
उत्सवरंग
दीपाली दोंदे
दरवर्षी बाप्पांच्या मूर्तीत, त्यांच्या अंगावरील दागिन्यांमध्ये, शेल्याच्या डिझाईन्समध्ये बदल होत असतात. गेल्या चार-पाच वर्षांमध्ये गणरायाच्या डोक्यावर फेटा बांधलेला किंवा पगडी घातलेली दिसू लागली आहे. एकूणच गेल्या काही वर्षांत फेटा बांधण्याची प्रथा पुन्हा पुनरुज्जीवित होत आहे. अशावेळी भक्तांचे लाडके बाप्पा फेट्याशिवाय कसे राहतील?
गणेशोत्सव सुरू झाल्यापासून त्यात अनेक बदल झाले आहेत. हे बदल केवळ गणेशोत्सवातील देखावे, रोषणाई, सजावट यांच्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर गणरायांच्या वेशभूषेपर्यंत ते आपलं अस्तित्व दाखवत आहेत. अलीकडे काही बाप्पा तर चक्क आधुनिक अवतारात सामोरे येतात, तर काही फेटेधारी बनत पारंपरिक बाज दाखवतात.
फेटा, पगडी, जिरेटोप, पागोटं किंवा एखाद्या समाजाची पारंपरिक टोपी घातलेले बाप्पा अलीकडे दिसू लागले आहेत. त्यातही फेटेधारी बाप्पांचं प्रस्थ अधिक दिसत आहे. गणेश मूर्तींसाठी तयार फेटे, पगड्या फक्त सार्वजनिक गणेशोत्सवातील मूर्तींनाच नाही, तर घरगुती मूर्तींनाही घातल्या जात आहेत. बाप्पाच्या मूर्तीसाठी फेटे शिवणं किंवा मूर्तीला फेटा बांधणं, हा चक्क एक स्वतंत्र व्यवसाय होत चालला आहे. गणेश मूर्तींसाठी फेटे शिवणाऱ्या, फेटे तयार करणाऱ्या आणि गणेश मूर्तीला फेटा बांधणाऱ्या काही कारागिरांशी, व्यावसायिकांशी संवाद साधला असता एक वेगळंच विश्व उलगडतं.
गणेश मूर्तींसाठी रेडिमेड फेटे बनवणाऱ्या, अहिल्यानगरमधील अकोले येथील ब्रह्मांड फेटेवाल्यांची कीर्ती पार विदेशात पोहोचली आहे. ब्रह्मांडचे स्वप्नील कांडेकर गेले पाच-सहा वर्षं गणपती बाप्पांसाठी फेटे बनवतात आणि त्यांचे फेटे दरवर्षी महाराष्ट्राची सीमा ओलांडून अहमदाबाद, तेलंगणा, सुरतपर्यंत जातात. जिथे घराघरांत गणपतीची स्थापना केली जाते, त्या कोकणातून फेट्यांसाठी येणारी मागणी लक्षणीय आहे. स्वप्नील कांडेकर फक्त रेडिमेड फेटेच बनवत नाहीत, तर पेशवाई पगडी, पुणेरी पगडी, जिरेटोप, कृष्णाच्या मूर्तीला घातली जाणारी पगडी देखील तयार करतात.
