आस्तिक्य तुमचे, नास्तिक्य आमचे

‘तुमचे नास्तिक्य तुमच्यापुरतेच ठेवा’ असे एखाद्या नास्तिकाला सांगितले जाते, तेव्हा सहज एक प्रश्न पडतो—मग आस्तिकांनीही आपले आस्तिक्य आपल्यापुरतेच ठेवावे का? अर्थात, मुद्दा कुणी आपली श्रद्धा व्यक्त करू नये किंवा कुणी आपली अश्रद्धा मांडू नये, असा नाही. मुद्दा इतकाच की, ज्याला श्रद्धा बाळगण्याचे स्वातंत्र्य आहे, त्याला प्रश्न विचारण्याचे आणि असहमती व्यक्त करण्याचे स्वातंत्र्यही असले पाहिजे.
आस्तिक्य तुमचे, नास्तिक्य आमचे
आस्तिक्य तुमचे, नास्तिक्य आमचे
Published on

समाजचिंतन

जगदीश काबरे

‘तुमचे नास्तिक्य तुमच्यापुरतेच ठेवा’ असे एखाद्या नास्तिकाला सांगितले जाते, तेव्हा सहज एक प्रश्न पडतो—मग आस्तिकांनीही आपले आस्तिक्य आपल्यापुरतेच ठेवावे का? अर्थात, मुद्दा कुणी आपली श्रद्धा व्यक्त करू नये किंवा कुणी आपली अश्रद्धा मांडू नये, असा नाही. मुद्दा इतकाच की, ज्याला श्रद्धा बाळगण्याचे स्वातंत्र्य आहे, त्याला प्रश्न विचारण्याचे आणि असहमती व्यक्त करण्याचे स्वातंत्र्यही असले पाहिजे.

तुमचे नास्तिक्य तुमच्यापुरतेच ठेवा. हे वाक्य ऐकतांना जणू काही समोरची आस्तिक व्यक्ती नास्तिकाला मोठ्या प्रेमाने सांगत आहे की, तुम्ही नास्तिक आहात, आम्हाला काहीच आक्षेप नाही; फक्त ते जाहीर करू नका. म्हणजे नास्तिक होण्याची परवानगी आहे, पण नास्तिक असल्याचे जाहीरपणे सांगण्याची नाही. नास्तिक विचार ठेवण्याचे स्वातंत्र्य आहे, पण तो विचार व्यक्त करण्याचे नाही. हाच तर्क स्वीकारायचा असेल तर त्याच न्यायाने नास्तिकही आस्तिकांना एक नम्र प्रश्न विचारू शकतात की, मग तुमचे आस्तिक्य तुम्हीही तुमच्यापुरतेच का ठेवत नाही? तुमचा देवावर विश्वास आहे—ठीक आहे. तुम्ही देवाची पूजा करता—ठीक आहे. तुम्ही मंदिरात जाता—ठीक आहे. तुम्हाला धार्मिक सण आवडतात—ठीक आहे. तुम्हाला देवाच्या नावाचा जयघोष करायचा आहे—करा. तुम्हाला तुमच्या श्रद्धेचा अभिमान आहे—तोही बाळगा. पण मग नास्तिकाने 'माझा देवावर विश्वास नाही' असे म्हटले की अचानक एवढा त्रास का होतो? 'हे सगळे स्वतःपुरते ठेवा' असा शहाजोग सल्ला देणे का सुरू होते? तुमच्या श्रद्धेला सार्वजनिक मोकळे मैदान द्यायचे आणि आमच्या विवेकाला बंदिस्त घरात कोंडायचे, हा कुठला न्याय?

