दिवाळी अंक २०२६ : लोकप्रियतेपासून विस्मृतीपर्यंत...

मराठी साहित्याचा प्रवास अनेक साहित्यप्रकारांच्या योगदानाने समृद्ध झाला आहे. काळाच्या ओघात काही नवे प्रकार उदयाला आले, लोकप्रियही झाले; मात्र बदलत्या साहित्यिक अभिरुचीमुळे त्यातील अनेक प्रकार हळूहळू लोप पावले. मराठी साहित्यविश्वातील अशाच विस्मृतीत गेलेल्या साहित्यप्रकारांचा घेतलेला हा मागोवा.
दिवाळी अंक २०२६ : लोकप्रियतेपासून विस्मृतीपर्यंत...
दिवाळी अंक २०२६ : लोकप्रियतेपासून विस्मृतीपर्यंत...
Published on: 

अनंत देशमुख

मराठी साहित्याचा प्रवास अनेक साहित्यप्रकारांच्या योगदानाने समृद्ध झाला आहे. काळाच्या ओघात काही नवे प्रकार उदयाला आले, लोकप्रियही झाले; मात्र बदलत्या साहित्यिक अभिरुचीमुळे त्यातील अनेक प्रकार हळूहळू लोप पावले. मराठी साहित्यविश्वातील अशाच विस्मृतीत गेलेल्या साहित्यप्रकारांचा घेतलेला हा मागोवा.

अव्वल इंग्रजीच्या काळात मुंबई विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर मराठी साहित्याचा पद्धतशीर अभ्यास सुरू झाला. संत, पंत आणि तंत साहित्याबरोबरच बखरवाङ्मयाचीही ओळख झाली. इतकेच नव्हे, तर शेक्सपिअरची नाटके आणि कालिदासादी संस्कृत कवींची नाटकेही अभ्यासक्रमात होती. त्यामुळे मराठीत नाटकांचा अभाव असल्याची उणीव जाणवू लागली. त्यातून मराठीत नाटके लिहिली जाऊ लागली. शेक्सपिअरच्या प्रभावामुळे नाटकातील ‘स्वगत’चे महत्त्व लक्षात आले. राम गणेश गडकरी यांनी आपल्या नाटकांत स्वगतांचा भरपूर वापर केला. पुढे तर ‘स्वगत’ हा नाट्यरचनेचा अपरिहार्य भाग ठरला. १९७१ साली वि. वा. शिरवाडकर यांनी ‘नटसम्राट’ हे नाटक लिहिले. या नाटकाच्या पहिल्या अंकातील पहिला दीर्घ प्रवेश हे एक स्वगतच आहे. त्यानंतर नाट्यरचनेतील सुटसुटीतपणाच्या गरजेतून स्वगते हद्दपार झाली.

हरिभाऊ आपटे यांनी आपल्या गुरूंच्या मृत्यूनंतर ‘शिष्यजनविलाप’ नावाचे काव्य लिहिले होते. विलापिका हा काव्यप्रकारही इंग्रजीतील Allegory या प्रकारावरून मराठीत आला. नाही म्हणायला, संस्कृतमध्ये ‘अजविलाप’सारखे काव्य होतेच.

गडकऱ्यांच्या काळात रॉबर्ट ब्राऊनिंग यांच्या Dramatic Monologue या काव्यप्रकारापासून प्रेरणा घेऊन शंकर काशिनाथ गर्गे ऊर्फ ‘दिवाकर’ यांनी ‘नाट्यछटा’ हा प्रकार मराठीत आणला. गडकऱ्यांनीही ‘सकाळचा अभ्यास’ यांसारखी रचना केली. त्या काळात ‘भालचंद्र’ यांनीही अशा प्रकारचे लेखन केले. मात्र, पुढे हा प्रकारही इतिहासजमा झाला.

हरिभाऊ आपटे आणि राम गणेश गडकरी यांच्या काळात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. त्यावेळी दु. आ. तिवारी यांनी समरगीते लिहिली. मात्र, हा प्रकारही फार काळ टिकला नाही. १९६१च्या चिनी आक्रमणानंतर कुसुमाग्रज, ग. दि. माडगूळकर आणि वसंत बापट यांनी समरगीते लिहिली. लावणी आणि पोवाडांना उत्तर पेशवाईत बहर आला. १९६०च्या सुमारास संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळात वसंत बापट, लीलाधर हेगडे, दादा कोंडके, अमर शेख आणि नारायण सुर्वे यांनी या प्रकारचे लेखन केले. कलापथकांमधून त्यांच्या रचना गायल्या जात असत.

