
हितगुज
डॉ. शुभांगी पारकर
शाळेचा पहिला दिवस म्हणजे केवळ सुट्टीनंतर पुन्हा शाळेत परतणं नाही, तर ती एक अनेक गोष्टींची नवी सुरुवात असते. अनेक मुलांसाठी शाळेकडे पुन्हा परतणं हे एक धाडस असतं. अनेक चिंता सोबत असतात त्यांच्या. अशावेळी गरज असते ती नवी उमेद जागवण्याची, मुलांच्या मनात विश्वास निर्माण करण्याची.
शाळेचा पहिला दिवस म्हणजे केवळ एक तारीख नव्हे किंवा दिवस नव्हे; शाळेचा पहिला दिवस म्हणजे नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी मिळालेलं एक नवं जग. एका मुलासाठी हा दिवस म्हणजे असंख्य भावनांचं एक सुंदर इंद्रधनुष्य असतं. उत्सुकता, भीती, कुतूहल आणि सोबत थोडंसं चिंतेचं सावट. हे सगळं त्या छोट्याशा मनात एकाच वेळी मिसळलेलं असतं आणि तरी ते धीराने त्या शाळेच्या गेटकडे वाटचाल करत असतं. शाळा पुन्हा सुरू होणं म्हणजे भावनांचा एक झंझावात. मुलांसाठीसुद्धा आणि पालकांसाठीही. ही वेळ आहे नव्या सुरुवातीची आणि नव्या उमेदीची, पण त्याचबरोबर भीती, अनिश्चितता आणि दबावाचीही. प्रत्येक विद्यार्थी शाळेच्या दारात फक्त आपलं दप्तर घेऊन येत नाही, तर नजरेआड असणाऱ्या अनेक गोष्टी घेऊन येतो; स्वप्नं, भीती, आशा आणि हजारो प्रश्न...
छोट्या पावलांमधलं मोठं धाडस
मुलं त्या दिवशी लवकर उठतात. कधी कधी गजर होण्यापूर्वीच. काही झपाट्याने उत्साहात उठतात. नवीन युनिफॉर्म, नवीन पाण्याची बाटली, नवे दप्तर, नवीन कव्हर घातलेली पुस्तकं आपल्या वर्गमित्रांना दाखवण्यासाठी उत्सुक असतात. काहीजण मात्र उशा कवटाळून सुट्ट्यांचे दिवस आणि घरचं आरामदायक वातावरण थोडंसं अधिक जपून ठेवायला बघतात. मनात विचार येत असतात, शिक्षिका कशा असतील? मला खिडकीजवळची जागा मिळेल का? कोणी मला टिफिनमधलं काही खायला देईल का? माझे मित्र तेच असतील का?
शाळेत प्रवेश करताना नवीन काही शिकावे, नवीन मित्र बनवावे, शाळेच्या नाटकात भाग घ्यावा, खेळात बक्षीस मिळवावे किंवा कधी केवळ चित्र रंगवावे..अशा नाना इच्छा त्यांच्या मनात असतात. मुलांच्या त्या छोट्या पावलांमध्ये मोठं धाडस असतं. काहीजण आई-बाबांचा हात घट्ट पकडून गेटपर्यंत जातात. काही खुद्कन हसतात, पण मनात थोडं थोडं दडपण तर असतंच. पहिली बेल वाजते... आणि एक नवीन अध्याय सुरू होतो. मुलं त्यांच्या वय आणि स्वभावानुसार शाळेच्या पहिल्या दिवसाचा अनुभव वेगवेगळ्या प्रकारे घेतात. काहींसाठी ही वेळ असते जुन्या मित्रांसोबत पुन्हा गळाभेट घेण्याची, नवीन वही-पुस्तकांचा वास अनुभवण्याची, नवीन शिक्षकांची उत्सुकता आणि नव्या इयत्तेचा अभिमान घेऊन पुढे जाण्याची. पण काहींसाठी मात्र ही वेळ असते जागरणाची, अनिच्छेची आणि शाळेच्या गेटवर शांत अश्रू ढाळण्याची.
