

विशेष
मंजिरी हसबनीस
‘नाम साराचेही सार...’ या संतउक्तीप्रमाणे देवतेच्या नामात तिचे संपूर्ण स्वरूप, कार्य आणि सामर्थ्य सामावलेले असते. गणेशोत्सवाच्या या पावन पर्वावर विघ्नहर्त्याचे स्वागत करताना केवळ त्याचे रूप डोळ्यांत साठवणे पुरेसे नाही, तर त्याच्या विविध नावांचा तात्त्विक अर्थ समजून घेणे हा भक्तीचा एक नितांत सुंदर आविष्कार आहे. वैदिक मंत्रांपासून संत साहित्यापर्यंत गौरविलेली गणपतीची ही नावे मानवी बुद्धीला, विवेकाला आणि मनाला चैतन्याची दिशा देणारा एक अद्भुत दीपस्तंभ आहेत.
नाम साराचेही सार|
शरणागत यमकिंकर|
नाम जपता चंद्रमौळी|
नामे तरला वाल्हा कोळी|
तुकारामांनी नामाचे, नामजपाचे, नामसंकीर्तनाचे महत्त्व असे वर्णिले आहे. मनोभावे देवाला अर्पण केलेली नामजपाची ओंजळ आपले मनोबल कितीतरी पटीने वाढवते. संकट नाशनाची प्रचंड शक्ती या नामामध्ये आहे. अर्थात या नावांचे महत्त्व, त्यांचा अर्थ आणि त्यांच्यातून व्यक्त होणारे देवतेचे स्वरूप याचे आकलन करणे हे भक्ती साधनेचे एक साधे सोपे पण अत्यंत प्रभावशाली स्वरूप आहे.
गणेशोत्सव अगदी उद्यावर असताना गणेशाच्या या नावांचा अर्थ जाणून घेणे त्यातून व्यक्त होणारे त्याचे स्वरूप मन:चक्षूंनी पाहणे, त्या नावांमधून व्यक्त होणारे त्याचे कार्य समजून घेणे हा गणेशभक्तीचा नितांत सुंदर आविष्कार आहे.
वैदिक काळापासून गणेशाच्या या नावांचे उल्लेख मंत्रामध्ये आलेले आहेत. गणानां त्वा गणपतीं हवामहे| इथे गणेशाला गणांचा अधिपती म्हटले आहे. गण म्हणजे ज्यांची गणना करता येते अशा सर्व भौतिक गोष्टी. शुक्ल यजुर्वेदात गणेशाला प्रियपती आणि निधिपती असे म्हटले आहे.
तत्पुरुषाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि|
तन्नो दन्ती प्रचोदयात्||
या गणेश गायत्री मंत्रात गणेशाची वक्रतुंड आणि दंती अशी दोन नावे उल्लेखलेली आहेत.
संत साहित्याचा विचार केला तर ज्ञानेश्वरांच्या मंगलश्लोकात ओमकारस्वरूपी श्री गणेशाची स्तुती केलेली आढळते. ज्ञानेश्वर म्हणतात-
देवा तूची गणेशु| सकल मती प्रकाशु| गणेशाला बुद्धिदायक तेजोनिधी म्हंटले आहे ते याकरताच. अथर्वशीर्षात त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि| असे म्हटले आहे ते याच अर्थाने. बुद्धी, ज्ञान, तर्क, सारासार विवेक या सर्व मेंदूशी संबंधित क्षमतांचा अधिपती या अर्थाने गणेशाकडे पाहिले जाते. अर्थातच गीतेचे तत्त्व मराठीमध्ये वर्णन करताना जो आध्यात्मिक आणि ज्ञानाधिष्ठित पाया ज्ञानेश्वरांना अभिप्रेत होता त्यासाठी गणेशाचा आशीर्वाद आवश्यकच होता. सर्वच संतांनी गणेशाला तात्त्विक विचारांच्या शिखरावर नेऊन ठेवले असे दिसते. गणेशाची सर्वच नावे ही या तात्त्विक विचारधारेने प्रेरित आहेत.
