खाली नीट पाहिले तर नंदी आणि हत्ती साकारलेले दिसले. पूर्णपणे जांभ्यात असणाऱ्या या मंदिराची चौकट वेगळी दिसली. ती शिस्ट स्टोनची आहे. मंदिरात प्रवेश केला. जांभ्यात संपूर्ण मंदिर असल्याने आत गारवा जाणवत होता. तिथे एक छोटा सभामंडप आहे. तिथे नंदी विराजमान आहे. कोरलेल्या कोनाड्यात गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या दरवाज्यावरही काही प्रतिमा आहेत. गर्भगृहात शीतल, शांत वातावरणात सप्तकोटेश्वराची लिंग स्वरूपात पूजा केली होती. दिव्याच्या मिणमिणत्या उजेडात दर्शन घेताना मनावरचे मळभ पूर्ण निघून गेले आणि चैतन्यमय वाटू लागले. श्री सप्तकोटेश्वर हे गोव्यावर राज्य करणाऱ्या कदंबांचे आराध्य दैवत. कुलदैवत. असं म्हणतात की, त्यांच्या सोन्याच्या नाण्यांवर आणि ताम्रपटात सप्तकोटेश्वरांचा उल्लेख होता. त्यामुळे गोव्यात येऊन हे मंदिर बघायला मिळणं एक पर्वणीच होती. श्री सप्तकोटेश्वरांचे अजून एक मंदिर मी नार्वे गावात बघितलेच होते. खांडेपारमधील हे मंदिरही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे.
दर्शन घेऊन बाहेर आले आणि आजुबाजूच्या परिसरात फेरफटका मारला. मंदिराच्या पाठी कुळागर आणि गर्द झाडी आहे. आम्ही गेलो होतो तेव्हा कुणीच नव्हतं. नदीच्या पाण्याचा खळखळ आवाज आणि त्या आवाजात मिसळून गेलेली शांतता जाणवत होती. पावसाळ्यात जेव्हा सलग काही दिवस मुसळधार पाऊस पडतो तेव्हा हे मंदिर पाण्याखाली जाते. या नदीत मगरींचा वावर आहे. त्यामुळे घाटावर लक्ष देऊन फिरत होतो.
इथले एकूणच वातावरण कधी प्रसन्न वाटते तर कधी धीरगंभीर गूढ. माझे मन मात्र नवीन ठिकाण गवसल्याने आनंदून गेले होते. खरेच भटकंतीत काही ठिकाणे पाहिल्यावर असे वाटते की एखादा खजानाच सापडलाय. गोव्यातील ही ठिकाणे असे अनोखे अनुभव देणारी होती. आपण कितीही ठरवले तरी भटकंतीत कधी कधी अशी आडवाटेची वळणे घ्यावी लागतात. आपण चांगले-वाईट आधीपासून न ठरवता तो अनुभव दिलखुलासपणे घ्यावा, म्हणजे असे खजिने सापडतातच. गोव्याची ही अशी घडलेली भटकंती आमच्यासाठी खासच ठरली.
ट्रॅव्हल व्लॉगर
muktanarvekarofficial@gmail.com
जवळचे बस स्थानक - फोंडा
जवळचे रेल्वे स्थानक - मडगाव रेल्वे स्टेशन
एअरपोर्ट - मोपा आणि dabolim एअरपोर्ट.
फोंडा शहरात मुक्काम करून स्वतःच्या गाडीने हा परिसर बघणे आनंददायी अनुभव आहे.
भेट देण्यासाठी उत्तम काळ - ऑक्टोबर ते मे