चिकन ते विच्छेदन - एक करुण सोहळा

कोंबडी खाण्यापेक्षा ती आणण्याची वेळ माझ्यावर आली की माझीच पंचाईत होते. एका शाकाहारी माणसाची चिकन दुकानापर्यंतची ही विसंगती, विनोद आणि अस्वस्थतेने भरलेली सफर.
चिकन ते विच्छेदन - एक करुण सोहळा
चिकन ते विच्छेदन - एक करुण सोहळा
Published on

प्रासादिक म्हणे

प्रसाद कुळकर्णी

कोंबडी खाण्यापेक्षा ती आणण्याची वेळ माझ्यावर आली की माझीच पंचाईत होते. एका शाकाहारी माणसाची चिकन दुकानापर्यंतची ही विसंगती, विनोद आणि अस्वस्थतेने भरलेली सफर.

नुकतंच एका जागतिक चिकन ब्रँडचा जिवंत कोंबडी ते तिचं विच्छेदन होऊन, स्वच्छ करून ती कशी पॅक केली जाते हे दाखवणारा व्हिडीओ पाहण्यात आला. आता तो खरा होता की AI ने बनवलेला होता कुणास ठाऊक. पण तो पाहून लेखासाठी हा विषय मात्र मला मिळाला. असो, चिकन किंवा स्वच्छ मराठी भाषेत कोंबडी, म्हणजे कोंबडीचं मटण (चिकन) आणायला हिने सांगितलं, की माझ्या पोटात गोळाच येतो. आता तुम्ही म्हणाल, जायचंच कशाला दस्तुरखुद्द आणायला, गोळा येतो तर ? ऑनलाइन मागवायचं ना आणि निवांत बसायचं घरात आणि बनल्यावर चाटून पुसून खाता ना? तेव्हा कुठे जातो गोळा ?? तर या प्रश्नांची आधी उत्तरं देतो.

आम्हाला काहीही ऑनलाइन मागवायला नाही आवडत. आम्हाला म्हणजे सर्वाधिकारी बायकोला. आता चाटून पुसून खाता ना? याचं उत्तर, मी शाकाहारी आहे, अगदी समुद्राच्या अथांग पाण्याने, उसळणाऱ्या लाटांनी मोहरून न येता, समुद्रातल्या माशांवर प्रेम करणाऱ्या सारस्वत घरात जन्म घेतलाय तरीही. तर, त्यामुळे माझ्यापुरता तरी चाटून पुसून खाण्याचा प्रश्नच नाही आणि चिकन जिथे मिळतं त्या वातावरणात, मला बायकोला ते आणायला पाठवणं तितकसं आवडत नाही म्हणून जातो बापडा.

आमच्या घरापासून पाच मिनिटांवर हे कोंबडी मिळण्याचं दुकान आहे. दुकानाच्या बाहेर चिकन सप्लायरची जाळीदार असलेली, कोंबड्यांच्या विष्ठेने आणि कलकलाटाने भरून गेलेली व्हॅनसदृश गाडी उभी असते आणि तो जीवाच्या आकांताने होत असलेला कलकलाट माझ्या मनाला पीळ पाडत असतो. पण गाडीबरोबरचे कामगार निर्विकार चेहऱ्याने एकाचवेळी, पाय गच्च बांधलेल्या पाच-सहा जिवंत कोंबड्या तंगड्यांकडून उचलून आणि वजनाला लावून दुकानात आणून देत असतात. मग त्यात गावठी, सेमी गावठी (असाही प्रकार असतो म्हणे) ब्रॉयलर आपापल्या जागी कोंडल्या जातात. रांगेत उभी असलेली गिऱ्हाईकं कौतुकाच्या नजरेनं हे सगळं पहात असतात. गावठी कोंबड्यांना जाळीदार दरवाजांची कपाटं काही मिनिटांच्या वस्तीसाठी दिलेली असतात, तर ब्रॉयलर कोंबड्या चारही बाजूंनी किंतानानी बंद केलेल्या आडोशात सैरभैर, अस्वस्थ होऊन आणि आपलं भविष्य समजून भिरभिरत तुरतुरत असतात. पांढऱ्या शुभ्र गुबगुबीत ब्रॉयलर कोंबड्या गणवेश घातल्यासारख्या दिसत असतात.

आता गावठी कोंबडी घ्यायची, तर ती कोवळी आहे की जून हे समजण्याचं तंत्र अवगत असायला हवं, म्हणजे यासाठी तिला हात लावणं आलं. हे मला तरी शक्य नसतं. जाणकार, दर्दी गिऱ्हाईकांची कोंबडी परीक्षा सुरू असते. ब्रॉयलर प्रकारात हा मुद्दा नसतो, कारण तिच्यात सगळं मऊ मऊ मांस भरलेलं असतं. म्हणून मी आपला तीच प्रेफर करतो आणि H.Q. ने तीच आणायला सांगितलेलं असतं.

