

हितगुज
डॉ. शुभांगी पारकर
विकासासाठी जंगलं तोडली जात आहे, विविध प्रकल्पांसाठी जंगलं उद्ध्वस्त होत आहेत. झाडांचं अस्तित्त्व केवळ मानवी शरीरासाठीच नाही, तर मानवी मनाच्या आरोग्यासाठीही महत्त्वाचं असतं. तुकोबांना हे उमगलं होतं, म्हणूनच त्यांनी निसर्गाशी सोयरेपण जोडलं होतं.
नाशिकच्या तपोवनमध्ये झाडे तोडण्याच्या घडामोडींनी पुन्हा एकदा आपल्याला अस्वस्थ केलं. हा लेख त्या राजकीय वादावर नाही, तर त्या घटनेमुळे उभ्या राहिलेल्या एका मूलभूत प्रश्नावर आहे. शास्त्रीयदृष्ट्या आपल्या जीवनासाठी निसर्ग इतका आवश्यक का आहे? आपण आपल्या घराची काळजी घेतो, कारण तिथे आपला श्वास आहे, आपली माणसं आहेत, आपलं आयुष्य आहे. मग ही पृथ्वी आपलं सर्वात मोठं घर नाही का? आपण निसर्गातून आलो आहोत, निसर्गावरच जगतो आहोत आणि शेवटी निसर्गातच विलीन होणार आहोत. मग निसर्गाशी वैर कशासाठी? म्हणूनच दलाई लामांसारखे शांततेचे संदेशवाहक सांगतात की, पर्यावरण हा धर्म, नीती किंवा नैतिकतेचा विषय नाही, तर तो थेट आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. “निसर्ग वाचवा, निसर्ग तुम्हाला वाचवेल” हा केवळ नारा नाही, तर ते जीवनाचं मूलभूत सत्य आहे. “भावी पिढीसाठी पृथ्वी जपा” ही फक्त घोषणा नाही, तर आपल्या लेकरांच्या श्वासासाठीची आर्त हाक आहे. आणि “हिरवं बना, स्वच्छ श्वास घ्या” हा केवळ संदेश नाही, तर जगण्याचा नवा मार्ग आहे. “निसर्ग वाचला, तरच माणूस वाचेल”, यापेक्षा मोठं सत्य आज दुसरं कोणतंच नाही.
निसर्ग आणि आपले आरोग्य
आजचे जीवन अतिशय वेगवान झाले आहे. मोबाईल, संगणक, टीव्ही, ट्रॅफिक, आवाज, स्पर्धा आणि सततचा ताण, या सगळ्यांनी आपले जगणे व्यापून टाकले आहे. बहुतांश वेळ आपण बंद खोल्यांत, स्क्रीनसमोर आणि कृत्रिम प्रकाशात घालवत आहोत. त्यामुळे थकवा, चिडचिड, अस्वस्थता, चिंता, नैराश्य, झोपेचे विकार, रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या समस्या झपाट्याने वाढत आहेत.
कोविड-१९ च्या महामारीच्या काळात निसर्गाने आपल्या मानसिक आरोग्यासाठी आधारस्तंभाची भूमिका बजावली. मेंटल हेल्थ फाउंडेशनच्या संशोधनानुसार, युकेमधील सुमारे ४५ टक्के लोकांना हिरव्या मोकळ्या जागांना भेट दिल्यामुळे मानसिक ताण कमी करण्यास मदत झाली. आज विज्ञान ठामपणे सांगते की आपले आजूबाजूचे प्रदूषित वातावरण केवळ मनावरच नव्हे, तर मेंदू, स्नायू, हार्मोन्स आणि रोगप्रतिकारशक्तीवरही खोल परिणाम करते.
निसर्ग वेदना खऱ्या अर्थाने कमी करतो. पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेनंतरच्या एका प्रसिद्ध अभ्यासात, खिडकीतून झाडे दिसणाऱ्या रुग्णांची तब्येत लक्षणीयरीत्या चांगली होती. त्यांना कमी वेदनाशामक औषधे लागली, ते भावनिकदृष्ट्या अधिक शांत होते, त्यांचा बरा होण्याचा वेग जास्त होता आणि ते लवकर रुग्णालयातून घरी जाऊ शकले.
