पहिल्या दिवसांच्या सोनेरी नोंदी
आनंदाचे झाड
युवराज माने
जून महिना आणि शाळा यांचं अतूट नातं आहे. याच महिन्यात उन्हाळी सुट्टीनंतर शाळा पुन्हा उघडते. पूर्वापारपासून १५ किंवा १६ जूनला शाळा सुरू होतात. बालवर्गातील, पहिलीतील मुलं पहिल्यांदाच शाळेत येत असतात. त्यामुळे बहुतेक शाळांमध्ये या मुलांचं उत्साहात स्वागत केलं जातं. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा या स्वागत सोहळ्यासाठी वेगवेगळ्या अनोख्या कल्पना अंमलात आणतात.
शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थी आणि शिक्षक दोघांसाठीही एक विशेष दिवस असतो. नवीन गोष्टी शिकण्याची आणि नवीन अनुभवांना सामोरं जाण्याची ही सुरुवात असते. एकीकडे हा दिवस खूप उत्साहाचा आणि त्याचवेळी थोडा गोंधळाचा असतो. ही सुरुवात मनासारखी आनंददायी झाली तर शाळा म्हणजे मुलांना त्यांच्या अंगणातलं ‘आनंदाचं झाड’ वाटू लागतं.
शाळा सुरू होते आणि मूल जेव्हा पहिल्या दिवशी शाळेत येतं त्यावेळी त्या पहिल्या दिवसातला प्रत्येक घटक, होणारी प्रत्येक कृती आणि त्यातून मिळणारा आनंद बालकांच्या मनावर कायमचा कोरला जातो. म्हणूनच शाळेच्या पहिल्या दिवसाचा अनुभव बालकांच्या मनात अविस्मरणीय आनंद निर्माण करणारा ठरावा यासाठी जिल्हा परिषदांच्या विविध शाळांमधील सर्व शिक्षक बंधू-भगिनी कल्पकता दाखवत वेगवेगळ्या अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा करतात. घरातली मायेची ऊब अन् विश्वासाचा परिसस्पर्श लेकरांना अगदी सुरुवातीलाच लाभला तर शाळा हे ठिकाण त्यांच्यासाठी दुसरं घरच ठरतं.
शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची सामाजिक पार्श्वभूमी वेगवेगळी असते. घराच्या चौकटीतलं प्रत्येकाचं राहणीमान वेगवेगळं असतं. पण शाळेच्या दारात हे सारे भेद गळून पडले पाहिजेत, इथे विद्यार्थी म्हणून आपण सगळे सारखेच लाडके आहोत, ही भावना मुलांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. म्हणूनही विद्यार्थ्यांच्या स्वागताचा हा उत्सव महत्त्वाचा असतो.
बैलगाडीतून मिरवणूक
गोंदिया जिल्ह्यातल्या पलखेडा गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिलीत प्रवेश घेतलेल्या मुलांच्या शाळेतल्या पहिल्या दिवसाचं स्वागत अगदी उत्साहात आणि ग्रामजीवनाशी सुसंगत असं केलं जातं. विद्यार्थ्यांना ढोल-ताशा आणि लेझीम बॅन्डच्या गजरात सजवलेल्या बैलगाडीतून शाळेत आणलं जातं. बैलगाडी तर सजवलेली असतेच, पण विद्यार्थ्यांनाही फुलांच्या हाराने, टोप्यांनी सजवलं जातं. शिवाय गावातील ज्येष्ठ नागरिक, ग्रामपंचायतीचे सदस्य, पालक आणि शिक्षक या मिरवणुकीत सहभागी होतात. म्हणजे मुलांचं स्वागत केवळ शाळेकडून व शिक्षकांकडून होत नाही, तर संपूर्ण समाजाकडून होतं. जिल्ह्यातल्या काही ठिकाणी शाळेच्या मुख्याध्यापकांकडून विद्यार्थ्यांना गोडधोड खाऊ दिला जातो किंवा शालेय साहित्याचं वाटप केलं जातं.
याशिवाय बैलगाडीमुळे ग्रामसंस्कृती सोबतचं नातं आणखी दृढ होत जातं. बैलगाडी हे ग्रामीण संस्कृतीचं प्रतीक आहे. त्यातून शिक्षण आणि परंपरेचा सुंदर संयोग साधला जातो. गावातून सर्वांच्या समोर वाजतगाजत शाळेत प्रवेश झाल्यानंतर विद्यार्थ्यांचं आत्मभान जागृत होतं. ‘आपण महत्त्वाचे आहोत’, ही भावना मुलांमध्ये निर्माण होते. त्यांना आपसूक शाळेविषयी आत्मियता वाटू लागते. शिक्षण महत्त्वाचं आहे, हा संदेश गावकऱ्यांपर्यंतही पोहोचतो. सामाजिक केंद्र म्हणून शाळेचं स्थान अधिक बळकट होतं.
