

दुसरी बाजू
प्रकाश सावंत
सध्याच्या धकाधकीच्या, घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या यंत्रवत जीवनातून थोडी उसंत, क्षणभर आनंद हवा असतो. सद्भाव, सद्गुणांमध्ये आत्मिक व सामूहिक आनंद आहे. तसाच तो १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या महागणपतीच्या साधने-आराधनेतही आहे. गौरी-गणपतीच्या सणातील आनंदोत्सव मन:शांती, समाधान, सकारात्मक भाव दर्शवितो आणि म्हणूनच तो ठरतो मनमंदिरातील आनंदाचा देव!
आपल्या घरी साक्षात देवबाप्पा येणार या कल्पनेनेच अंग शहारते. मन सुखावते. अनामिक हुरहूर लागते. मन उत्फुल्लतेने, उत्साहाने उचंबळून येते. नवचैतन्याला, आनंदाला एकच उधाण येते. अंगात चार हत्तींचे बळ संचारते. लगबग वाढते. पूर्वतयारी सुरू होते. घर हलू लागते. डोलू लागते. नाचू लागते. बागडू लागते. गुणगुणू लागते. बाजारातील नवनव्या ट्रेंडिंग साहित्याने घर सजते. साऱ्या घराचे रूपडेच पालटते. देवाच्या प्रत्यक्ष आगमनानंतर मनमंदिरात टाळांची किणकिण ऐकू येते. मृदुंग झंकारून उठतो. घर धूप, कापूर, अगरबत्त्यांनी गंधित, सुगंधित होते. फळा-फुलांनी बहरते. पणत्या, दिव्यांनी घर लख्ख उजळून निघते. घर-मन अक्षरशः भारावून जाते. प्रसाद, स्नेहभोजनाचा आग्रह असतो. आप्तस्वकियांच्या कल्लोळाने घर हसतखिदळत, गिरक्या अन् फिरक्या घेते. मन प्रफुल्लित, आनंदित होते. त्यात आत्मिक आनंद असतो अन् दुसऱ्याला देणारा समूह आनंदही असतो. आनंदाचा देव भेटतो तोच मुळी असा...
आमचे मित्र व ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी यांनी आपल्या घरी त्रिधातूची गणेश मूर्ती आणली, त्याला बरीच वर्षे लोटली. दरवर्षी ते त्या धातूच्या गणेश मूर्तीची मनोभावे साधना-आराधना, पूजाअर्चा करतात. मग तिचे विधिवत विसर्जन करून ती पुन्हा मोठ्या दिमाखात आपल्या दिवाणखान्यात विराजमान करतात. त्यांच्याकडील ही धातूची मूर्ती लहानशी, सुबक आहे. त्यांना दरवर्षी नवी मूर्ती आणण्याची गरजच भासत नाही. उलट ही मूर्ती त्यांच्या घरी शुभकार्यासाठी सदैव सज्ज असते, हे विशेष. सध्याचे वाढते जलवायू प्रदूषण लक्षात घेता, त्यांचा हा कृतिशील विचार पुरोगामी महाराष्ट्राला साजेसा, मंगलदायी आणि तितकाच अनुकरणीय म्हणावा लागेल. जातीय सलोखा जपणारे, सर्वधर्मसमभाव मानणारे त्रिवेदी हे मूळचे गुजराती भाषिक असले तरी ते कडवे मराठी समर्थक आहेत, हे त्यांचे आणखी एक गुणवैशिष्ट्य. त्यांचा हा भाषिक बंधुभावही 'मेरा भारत महान'ची अनोखी प्रचिती आणून देतो. त्यांचा नातीगोती, मैत्री जपण्याचा, जोपासण्याचा आनंदमार्गी स्वभावही न्यारा अन् प्यारा. माणसाचा देव माणूस आणि आनंदाचे घर देवघर व्हावे, तर ते असे...
श्री गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने रुसवे, फुगवे, राग, लोभ गळून पडतात. मनातील सात्विक भाव जागे होतात. घराला चार लोकांचे पाय लागतात. शुभेच्छा, सदिच्छा, आशीर्वादाची कोण देवाणघेवाण होते. नमस्कार, चमत्कारातून, आदर, आपुलकीतून घराचेच होते तीर्थक्षेत्र.
उत्साह, आनंद, प्रसन्नतेचे दुसरे नाव म्हणजे सण-उत्सव. गणेशोत्सव आणि आनंद यांचे नातेच आगळे. त्यात देव आहे, भाव आहे. नावीन्य आहे अन् नवनिर्मितीचा आनंदही आहे. नवरंगांची उधळण आहे. कला आहे अन् कलासक्त मन आहे. सकारात्मक विचार आहेत आणि दृष्टिकोनही आहे. आज परिस्थिती पूर्णपणे बदलली असली, तरी लोकांना जोडणे, सुसंवाद वाढवणे आणि सामाजिक एकोपा व सलोखा टिकवून ठेवणे आवश्यक आहे.
आनंद मनामनात, घराघरात अन् चराचरात सामावलेला आहे, अगदी देवासारखा. तो शोधला म्हणजे सापडतो. त्यासाठी खूप काही आयास, सायास, प्रयास करायची गरज नसते. तो अगदी सहज, साध्या, सोप्या गोष्टीत आढळतो. सकाळचा वाफाळता गवती चहा, पहिल्या पावसाचा मृदगंध, कडाक्याच्या उन्हातील डेरेदार वृक्षाची सावली, निसर्गाची निवांत भटकंती, रानपाखरांच्या गुजगोष्टी, दुर्मिळ वन्य पशू-पक्ष्यांचे अचानक झालेले दर्शन म्हणजे मनस्वी आनंद! त्याची रीतच न्यारी!
