

स्ट्रेट ड्राईव्ह
ऋषिकेश बामणे
फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा २३वा हंगाम उत्साहात पार पडला. गेला महिनाभर रंगलेल्या या स्पर्धेत स्पेनने अखेर बाजी मारताना गतविजेत्या अर्जेंटिनाला नमवले. ख्रिस्तियानो रोनाल्डो, नेयमार यांसारख्या खेळाडूंच्या कारकिर्दीतील हा अखेरचा विश्वचषक ठरला. तर लिओनेल मेस्सीची कारकीर्द देखील जवळपास समाप्त झाली आहे. त्यामुळे या विश्वचषकाद्वारे चाहत्यांनी नव्या तार्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि यामधूनच त्यांना किलियान एम्बाप्पे, लॅमिन यमाल, एर्लिंग हालँड असे काही खेळाडू गवसले.
भारत हा देश क्रीडा सामने खेळण्यापेक्षा ते पाहण्यासाठी अधिक ओळखला जातो. भारतातील तमाम चाहत्यांनी यंदाही रात्रीचा दिवस करून फुटबॉल वर्ल्डकपच्या सामन्यांचा आनंद लुटला. १४०कोटींहून अधिक लोकसंख्या असूनही आपण ४८ संघांचा समावेश असलेल्या विश्वचषकास पात्र ठरू शकलो नाहीत, याचे दुःख राहिले बाजूला. मात्र आपली तरुण पिढी गेले काही दिवस नक्कीच त्यांच्या आवडत्या संघाला पाठिंबा देण्यात मग्न होती. देशात सध्या वेगळे वातावरण असतानाच विश्वचषकाच्या काळात मात्र मेस्सी श्रेष्ठ की रोनाल्डो यावरून दोन गट निर्माण झाले होते.
३९ वर्षीय मेस्सीने या विश्वचषकात त्याची मॅजिक पुन्हा एकदा दाखवून दिली. त्याने आठ सामन्यांत आठ गोल आणि चार असिस्ट नोंदवताना गोल्डन बूटच्या यादीत दुसरे स्थान मिळवले. उपांत्यपूर्व आणि उपांत्य सामन्यात मेस्सीला गोल करण्यात अपयश आले, मात्र त्याने असिस्टद्वारे संघाच्या विजयात योगदान दिले. मुख्य म्हणजे २०२२च्या वर्ल्डकप मधील उपांत्यपूर्व फेरीपासून ते २०२६ च्या उपांत्य फेरीपर्यंत सलग १० सामन्यांत मेस्सीने किमान गोल किंवा असिस्ट नोंदवला. हा एक विश्वविक्रम ठरला. त्याशिवाय सलग ७ सामन्यांत गोल करणारा मेस्सी पहिलाच खेळाडू ठरला. अंतिम फेरीत मात्र स्पेनच्या बचावापुढे मेस्सी निष्प्रभ ठरला. परिणामी अर्जेंटिनाचा संपूर्ण संघही ढेपाळला आणि त्यांना सलग दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावण्यात अपयश आले. स्पेनने या लढतीत १-० अशी बाजी मारली. अर्जेंटिनाच्या अंतिम फेरीतील खेळावर आणि मैदानाबाहेरील काही घडामोडींवर सध्या वेगळी चर्चा सुरू असली तरी मेस्सीने २०२२ मध्ये विश्वचषक, कोपा अमेरिका आणि अन्य आंतरराष्ट्रीय तसेच क्लब पातळीवरील जवळपास सर्व स्पर्धा जिंकल्याने त्याचे चाहत्यांच्या मनात नेहमीच वेगळे स्थान राहील. मेस्सीने अद्याप निवृत्ती जाहीर केलेली नसली, तरी २०३० चा विश्वचषक तो खेळण्याची शक्यता कमीच आहे.
यानंतर वळूया रोनाल्डो आणि नेयमार यांच्याकडे. रोनाल्डोच्या पोर्तुगालचे आव्हान राऊंड ऑफ ३२ फेरीत संपुष्टात आले. रोनाल्डोने या स्पर्धेत फक्त तीन गोल केले. त्याच्या कारकिर्दीतील हा सहावा विश्वचषक होता. मात्र ४१ वर्षीय रोनाल्डो फारसा लयीत दिसलाच नाही. त्याच्या संघाकडूनही पुरेसे पाठबळ लाभले नाही. रोनाल्डोच्या २००६ ते २०२६ या २० वर्षांच्या विश्वचषक कारकिर्दीत पोर्तुगालला एकदाही अंतिम फेरी गाठता आली नाही. तसेच ३४ वर्षीय नेयमार या विश्वचषकात बहुतांशी सामन्यांत जायबंदी राहिला. ब्राझील संघाला राऊंड ऑफ १६ फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. नेयमारने या लढतीत कारकीर्दीतील अखेरचा गोल केला. नेयमारचा समावेश असताना २०१४ मध्ये ब्राझीलने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर या संघाची कामगिरी सातत्याने ढेपाळली आहे. त्यामुळेच नेयमार पर्वाचा या स्पर्धेद्वारे शेवट झाला.
