
विशेष
शब्दांकन : पूजा सामंत
१५ जूनला फादर्स डे आहे. परंपरागत समजूत वडिलांना कठोर, शिस्तप्रिय मानते. पण अनेकदा आपल्या मुलांना हळूवारपणे फुलवण्याचं काम अनेक बाबामंडळी करत असतात. विशेषत: लेकींच्या बाबतीत बाबा लोण्याहून मऊ होतात, तर एखादे ‘पा’ त्याच्या मुलासाठी जगण्याचा पाया असतात. त्या पायावर उभं राहून तो मुलगा जगाकडे पाहत असतो. उंगली पकड के तूने, चलना सिखाया था ना...असं म्हणत नुसरत भरुचा आपल्या आयुष्यातील आपल्या बाबांचं स्थान उलगडत आहेत.
मी घरात सगळ्यांची लाडकी एकुलती एक लेक होते. पाच-सहा वर्षांची झाले आणि मला एखादं भावंडं हवं, असं वाटू लागलं. खेळायला कोणाची तरी सोबत हवी, असं वाटू लागलं. मला एकटीला कंटाळा येई. माझा हा कंटाळा माझ्या पापांनी ओळखला आणि माझा ‘मित्र’ होण्यासाठी त्यांनी कंबर कसली. त्यांचे शनिवार-रविवार त्यांनी माझ्यासाठी राखून ठेवले. मला चौपाटी, राणीची बाग, गार्डन असं सगळीकडे ते नेऊ लागले. पण कुठंही नेण्याआधी ते मला त्या स्थानाची माहिती देत असत. मेरे पापा कब मेरे गाईड, मेरा एन्सायक्लोपेडिया बन गये मुझे पता ही नहीं चला...माझ्याशी गप्पा मारणं, घरी असलो की बुद्धिबळ, मेकॅनो खेळणं हे सारं ते करीत. त्यांच्यामुळेच माझ्या वाढत्या वयात मला कधीही एकटेपणा जाणवला नाही.
कॉलेजनंतर मी ॲक्टिंग, मॉडेलिंग क्षेत्रात जाण्याचं ठरवलं. माझी आवड ओळखून त्यांनी मोकळेपणाने परवानगी दिली. माझ्या आवडीप्रमाणे मला करियर करू द्यायचं, माझ्या मागे नव्हे तर माझ्या बरोबरीने मला साथ द्यायची, हे धोरण त्यांनी स्वीकारलं. पित्याचा अडथळा होऊ नये, तर त्याने ढाल बनावं, असं त्यांचं वर्तन असे. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी निराशेचे क्षण येतात. अपयश पचवणं सोपं नाही. मॉडेलिंगमुळे मी अभिनयात आले. २०१३ मध्ये मला ‘आकाशवाणी’ हा चित्रपट मिळाला. कार्तिक आर्यन माझा हिरो होता. पण हा चित्रपट सपाटून आपटला. मी प्रचंड डिप्रेस्ड झाले. मी स्वतःला बेडरूममध्ये कोंडून घेत असे. घरात आई-वडील-आजी यांना तोंड दाखवत नव्हते. मैं हसना भूल चुकी थी...रातों की नींद हराम हो गयी.. बहुत भयंकर दौर था वो मेरे लिए.. पापा ने मुझसे कई मर्तबा बात करने की कोशिश की..वे रात दिन मेरे कमरे में बैठने लगे.. इस डर से की नुसरत डिप्रेशन में कुछ गलत कदम न उठा ले.. मी काय करतेय, कुठल्या दिशेला चालले आहे ते मला काहीही समजत नव्हतं. मग पापांनीच पुढाकार घेत मला कौन्सिलिंगची, समुपदेशनाची गरज आहे, हे ठरवलं आणि माझी ट्रिटमेंट सुरू झाली. अगदी मला औषधं देण्याचं कामही पापा करू लागले. शिवाय त्यांचे प्रेमळ शब्द होतेच सोबतीला. ते सांगत, बेटा, सूर्य रोज उगवतो. पण संध्याकाळ होत आली की त्याचा उजेड कमी होतो. कारण तेव्हा चंद्र उगवत असतो. मग रात्र होते आणि पुन्हा सकाळी सूर्य उगवतो. आपल्या आयुष्याचंही हेच चक्र आहे. कधी सफलता, तर कधी असफलता. तुझेही चांगले दिवस येतील. पण त्या दिवसांचं स्वागत करण्यासाठी तुला हसऱ्या चेहऱ्यानेच त्या दिवसांसमोर गेलं पाहिजे... मी त्या भयंकर निराशेतून बाहेर येऊ शकले. कारण, मेरे पापा मेरे लिए सम्बल बने..मेरे लिए सूरज की रोशनी बने... ज्या प्रकारे पापांनी त्या काळात मला समजून घेतलं त्याला तोड नाही.
आज मी वयाची पस्तिशी पार केली आहे. माझं लग्न का झालं नाही, याच्या चौकशा लोक करतात. पण जोवर मला आवडेल, समजून घेईल, असा मुलगा सापडत नाही, तोवर मी लग्न करू नये, हेच पापांचं मत आहे.
पापांनी दिलेलं प्रेम, दाखवलेला विश्वास हा माझ्यासाठी आयुष्यभराचा ठेवा आहे. पापांमुळे मी आत्मविश्वासाने झळाळून उठले.