समर्थांनी ओम नमोजी गणनायका|
सर्व सिद्धी फळदायका|
अज्ञानभ्रांती छेदका| आत्मरूपा....
अशी गणेशाची सार्थ स्तुती केलेली आहे. यातही त्याचे विज्ञानमय स्वरूपच त्यांना अभिप्रेत आहे. अर्थात गणेशाचे सिद्धिविनायक हे नाव अगदी सार्थ आहे. एकनाथ द्वैताद्वैताच्या पलीकडे श्री गणेशाची स्थापना करतात. त्याचे गजवदन हे स्वरूप त्यांना भावते. ते म्हणतात-
पाहता नरु ना कुंजरु|
ऐसा जाणूनी निर्विकारु|
गणेशाचे एक नाव प्रणव असेही आहे. या प्रणवातच जिवा शिवाचे मिलन होत असते.
गणपतीची जी असंख्य नावे आहेत त्यातील काही नावे ही त्याच्या स्वरूपाचे वर्णन करतात. या त्याच्या स्वरूपात त्या गजाननाचे रूप, त्याने धारण केलेली शस्त्रे, त्याचे वाहन या सगळ्याचा समावेश आहे. संकटनाशन स्तोत्रात वक्रतुंड, एकदंत, कृष्णपिंगाक्ष, गजवक्र, लंबोदर, धूम्रवर्ण, भालचंद्र, गजानन, गजकर्ण, मूषकवाहन, पाशधर, कुशधर चतुर्भुज अशी अनेक नावे आहेत. यातून हत्तीचे मुख असलेला, ज्याची सोंड डाव्या बाजूला वळलेली आहे, ज्याचा एक दात तुटलेला आहे, जो गौर आहे, ज्याचे नेत्र पिंगट रंगाचे आहेत, ज्याचे पोट विशालकाय आहे, ज्याला चार हात आहेत, जो भारदस्त महाकाय आहे, ज्याचे कान सुपासारखे आहेत, ज्याच्या मस्तकावर अर्धचंद्र विराजमान आहे,
शेंदूर त्याला प्रिय आहे, म्हणून तो सिंदूरवदन आहे. ज्याने हातात पाश आणि परशु धारण केलेला आहे, उंदीर हे ज्याचे वाहन आहे अशी गणपतीची मूर्ती मनात साकार होते.
दंती किंवा एकदंत म्हणून ज्याचा गौरव वारंवार होतो त्याच्या या एकदंताविषयी अनेक कथा आहेत. परशुरामांनी गणेशाचा दात तोडला किंवा कार्तिकेयाशी भांडण केल्यावर त्या भांडणात त्याचा दात तुटला. या आख्यायिका सर्वश्रुतच आहेत. पण त्याबरोबरच गणपती महाभारत लिहीत असतात लेखणी तुटल्याने त्यानेच स्वतःचा दात तोडला व त्याचा वापर लेखणी म्हणून केला ही कथा फारच बोधक आहे. ज्ञानासाठी केलेल्या त्यागाचे ती प्रतीक आहे. गणेशाला विशाल उदर किंवा लंबोदर अशी नावे आहेत याचे कारणही मोठे उद्बोधक आहे. ज्ञानग्रहणासाठी सर्व स्थूल सूक्ष्म अनुभवांचे ग्रहण करावेच लागते. नंतर त्याचे योग्य ते पृथक्करण करावे लागते. यासाठी साठवण म्हणून या विशाल उदराचा वापर गणेश करत असावा.
मूषकध्वज असे ज्याचे नाव आहे. तो गणपती लहानशा उंदराला एवढे महत्त्व देतो याचे काय बरे कारण असावे?
