पळा पळा, कोण पुढे पळे तो!

एक, दोन, तीन... पळा! अरे, थांबा! ही शर्यत माणसांची नाही, तर निसर्गातल्या वेगवान प्राण्यांची आहे! जमिनीवरचा चित्ता, आकाशातला बहिरी ससाणा आणि समुद्रातला सैलफिश यांच्यात कोण सर्वात वेगवान असेल? प्रत्येकाचा वेग वेगळा, प्रत्येकाची धावण्याची किंवा झेप घेण्याची पद्धतही वेगळी! चला तर मग, जाणून घेऊया निसर्गातल्या या भन्नाट धावपटूंची गुपितं!
पळा पळा, कोण पुढे पळे तो!
पळा पळा, कोण पुढे पळे तो!'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

अजब निसर्ग

मकरंद जोशी

एक, दोन, तीन... पळा! अरे, थांबा! ही शर्यत माणसांची नाही, तर निसर्गातल्या वेगवान प्राण्यांची आहे! जमिनीवरचा चित्ता, आकाशातला बहिरी ससाणा आणि समुद्रातला सैलफिश यांच्यात कोण सर्वात वेगवान असेल? प्रत्येकाचा वेग वेगळा, प्रत्येकाची धावण्याची किंवा झेप घेण्याची पद्धतही वेगळी! चला तर मग, जाणून घेऊया निसर्गातल्या या भन्नाट धावपटूंची गुपितं!

चित्ता, पेरिग्रीन फाल्कन, सैलफिश, मेक्सिकन फ्री-टेल्ड बॅट, सदर्न कॅलिफोर्नियन माइट, सदर्न जायंट डार्नर (चतुराचा प्रकार), पेन्सिल स्क्विड, पेरेंटाय, ब्लॅक मांबा हे सगळे वेगवेगळ्या गटांतले प्राणी एका बाबतीत मात्र समान आहेत आणि ती गोष्ट म्हणजे त्यांची गती, त्यांचा वेग. जगातल्या सर्वात वेगवान प्राण्यांची यादी करताना या सगळ्यांना पहिल्या दहांमध्ये स्थान नक्की मिळणार. आता खरं म्हणजे हे सगळे जण वेगवेगळ्या गटांचे सभासद आहेत. म्हणजे चित्ता जमिनीवरचा सस्तन प्राणी आहे, तर पेरिग्रीन फाल्कन आकाशात भरारी घेणारा ससाणा पक्षी, पेन्सिल स्क्विड जलचर आहे, तर ब्लॅक मांबा हा सरपटणारा रेप्टाइल. त्यामुळे मग या सगळ्यांची शर्यत लावून त्यांच्यातला सर्वात गतिमान कोण, हे ठरवणं तसं शक्यच नाही. तरीही जगातला सर्वात चपळ, जलद, गतिमान प्राणी कोण असू शकेल, याची पाहणी केली तर एक मनोरंजक यादी समोर येते. या यादीतलं सर्वात वरचं, पहिल्या क्रमांकावरचं नाव आहे ते निर्विवादपणे पेरिग्रीन फाल्कन म्हणजेच ‘बहिरी ससाणा’ या पक्ष्याचं. हा शिकारी पक्षी तसा जगभरात (बर्फाळ परिसर सोडून) पाहायला मिळतो. याचा सर्वात जास्त वेग ताशी ३८९ किलोमीटर असा नोंदवण्यात आलेला आहे. मात्र, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हा वेग त्याचा आडवे उडण्याचा नाही, म्हणजे स्थलांतर करताना किंवा सर्वसाधारणपणे उडताना हा ससाणा या वेगाने उडत नाही. तर जेव्हा तो उंच आकाशातून खाली जमिनीवरचे भक्ष्य हेरतो, तेव्हा त्याच्याकडे झेपावताना-म्हणजेच सूर मारताना-असा अफलातून वेग घेतो. पक्षीराज्यात या ससाण्यामागोमाग वेगवान ठरतो तो गोल्डन ईगल. हा सुवर्ण गरुड सगळ्या गरुडांमध्ये सर्वात जास्त वेगाने सूर मारून भक्ष्य पकडतो. सुमारे २४० ते ३२० किलोमीटर प्रतितास या वेगाने हा गरुड आकाशातून जमिनीवरच्या आपल्या भक्ष्याकडे झेपावतो. आकाशात उंच उंच भरारी घेणाऱ्या पक्ष्यांसारखेच जमिनीवर धावण्यात पटाईत असलेले पक्षीही आहेत आणि त्यातला मुख्य भिडू म्हणजे शहामृग. जमिनीवर धावण्याचा याचा वेग तासाला ६१ ते ९७ किलोमीटर इतका असतो. त्यामुळे हा जसा जमिनीवरचा सर्वात वेगवान पक्षी आहे, त्याचप्रमाणे द्विपादांमध्येही तो सर्वात वेगवान आहे.