डेन्मार्कमध्ये ९ लाख लोकांवर केलेल्या एका महत्त्वाच्या अभ्यासात असे आढळले की, ज्या मुलांना लहानपणी निसर्गाचा पुरेसा सहवास मिळाला नाही, त्यांना पुढील आयुष्यात मानसिक आजार होण्याचा धोका ५५ टक्क्यांनी अधिक होता. नैराश्य, व्यसनाधीनता आणि मानसिक अस्थिरता या समस्या निसर्गापासून दूर राहण्याशी जोडलेल्या असल्याचेही या अभ्यासातून स्पष्ट झाले.
निसर्गात गेल्यावर आपल्याला शांत का वाटते?
खरं तर निसर्गाचा माणसावर होणारा परिणाम हा औषधासारखाच नव्हे, तर त्याहूनही खोलवर जाणारा असतो. हिरवी झाडे, मोकळे आकाश, वाहते पाणी, पक्ष्यांची किलबिल, वाऱ्याची झुळूक, पावसाचा गंध, हे सारे मनाला शांत करते, शरीराला सैलपणा देते आणि ताणतणाव हळूहळू विरघळवते. निसर्ग म्हणजे जणू न बोलणारा, नि:स्वार्थ आणि कायम उपलब्ध असलेला मन, मेंदू आणि शरीरावर उपचार करणारा अदृश्य चिकित्सक!
जगाच्या कुठल्याही संस्कृतीत, कुठल्याही वयात संकटात सापडलेला माणूस आपोआप निसर्गाकडे ओढला जातो. समुद्रकिनारा, डोंगर, जंगल, बाग, नदीकाठ आपल्याला सहज शांत वाटतात. एका अभ्यासात असे दिसून आले की तणावात असलेल्या लोकांपैकी सुमारे दोन-तृतीयांश लोक निसर्गात जाणे पसंत करतात.
याचे कारण आपल्या शरीररचनेतच दडले आहे. हजारो वर्षे मानव निसर्गाच्या कुशीतच वाढला, जगला, शिकला. अन्न, पाणी, आसरा, सुरक्षा आणि उपचार, हे सर्व काही निसर्गानेच दिले. म्हणूनच आजही आपल्या मेंदूच्या खोल कप्प्यात निसर्ग हा सुरक्षितता, समतोल आणि शांती यांचे प्रतीक बनले आहे. हिरवळ पाहिली की उगाचच मन हलके होते, हृदयाची धडधड स्थिर होते, रक्तदाब नियंत्रित राहतो, श्वसन संतुलित होते. वाहते पाणी पाहिले की शांत वाटते, आकाशाकडे पाहिले की श्वास मोकळा होतो — हे सगळे आपल्या निसर्गाशी असलेल्या आदिम नात्याचेच प्रतिबिंब आहे.
रेचल एम. नेजाडे आणि सहकाऱ्यांच्या २०२२ मधील आंतरराष्ट्रीय संशोधनातून स्पष्टपणे दिसून आले आहे की, निसर्गाचा नियमित संपर्क हा शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. निसर्गात वेळ घालवणाऱ्या व्यक्तींमध्ये ताणतणाव कमी होतो, चिंता व नैराश्य घटते, झोप सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
आज चिंता, नैराश्य, अस्वस्थता आणि चिडचिड या मानसिक समस्या जवळजवळ प्रत्येक घरात दिसतात. अशा वेळी निसर्ग हे मानसिक आरोग्यावर अत्यंत प्रभावी औषध ठरते. एका मोठ्या अभ्यासात तब्बल ९५ टक्के लोकांनी सांगितले की, निसर्गात वेळ घालवल्यानंतर त्यांचा मूड सुधारतो, एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती सुधारते आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी अधिक सकारात्मक, स्थिर आणि आनंदी बनते.