दुकान जसजसं जवळ येऊ लागतं, तसा एखाद्या नवख्या शाकाहारी माणसाला जराही सहन न होणारा आणि नियमित गिऱ्हाईकाच्या नाकाला सवयीचा झालेला एक उग्र दर्प नाकात शिरू लागतो. हा दर्प कोंबड्या आणि त्यांच्या फडफडण्यामुळे इतस्ततः उडणारी पिसं, जमिनीवर जागोजागी पसरलेली विष्ठा आणि दुकानाच्या अंतर्भागात त्यांचा कत्लेआम केल्यावर रक्त मांसाचा असा एकत्रित वास त्या दर्पामध्ये भरलेला असतो. दुकानाच्या दारात एक टेबलावर गावठी, इंग्लिश अंड्यांचे ट्रे हारिने रचून ठेवलेले असतात आणि एक भकास चेहऱ्याचा कळकट माणूस तिथे उभा असतो. थोडक्यात स्वच्छता नावाची गोष्ट इथे नावालाही नसते. वजन करणाऱ्यापासून, मुंडी कापून क्षणात त्या मुक्या जीवाचा कलकलाट थांबवणारा ते तिची पिसं उपसून आणि धारधार सुरीने तिचे तुकडे करून, काही मिनिटांपूर्वी असलेली तिच्या जिवंतपणाची खुणही नष्ट करणाऱ्यापर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपला कार्यभाग साकारताना एक त्रयस्थ, निर्विकार आणि 'इदं सर्वम् नश्वरं हि जगत्' थोडक्यात जीवन क्षणभंगुर आहे हे सांगणारा भाव लख्खपणे तरळत असतो. या सगळ्या हलाल माहोलात अगदी एखाद्या मंगल कार्यात, आपल्या घरचं कार्य असल्यासारखं अनेक ग्राहक मोकळेपणाने वावरत असतात. आपण निवडलेलीच कोंबडी आपल्याला मिळतेय ना, यावर लक्ष ठेवण्यासाठी अगदी कत्तल करणाऱ्याच्या पुढ्यात उभं राहून तो करुण सोहळा, अनिमिष नेत्रांनी पहात असतात, सूचना करत असतात, तिचे सगळे अवयव पिशवीत आले ना याकडे अगदी काटेकोरपणे लक्ष ठेवून असतात. सगळा ऐवज काळ्या कॅरी बॅगमध्ये भरून त्या कत्तलकऱ्याने हाती दिला की पुन्हा एकदा ती पिशवी वजन काट्यावर ठेवून, आपल्या आकडेमोडीनुसार फायनली बरोबर मटण हाती आलं ना, हे पडताळून मगच भरल्या मनाने आणि हसऱ्या चेहऱ्याने दुकानाबाहेर पाय ठेवतात.

मी तिकडे तसा परक्यासारखाच वावरत असतो. म्हणजे ना, दुकानात शिरल्यापासून एक प्रकारचं अवघडलेपण जाणवत असतं. मी निवडलेली.... म्हणजे माझ्या सांगण्यानुसार त्याने निवडलेली असं, कोंबडी वजन करून आत गेली की, तिथून फक्त दोन पावलं पुढे सरकून, लांबूनच पुढच्या विच्छेदन प्रक्रियेकडे न पहाता मी पाठ फिरवून उभा राहतो. मध्येच तो मानकाप्या किंवा कोंबडीविच्छेदक ओरडतो, 'बीस नंबर किसका है?'

मी किंचित मान वळवून माझा असल्याचं खुणेने सांगतो आणि पुन्हा माझी पोझिशन घेतो. मागून येणारा फडफड आवाज, आपण (म्हणजे मी नाही त्यात) एका निष्पाप जीवाला, आपल्या जीभेचे चोचले पुरवण्यासाठी मारून त्याच्या चविष्ट मटणाचा, चव घेत आस्वाद घेऊन त्याला उदरात गडप करणार आहोत याची जाणीव देत असतो. इतक्यात पुन्हा मागून आवाज येतो, 'साब, तुकडा कैसा काटनेका ? मिडीयम, बडा, छोटा ?'

मी बायकोने सांगितल्याप्रमाणे उत्तर देतो आणि पुढच्याच क्षणी, ती काही क्षणांपूर्वी जिवंत असलेली अख्खी कोंबडी, मटणाचा ऐवज बनून पिशवीत येऊन बसते.

किंचित जड अंतःकरणाने मी मटणासहवर्तमान घरी पोहोचतो आणि दार उघडताच माझ्याआधी मटणाच्या पिशवीचं अर्थात कोंबडीचं स्वागत अगदी भरल्या अंतःकरणाने होतं आणि मला चहा वगैरेही न विचारता, बायको माझ्या हातातल्या पिशवीसह अगदी आनंद उत्साहाने किचनमध्ये शिरते..

kprasad1959@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in