स्वप्नील कांडेकर यांचा हा कलाप्रवासही मोठा रंजक आहे. गणेश मूर्तींसाठी वैशिष्ट्यपूर्ण फेटे, पगड्या घडवणाऱ्या कांडेकरांचा पिंडच कलाकाराचा. ते खरंतर ‘महाराष्ट्राची गौरवगाथा’मध्ये काम करणारे लोककलावंत. लोककलावंत म्हणून काम करता-करता ते या व्यवसायात आले. ते सांगतात, “मी लोककलावंत म्हणून काम करत होतो, नाटकाचीही खूप आवड होती. त्यावेळी पुण्याला रविवार पेठेत मुंदडा फेटेवाले यांच्याकडे मी नोकरीला होतो. त्यांच्याबरोबर समारंभांमध्ये फेटे बांधायला जायचो. तिकडे खूप शिकायला मिळालं, माझा हात बसला. सुरुवातीला प्रदर्शनांमध्ये फेटे ठेवायला लागलो. मग अहिल्यानगरच्या अकोले येथे या कामाची सुरुवात झाली. रेडिमेड पगड्या, फेटे, विठ्ठल भक्तांसाठी पागोटी बनवून विकण्यापासून खरी सुरुवात झाली. आमच्याकडे बाराही महिने पगड्या, पागोटी तयार असतात. मग खास बाप्पांसाठी फेटे, पगड्या करायला लागलो. खूप उत्साहाने हे काम करायला लागलो, पण अनेकांप्रमाणे मलाही लॉकडाऊनचा फटका बसला. त्या काळात वेगवेगळे प्रयोग करून बघितले, नवीन डिझाईन्स तयार केली. लॉकडाऊन उठल्यानंतर पुन्हा जोमाने हा व्यवसाय सुरू झाला.”
स्वप्नील कांडेकर अस्सल पैठणीच्या वस्त्रापासून हे फेटे तयार करतात. त्यासाठी ते तीन-साडेतीन हजारांच्या पैठण्या वापरतात. पैठणी साड्यांच्या काठांपासून हे फेटे शिवले जातात. पुणेरी पगड्या, फेट्यांखेरीज कृष्णाची ॲडजस्टेबल पगडी, फर टोपी असे वेगवेगळे प्रकारही ते गणेशभक्तांना उपलब्ध करून देतात. यासाठी लागणारा कच्चा माल ते मुंबई, पुणे, सुरत असा वेगवेगळ्या ठिकाणांहून मागवतात. फेट्यांसाठी लागणाऱ्या पैठण्या ते आधीच होलसेलमध्ये आणून ठेवतात. हे फेटे, पगड्या तीन ते चार वर्षं वापरता येतात. त्या लवकर खराब होत नाहीत.
स्वतः स्वप्नील कांडेकरांखेरीज त्यांची आई आणि पत्नीही या व्यवसायात आहेत. कांडेकर यांच्या, अंगणवाडी शिक्षिकेची नोकरी करणाऱ्या आई पूर्वी शिवण करायच्या. त्यांची सुरुवातीला खूपच मदत झाली. मग त्यांच्या आईने स्वप्नील यांच्या पत्नीलाही फेटे शिवायला शिकवलं. आज स्वप्नील कांडेकरांकडे चार कारागीर आहेत. टीप मारणे, लहानसहान शिलाई यासारखी छोटी कामं ते बाहेरून (घरून काम करणाऱ्या महिलांकडून) करून घेतात.
स्वप्नील यांच्या ‘ब्रह्मांड फेटेवाले’मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फेटे, पगड्या दिसतात. लोक ऐनवेळेला येऊन आवडीप्रमाणे डिझाईन निवडून फेटा, पगडी, जिरेटोप विकत घेतात का, याविषयी बोलताना ते सांगतात, “आम्ही आतापर्यंत ज्या ज्या डिझाईन्सचे फेटे, पगड्या तयार केल्या आहेत, त्याचा कॅटलॉग तयार केलेला आहे. आपल्याला कुठल्या प्रकारचा फेटा हवा आहे, ते हा कॅटलॉग बघून ग्राहक मंडळी ठरवतात. एका साईजचा फेटा किंवा पगडी साधारण वेगवेगळ्या गणेशमूर्तींसाठी चालतो. दुकानदारांकडून आर्डर्स येतात. माझं स्वतःचं यूट्यूब चॅनेल आहे, त्याच्यामुळेही चांगला प्रतिसाद मिळतो. ऑर्डर घेतल्यानंतर तीन-चार दिवसांत आम्ही माल डिस्पॅच करतो. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात माल बनवून ठेवणं, हे थोडं कठीण असतं. त्यामुळे ऑर्डर आधी मिळाली तर बरंच असतं. दोन-तीन महिने आधीपासून आम्ही ऑर्डर घ्यायला सुरुवात करतो. एखाद्या वेळेस मोठी ऑर्डर असेल तर मी नम्रपणे त्यांना उशीर होईल, असं सांगतो. प्री-ऑर्डर्समुळे काम सोपं होतं. आतापर्यंत माल पडून राहिला आहे, विकला गेलेला नाही, असं झालेलं नाही. उलट दरवर्षी स्टॉक कमीच पडतो. मी प्री-ऑर्डरच्या फेट्यांसाठी अजिबात ॲडव्हान्स घेत नाही, तेवढी जोखीम मी उचलतो. कधीतरी ट्रान्सपोर्टमुळे थोडाफार त्रास होतो, पण देवाचं काम असल्यामुळे भांडणं, कलह अजिबात होत नाही.”