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची बैलगाडीतून निघणारी मिरवणूक ही केवळ एक आकर्षक कृती नसून, शिक्षणाला सणासारखी प्रतिष्ठा देण्याचा तो प्रयत्न आहे. हे असे उपक्रम ग्रामीण भागातील लोकांसाठी शिक्षणाला उत्सवाचं स्थान देतात. यातून शाळा म्हणजे केवळ भिंती नव्हेत, तर गावाच्या प्रगतीचं दार असतं, ही भावना लोकांपर्यंत पोहोचते.
हातां-पायांच्या तळव्यांवरच्या सोनेरी नोंदी
परभणी जिल्ह्यातल्या पारडी तांड्यावरही अशाच पद्धतीने पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं दरवर्षी स्वागत केलं जातं. अगदी पहिल्याच दिवशी त्यांच्या हातांच्या आणि पायांच्या तळव्यांचे ठसे कोऱ्या कागदावर घेऊन ते जतन केले जातात. प्रत्येक विद्यार्थ्याची एक स्वतंत्र फाईल बनवली जाते. या फाईलमध्ये त्या प्रत्येक विद्यार्थ्याचे शाळेतील पहिले पाऊल, त्याने काढलेलं पहिलं चित्र, त्याने गिरवलेलं पहिलं अक्षर, त्याने वाचलेल्या पहिल्या पुस्तकाचं नाव...अशा कितीतरी सोनेरी नोंदी करून ठेवल्या जातात. या शाळेतून हे विद्यार्थी जेव्हा बाहेर पडतात तेव्हा हा अनमोल खजिना त्यांना शिदोरी म्हणून सुपूर्द केला जातो. अतिशय विलक्षण अशी ही बाब आहे.
शिक्षकाच्या नजरेतून पहिला दिवस
शाळेचा पहिला दिवस दरवर्षी येतो, पण प्रत्येक वेळी नव्या आठवणी, नव्या आशा आणि थोडीशी धडधड असते. शाळेच्या दाराशी पाऊल ठेवताच मनात नकळत एक हुरहुर दाटते. यंदा कोणकोणते चेहरे भेटतील? पहिल्या वर्गात प्रवेश घेणारी लेकरं मला त्यांचा गुरुजी म्हणून स्वीकारतील का? कोणते निरागस डोळे माझ्याकडे आशेने पाहतील? वर्गखोलीत पाऊल टाकलं की नजर तिथल्या रिकाम्या बाकांवर जाते. कालपरवा हे बाक भरलेले होते. हसणाऱ्या, खेळणाऱ्या, प्रश्न विचारणाऱ्या चेहऱ्यांनी. आज पुन्हा तीच जागा आहे, पण नवीन येणाऱ्या मुलांसाठी. नव्याने आलेले काही चेहरे बिचकलेले असतात, काही उत्साहाने फुललेले असतात, तर काही आईच्या ओंजळीतून निघायला तयारच नसतात. त्यांच्याशी बोलताना आपलीही नजर थोडी पाणावते.
पहिल्या दिवशी आम्ही नाव विचारतो, मुलांचा एकमेकांशी परिचय करून देतो. खरंतर, आम्ही त्यांना वाचत असतो. त्यांच्या डोळ्यांतली स्वप्नं, गोंधळ, शंका आणि आशा निरखत असतो.
आणि त्या क्षणी एक दृढनिश्चय होतो - या प्रत्येक स्वप्नाच्या मागे मी उभा आहे. त्यांना उंच भरारी घेऊ द्यायची जबाबदारी माझी आहे. सहकारी शिक्षकही सोबत असतात. सर्वांच्या चेहऱ्यावर एकच भावना - हे वर्ष खास असावं, काहीतरी सुंदर घडावं. पहिल्या तासाची बेल वाजते. वर्गात उभं राहिलं की जाणवतं, ही केवळ शाळा नाही; ही एक संस्कारशाळा आहे. इथे अक्षरं शिकवली जातात, पण माणूसही घडवला जातो.
शिक्षक म्हणून प्रत्येक पहिला दिवस म्हणजे एक नवीन संधी असते. नव्याने शिकवायची, नव्याने जोडायची, आणि छोट्या आयुष्यांना मोठा अर्थ देण्याची. ग्रामीण भागातील शिक्षक ही संधी साधतात आणि शाळेचा पहिला दिवस सोनेरी करण्यासाठी सगळे प्रयत्न करतात.
प्रयोगशील शिक्षक आणि ललित लेखक.