देव मानणे हा एक वैयक्तिक निर्णय आहे आणि देव न मानणे हाही तितकाच वैयक्तिक निर्णय आहे. ज्याला देवावर विश्वास ठेवायचा आहे त्याने ठेवावा; ज्याला ठेवायचा नाही त्याने ठेवू नये. या गोष्टी समान पातळीवर स्वीकारल्या गेल्या तर वाद उरत नाही. वाद तेव्हाच निर्माण होतो जेव्हा एका व्यक्तीची श्रद्धा दुसऱ्या व्यक्तीच्या विवेकावर अधिकार सांगू लागते. 'माझ्या श्रद्धेने मला मानसिक आधार मिळतो', हे जितके वैध आहे, तितकेच 'मला आधारासाठी देवाची गरज वाटत नाही', हेही वैध आहे. दोन्ही अनुभव वैयक्तिक आहेत. मग एकाला पवित्र आणि दुसऱ्याला अपवित्र ठरवण्याचा अधिकार आस्तिकांना कोणी दिला? गंमत अशी की, आस्तिक्याचे सार्वजनिक प्रदर्शन आपल्या समाजात इतके सामान्य झाले आहे की त्याला प्रदर्शन म्हणण्याचीही कोणाला गरज वाटत नाही. देवळांच्या घंटा वाजतात, धार्मिक मिरवणुका निघतात, मोठमोठे धार्मिक कार्यक्रम होतात, हे सगळे समाजाला स्वाभाविक वाटते. पण एखादा नास्तिक म्हणतो, मी नास्तिक आहे, आणि नास्तिक परिषद भरवतो तेव्हा आस्तिकांचा पोटशुळ उठतो आणि ते विचारू लागतात, हे जाहीर करण्याची गरज काय? त्यावर नास्तिकांनी आस्तिकांना हाच प्रश्न विचारला तर चुकीचे ते काय? जर जाहीरपणे कृती करणे हीच अभिव्यक्ती असेल तर ती दोघांनाही लागू झाली पाहिजे. जर अभिव्यक्ती हा अधिकार असेल तर तोही दोघांना समान असला पाहिजे.

समाजात जे सतत दिसते ते सामान्य मानले जाते आणि जे लपवले जाते ते असामान्य ठरते. जर प्रत्येक आस्तिक आपली श्रद्धा उघडपणे व्यक्त करू शकतो, मग नास्तिकाने मात्र आपली भूमिका का लपवायची? मुळात नास्तिकाच्या नास्तिक्यामुळे आस्तिकाच्या श्रद्धेला ठेच का लागावी? नास्तिक देवाला नमस्कार करत नाही म्हणून तुमचा देव काही शक्तिहीन होत नाही. नास्तिक मंदिरात जात नाही म्हणून मंदिरे बंद पडत नाहीत. नास्तिक देवाच्या अस्तित्वावर प्रश्न विचारतो तरीही तुम्हाला देव सोडावासा वाटत नाही. मग एवढी चिडचिड कशासाठी? देव आहे, असे म्हणणे ही श्रद्धा आहे. देव आहे हे सिद्ध करा, असे म्हणणे हा प्रश्न आहे. प्रश्न विचारला म्हणून श्रद्धा नष्ट होत असेल, तर दोष प्रश्नाचा नसतो. उलट, प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी प्रश्नच न विचारण्याची मागणी केली जाते तेव्हा संशय निर्माण होतो. मग कोणत्याही श्रद्धेवर प्रश्न उपस्थित केला की अस्तिकांच्या भावना दुखावतात. खरेतर भावना दुखावणे म्हणजे विचार करणे थांबवणे होय. धर्म, राजकारण, इतिहास, समाजव्यवस्था, विज्ञान या प्रत्येक क्षेत्रातील विचारांची चिकित्सा होणारच. धार्मिक विचारांना मात्र भावना दुखावतात या नावाखाली चिकित्सेपासून मुक्त केले तर धर्म विचारांच्या क्षेत्राबाहेर जाऊन विशेषाधिकाराच्या क्षेत्रात प्रवेश करतो. नास्तिक देवाधर्माची चिकित्सा करताना कोणाचाही अपमान करत नाही. कारण नास्तिक व्यक्तीऐवजी विचारांवर प्रहार करतो. पण हीच सभ्यता आस्तिकांकडूनही अपेक्षित आहे. त्यांचा देवावर विश्वास आहे हे ठीक. पण नास्तिकांनाही देव मानावाच लागेल अशी जबरदस्ती करणे मात्र अवैध. माझा धर्म माझ्यासाठी महत्त्वाचा आहे हे वैध; पण माझ्या धर्मानुसारच सर्व समाजाने वागले पाहिजे, याला आरेरावी अतिरेकीपणा म्हणतात. म्हणून प्रश्न आस्तिक विरुद्ध नास्तिक असा नाही. प्रश्न आहे स्वातंत्र्य विरुद्ध वर्चस्वाचा.