संत तुकारामांना निसर्गाच्या सान्निध्यात एक वेगळीच शांती मिळत असे. त्यांच्या अभंगांतून हे वारंवार जाणवतं. “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे” म्हणताना ते केवळ झाडांना आपले सोयरे म्हणत नाहीत, तर निसर्गाशी असलेलं खोल आत्मीय नातं व्यक्त करतात. पक्ष्यांच्या सुरेल किलबिलाटात, हिरव्या झाडांच्या सान्निध्यात, वनराईच्या आलिंगनात त्यांना शांती सापडत असे.“येण सुखे रुचे एकांताचा वास”, या ओळीत त्यांनी सांगितलेली आनंदाची अनुभूती म्हणजे मनाला कुठलाही गुणदोष स्पर्श न करणारा निर्मळ एकांत. निसर्गात मिळणारी ही साधी, शांत, सूक्ष्म सुखांची अनुभूती आजच्या विज्ञानालाही मान्य आहे
किती निसर्ग पुरेसा आहे?
आठवड्याला फक्त दोन तास निसर्गात वेळ घालवणेही आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. हा वेळ एकाच दिवशी किंवा वेगवेगळ्या दिवशी घेता येतो. फक्त ४० सेकंद हिरवळ पाहिल्यानेही मेंदूची कार्यक्षमता वाढते, असे संशोधन सांगते. पक्ष्यांचा आवाज, पावसाचा आवाज, लाटांचा गजर — हे सगळे मेंदूला विश्रांती देतात. खिडकीतून दिसणारे निसर्गाचे दर्शनही, आकाश, घरातले रोप, पक्ष्यांचा आवाज, हेही मनाला आधार देतात.
निसर्गाशी घट्ट नातं आणि आनंद
निसर्गात वेळ घालवणे म्हणजेच निसर्गाशी जोडलेपण (connectedness) असणे, आपल्या सर्वांसाठी अनेक कारणांनी लाभदायक असते. संशोधन स्पष्टपणे दाखवते की ज्या व्यक्तींचा निसर्गाशी भावनिक संबंध अधिक दृढ असतो, त्या व्यक्ती आयुष्यात अधिक आनंदी असतात. त्यांना आपल्या जीवनाला अर्थ आहे, आपलं जगणं मूल्यवान आहे, असं जास्त प्रमाणात वाटतं. निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्याची गुणवत्ताही अनेक सकारात्मक भावना, शांती, आनंद, सर्जनशीलता आणि एकाग्रता वाढवायला मदत करते. निसर्गाशी घट्ट नातं असलेल्या व्यक्तींमध्ये नैराश्य आणि चिंता (डिप्रेशन व अॅन्झायटी) यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी आढळते. मोठे डोंगर, समुद्र, आकाश पाहताना आपल्याला जो विस्मय वाटतो, तो आपला अहंकार कमी करतो आणि आपण एका मोठ्या विश्वाचा भाग असल्याची जाणीव करून देत आपल्याला अधिक प्रगल्भ बनवतो.
म्हणून निसर्ग हा फक्त सौंदर्याचा विषय नाही, तर तो मानवी आत्म्याला उंचीवर नेणारा, त्याला तेजस्वी करणारा दिव्य सहप्रवाही आहे.
निसर्गाशी नातं कसं वाढवता येईल?
