

जगतवारी
मेधा आलकरी
दहा वर्षांतून एकदा येणारी 'फ्लोरियाड' ही हरित पर्वणी आणि हॉलंडची जागतिक स्तरावर ओळख असलेली सायकल संस्कृती यांचे रंजक वर्णन या प्रवासातून उलगडते. तिथल्या निसर्गवेड्या आणि प्रामाणिक लोकजीवनाचा हा एक विलोभनीय पट आहे.
प्रफुल्लित करणारा वसंत सरला की हॉलंडमधील मंडळी ‘समर’ची वाट पाहत असतात. (उन्हाळा शब्द उन्हाचा नकोसा रखरखीतपणा दर्शवतो आणि समर दाखवतो हवीहवीशी ऊब.) वोलेनडॅम आणि मार्केन या मच्छीमारांच्या गावाची सफर आम्हाला तिथल्या स्थानिकांची मासेमारी संस्कृती आणि उन्हाळी जीवनशैलीचा अनुभव देणार होती. त्यासाठी आम्ही ‘मार्केन एक्सप्रेस’ या फेरीचा पर्याय निवडला. बोटीच्या पुढच्या टोकाशी बसून आठवतील तितकी कोळीगीतं गायली, तोंडावर येणाऱ्या भन्नाट वाऱ्यावर विरून जात असली तरी! हॉलंडच्या उत्तर समुद्राशी अरबी समुद्राचं नवं नातं जोडून दिलं. इन मीन अर्ध्या तासाचा प्रवास! बंदरात जुन्या धाटणीच्या मासेमारी नौका उभ्या होत्या. खूप सारी उपहारगृहं होती. फेरीतून उतरून आता गावातल्या गल्लीबोळातून फेरफटका मारायचा होता. या पदयात्रेत स्थानिकांची लाकडी घरं, दारं-खिडक्या आणि अंगणं बघायला मिळाली आणि त्यांच्या कलात्मक दृष्टीचं कौतुक वाटलं. ही घरं रस्त्यापासून थोडी खाली असल्यामुळे खिडक्यांच्या उघडझाप करता येणाऱ्या चिमुकल्या झरोक्यापर्यंतचा भाग बाहेरून दिसतो. खरं तर ही जळमटांची आवडती जागा; परंतु रहिवाशांनी तो भाग अगदी स्वच्छ आणि शोभेच्या वस्तूंनी सुशोभित करून ठेवला होता. फुलं, फुलदाण्या, लाकडी फळं आणि छोट्या छोट्या बाहुल्यांनी ती तावदानं सजली होती. खिडक्यांना अर्धवट उंचीचे तलम, नाजूक जाळीदार, नक्षीदार, कमानीच्या आकाराचे पांढरे शुभ्र पडदे होते. हॉलंडमधील शहरांमध्ये मात्र खिडक्यांना पडदे न लावण्याची एक वेगळीच परंपरा आहे. त्यामागे काही रंजक कारणं आहेत. डच लोकांच्या जुन्या विचारसरणीनुसार पडदे न लावणं हे आयुष्याच्या पारदर्शकतेचं, प्रामाणिकपणाचं आणि नैतिकतेचं लक्षण समजलं जाई. ‘लपवून ठेवण्यासारखं माझ्याकडे काहीही नाही’ ही भावना! परंतु मला वाटतं मुख्य कारण असावं नैसर्गिक सूर्यप्रकाश. वर्षभर ढगाळ वातावरण असलेल्या या देशात कधीमधीच दर्शन देणाऱ्या सूर्याच्या स्वागतासाठी या खिडक्यांवर पडदे लागत नसावेत.
एका घराच्या अंगणात एक वयस्कर जोडपं उंच ग्लासातील ‘फेसाळत्या चहाचा’ आस्वाद घेत बसलं होतं. स्वच्छ गाव आणि शांत जीवन! पांढरी टोकदार टोपी आणि रंगीबेरंगी पारंपरिक डच पेहराव परिधान केलेले लोक तिथे आजही पाहायला मिळतात. माझ्या मनातील मच्छीमार गावांपेक्षा ही गावं खूपच वेगळी होती. फार पूर्वी म्हणे इथे ती संस्कृती होती; परंतु आता तिथे एक मोठा बांध बांधल्यामुळे समुद्राचं पाणी गोड झालं आणि मासेमारीचं स्वरूपच बदलून गेलं. आता ही गावं मुख्यत्वे पर्यटनासाठीच ओळखली जातात.