म्हणून नास्तिकाचा आक्षेप आस्तिकाच्या देवावर नसून देवाच्या नावाने नास्तिकाच्या विवेकावर गाजवलेल्या अधिकारावर आहे. नास्तिकाला तुमचा देव हिरावून घ्यायचा नाही. त्याला तुमची पूजाही बंद करायची नाही. त्याला तुमच्या श्रद्धेवर पोलिसिंगही करायचे नाहीत. त्याची मागणी इतकीच आहे की, तुम्ही तुमचा देव सांभाळा; माझा विवेक मला सांभाळू द्या. कारण नास्तिक हा संविधानातील अनुच्छेद २५ या कलमाचा आदर करणारा आहे. तुम्हाला देवाचे नाव सार्वजनिकपणे घेता येते, तसेच आम्हालाही देवाचे नाव सार्वजनिकपणे नाकारता येते. तुम्हाला मंदिरात जाण्याचा अधिकार आहे, तसा आम्हाला मंदिरात न जाण्याचा अधिकार आहे. तुम्हाला तुमच्या श्रद्धेचा अभिमान बाळगता येतो, तसा आम्हाला विवेकाचा अभिमान बाळगता येतो. तुम्ही तुमचे आस्तिक्य मिरवा; आम्ही आमचे नास्तिक्य मांडू. तुम्ही देवाची स्तुती करा; आम्ही देवाच्या अस्तित्वाचा पुरावा मागू. तुम्ही श्रद्धा जपा; आम्ही प्रश्न विचारू. पण तुम्ही आमचे प्रश्न विचारण्याचा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही. कारण प्रश्न विचारणे म्हणजे श्रद्धेचा अपमान नव्हे. असहमती म्हणजे द्वेष नव्हे. नास्तिक असणे म्हणजे आस्तिकांचा शत्रू असणे नव्हे.

खरा सभ्य समाज तो नाही जिथे सगळे लोक एकाच देवावर विश्वास ठेवतात. खरा सभ्य समाज तो आहे जिथे एक माणूस देवावर पूर्ण श्रद्धा ठेवू शकतो आणि त्याच्या शेजारी दुसरा माणूस देव नाकारूनही सन्मानाने जगू शकतो. म्हणून पुढच्या वेळी एखाद्या नास्तिकाला तुमचे नास्तिक्य तुमच्यापुरते ठेवा, असे सांगण्यापूर्वी एक क्षण स्वतःला आरशात पाहावे आणि प्रश्न विचारावा, मी माझे आस्तिक्य माझ्यापुरते ठेवतो का? जर उत्तर 'नाही' असेल, तर नास्तिकालाही गप्प करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आणि जर उत्तर 'हो' असेल, तर नास्तिकालाही तेच स्वातंत्र्य देण्यास काय हरकत आहे? श्रद्धेला स्वातंत्र्य हवे असेल, तर अश्रद्धेलाही द्यायला हवे. देवावर विश्वास ठेवण्याचे स्वातंत्र्य हवे असेल, तर देवावर विश्वास न ठेवण्याचे स्वातंत्र्यही स्वीकारायला हवे. कारण स्वातंत्र्याला धर्म नसतो. म्हणून शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवावी की, तुमचा देव तुमच्या श्रद्धेमुळे सुरक्षित असेल, तर एका नास्तिकाच्या प्रश्नाने तो धोक्यात येणार नाही. पण जर नास्तिकाच्या प्रश्नाने तुमची श्रद्धा हादरत असेल, तर तो तुमच्या श्रद्धेवरील आत्मविश्वासाचा प्रश्न आहे.

लेखक समाजचिंतक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारक आहेत.

jetjagdish@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in