

विशेष
डॉ. शैलेश उमटे
समाज अजूनही साठीनंतरच्या प्रेमाकडे आश्चर्याने किंवा संशयाने पाहतो. पण वाढते एकाकीपण, बदलती कुटुंबव्यवस्था आणि मानसिक आरोग्याची गरज लक्षात घेतली, तर उतारवयातील सहजीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची वेळ आता आली आहे.
बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्टनिस्ट' आमीर खान याने वयाच्या ६१ व्या वर्षी तिसरे लग्न केल्याची बातमी जेव्हा समोर आली, तेव्हा सोशल मीडियापासून ते गल्लीबोळातील कट्ट्यांपर्यंत एकच चर्चा सुरू झाली. कोणी यावर टीका केली, तर कोणी चकित झाले. पण या निमित्ताने एका अत्यंत महत्त्वाच्या मानवी गरजेवर पुन्हा एकदा प्रकाश पडला- ती म्हणजे 'सहजीवनाची ओढ'. प्रेम, सोबत आणि लग्न या गोष्टींना खरोखरच वयाचे बंधन असते का? उतार वयात जेव्हा स्त्री किंवा पुरुष एकाकी असतात, तेव्हा त्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या सहजीवनाच्या ओढीचा आणि मानवी मानसिकतेचा काय संबंध असेल.. ?
जर आपण इतिहास चाळला, तर १९ व्या शतकातही या वयात लग्नं व्हायची, पण त्यामागील कारणं पूर्णपणे वेगळी होती. तेव्हा केवळ संपत्ती राखण्यासाठी, दोन घराण्यांना जोडण्यासाठी किंवा संपत्तीला वारस देण्यासाठी असा एक व्यावहारिक समझोता केला जात असे. अशा लग्नांमध्ये स्त्री तयार होण्याचं मुख्य कारणं म्हणजे समाजात मिळणारं संरक्षण आणि तिची सुरक्षा. परंतु, काळाच्या ओघात समाजातील बदलांमुळे घराणेशाही नष्ट झाली. स्त्रिया स्वबळावर जगू लागल्या. विभक्त कुटुंबपद्धती वाढली आणि समाज काहीसा स्व-केंद्रित होत गेला. म्हणूनच, आजच्या काळात या वयात होणाऱ्या लग्नाची कारणं सामाजिक नसून पूर्णपणे वैयक्तिक आणि भावनिक आहेत.
साठीच्या वयात मनुष्य मानसिकदृष्ट्या परिपक्व होतो. स्वतःला त्याने बर्यापैकी समजून घेतलेलं असतं. जर ती व्यक्ती अगोदर नातेसंबंधात राहिलेली असेल, तर त्यातील चुका, समजुती आणि गैरसमजुती यातून ती तावूनसुलाखून निघालेली असते. म्हणूनच, या वयात माणूस दुसऱ्याला समजून घेण्यासाठी अधिक योग्य बनतो. या वयात ज्यांना पुन्हा प्रेम होतं, ते प्रत्यक्षात स्वतःचा एक नवा शोध घेत असतात. ही एक अत्यंत सकारात्मक भावना आहे. दररोजच्या जगण्यात, सुखदुःख वाटून घेण्यासाठी एका जोडीदाराची गरज असते, ज्यामुळे मानसिक स्वास्थ सुदृढ राहते. पुरुषाला संध्याकाळी घरी परतण्यासाठी एक हक्काचं कारण मिळतं, तर स्त्रीला समाजात वावरताना एक खंबीर भावनिक आधार मिळतो.
यात एक गमतीशीर विरोधाभास संशोधनातून समोर आला आहे. या वयात पुरुष स्वतःला दीर्घकालीन नातेसंबंधात किंवा विवाह बंधनात बांधून घ्यायला लगेच तयार असतो. पण स्त्रीला मात्र विवाह बंधनात अडकायचं नसतं; तिला फक्त काही काळासाठी एक चांगला जोडीदार हवा असतो. याचं कारण म्हणजे तिला मिळालेलं तिचं व्यक्तीस्वातंत्र्य तिला जास्त प्रिय असतं. तसेच, ही इच्छा त्यांच्या कौटुंबिक आणि सामाजिक आधारावरही अवलंबून असते. ज्यांना मुलांचा किंवा नातवंडांचा कौटुंबिक आधार चांगला असतो, त्यांना सहसा नव्या पार्टनरची गरज भासत नाही. म्हणूनच बरेच वृद्ध स्वतःला कुटुंबात गुंतवून घेत मुला-नातवंडांबरोबर आनंदात जगतात.
परंतु, ज्यांचा कौटुंबिक आधार तुटला आहे, ज्यांची मुलं परदेशात स्थायिक आहेत आणि साथीदार वारला आहे, अशा एकट्या पडलेल्या व्यक्तींमध्ये डिप्रेशन आणि चिंतेचे आजार मोठ्या प्रमाणात आढळतात. या कमालीच्या एकाकीपणातून आत्महत्येसारखे टोकाचे विचारही मनात येऊ शकतात. एकाकीपणामुळे शारीरिक आजारही बळावतात; डायबेटिस, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक यांसारख्या आजारांमुळे मृत्यू लवकर ओढवू शकतो. अपुरी झोप, स्मृतीभंश आणि सामाजिक बांधिलकी कमी होणे अशा समस्या निर्माण होतात. असा वेदनादायी एकाकीपणा कोणाला हवा असणार? ही भीषण स्थिती स्त्री आणि पुरुष दोघांनाही तितकीच लागू होते.