जमिनीवरच्या प्राण्यांमध्ये सर्वात वेगवान कोण? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ‘चित्ता’. याच्या दोन प्रजाती-आफ्रिकन आणि आशियाई- आढळतात. पूर्वी आपल्या भारतात वाघ, बिबट्या, सिंहाबरोबरच आशियाई चित्तेही होते. मात्र, शिकार आणि अधिवासाचा नाश यामुळे भारतातील आशियाई चित्ते नामशेष झाले. आता मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आफ्रिकेतून आणलेले चित्ते पाहायला मिळतात. गवताळ कुरणात राहणारा आणि भक्ष्याचा पाठलाग करून शिकार करणारा चित्ता ताशी १२० किलोमीटर या वेगाने धावू शकतो. धावायला सुरुवात केल्यावर फक्त तीन सेकंदांमध्ये तो ताशी ९७ किलोमीटर इतक्या वेगाने धावू शकतो. मात्र, ताशी १२० हा त्याचा सतत धावण्याचा वेग नाही. आपल्या भक्ष्यावर शेवटचा हल्ला करताना फक्त २-३ सेकंदांकरता चित्ता या वेगाने धावतो. साधारण ६५० ते ९८० फुटांचे अंतर तो या गतीने पार करतो. मात्र, एकदा असा सर्वोच्च वेग गाठला की नंतर थकलेल्या चित्त्याला पुन्हा एकदा ताजंतवानं व्हायला किमान ३० मिनिटांची विश्रांती घ्यावीच लागते.

महासागरातला वेगवान जीव म्हणून ओळखला जातो तो ‘सैलफिश’ हा मासा. पॅसिफिक आणि हिंद महासागरात आढळतो. त्याच्या पाठीवरचा कल्ला एखाद्या जहाजाच्या शिडासारखा उभा असतो. हा मासा पोहताना अनेकदा पाण्याच्या पृष्ठभागावर हा कल्ला सहज दिसतो. हा मासा पोहताना ताशी १०९ किलोमीटर या वेगाने पोहतो. मात्र, त्याच्या या पोहण्यात त्याने पाण्याबाहेर उसळून घेतलेल्या उड्याही असतात आणि त्यामुळेच तो कमी वेळात जास्त अंतर कापू शकतो. पाण्यातील कणाहीन म्हणजे इनव्हर्टिब्रेट्सच्या गटातले सर्वात वेगवान जीव स्क्विड (माकूळ) च्या गटात आढळतात. हम्बोल्ट स्क्विड साधारण ताशी ४० किलोमीटरचा वेग घेते, तर पेन्सिल स्क्विड ताशी ३६ किलोमीटरच्या वेगाने पोहते. मात्र, यातले बहुतेक प्रकार पाण्याबाहेर उसळी घेऊन आपली गती कायम राखतात. जपानी फ्लाइंग स्क्विड तर अशी उसळी घेऊन जणू उडत उडत ३० मीटरचं अंतर फक्त ३ सेकंदांत पार करते.

जल, भूमी आणि आकाश या तिन्ही ठिकाणी संचार करू शकणारे म्हणून कीटक ओळखले जातात. या कीटकांच्या गटातली विविधता थक्क करणारी आहे. त्यांच्यातील सदर्न जायंट डार्नर हा ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात आढळणारा चतुर सर्वात वेगवान कणाहीन-इनव्हर्टिब्रेट-म्हणून प्रसिद्ध आहे. आधुनिक काळातील याच्या वेगाचं मोजमाप उपलब्ध नसलं तरी एका जुन्या नोंदीप्रमाणे हा चतुर ताशी ९७ किलोमीटर या वेगाने उडतो. या चतुराच्या खालच्या पायरीवर आहे टायगर बीटल. ऑस्ट्रेलियातील एका जातीचा टायगर बीटल जमिनीवर ताशी ६.८ किलोमीटर या वेगाने पळू शकतो, तर याचाच उडण्याचा वेग ताशी ४३ किलोमीटर असतो.

निसर्गातले हे धावपटू आणि त्यांच्या पळण्याचा वेग माहिती करून घेतल्यावर या सगळ्यांमध्ये माणूस कुठे बसतो (खरं तर पळतो!) असा प्रश्न नक्कीच मनात येतो, तर सर्वसाधारण मनुष्य लांब पल्ल्याचं अंतर पार करताना तासाला २२ किलोमीटर या गतीने पळू शकतो. अगदी छोटं अंतर असेल तर हाच वेग तासाला ४४ किलोमीटर इतका वाढू शकतो. मात्र, एक नक्की आहे की निसर्गातील अन्य कोणत्याही वेगवान, गतिमान प्राण्यापेक्षा दीर्घ अंतराच्या शर्यतीत माणूसच जास्त काळ टिकाव धरू शकतो. त्यामुळे ‘पळा पळा, कोण पुढे पळे तो’ याचं उत्तर निसर्गातल्या प्रत्येक घटकाकडे वेगळं आहे.

निसर्ग अभ्यासक व लेखक

makarandvj@gmail.com