खुल जा सिम सिम
ज्योती कपिले
Hi friends! कसे आहात? मित्रांनो, संपूर्ण निसर्ग आपला सखा असतो. हे आकाश, धरती, निसर्ग, हे ऋतू सगळे आपले मानव जातीचे मित्र असतात. परंतु माणूस जेव्हा त्यांना मित्र न मानता शत्रू मानतो तेव्हा ते मानवाचे नुकसान करतात. ‘मैत्र’ हा शब्द खूप महत्त्वाचा असून संत ज्ञानेश्वर महाराज यांनी सुद्धा आपल्या ‘पसायदान’मध्ये लिहून ठेवलं आहे की, ‘भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे’
एव्हाना तुम्हाला वाटत असेल की मी हे मैत्री पुराण का लावले आहे? मैत्री दिन तर होऊन गेला आहे.
तर आपण आज भेटणार आहोत एका ‘दोस्त ऋतू’ला. तुम्हाला आपले ऋतू माहिती आहेत का? बोला, बोला… बरोब्बर सहा ऋतू आहेत आणि त्यांची नावं सांगा… वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर…हे ऋतू आपले मित्र असतात. एक कवी आहेत. त्यांचे नाव विश्वास वसेकर आहे. त्यांनी तुम्हा बालमित्रांसाठी खूप म्हणजे खूप पुस्तकं लिहिली आहेत. त्यापैकी एका पुस्तकाचे नाव आहे ‘दोस्त ऋतू’.
किती सुंदर नाव आहे ना ‘दोस्त ऋतू’. खरंच, ऋतूंना ‘मैत्र’ संबोधणं किती मस्त वाटतं ना? थांबा, ती कविताच तुम्हाला वाचायला देते. तुम्हाला ती कविता नक्की आवडेल. कवितेचे शीर्षकच आहे ‘दोस्त ऋतू’.
“वसंत म्हणतो पहा फुले,
अन् ग्रीष्म म्हणतो आइस्क्रीम खा,
वर्षा म्हणते भिजा चिंब
अन् शरद म्हणतो चांदणे प्या
थंडी असते चक्क गुलाबी
हेमंताचा थाट रुबाबी
पानगळीचा रंग बदामी
शिशिर ऋतूच्या अंतर्यामी
सहा ऋतूंच्या हजार गमती
तनामनावर झेलू या
उघडून डोळे, नाक चालवून
रूप गंध हे चाखू या.”
बघा, कवीने किती सोप्पं काम केलं तुमचं. आता कविता वाचल्यावर तर तुम्हाला प्रत्येक ऋतू आणि त्याची वैशिष्ट्यं समजली असून ती कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहतील ही खात्री आहे. काय म्हणता, तुम्हाला कविता आवडली आणि अजून काही कविता वाचायच्या आहेत. अरे मग नेकी और पूछ पूछ! तुमच्यासारखी वाचणारी मुलं मला खूपच आवडतात. या पुस्तकात एकूण २३ कविता असून विषयाचे वैविध्य तर आहेच, पण विषयही वेगवेगळे आहेत. त्यातली एक कविता आहे, ‘बारसं’. त्यात बाळाचं नाव काय ठेवायचं, कोणाचं ठेवायचं, कसं ठेवायचं याची गंमत आहे. आहे ना वेगळ्याच विषयावरील कविता? आता अजून एक अफलातून विषय असलेली कविता आहे, ‘झाडे चालाया लागली’. असं झालं तर काय काय मज्जा येईल ती तुम्ही पुस्तक वाचताना अनुभवाल. या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या आकाराचं आणि सुंदर सुंदर चित्रांनी नटलेलं हे पुस्तक आहे आणि याचं मुखपृष्ठ आणि आतील चित्रं काढली आहेत सुप्रसिद्ध चित्रकार संतोष घोंगडे यांनी.
आता ‘मालनबाई’ या कवितेत फुलं कुठली वेचायची हे सांगितलं आहे. कवी म्हणतो की फुलं झाडावरची नाही तर खाली पडलेली वेचायची…झाडावरची फुलं ओरबाडून काढायची नाही. किती महत्त्वाचा विचार आहे ना हा…तुम्हीही लक्षात ठेवा हं! शिवाय तुम्हाला पणजी कोणाला म्हणतात हे माहिती आहे? पणजी म्हणजे तुमच्या आईची, वडिलांची आजी बरं का? तर तिची कविताही छान आहे.
तुम्हाला ‘बाऊ’ माहिती आहे ना? लहान मुलं खेळताना, चालताना पडले तर मोठे त्यांना म्हणतात तुला ‘बाऊ’ झाला का? तर या ‘बाऊ’ नावाची कविताही वाचा बरं.
“कण्हायचं नाही, कुंथायचं नाही
बाऊकडे लक्षच द्यायचं नाही
बाऊ झाला बोटाला,
तर पहायचं पायाला,
बाऊ झाला पायाला,
पाहू समोरच्या झाडाला!
दुखू लागलं पोटात,
तर खेळायचं गोटात,
गोष्टी सुद्धा दुखण्याच्या
मित्रांमध्ये करायच्या नाहीत,
सगळ्यांवरचे औषध एक,
मळ्यात पिके खसखशीच्या,
खसखशीचा मळा आपण,
फुलविल्याविना राहायचं नाही,
कण्हायचं नाही, कुंथायचं नाही
बाऊकडे लक्षच द्यायचं नाही!”
अगदी तुमच्यासारख्या गोड, समंजस मुलांची ही कविता आहे. मित्रांनो, खूप वाचा आणि समृद्ध व्हा! पुस्तक विकत घेऊन वाचा किंवा लायब्ररीत वाचा आणि आम्हाला हे दिलीप प्रकाशनाने प्रकाशित केलेलं पुस्तक कसं वाटलं ते जरूर कळवा. शेअरिंग is always केअरिंग!
- बाल साहित्यिक व साहित्याच्या आस्वादक