बाप्पांना पगडी, फेटा घातला म्हणून कधी टीका झाली आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना स्वप्नील सांगतात, “मंगलकार्याच्या वेळी डोक्यावर वस्त्र परिधान करणं हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, मग ती टोपी असो, फेटा असो किंवा पगडी असो. दहा दिवसांच्या उत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचा आणि भक्तांचा उत्साह खूप असतो. बाप्पांच्या मूर्तीवर आपण शेला तर पांघरतोच, मग बाप्पांच्या मूर्तीला पगडी, फेटा का घालू नये? खरं तर, यात बाप्पांचा सन्मान करण्याचीच भावना असते. लोकांनाही आवडतं ते. आतापर्यंत कुणीही नकारात्मक प्रतिक्रिया दिलेली नाही. काही लोक तर एकाच बाप्पाच्या मूर्तीसाठी सहा-सहा फेटे घेऊन जातात. प्रत्येक दिवशी वेगवेगळा फेटा चढवण्यासाठी. ऑस्ट्रेलिया, जर्मनी इथेही आमचे फेटे गेलेले आहेत. अर्थात, या ऑर्डर्स डायरेक्ट आमच्याकडे आल्या नव्हत्या. आमच्याकडून माल उचलणाऱ्या दुकानदारांकडून त्यांनी हे फेटे मागवले. फेटे घेतलेल्या परदेशातल्या मंडळींकडूनही चांगले अभिप्राय येतात, तेव्हा खूप आनंद होतो.”
‘ब्रह्मांड फेटेवाले’ यांच्याकडील फेटे, जिरेटोप किंवा पगड्या शिवलेल्या आणि वेलक्रो लावून तयार केलेल्या असतात. पण पुठ्ठा, पुठ्ठा आणि रेशमी कापड, पैठणी साडीचं कापड, वेलवेट यापासून तयार केले जाणारे स्वस्त फेटेही हल्ली बाजारात मिळू लागले आहेत. गणेशोत्सव जवळ येऊ लागला की, मुंबईतील दादरसारख्या ठिकाणी असे टिकावू नसणारे पण आकर्षक दिसणारे फेटे फिरते फेरीवाले विकताना दिसतात. या तयार फेट्यांच्या किमती कुठले मटेरियल वापरले आहे यानुसार पन्नास रुपयांपासून दोनशे-अडीचशे रुपयांपर्यंत असतात.
तयार फेट्यांप्रमाणेच काही ठिकाणी थेट गणेश मूर्तींवर फेटे बांधून देणारे, गणेश मूर्तीला धोतर नेसवणारे कारागीरही आहेत. डोंबिवलीत ‘ईश्वरी कला केंद्र’ या गणेश मूर्ती विक्री केंद्राचे नितीन परमार स्वतः कार्पोरेटमध्ये नोकरी करतात. ते मूळचे पेणचे आहेत. चार वर्षांपूर्वी त्यांनी पेणवरून गणेश मूर्ती आणून त्या मूर्तीला धोतर, शेला, फेटा चढवणे, साजेसे दागिने घालून मूर्तीला सजवणे, हे काम सुरू केले. त्यांच्याकडे गणेश मूर्तीला धोतर, फेटा चढवणारा एक कारागीरही आहे. आणखी एक कारागीर गणेश मूर्तीसाठी दागिने तयार करतो.