या प्राणीप्रेमाविषयी एक सुंदर कथा आहे. गणपती तेव्हा फार लहान होता. तो झाडांमधून फिरत असताना त्याला एक मांजर दिसली. तो तिच्या मागे लागला. ती त्याच्यावर फिस्कारू लागली. त्या वेळेला गणेशाने तिच्या खोड्या काढायला सुरुवात केली. तिला छोटे दगडच मार, तिची शेपटी ओढ, झाडाच्या फांदीने तिला मार असे काही काही तो करत राहिला. थोड्या वेळाने थकला आणि रमत गमत घरी आला. पार्वती तिथे झोपली होती आणि विव्हळत होती. तिला छोट्या-मोठ्या जखमा झाल्या होत्या. गणेशाला काळजी वाटली. त्याने मातेला विचारले. तेव्हा पार्वती त्याला म्हणाली, मी मांजरीचे रूप धारण केले होते आणि फिरत होते. तेव्हा खोड्या करण्यासाठी तूच मला असा त्रास दिलास. तेव्हा गणेशा यापुढे लक्षात ठेव. लहान-मोठ्या जीवजंतूंना किंवा प्राण्यांना अजिबात त्रास द्यायचा नाही. गणेशाने मातेला वचन दिले आणि छोट्याशा उंदराचा स्वीकार वाहन म्हणून केला. हे वाहन निवडून सानथोरांना सारखेच महत्त्व दिले पाहिजे असे तर गणेश सुचवत नसावा ना?
गणेशाचे कार्य आणि त्याच्या शक्ती व्यक्त करणारी अशी त्याची असंख्य नावे आहेत. या नावांद्वारे त्याचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व आपल्या मनात साकार होते. तो विघ्नहर्ता, विघ्नविनाशक, विघ्नेश आहे. विशेष: नायक: म्हणून तो विनायक आहे. गणेश अतिशय बुद्धिमान आहे. तो १४ विद्यांचा अधिपती म्हणून विद्याधिपती आहे त्याचप्रमाणे तो ६४ कलांचा स्वामी आहे म्हणून कलानिधी आहे. तो वर देणारा आहे म्हणून वरद आहे. तो सुख देणारा आहे म्हणून सुखकर्ता आहे. तो अमंगलाचा नाश करणारा आणि मंगलाची निर्मिती करणारा असा मंगलमूर्ती आहे. सर्व कार्यात प्रथम त्याची पूजा होते म्हणून तो प्रथमेश, प्रथमपूज्य आहे, देवाधिदेव आहे. याविषयीही जी कथा आहे ती मनोरंजक आहे. गणेश बुद्धिचातुर्याने देवासुरांच्या युद्धात उत्तम आखणी करत असे. ते पाहून प्रत्यक्ष शिवाने त्याला प्रथम पूजेचा मान दिला. पण नंतर शिवच एकदा ते विसरून गेले. एका राक्षसाला धडा शिकवण्यासाठी ते गणेशाची दखल न घेता गेले. तेव्हा राक्षस त्यांच्यावर भारी पडू लागला. शिवाला आश्चर्य वाटले. तेवढ्यातच गणपती तिथे अवतरले. शिवाला स्वतः दिलेल्या वराची आठवण झाली. त्यांनी तिथल्या तिथे गणेशाची पूजा केली आणि गणेशाने त्यांना मार्ग सुचवला. नंतर काही वेळातच समोरच्या राक्षसाचा त्यांनी वध केला, तर अशी ही पितापुत्रांची कथा. म्हणूनच आपण म्हणतो ना प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादयासागरा.... तो शिवपुत्र आहे, तो उमासूत, गौरीपुत्र आहे. त्याला मोदक प्रिय आहेत म्हणून तो मोदकप्रिय आहे. त्याला दुर्वा आवडतात म्हणून दुर्वाप्रिय आहे, त्याला लाल फुले आवडतात म्हणून तो रक्तपुष्पसुपूजित आहे. अशी असंख्य नावे त्याला बहाल करण्यात आलेली आहेत. महाराष्ट्रातील अष्टविनायक हे खूपच प्रसिद्ध आहेत. त्यांची स्थाने आणि त्या ठिकाणी सुस्थापित गणपतीची विशिष्ट नावे ही विचारात घेण्यासारखी आहेत. प्रत्येकच नावाचा काहीतरी विशिष्ट इतिहास आहे.
मोरगावचा मयुरेश्वर. गणपतीने मोरावर स्वार होऊन कमलासुर नावाच्या राक्षसाचा याठिकाणी वध केला अशी आख्यायिका आहे. अष्टविनायक यात्रेची सुरुवात या ठिकाणाहून होते. सिद्धटेकचा सिद्धिविनायक या ठिकाणी प्रत्यक्ष विष्णूने तपस्या केली होती येथे गणेशाचे स्वरूप अतिशय जागृत आहे आणि दर्शन घेणाऱ्याच्या मनोरथांची पूर्ती नक्कीच होते असे मानले जाते.
पालीचा बल्लाळेश्वर. बल्लाळ नावाच्या बालभक्ताचा हट्ट पुरवण्यासाठी या स्वरूपात इथेच राहिला आहे. म्हणजे गणपतीचे बल्लाळेश्वर हे नाव त्याच्या भक्तावरून पडले आहे. महाडचा वरदविनायक. वर देणारा म्हणून हा वरदविनायक.
थेऊरचा चिंतामणी. इथे चिंता शब्दाचा अर्थ मनात निर्माण होणाऱ्या इच्छा. त्यांची पूर्ती करणारा असा हा चिंतापूरक चिंतामणी. लेण्याद्रीचा गिरिजात्मज. पर्वतकन्या उमेचा पुत्र गणपती.
ओझरचा संकटांचा नाश करणारा विघ्नेश्वर आणि रांजणगावचा महाशक्तिशाली महाकाय महागणपती.
अशी अष्टविनायकांची नावे खूपच वैशिष्ट्यपूर्ण आणि अर्थपूर्ण अशी आहेत.
धूम्रकेतू आणि विकट अशी गणेशाची आणखी दोन नावे आहेत. ही दोन्ही नावे गणपतीच्या तांत्रिक आणि दुष्ट निवारक शक्तींशी निगडित आहेत. विकट म्हणजे विक्राळ असे गणेशाचे सामर्थ्य. धूम्रकेतू हे गणेशाचे तांत्रिक स्वरूप आहे, तर असा हा अनेक नावांनी संबोधला गेलेला गणपती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाजतगाजत येत आहे. तो तुमचे-आमचे रक्षण करो.
अशा प्रकारे, श्री गणेशाची प्रत्येक नावे केवळ उच्चारण्यासाठी नसून, ती मानवी जीवनाला सन्मार्गाकडे नेणारी ज्ञानाची आणि भक्तीची दीपस्तंभ आहेत. ‘वक्रतुंड’ आपल्या मनातील वक्रता आणि अहंकार दूर करतो, तर ‘लंबोदर’ आपल्याला जगातील सुख-दुःखांना पचवून स्थिर राहण्याची शिकवण देतो. ‘एकदंत’ ज्ञानासाठी त्याग करायला शिकवतो, तर मूषकवाहन लहानात लहान जिवालाही सन्मान देण्याची शिकवण देतो.
गणेशोत्सवाच्या या पावन पर्वावर, जेव्हा विघ्नहर्त्याचे आगमन आपल्या घराघरांत आणि मनामनांत होत आहे, तेव्हा त्याच्या केवळ रूपाचेच नव्हे, तर त्याच्या या अर्थपूर्ण नामांचे व गुणवैशिष्ट्यांचे चिंतन करणे हीच खरी त्याची उपासना ठरेल. ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा, सकल कलांचा स्वामी आणि संकटांचा नाश करणारा हा मंगलमूर्ती आपल्या सर्वांच्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करो; बुद्धीला सत्कर्माची दिशा देवो आणि प्रत्येकाच्या घरात सुख, समृद्धी व शांतीचे वरदान देवो.
hasabnis1gmail.com