यंदाच्या विश्वचषकात मेस्सी, रोनाल्डो, नेयमार या तिघांवरही भारी पडला तो फ्रान्सचा एम्बाप्पे. या २६ वर्षीय आक्रमकाने सलग दुसर्या विश्वचषकात गोल्डन बूट पुरस्कार पटकावताना दहा गोल नोंदवले. २०१८ मध्ये पदार्पण करणाऱ्या एम्बाप्पेने त्यावेळी फ्रान्सला विश्वचषक जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. २०२२ मध्ये फ्रान्सला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर यंदा त्यांना उपांत्य फेरीमध्ये स्पेनकडून पराभव पत्करावा लागला. एम्बाप्पेने मात्र आताच फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत २२ गोलसह अग्रस्थान काबीज केले आहे. मेस्सी २१ गोलसह या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. एम्बाप्पे किमान २ विश्वचषक आणखी नक्कीच खेळू शकतो. त्यामुळे फ्रान्स पुढील विश्वचषकात देखील जेतेपदाचा प्रबळ दावेदार असेल.
एम्बाप्पेचा कट्टर प्रतिस्पर्धी म्हणुन या विश्वचषकात उदयास आला तो म्हणजे स्पेनचा १९ वर्षीय यमाल. त्याने या स्पर्धेत गोल एकच केला. मात्र असिस्टसह संपूर्ण सामन्यात स्पेनला नियंत्रण मिळवून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली. यमालकडे मेस्सीचा वारसदार म्हणूनही पाहिले जात आहे. कारण ज्या बार्सिलोना क्लबकडून मेस्सी एकेकाळी खेळायचा, तेथूनच यमाल खेळतो. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मेस्सी व यमाल आमनेसामने आले, या निमित्ताने दोघांचेही १९ वर्षांपूर्वीचे छायाचित्र समाज माध्यमांवर तुफान वायरल झाले होते. २००७च्या उत्तरार्धात, ‘स्पोर्ट’ हे स्पॅनिश वृत्तपत्र आणि युनिसेफ मिळून बार्सिलोनाचे खेळाडू आणि लहान मुले यांच्यासह एक ‘चॅरिटी कॅलेंडर’ तयार करत होते. यमालच्या पालकांनी त्याला एका सार्वजनिक सोडतीमध्ये सहभागी केले आणि अनपेक्षितपणे निवडल्या गेलेल्या मुलांमध्ये त्याचीही निवड झाली. त्या सत्रासाठी बार्सिलोनाचा जो खेळाडू नेमला गेला होता, तो म्हणजे मेस्सी. मेस्सीचे त्यावेळचे वय अवघे २० वर्षे. त्यामुळे यमाल १९ वर्षांनी इथवर मजल मारेल, असा विचारही त्यावेळी कोणी केला नव्हता. २०२४ मध्ये युरो चषक आणि आता विश्वचषक जिंकून यमालने तरुण वयातच महान खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे.
एम्बाप्पे, यमाल यांच्यानंतर नव्या पिढीतील तार्यांमध्ये क्रमांक लागतो तो नाॅर्वेच्या हालँडचा. ७ फूट उंचीच्या या पठ्याने यंदाच्या विश्वचषकात सात गोल केले. नॉर्वे संघाला उपांत्यपूर्व फेरीपर्यंत नेण्यात हालँडचा मोलाचा वाटा होता. तब्बल २ दशकानंतर हा संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. राऊंड ऑफ १६ फेरीत नॉर्वेने ब्राझीलला देखील पराभूत केले. मात्र इंग्लंडविरुद्ध ते कमी पडले. प्रीमियर लीगमधून मँचेस्टर सिटीकडून खेळणाऱ्या हालँडने अल्पावधीतच जगभरात चाहते कमावले आहेत. लांब केस आणि दमदार शरीरयष्टीमुळे त्याची मुलींमध्येही चर्चा असते. २०३० च्या विश्वचषकासाठी नॉर्वे पात्र ठरली, तर एम्बाप्पे, यमाल आणि हालँड यांच्यातील जुगलबंदी पाहण्यास चाहते नक्कीच आतुर असतील.
एकूणच आता फिफा वर्ल्डकपचा थरार संपला असून फुटबॉलपटूही विश्रांतीचा आस्वाद लुटत आहेत. २०३०च्या विश्वचषकात सहभागी संघांची संख्या आणखी वाढणार असल्याचे समजते. तेव्हा नव्हे, तर किमान २०३४ मध्ये तरी भारतीय संघ देखील वर्ल्ड कपसाठी पात्र ठरेल आणि आपला खेळाडू फुटबॉल च्या पटलावर उदयास येईल, अशीच आशा तमाम चाहते बाळगून आहेत.
bamnersurya17@gmail.com