निसर्गाशी आपलं नातं अधिक घट्ट करण्याचे अनेक मार्ग आहेत. आपल्या इंद्रियांना सक्रिय करणाऱ्या कृती — म्हणजे पाहणं, ऐकणं, स्पर्श करणं, वास घेणं — या सगळ्या गोष्टी निसर्गाशी असलेले आपले जोडलेपण अधिक दृढ करतात. आपण पक्ष्यांचा किलबिलाट लक्षपूर्वक ऐकला, झाडांच्या खोडाला हात लावून त्याचा खरखरीतपणा अनुभवला, फुलांचा सुगंध घेतला, किंवा बागेत रोप लावताना मातीचा स्पर्श अनुभवला — तर हे सगळे निसर्गाशी जोडले जाण्याचे अत्यंत संवेदनशील आणि खोल अनुभव ठरतात. आपल्या आवडत्या निसर्गदृश्यावर कविता लिहिणं, फिरायला गेलेल्या वाटांचे स्मरण मनात जागवणं, किंवा त्या अनुभवांवर शांतपणे विचार करणं, यामुळेही आपण निसर्गातील चांगल्या गोष्टी जाणीवपूर्वक पाहतो, त्यांचा विचार करतो आणि त्यांचे मोल समजून घेतो.
आज पर्यावरणावर संकटांचे मोठे ढग घिरट्या घालत असताना, माणूस आणि निसर्ग यांच्यातील परस्पर आधार देणारं, सुसंवादी नातं अधिक मजबूत होणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या लोकांचा निसर्गाशी भावनिक संबंध खोल असतो, ते लोक पर्यावरणपूरक वर्तन अधिक करतात. उदा. कचऱ्याचे वर्गीकरण करून पुनर्वापरासाठी देणं (रीसायकलिंग), ऋतुजन्य फळं-भाज्या खरेदी करणं, अनावश्यक नासधूस टाळणं इत्यादी. अशा सवयींमुळे निसर्गात आणखी सुधारणा घडून येते आणि त्याचा आनंद पुन्हा आपल्यालाच मिळतो.
निसर्ग उपकारक असतोच, पण ‘उच्च दर्जा’चा निसर्ग मानसिक आरोग्यासाठी आणि भावनिक स्वास्थ्यासाठी अधिक प्रभावी ठरतो. विविध झाडां-फुलांची समृद्धता, पक्षी-प्राणी-कीटकांची जैवविविधता, गजबजाटापासून दूर असलेली शांत हिरवळ, मनाला निवांत करणारी दृश्यं आणि स्वच्छता, या सगळ्यांमुळे निसर्गाचा दर्जा ठरतो.
निसर्ग सर्वत्र आहे, पण उच्च दर्जाचा निसर्ग सर्वांना समान मिळतोच असे नाही. शहरांतील गरीब व वंचित वस्तीमध्ये चांगल्या उद्यानांची, मोकळ्या हिरवळीची आणि स्वच्छ परिसराची कमतरता असते. ज्यांच्याकडे स्वतःची बाग नाही, त्यांना निसर्गाचा लाभ कमी मिळतो. तरुण पिढी, अपंग व्यक्ती आणि दीर्घ आजारांनी ग्रस्त लोकांसाठीही निसर्गस्थळांपर्यंत सुरक्षित व सोयीस्कर पोहोचणे अनेकदा कठीण असते. अनेक महिलांसाठी निसर्गस्थळं आजही असुरक्षित वाटतात.
आशेची किरणंही आहेत
म्हणूनच आज गरज आहे ती केवळ निसर्ग वाचवण्याची नाही, तर तो सर्वांपर्यंत पोहोचवण्याची. रस्त्यांच्या कडेला झाडं लावणं, फुलझाडं वाढवणं, नवीन रस्ते किंवा बांधकाम करताना तिथे पुन्हा नैसर्गिक अधिवास निर्माण करणं, गरजेचं आहे. हिरवळ ही श्रीमंतांची मक्तेदारी नसावी, तर प्रत्येकाच्या श्वासाचा हक्क असावा. जिथे झाडं तोडली जातात, तिथे माणसांच्या मनातूनही शांतता तुटत जाते. निसर्ग नष्ट झाला, तर केवळ पर्यावरणच नाही, तर आपले भावनिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यही उद्ध्वस्त होईल.
म्हणून आजच ठरवायला हवं — आपण निसर्गाचे मालक नाही, तर विश्वस्त आहोत. पुढच्या पिढ्यांसाठी हिरवं, शांत, सुरक्षित जग सोपवणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
मनोचिकित्सक आणि वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता