
विशेष
शब्दांकन : पूजा सामंत
१५ जूनला फादर्स डे आहे. परंपरागत समजूत वडिलांना कठोर, शिस्तप्रिय मानते. पण अनेकदा आपल्या मुलांना हळूवारपणे फुलवण्याचं काम अनेक बाबामंडळी करत असतात. विशेषत: लेकींच्या बाबतीत बाबा लोण्याहून मऊ होतात, तर एखादे ‘पा’ त्याच्या मुलासाठी जगण्याचा पाया असतात. त्या पायावर उभं राहून तो मुलगा जगाकडे पाहत असतो. उंगली पकड के तूने, चलना सिखाया था ना...असं म्हणत मेघना गुलझार आपल्या आयुष्यातील आपल्या बाबांचं स्थान उलगडत आहेत.
हा असा फादर्स डे साजरा करणं म्हणजे एक फॅडच आहे. गेली १५-२० वर्षं तरी ते जोमात सुरू आहे. मी पापांना आजवर कधीही ग्रीटिंग कार्ड, फुलं, चॉकलेट्स, त्यांचे आवडते खादीचे कुडते अशी कुठलीही गिफ्ट्स दिलेली नाहीत. कारण अशा कुठल्याही मार्केटिंगपेक्षा, मार्केटचं प्रॉडक्ट असलेल्या ‘फादर्स डे’पेक्षा आमचं नातं वेगळं आहे. मला माझ्या वडिलांनी मोठं केलं, मला घडवलं.. एक इन्सान के रूप में, एक लेखक-एक निर्देशक के रूप में उन्होंने मुझे इस काबिल बनाया की मैं आज इस जगह हूँ.. माझे वडील आता ९० वर्षांचे आहेत. पण त्यांची स्मरणशक्ती आजही टवटवीत आहे, ते उत्साहाने सळसळत असतात. मी लहान असताना ते मला पाठीवर बसवून घरभर घोडा बनून फिरत. आज त्यांच्या नातवाच्या सहवासातही ते असेच उत्साही असतात. त्यांचा लाडका नातू म्हणजे माझा मुलगा, समय संधू. त्यालाही पापांनी इतक्या प्रेमाने वाढवलं आहे की, त्याला आजोबा म्हणजे त्याचे ‘बेस्ट बडी’च वाटतात. माझ्या वडिलांनी खूप बाल साहित्य लिहिलं आहे. कारण माझ्या जन्मानंतर त्यांना बाल साहित्याविषयी आपसूक ओढ निर्माण झाली. माझी आई अभिनेत्री राखी हिने माझ्या जन्मानंतर वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. मला पूर्ण वेळ द्यावा, किमान मी लहान असेपर्यंत अभिनयासारख्या ‘फुल टाइम’ व्यवसायाला महत्त्व देऊ नये, असं माझ्या वडिलांना वाटत होतं. दोघांची व्यक्तिमत्त्वं परस्परविरोधी आणि ‘स्ट्राँग’ असल्याने मम्मी वेगळी झाली आणि तिने अभिनयाला वेळ दिला. अर्थात मला भेटण्यासाठी, शाळेच्या ओपन हाऊससाठी ती आवर्जून येत असे. पण मला पूर्ण वेळ दिला तो माझ्या वडिलांनी. माझ्या अनुपस्थितीत त्यांचं लिखाण व्हायचं. म्हणूनच मला घडवण्यात माझ्या वडिलांचं योगदान अधिक आहे.
मी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘फिलहाल’ रिलीज झाला ते वर्ष होतं २००२. सरोगसीवर भाष्य करणारा हा पहिलाच चित्रपट होता. काळाच्या आधी बनला होता की आणखी काही कारण होते, नाही सांगू शकत. पण माझा पहिलाच चित्रपट अयशस्वी झाला आणि मी नैराश्याने झाकोळून गेले. माझ्या करियरचं पुढे काय होणार? हा प्रश्न मला डिप्रेशनमध्ये लोटत होता. माझ्या इतकाच माझ्या आई-वडिलांनाही हा प्रश्न तीव्रतेने भेडसावत होता. माझ्या आईकडे याचं त्वरित सोल्यूशन नव्हतं, पण पापांकडे मात्र आशेचा किरण होता. दिग्दर्शक विशाल भारद्वाज याच्या रूपाने! विशाल भारद्वाज माझ्या पापांना मुलासारखा आहे. पापांनी ‘फिलहाल’चं अपयश आणि माझं नैराश्य याबाबत विशालशी चर्चा केली. त्याने दिल्लीच्या आरुषी तलवार या बालिकेच्या मर्डर केसवर चित्रपट काढावा असं सुचवलं. ही कल्पना विशालने मांडली नसती तर मी ‘तलवार’ दिग्दर्शित केला नसता. हा दुसरा सिनेमा मी केला नसता तर मी डिप्रेशनमधून कधी बाहेर आले असते कोण जाणे. ‘तलवार’मुळे मला माझं पहिलं व्यावसायिक यश लाभलं.
मी कॉलेजमध्ये शिकत असताना आमच्यात माझ्या करियरविषयी नेहमी चर्चा होई. कमल हसन यांनी पापांना फोन केला होता आणि माझ्यासाठी अभिनयाची ऑफर दिली. पण मेघनाचं शिक्षण पूर्ण व्हायचं आहे, शिक्षण झाल्यानंतर तिचा निर्णय ती घेईल, असं पापांनी सांगितलं.
मला वाटतं, जर कमल हसन यांच्या फोननंतर पापांनी माझा कल कशात आहे हे न जोखता मला अभिनयात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं असतं, तर एक-दोन चित्रपट करून मी पुन्हा बॅक टू पॅव्हेलियन झाले असते.
मी लहान होते तेव्हापासून आईला अभिनय करताना पाहत आलेय. पण माझे वडील प्रख्यात लेखक-कवी-दिग्दर्शक आहेत हे त्या अजाणत्या वयात समजलं नव्हतं. मग हळहळू त्यांची वैचारिक उंची, साहित्यिक उंची लक्षात येऊ लागली. माझे वडील म्हणून ते किती वेगळे, किती प्रेमळ, मला किती घडवणारे आहेत हे लक्षात येत गेलं.
माझं बालपण.. माझे टिनएजर असतानाचे दिवस.. मी तरुण झाले तेव्हा माझ्या करियरचा प्रश्न..प्रत्येक वेळी त्यांनी मला अगदी शांतपणे, संयमाने, तरलतेने समजून घेतलं. माझ्या सगळ्याच फिल्ममध्ये त्यांनी लिहिलेली गाणी माझी अगदी आवडती आहेत. ते सिद्धहस्त लेखक असले तरी मी त्यांच्यावर हक्क गाजवते. एक और मुखडा लिखिये प्लीज.. एक और अंतरा... असं मी त्यांना सांगते आणि ते ऐकत जातात.”