निसर्गाचा फ्लॅशबॅक फॉसिल्स

आजचे प्राणी आणि झाडे पूर्वी कसे दिसत असतील, असा प्रश्न तुम्हाला पडतो का? त्याचे उत्तर दडले आहे जिवाश्मांमध्ये! खडकांमध्ये जपलेल्या या खुणा आपल्याला प्राचीन जीवसृष्टीची भन्नाट गोष्ट सांगतात.
निसर्गाचा फ्लॅशबॅक फॉसिल्स
Published on

अजब निसर्ग

मकरंद जोशी

आजचे प्राणी आणि झाडे पूर्वी कसे दिसत असतील, असा प्रश्न तुम्हाला पडतो का? त्याचे उत्तर दडले आहे जिवाश्मांमध्ये! खडकांमध्ये जपलेल्या या खुणा आपल्याला प्राचीन जीवसृष्टीची भन्नाट गोष्ट सांगतात.

आज ज्या वनस्पती, पशु-पक्षी-कीटकांचे विविध प्रकार पाहतो ते हजारो-लाखो वर्षांपूर्वी निर्माण झाले आहेत. ते जेव्हा निर्माण झाले तेव्हा त्यांचे रूप-स्वरूप काही आजच्यासारखे नव्हते, कारण पृथ्वीवरील वातावरण, हवामान, भौगोलिक परिस्थिती तेव्हा वेगळीच होती. काळाच्या ओघात हे सगळे बदलत गेलं तसं निर्माण झालेल्या अनेक जाती नष्ट झाल्या, काहींनी त्यांचं स्वरूप बदललं. मग आजच्या प्राण्यांचे पूर्वज नेमके कसे होते? कुठे राहत होते? याची माहिती आपल्याला कशी मिळते? तर हिंदी चित्रपटांमध्ये जसा हिरो किंवा हिरॉइनचा फ्लॅशबॅक दाखवला जातो, तसाच लाखो वर्षांपूर्वीच्या जीवसृष्टीचा फ्लॅशबॅक निसर्गात पाहायला मिळतो तो फॉसिल्सच्या रूपाने..

फॉसिल्स म्हटल्यावर आपल्याला सर्वांत आधी आठवतात ते डायनासॉर. आपल्या अवाढव्य, महाकाय शरीराने पृथ्वीवरच्या सगळ्या प्राण्यांमध्ये वरचढ ठरलेले डायनासॉर सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी या पृथ्वीतलावरून कायमचे नष्ट झाले. पण त्यांच्या खाणाखुणा आजही सापडतात त्या फॉसिल्समधून. पण म्हणून फॉसिल्स काही फक्त डायनासॉर्सचेच नसतात. प्रागैतिहासिक काळातील वनस्पती, कीटक, जलचर, शंख-शिंपले यांचेही फॉसिल्स बनतात. फॉसिल्स म्हणजे जणू लाखो-करोडो वर्षांपूर्वीच्या भूतकाळात उघडलेली छोटीशी खिडकीच. या खिडकीतून घडणारे भूतकाळाचे दर्शन थक्क करणारे असतं. फॉसिल्सच्या या अनोख्या दुनियेची झलक पाहायला मिळते ती घुघवा फॉसिल्स पार्कमध्ये. मध्यप्रदेशातील डिंडोरी जिल्ह्यात हा फॉसिल पार्क आहे. घुघवा आणि उमरिया या दोन गावांमध्ये मिळून २७.३४ हेक्टर परिसरात हा आगळावेगळा नॅशनल पार्क पसरलेला आहे. या ठिकाणी प्रामुख्याने झाडांचे फॉसिल्स पाहायला मिळतात. या फॉसिल्सच्या रूपाने सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वीच्या वृक्षसंपदेचं दर्शन इथे घडतं. हा काळ वनस्पतींच्या इतिहासातील महत्त्वाचा काळ आहे, याच काळात अपुष्प वनस्पती मागे पडून सपुष्प वनस्पतींचे प्रकार वाढायला सुरुवात झाली होती. तसेच आज आपण वनस्पतींची जी रूपे पाहतो त्यांना आकार यायला सुरुवात झाली होती.