हॉलंडमध्ये दर वसंतात ट्युलिपचा बहर असला तरी एप्रिल ते ऑक्टोबर असा सहा महिने चालणारा ‘फ्लोरियाड’ नावाचा फळाफुलांचा महोत्सव इथे दहा वर्षांतून एकदा भरवला जातो. विविध देशांना आपापल्या प्रांतातील फळं आणि फुलं सादर करण्याची ही सुवर्णसंधी असते. पासष्ट एकर इतकं विशाल क्षेत्रफळ असलेल्या ‘पोल्डर लँड’वर (समुद्रातून मिळवलेल्या जमिनीवर) हा जगातील सर्वात मोठा हरित महोत्सव साजरा होतो. या बागेत फेरफटका मारताना जागोजागी डच लोकांची कल्पकता आणि निसर्गप्रेमाचं विलोभनीय दर्शन घडलं. वर्षभर आधीपासूनच या सुनियोजित जागेचं बागेत रूपांतर करण्यास सुरुवात होते. कृत्रिम तलाव, छोट्या टेकड्या मुद्दाम तयार केल्या जातात.
बागेत प्रवेश करताक्षणीच फुलझाडांनी सजवलेली, ‘Feel the Art of Nature’ ही ठळक आणि रंगीत अक्षरं पाहून आम्ही हरखून गेलो. हिरवळीवर रेखलेली ती अक्षरं उंचावरून पाहण्यासाठी आम्ही तिथल्या मचाणावर चढून गेलो. बागेच्या मध्यभागी असलेल्या कृत्रिम टेकडीकडे चालत निघालो असता कितीतरी अनोळखी फुलांशी हस्तांदोलन केलं. ही टेकडी म्हणजे चाळीस मीटर उंचीचा वाळूचा पिरॅमिड आहे. चारी बाजूंनी बांधकाम करून त्यावर हिरवळ चढवली होती. वर जायला भक्कम पायऱ्या होत्या. त्याच्या शिखरावरील सूर्यमंडळाची प्रतिकृती बघण्यात वेळ दवडण्यापेक्षा आम्ही तिथून दिसणाऱ्या फुलांच्या सागरात मनसोक्त डुंबून घेतलं. टेकडीवरून उतरून काचेचं आवरण असलेल्या सज्जाकडे जाण्याची उर्मी आमच्या पायांना वेग देत होती. तिथे आंतरराष्ट्रीय पुष्प प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. वीस देशांतून आलेल्या दुर्मिळ वनस्पती, फळं-फुलं, त्यांची कला-संस्कृती आणि तंत्रज्ञान यांचं एकत्रित दर्शन हा एक अनन्यसाधारण अनुभव होता. थायलंडच्या ऑर्किडपासून तर फ्रान्सच्या द्राक्षांपर्यंत आणि जपानच्या ओरिगामीपासून हॉलंडच्या ट्युलिपपर्यंत सगळे हातात हात घालून आमच्या स्वागतार्थ उभे होते. सज्जाची एक बाजू फुलांचा राजा गुलाबासाठी राखून ठेवली होती. गुलाबच गुलाब! पांढरे, पिवळे, जांभळे आणि काळेसुद्धा! तिथे गुलाबी कांतीची एक गुलाबकन्या, गुलाबांचा स्कर्ट आणि गुलाबांची छत्री घेऊन उभी होती. हॉलंडच्या छोट्या छोट्या लाकडी बुटांमध्ये एकेक गुलाब खोचून त्यांना पाण्यात सोडले होते. शिडाच्या नावेसारख्या दिसणाऱ्या या गुलाबाच्या होड्या, एकमेकांशी टकरा खात, संथ गतीनं पुढे जात प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत होत्या. वाईनच्या हिरव्या रंगाच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये एकेक टवटवीत गुलाब खोचून त्याचा एक पडदा सोडला होता. किती ती कल्पकता! बाजूच्या हॉलमध्ये पुष्परचनेचं प्रदर्शन होतं. हिरव्याच्या अनेक छटा असलेली विविध आकारांची ताजी पानं आणि काही वाळक्या काड्या त्या फुलांना उठाव देऊन अधिक सुंदर बनवत होत्या.
फुलांच्या बागेचा मनमुराद आस्वाद घेतल्यानंतर फळांच्या बागेत शिरलो. झाडांवर लटकली होती म्हणून खरी म्हणायची, नाहीतर चकचकीत पॉलिश केलेली लाकडी फळंच वाटत होती ती. सफरचंद, नासपती, संत्री, मोसंबी यांचा रसरशीतपणा काही वेगळाच. भाज्यांच्या विभागात तुकतुकीत कांतीच्या विविधरंगी सिमला मिरच्या आणि नारळाएवढे टमाटे पाहिले. मेंढरांच्या लोकरीगत दिसणारा फ्लॉवर पाहिल्यानंतर मात्र त्याला कराकरा कापून फोडणीस घालावा अशी एक अरसिक कल्पना माझ्यातल्या गृहिणीला चाटून गेली. हॉलमध्ये पाकक्रियेचं प्रात्यक्षिक चालू होतं. लगबगीनं तिथे प्रवेश केला. परदेशी पाककृतींबरोबरच तिथे भविष्यात अन्नाची गरज कशी भागवली जाईल, यावर आधारित ‘फूड लॅब’ होती.