थोडी मोठी झालेली मुलंसुद्धा बाहेरून परिपक्व वाटतात, पण आतून गोंधळलेली असतात. अभ्यासातील अपेक्षा, मित्रांमधली स्पर्धा, बदलांची भीती हे सगळं त्यांच्या मनात खोलवर असतं. विशेषतः किशोरवयीन मुलं आपले विचार स्पष्टपणे व्यक्त करत नाहीत. कधी कधी ते चिडतात, कधी अधिक गप्प होतात. काहींचे आधीचे अनुभव दुखरे-बोचरे असतात. त्यामुळेच पालक आणि शिक्षकांनी त्यांच्या वर्तनाकडे लक्षपूर्वक आणि सहानुभूतीने पाहणं आवश्यक आहे.
छोट्या गोष्टी, मोठ्या भावना
प्रौढांनाच सामान्य वाटणाऱ्या गोष्टी मुलांसाठी खास असतात किंवा कधी कधी भीतीदायकही. नव्या शार्प केलेल्या पेन्सिलीचा वास. नवीन टिफिन बॉक्स उघडतानाचा आवाज. सुट्टीनंतर मित्राला भेटण्याचा आनंद. पण बाथरूम कुठं आहे हे आठवत नाही याची काळजी. शाळेच्या रूटीनबद्दल गोंधळ. हात वर करून बरोबर उत्तर दिल्याचा अभिमान.
मुलं सगळ्या गोष्टी टिपतात. शिक्षिकेचा आवाज, वर्गातील रंगसंगती, इतर मुलांचा नम्रपणा किंवा उद्धटपणा. शिक्षकाची हसरी नजर, स्वत:हून ‘हाय’ म्हणणारा मित्र...अशा छोट्या गोष्टी शाळेच्या वर्षभराच्या भावना ठरवतात. शाळेतील संघर्ष अनेक प्रकारचे असू शकतात. अभ्यासाशी संबंधित अडचणी, सामाजिक समस्या, शिक्षकांसोबतचे ताण, परीक्षाकेंद्री दबाव, इतर मुलांनी केलेला अत्याचार इत्यादी. विशेषतः अनेक वेळा ही मुले त्याविषयी थेट काहीच बोलत नाहीत. म्हणूनच पालक आणि शिक्षकांनी त्यांच्या वर्तनातील सूचक बदल ओळखायला शिकणं गरजेचं आहे.
मुलं शाळेबद्दल टाळाटाळ करत असतील, त्यांच्या वागणुकीत अचानक बदल जाणवत असेल, झोपेच्या किंवा भूकेच्या सवयी बदलत असतील, तर या संकेतांकडे पालकांनी दुर्लक्ष करू नये. तसंच गृहपाठ करताना फार वेळ लागणं किंवा काम टाळणं, वर्गात त्रास देणं किंवा उलट अगदी गप्प होऊन जाणं, गुणांमध्ये घसरण किंवा सातत्याने तासांना अनुपस्थित राहणं... हे सगळे लक्षणीय संकेत असतात. याशिवाय, शिक्षकांकडून मिळालेला काळजीचा इशारा सुद्धा पालकांनी गांभीर्याने घ्यायला हवा.
तज्ज्ञांच्या मते, शाळेतील संघर्षाची किंवा वर्तणुकीत अस्वाभाविक बदल झाल्याची सुरुवात दिसली, की तत्काळ पावलं उचलणं अत्यंत आवश्यक असतं. कारण ही अडचण वेळेवर लक्षात घेतली नाही, तर ती दीर्घकालीन परिणाम करणारी ठरू शकते. अशा परिस्थितीत मुलांची स्वमूल्य भावना कमी होऊ शकते. परिणामी त्याच्या शिक्षणातील गती व आनंद यावर विपरीत परिणाम होतो. योग्य वेळी दिलेली मदत आणि समजूतदार प्रतिक्रिया मुलांच्या मनातील भीती दूर करू शकते. त्यांच्या मनोबलाला नवी ऊर्जा मिळते आणि ते पुन्हा आत्मविश्वासाने शाळेतील प्रवास सुरू करू शकतात.