आज घुघवा येथे जांभूळ, आवळा, खजूर, नारळ, केळी, रुद्राक्ष, आंबा अशा झाडांच्या खोडांचे, फांद्यांचे, मुळांचे, पाना-फुलांचे, फळांचे आणि बियांचे फॉसिल्स आढळतात. ही सगळी झाडे सदाहरित असून, दमट हवामानात वाढणारी आहेत. या झाडांना भरपूर पाऊसही लागतो. सध्या घुघवामध्ये १४०० मिलिमीटर पाऊस पडतो, पण तेव्हा म्हणजे सहा कोटी वर्षांपूर्वी इथे २००० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडत असे. त्यामुळे आज जरी हा परिसर कोरडा, रखरखीत असला तरी त्याकाळी इथे घनदाट असं अरण्य होतं याची साक्ष हे फॉसिल्स देतात. इथल्या फॉसिल्सच्या खजिन्यातील एक आश्चर्य म्हणजे इथे युकॅलिप्टस म्हणजे नीलगिरीच्या झाडांचे जीवाश्म सापडतात. आधुनिक जगात युकॅलिप्टस हे झाड ऑस्ट्रेलिया खंडाची देणगी मानले जाते. मग या मूळ ऑस्ट्रेलियन झाडाचे फॉसिल्स भारताच्या मध्यभागी असलेल्या घुघवात कसे? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला वीस कोटी वर्षे मागे जावे लागते. आज आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरील भूभागांची वाटणी सात खंडांमध्ये केली आहे. पण वीस कोटी वर्षांपूर्वी एकच विस्तीर्ण भूभाग होता. त्याला पॅनेजिया म्हटले जाते. पंधरा कोटी वर्षांपूर्वी हा पॅनेजिया हलला आणि त्याचा उत्तर भाग दक्षिण भागापासून वेगळा झाला. उत्तर भागाला लॉरेशिया तर दक्षिण भागाला गोंडवन म्हणतात. दहा कोटी वर्षांपूर्वी भूगर्भातील हालचालींनी या खंडांचेही तुकडे झाले. गोंडवनातील साऊथ अमेरिका, आफ्रिका, भारत वेगळे झाले. सर्वांत शेवटी पाच कोटी वर्षांपूर्वी त्यातून ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका वेगळे झाले. पण त्याआधी ऑस्ट्रेलिया आणि भारत हे आजचे देश एकाच भूभागावर होते, याचा पुरावा घुघवातील युकॅलिप्टसच्या फॉसिलमधून मिळतो.

मात्र भारतात फक्त वनस्पतींचेच फॉसिल्स मिळालेले नाहीत. हिमालय पर्वताच्या पायथ्याच्या प्रदेशातील वाघ, हत्ती, हिप्पोपोटॅमस, महाकाय कासवे, मगरी, ओकापी (फॉरेस्ट जिराफ) अशा लाखो वर्षांपूर्वीच्या प्राण्यांचे, जे आता नष्ट झाले आहेत, अवशेष फॉसिल्सच्या रूपाने पाहायला मिळतात. हिमालयाच्या शिवालिक रांगेतील हे सगळे प्राणी आपला विश्वास बसणार नाही इतक्या भव्य आकाराचे होते. हिमाचल प्रदेशातील सिरमुर जिल्ह्यातील साकेती या ठिकाणी हा शिवालिक फॉसिल पार्क आहे. या पार्कमध्ये लाखो वर्षांपूर्वीच्या प्राण्यांचे जे अवशेष हत्तीचे दात, कासवाचे कवच, काही प्राण्यांच्या कवटीचे तुकडे जतन करून ठेवण्यात आले आहेत. बाहेरच्या विस्तीर्ण आवारात या प्राण्यांच्या मूळ आकाराच्या मोठ्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने हे जीवाश्म उद्यान विकसित केलं आहे. साकेतीमधल्या मार्कंड व्हॅलीत सुमारे दहा ते पंचवीस लाख वर्षांपूर्वीच्या प्राण्यांचे जे अवशेष मिळाले ते या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत.

घुघवामधली वनस्पतींची फॉसिल्स काय किंवा साकेती येथील प्राण्यांची फॉसिल्स काय, मुळात ही फॉसिल्स तयार कशी होतात? सर्वसाधारणपणे एखादा जीव मृत झाल्यानंतर त्याच्यामधील सेंद्रिय म्हणजे ऑरगॅनिक भाग कुजून नष्ट होतो. पण जेव्हा त्या प्राण्याचा मृतदेह किंवा वनस्पतीचा भाग मेल्यानंतर पाण्याखाली किंवा गाळाखाली गाडला जातो तेव्हा मात्र ही कुजण्याची प्रक्रिया पूर्णत्वास जात नाही. अशा वेळी त्या प्राण्याच्या शरीराची आकृती त्या गाळावर उमटते, त्यालाच आपण जीवाश्म म्हणतो. म्हणूनच बहुतेक फॉसिल्स हे गाळाच्या खडकांमध्ये, कोळशाच्या थरात, सरोवराच्या तळाशी किंवा सागराच्या तळाशी सापडतात. काही फॉसिल्समध्ये मूळ जीवाचे सारे अवशेष नष्ट झाल्यानंतर उरलेला ठसा पाहायला मिळतो. काही वेळा झाडातून पाझरलेल्या डिंकात कीटक, कोळी, झाडाच्या बिया अडकतात आणि त्या सगळ्याचे रूपांतर अंबरमध्ये होते. एखाद्या अर्धपारदर्शक लोलकात खडा जडवावा तसं हे फॉसिल दिसतं. फॉसिल्सचे वय शोधण्यासाठी रेडिओमेट्रीचा वापर करतात. सजीवांच्या शरीरातील कार्बन १२ आणि कार्बन १४ या घटकांच्या मदतीने सापडलेल्या अवशेषांचे वय शोधता येतं.

निसर्गाच्या उत्क्रांतीच्या चक्रात लाखो प्रकारचे जीव वेगवेगळ्या काळात निर्माण झाले आणि लयालाही गेले. मात्र त्यातले जे टिकले, तगले त्यांचे पूर्वज कसे होते याची झलक आपल्याला फॉसिल्स म्हणजेच जीवाश्मांमधून बघायला मिळते. त्यामुळे हा निसर्गाचा फ्लॅशबॅक जसा रंजक आहे तसाच तो प्राचीन काळातील जीवसृष्टीचं दर्शन घडवणारा असल्याने माहितीपूर्णही आहे.

निसर्ग अभ्यासक व लेखक

makarandvj@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in