विविध देशांचे स्टॉल्स असलेल्या भागाकडे गेलो. खाद्यपदार्थांबरोबर तिथे कलासंस्कृतीचं प्रदर्शनही पाहायला मिळणार होतं. भारताच्या स्टॉलने आमची घोर निराशा केली. फ्रान्सच्या स्टॉलवर तऱ्हेतऱ्हेची द्राक्षं पाहिली आणि ‘द्राक्षासवां’चे नमुनेही पाहिले. ज्या द्राक्षांपासून उत्कृष्ट वाईन बनवली जाते ती टपोरी, लालसर आणि मधुर द्राक्षं तिथे चाखायला मिळाली. चीनच्या स्टॉलवरील फळं न चाखता दुरूनच बघितली. तिथे पाच मिनिटांत चिकणमातीच्या वस्तू करून देणाऱ्या कलाकाराची कला पाहत बराच वेळ थांबलो. स्टेजवर मनोरंजनाचे खेळ आणि पारंपरिक नृत्य सादर होत होती. एक पूर्ण दिवस अशी हरित पर्वणी देऊन गेला. पाण्याची काटकसर, सौरऊर्जेचा वापर आणि शहरी शेती याबद्दलची बरीच नवी माहिती मिळाली. यापुढील फ्लोरियाड २०३२ साली होणार आहे.
फ्लोरियाडमध्ये फिरताना आम्हाला एक हाँगकाँगवासी तरुण मुलगा भेटला. आशियाई जवळीक साधून त्याने आमच्याशी संवाद साधला. पाठीवर फक्त एक मोठी हॅवरसॅक घेऊन तीन-चार देश पालथे घालणारा हा एकला गडी! त्याच्याजवळच्या प्रवासी पुस्तकातून मला ‘सिल्व्हर डस्ट’ या वनस्पतीचं पान डोकावताना दिसलं. त्याचं नाव अगदी समर्पक! चांदीची वस्त्रगाळ पावडर शिंपडली आहे असंच वाटायचं. खरं तर इथली पानं-फुलं तोडायला बंदी आहे. मी त्याला ते जाणवून दिल्यावर तो हसून म्हणाला की, या बागेच्या अवाजवी प्रवेश शुल्काचा निषेध म्हणून त्याने ते पान तोडलं. मला हसूच आलं. त्या आशियाई गरम रक्ताचा सात्विक निषेध आणि सात्विक समाधान!
थकल्या-भागल्या देहाने परंतु प्रसन्न मनाने फ्लोरियाडचा निरोप घेऊन बाहेर आलो आणि प्रचंड मोठ्या सायकल स्टँडजवळच्या एका कठड्यावर टेकलो. हॉलंड हा एक सायकलप्रेमी देश आहे. सायकलींची संख्या इथल्या लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. युट्रेक्ट या शहरात असलेला जगातील सर्वात मोठा सायकलतळ आम्ही बघून आलो होतो. तिथे १२,५०० हून अधिक सायकली ठेवण्याची सोय आहे. ही सायकल संस्कृती डच लोकांनी हेतुपुरस्सर रुजवली आहे. १९७०च्या दशकात गाड्यांच्या वाढत्या अपघातांमुळे नागरिकांनी त्याविरुद्ध एक मोठी चळवळ उभी केली. सरकारने त्याची दखल घेऊन सायकलींची वेगळी लेन बनवली. फक्त सायकलींसाठी कित्येक किलोमीटर लांबीचे स्वतंत्र रस्ते आहेत. या रस्त्यांचे स्वतःचे ट्रॅफिक सिग्नल आणि नियम असतात.
हॉलंडमध्ये चढ-उतार नसल्यामुळे सायकल चालवणं पर्यायाने सोपं जातं. चौकात चारचाकीपेक्षा या दुचाकीला प्राधान्य दिलं जातं. ‘Cars are guests, cyclists are kings.’ असा फलक मी एका चौकात वाचला होता. सायकलस्वारांप्रति केवढा हा आदर! हॉलंडमध्ये पंतप्रधानांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सगळे सायकल वापरतात हे बघून तर मला खूप आश्चर्य वाटलं होतं. सायकलच्या पुढच्या बाजूला असलेल्या बास्केटमध्ये खरेदी केलेलं घरगुती सामान आणि मागच्या बास्केटमध्ये बसलेलं छोटं मूल अशी ‘कौटुंबिक कार’ घेऊन जाणारे पालक इथे सर्रास दिसतात. यांना मुळी वेगळा व्यायामच करायला नको. सायकल चालवल्यामुळे येथील रहिवाशांची तब्येत ठणठणीत राहत असावी. वाहनांचं प्रमाण कमी म्हणताना हवेचं आणि आवाजाचं प्रदूषण नाही, त्यामुळे देशाचीही तब्येत उत्तम राहत असेल.
हॉलंडमध्ये सतत रिमझिम पाऊस पडत असतो. पण भिजण्याची पर्वा न करता डच लोक सायकलवरून रपेट मारत असतात. भिजलेल्या अवस्थेत ट्राममध्ये शिरलेल्या एका तरुण सायकलस्वाराला मी हा प्रश्न केला, तेव्हा त्याने हसून म्हटलं, “We are not made of sugar.”