या वयात जोडीदार निवडताना पुरुषांची पसंती चांगल्या आरोग्याला असते, तर स्त्रिया पुरुष आरोग्याने चांगला आणि धनवान असावा याला प्राधान्य देतात; मग पुरुषाचं वय थोडं जास्त असलं तरी त्यांना चालतं. सर्वात रंजक गोष्ट म्हणजे, 'या वयातही आपण रोमान्स करू शकतो,' या केवळ कल्पनेनेच वृद्ध स्त्री-पुरुष भारावून जातात. मनात होणारी हुरहुर, पोटात येणारा गोळा अशा किशोरवयीन भावना आजही तशाच स्वरूपात जागृत होतात, जे अतिशय रोमांचकारी असतं.
शारीरिक जवळीक, आलिंगन, हात हातात धरणं किंवा चुंबन घेणं हे कोणत्याही वयात आरोग्याला पोषकच असतं. 'नॅशनल कौन्सिल ऑफ एजिंग'च्या संशोधनानुसार, उतार वयातील जोडप्यांना या जवळीकीमुळे ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही, ताणतणाव आणि डिप्रेशन कमी होतं आणि त्यांची वयोमर्यादा वाढून ते भावनिकदृष्ट्या सुदृढ राहतात. अमेरिकेत तब्बल ५४% वृद्ध डेटिंग करतात. भारतात हा आकडा कमी असला, तरी गेल्या काही वर्षांत तो २% वरून ६% वर गेला आहे. एका सर्वेक्षणातून असं समोर आलं आहे की, जवळपास ७०% वृद्धांना सहजीवन जगण्यास नक्कीच आवडेल.
भारतात ६० वर्षांच्या वर सुमारे १०.४ कोटी वृद्ध लोकसंख्या आहे. यातील ६० ते ६४ वयोगटात १०% पुरुष विदुर आहेत, तर तब्बल ४४% स्त्रिया विधवा आहेत. ५.७% वृद्धांना तर कसलाही आधार नाही. या लोकसंख्येमध्ये एकाकीपण आणि मानसिक आजारांचं प्रमाण सर्वाधिक असू शकतं, ज्यावर सहजीवन हाच एकमेव उत्तम उपाय आहे. पण दुर्दैवाने, भारतात आजही समाजात आणि कुटुंबात या गोष्टीला सहज मान्यता मिळत नाही. साठीनंतर नातवंडांना खेळवावं, घरातील इतर कामं करावीत, असं जीवनमान त्यांच्याकडून अभिप्रेत असते. विचार करा, ज्या वृद्धांची मुलं परदेशात आहेत आणि जे घरात अगदी एकटे आहेत, त्यांनी या वयात जोडीदार शोधण्यात गैर ते काय?
काही लोकांना वाटतं की, मालमत्तेसाठी वृद्ध लोक लग्न करतात, पण हा एक मोठा गैरसमज आहे. हा गैरसमज दूर व्हावा म्हणूनच आजकाल अनेक वृद्ध लोक 'लिव्ह-इन रिलेशनशिप' (Live-in Relationship) मध्ये राहण्याला पसंती देत आहेत. प्रेम आणि सहजीवन हे कोणत्याही वयासाठी सकारात्मक ऊर्जा देणारं असतं. त्याला वयाच्या चौकटीत बांधता येत नाही. भारतातही आता वृद्ध मंडळी साथीदार शोधण्यासाठी डेटिंग ॲपचा वापर करत आहेत. पुरुषांना हे ॲप्स आवडतात, तर स्त्रिया ॲपपेक्षा प्रत्यक्ष भेटून डेटिंग करणं पसंत करतात. त्यांना केवळ गप्पा मारण्यासाठी, सिनेमा पाहण्यासाठी किंवा डिनरला जाण्यासाठी एक चांगला मित्र हवा असतो.
थोडक्यात सांगायचं तर, सध्या जगाचा ट्रेंड बदलतो आहे आणि वाढत्या वयात सहजीवन ही चैनीची गोष्ट नसून आरोग्याची गरज बनत चालली आहे. सहजीवन हे नक्कीच आयुष्य वाढवणारं आणि मानसिक बळ देणारं ठरतं. त्यामुळे मनातील नकारात्मकता नष्ट होऊन जीवनातील सकारात्मकता वाढते. म्हणूनच, उतार वयातील प्रेमाकडे आणि सहजीवनाकडे संशयाने न पाहता, समाजाने त्याचा खुल्या मनाने स्वीकार करायला हवा.
मानसोपचारतज्ज्ञ आणि सेक्सोलॉजिस्ट