मुलांना शिकवता येणाऱ्या सर्वात उपयुक्त कौशल्यांपैकी एक म्हणजे व्यावहारिक आशावाद. तो असला की, संकटांना तोंड देता येतं, अडथळे संधीमध्ये बदलता येतात. आपण कोणत्याही समस्येपेक्षा मोठे आहोत, ही जाणीव महत्त्वाची असते. याचा अर्थ दु:खाकडे दुर्लक्ष करणं नव्हे, तर त्याला सामोरं जाण्यासाठी सकारात्मक, कल्पक आणि आधार देणारी दृष्टी देणं. मुलांचं मन समजून घेणं आणि त्यांना भावनिक आधार देणं, ही आपली मोठी जबाबदारी आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ती अत्यावश्यक ठरते.
भीतीचा सामना करताना
शाळा सुरू होण्याच्या काळात पालकही अस्वस्थ असतात. माझं मूल आनंदी असेल का? अभ्यास, मैत्री सांभाळेल का? मी त्याच्यासाठी पुरेसं करत आहे का? आजकालचे पालक पूर्वीच्या पालकांपेक्षा अधिक तणावात असतात. त्याने नवीन स्कूल बॅग, टिफिन बॉक्स आणि शाळेचा युनिफॉर्म आवडीने पाहिला, पण नवीन पुस्तकांकडे मात्र ढुंकूनही पाहिले नाही, असं सांगत माझ्याकडे गेल्याच आठवड्यात एक बाई आल्या होत्या. हे क्लिष्ट प्रश्न अनेक पालकांच्या मनात असतात. या तणावांपेक्षा पालकांनी आपल्या मुलांसाठी एक भावनिकदृष्ट्या सुरक्षित वातावरण तयार करायला हवं. असं वातावरण जिथे मुलांना वाटेल की त्यांचं ऐकलं जातं, समजून घेतलं जातं आणि अगदी त्यांच्या अपयशातही त्यांच्यावर प्रेम केलं जातं. दैनंदिन संवाद, जेवणाच्या वेळच्या गप्पा किंवा आठवड्याच्या शेवटी एकत्रित केलेली भटकंती.. या सर्व गोष्टी पालक-मुलं यांच्यातील भावनिक नातं घट्ट करण्यास मदत करतात.
शिक्षक हे केवळ शिकवणारे नसतात
शिकवण्यापलीकडे शिक्षक हे मुलांसाठी पालकसदृश मार्गदर्शक आणि आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातला एक विश्वासाचा आधार असतात. ज्या शाळा अभ्यासाबरोबर भावनिक समज (emotional intelligence) विकसित करतात, त्या शाळांमध्ये मुलं केवळ गुणांच्या बाबतीतच नव्हे, तर स्वभाव आणि आत्मविश्वास यामध्येही बहरतात. समावेशक वर्ग आणि सहज उपलब्ध समुपदेशक अशा छोट्या-छोट्या गोष्टी मुलांना समायोजन करण्यात मोठी मदत करतात.
जर आपल्या अपत्याला शाळेत जाताना चिंता (Anxiety) वाटत असेल किंवा ते मूल शाळेत जाणं टाळत असेल (School Refusal) तर पालकांसाठी शाळा हे दररोजचं आव्हान ठरू शकतं. आपल्या मुलीला किंवा किशोरवयीन मुलाला सकाळी उठणं कठीण जातं, झोपण्याआधी किंवा सकाळी पोटदुखी-डोकेदुखी यासारख्या तक्रारी जाणवतात, शाळेतील गोंगाट व गर्दी यामुळे ती गोंधळून जातात, अशा शाळेशी संबंधित चिंता निर्माण होण्याची अनेक कारणं असू शकतात. पण एक गोष्ट निश्चित आहे, जेव्हा मूल चिंताग्रस्त असतं तेव्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं त्याला कठीण जातं. हळूहळू ही गोष्ट निराशा आणि भीती यांच्यात बदलते. अशा चिंताग्रस्त मुलांच्या मनात चालणारी विचारांची साखळी काहीशी अशी असते -
“मी अभ्यास नीट केला नाही आणि जर यशस्वी ठरलो नाही, तर आई-बाबांची माया मला मिळणार नाही.”