प्रत्यक्ष गणेश मूर्तीला जे फेटे किंवा पगड्या चढवल्या जातात, त्या तात्पुरत्या वापरासाठीच असतात. स्टॅपलरने पिना मारून किंवा गोंदाने चिकटवून त्या तयार केलेल्या असतात. त्यांच्या बनावटीत मात्र वैविध्य असतं. पारंपरिक कोल्हापुरी फेटा, खंडोबाचा फेटा, बालगणेश मूर्तीसाठीचा गोल फेटा, दक्षिण भारतीय पद्धतीची पगडी, पुणेरी पगडी असे वेगवेगळे फेटे आणि पगड्या ग्राहकांच्या मागणीप्रमाणे त्या त्या गणेश मूर्तीला चढवल्या जातात.
“ग्राहकाने फेटे, पगडीची मागणी केली तरी त्यांचं रंगरूप कसं असावं, हे आम्ही (मी आणि माझे कारागीर) चर्चा करून ठरवतो आणि ते नेहमी ग्राहकांच्या पसंतीस उतरतं”, अशी माहिती नितीन परमार देतात.
‘एक नूर आदमी दस नूर कपडा’ हे आता ‘आदमी’पर्यंत मर्यादित न राहता, माणसाने देवालाही या गटात आणून ठेवलंय, असंच म्हणावं लागेल.
सोशल मीडियाही तेजीत
सोशल मीडियावर प्रत्येक उत्सव कित्येक दिवस आधीपासूनच वाजत-गाजत असतो. इन्स्टाग्रामवर चक्क दोनशे रुपयांच्या आत काही तासांमध्ये फेटा शिवायला शिकवण्याचा दावा करणाऱ्या ऑनलाइन क्लासच्या जाहिरातीही बघायला मिळतात. यूट्यूबवर गणपतीसाठी घरच्या घरी फेटे कसे बनवावेत, याचे अनेक व्हिडीओ उपलब्ध आहेत.
फेटे आणि महिला कारागीर
गणेश मूर्ती घडवण्याच्या कामामध्ये आणि मूर्तीला रंगरंगोटी करण्यामध्ये महिलांचाही सहभाग असतो. गणेश मूर्तींसाठी दागिने बनवून व्यापाऱ्यांना घाऊक किमतींत दागिने विकणाऱ्या महिलाही आहेतच. गणेश मूर्तींसाठी फेटे बनवण्याचे कामही काही महिला करत आहेत. खासगी कंपनीत काम करणारी साक्षी आणि तिची आई गणपतीच्या मोसमात फेटे शिवण्याच्या ऑर्डर्स घेतात. त्यांच्याकडे ओळखीतून येणाऱ्या ऑर्डर्स जास्त असतात. पेशाने फॅशन डिझायनर असलेल्या कोल्हापूरच्या अमृता गावडे यांचा एक व्हिडीओ तीन वर्षांपूर्वी पाहण्यात आला होता. कोल्हापुरात गणेश मूर्तींना धोतर आणि कोल्हापुरी फेटा चढवणाऱ्या त्या एकमेव महिला होत्या. आपल्या घरच्या गणेश मूर्तीची सजावट करताना त्यांच्या लक्षात आलं की आपली गणेश मूर्ती फेट्यामुळे खूपच उठून दिसते आहे. दर्शनाला येणाऱ्या अनेकांनी तसं बोलूनही दाखवलं. मग त्यांनी फेट्यांच्या ऑर्डरी घ्यायला सुरुवात केली.
मुक्त पत्रकार