१९४४-४५च्या सुमारास वि. स. खांडेकर यांनी ‘रूपककथा’ हा साहित्यप्रकार रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ‘या रूपककथा का?’ असा वाद ‘साप्ताहिक मौज’मध्ये रंगला होता.

इंग्रजी काव्याच्या अनुकरणातून Sonnet या काव्यप्रकारावरून ‘सुनीत’ हा प्रकार मराठीत रुजवण्याचा प्रयत्न झाला. १९३३च्या सुमारास उमर खय्याम यांच्या रुबायांपासून प्रेरणा घेऊन अनंत काणेकर यांनी ‘रुपेरी वाळू’ हा काव्यसंग्रह लिहिला.

इंग्रजीतील Utopia या साहित्यप्रकाराचेही अनुकरण झाले. वि. वा. शिरवाडकर यांनी ‘कल्पनेच्या तीरावर’ या कादंबरीत त्याचा सुंदर उपयोग केला आहे. मात्र, हा प्रकार अलक्षितच राहिला.

याच काळात इंग्रजीतील Parody या प्रकारावरून मराठीत ‘विडंबनकाव्य’ हा साहित्यप्रकार लोकप्रिय झाला. तत्कालीन नियतकालिकांनी त्याला प्रसिद्धी दिली. आचार्य प्र. के. अत्रे यांनी ‘झेंडूची फुले’ हा विडंबनकाव्यसंग्रह लिहून आणि पुस्तकरूपाने प्रसिद्ध करून हा प्रकार लोकप्रियतेच्या शिखरावर नेला. इतकेच नव्हे, तर त्या काळात अनेक कवीही विडंबनकाव्ये लिहू लागले. अशा विडंबनांचे ‘उपहासिका’ या नावाचे एक संकलनही त्यावेळी प्रसिद्ध झाले होते. १९६५ ते १९८० या काळात केशव शिरसेकर नावाचे कवी विडंबनकाव्ये लिहीत असत, असे आठवते.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजीतील Farce या प्रकारावरून मराठीत ‘प्रहसन’ हा साहित्यप्रकार आला. ‘मोर एल. एल. बी.’, ‘छपरी पलंगाचा फार्स’, ‘अफजलखानाच्या वधाचा फार्स’ यांसारखे फार्स लिहिले गेले. पौराणिक नाटकांच्या प्रयोगांमध्येही त्यांचे सादरीकरण होत असे. तत्कालीन अनिष्ट सामाजिक रूढींवर प्रहार करण्यासाठी प्रामुख्याने हे फार्स लिहिले जात. हरिश्चंद्र तालचेलकर यांनी असे फार्स लिहून लोकप्रियता मिळवली होती. या काळातील फार्सचे संपादन डॉ. भीमराव कुलकर्णी यांनी केले आहे. १९५० ते १९६० या काळात बबन प्रभू आणि आत्माराम भेंडे यांनी ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’, ‘झोपी गेलेला जागा झाला’ यांसारखे फार्स लिहून आणि रंगमंचावर सादर करून नाट्यरसिकांची मने जिंकली.

पंडिती काव्यातील ‘आख्यानकाव्य’ आणि इंग्रजीतील Narrative Poetry यांच्या संमिश्र प्रभावातून रविकिरण मंडळाच्या काळात ‘खंडकाव्य’ हा प्रकार उदयाला आला. राजकवी यशवंत आणि माधव ज्युलियन यांनी या प्रकारात लेखन केले. ‘सुधारक’ आणि ‘विरहतरंग’ ही माधव ज्युलियन यांची, तर ‘जयमंगला’ आणि ‘बंदिशाळा’ ही यशवंत यांची खंडकाव्ये होत. बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर यांनी ‘काय हो चमत्कार’ हे खंडकाव्य लिहिले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही ‘कमला’ आणि ‘गोमंतक’ ही महाकाव्ये लिहिली. मात्र, हे साहित्यप्रकारही फार काळ टिकले नाहीत.

मराठीत पत्रलेखन मोठ्या प्रमाणावर होत असे. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय आणि साहित्यिक स्वरूपाची अनेक पत्रे पुस्तकांच्या रूपाने प्रसिद्ध होत असत. अगदी सुरुवातीला लोकहितवादींनी ‘प्रभाकर’ या नियतकालिकातून ‘शतपत्रे’ (१०८ पत्रे) लिहिली. याशिवाय ‘हरिभाऊंची पत्रे’, ‘कुसुमानिल’, ‘विश्रब्ध शारदा’ यांसारखी पुस्तकेही प्रसिद्ध झाली. मात्र, अलीकडच्या काळात पत्रलेखन हा प्रकार मागे पडला आहे. अपवादात्मक स्वरूपात ‘पत्रसंस्कृती’ यांसारखी पुस्तके प्रकाशित होतात.