“मला हे प्रश्न सोडवता येत नाहीत, पण मदत मागण्याचीही भीती वाटते. शिक्षक माझ्यावर रागावतील.”
“गृहपाठ करताना मला कंटाळा येतो. मी काही चूक केली का? मला हे जमतच नाही.”
ही अशी मनातल्या मनात सुरू असणारी चिंता केवळ मानसिक थकवा आणत नाही, तर मुलाच्या आत्मविश्वासावर, शैक्षणिक प्रगतीवर आणि सामाजिक आयुष्यावरही परिणाम करते. यासाठी लक्षपूर्वक समजून घेणं, संवाद साधणं आणि योग्य वेळेवर मदत मिळणं खूप आवश्यक आहे.
पहिल्या दिवशी आवश्यक असलेली मदत
प्रौढांनी लक्षात घ्यायला हवं की, शाळेचा पहिला दिवस ‘वागतोय का बरोबर?’ किंवा ‘शिकतेय का योग्यरीत्या?’ यासाठी नाही; तर तो भावनिक सुरक्षिततेसाठी आहे. मुलं केवळ इंग्रजी किंवा गणित शिकत नाहीत, तर ती अभ्यास कसा करावा हे शिकत आहेत. म्हणूनच-
आई-बाबा मुलांना हसत-हसत तयार करून, प्रेमाने निरोप देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवू शकतात. चुकलं तरी चालतं; होईल ठीक; हे सांगणं फार महत्त्वाचं.
शिक्षक लहानशा कृतीतून मोठा फरक घडवू शकतात. नाव घेऊन बोलावणं, प्रयत्नांना दाद देणं, समस्या जाणून घेणं, प्रश्न विचारण्याची परवानगी देणं इत्यादी.
शाळा ही फक्त अभ्यासासाठी नाही, तर मुलांच्या हृदयाला सुरक्षित वाटावं अशी जागा असायला हवी. ‘आपण इथं फिट आहोत’, असं मुलांना वाटायला हवं.
मुलांना सतत ‘लवकर सेट हो’ किंवा ‘परफॉर्म कर’ असं सांगण्याऐवजी त्यांना विचार करू द्या, चुका करू द्या, रडू द्या, निराश होऊ द्या आणि त्यातून बाहेरही येऊ द्या.
अंतर्गत ताकद हवी
आज आपण अशा जगात राहतो आहोत जिथे मुलांना विविध संकटांचा सामना करावा लागतो. आजारांपासून युद्धांपर्यंत, सामाजिक अन्यायापासून हवामान बदलांपर्यंत, मोठ्या विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या छळवणुकीपासून ते बरोबरीच्या मुलांकडून होणाऱ्या मानहानीपर्यंत. त्यामुळे केवळ शैक्षणिक प्रावीण्य पुरेसं नाही; मुलांना मनोबलाची, अंतर्गत सामर्थ्याचीही गरज असते. अशा मनोबलाच्या आधारेच ते खंबीर राहतील, बदलांना सामोरे जातील आणि सतत विकसित होतील. दिवसेंदिवस मुलांमध्ये आशावाद, कृतज्ञता, लवचिकता आणि स्वमूल्याची भावना विकसित करणं, ही पालकांकडून मुलांना मिळणारी सर्वात मौल्यवान भेट आहे.
म्हणूनच या नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला आपण आपल्या मुलांना ते जिथे आहेत तिथेच भेटूया. त्यांच्या आनंदात, भीतीत, उत्सुकतेत आणि संकोचात. आपण त्यांच्या पुढे नाही, मागेही नाही, तर त्यांच्या शेजारी चालूया. कारण शाळेचा पहिला दिवस ही केवळ सुट्टीनंतर पुन्हा शाळेत परतण्याची गोष्ट नाही, तर जीवनात पुढे जाण्याचा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे.
- मनोचिकित्सक व अधिष्ठाता.