आनंद हा व्यक्तिसापेक्ष आहे. कुणाला खाण्यात आनंद मिळतो, तर कुणाला खिलवण्यात. कुणाला फिरण्यात असतो, तर कुणाला वाचण्यात, तर कुणाला लिहिण्यात. आनंद गाण्यात आहे, तसा नृत्याविष्कारातही आहे. कुणाला छंद जोपासण्यात तर कुणाला कलाविष्कारात आनंद मिळतो. आनंद हा शांततेच्या, सद्भावनेच्या विचारात, विवेकबुद्धीच्या कृतिशील आचरणात आहे. तो विद्येच्या विनयात अधिक शोभून दिसतो अन् सण-उत्सवात तो अधिक खुलतो.
श्रद्धा, ध्यानधारणा, भक्तीत आनंद आहे. आपलेपणाने, आस्थेवाईकपणे विचारपूस करण्यात आनंद आहे. आनंद ही अशी गोष्ट आहे जी वाटल्याने कधीही कमी होत नाही, उलट ती कैक पटीने वाढते. त्यामुळे स्वतः आनंदी राहण्याइतकेच दुसऱ्याच्या आनंदाचे कारण होणे हे सुदृढ व विवेकी मनाचे लक्षण आहे. माणसाच्या विचारांत, नात्यांत आणि दुसऱ्याच्या आयुष्यात आपण निर्माण केलेल्या चांगुलपणात आनंद आहे. मी तुझ्यासोबत आहे हा विश्वास जागविण्यात जसा आनंद आहे, तसाच तो समाजाला योग्य दिशा दाखविण्यातही आहे. जीवनाच्या यात्रेत व्यक्ती, समाज, राज्य, देशच नव्हे, तर जगाला आनंद देतो, तोच असीम आनंद.
गणेशोत्सव हा आपल्या संस्कृती परंपरेतील असाच एक सामूहिक आनंदाचा आणि चैतन्याचा महासोहळा आहे. गणेश हा बुद्धी, विद्या, कल्पकता आणि विवेकाचे सर्वोच्च प्रतीक मानला जातो, मग गणेशोत्सवच या उच्च मूल्यांचा आणि विचारांचा उत्सव का होऊ नये? सार्वजनिक गणेशोत्सव मंडपांमध्ये विज्ञानप्रदर्शने, पुस्तकांची हक्काची दालने, वैचारिक व सामाजिक व्याख्याने, कला-संस्कृतीचे दर्जेदार कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक उपक्रम, पर्यावरणपूरक प्रयोग आणि सामाजिक प्रबोधनाचे उपक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जाऊ शकतात. उत्सवाची खरी ताकद तिथे किती गर्दी जमली किंवा किती लोक आले यात नाही, तर त्या निमित्ताने किती माणसे मनाने जोडली गेली, यात प्रामुख्याने सामावलेली आहे. एखाद्या मंडळाने केवळ देखाव्यावर पैसे उधळण्याऐवजी एखादे मोठे रक्तदान शिबिर आयोजित केले, गरजू विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक साहित्य दिले, एखाद्या दुर्धर आजारी रुग्णाला उपचारासाठी मदत केली, स्थानिक भूमिपुत्र कलाकाराला त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले किंवा परिसरातील एकाकी वृद्धांशी संवाद साधून त्यांचा एक दिवस मजेत घालवला, तर त्या मंडळाचे कार्यकर्ते सर्वार्थाने उत्सव जगले, असेच म्हणता येईल.
देवापुढे जाऊन केवळ सोपस्कार म्हणून मोठी आरती करण्यापेक्षा, देवाच्या खऱ्या प्रेमापोटी एखाद्या दुःखी माणसाचे अश्रू पुसणे हीच मानवतेची पूजा ठरेल. उत्सवाचा आनंद घराच्या चार भिंतींच्या पलीकडे नेण्याची आणि समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याची आज नितांत गरज आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी मनापासून संवाद साधणे, जुना राग आणि कटुता विसरून जाणे, नात्यातील वाढलेला दुरावा मिटवणे, शेजाऱ्याला प्रेमाने घरी बोलावणे, वेगळ्या धर्माच्या किंवा जातीच्या व्यक्तीसोबत सणाचा खरा आनंद वाटून घेणे, स्थानिक कारागिराकडून वस्तू खरेदी करणे किंवा परिसरात आवर्जून एखादे झाड लावून ते वाढवणे- या साध्या कृती सण-उत्सवाला एक मानवी चेहरा देतात. आनंदाला पैशांच्या अवाढव्य खर्चाची नाही, तर त्याला केवळ एका संवेदनशील आणि जागृत मनाची गरज असते. आजचा हा उत्सव केवळ कर्मकांड आणि भक्तीपुरता मर्यादित न राहता तो सुसंवादातून सामाजिक प्रबोधनाचे एक सशक्त व्यासपीठ व्हायला हवा.
सण-उत्सवाच्या निमित्ताने आपल्या मनातील अहंकार, द्वेष, मत्सर, दिखावूपणा, वर्गभेद आणि सर्व प्रकारच्या संकुचित भेदभावाचे विसर्जन झाले तर त्याचा सामाजिक परिणाम अधिक व्यापक आणि चिरकाल टिकणारा असेल. उत्सव संपल्यानंतर भलेही मोठे मंडप उतरतील, रोषणाई विझेल, ढोल-ताशांचा गजर थांबेल आणि हे रस्ते पुन्हा नेहमीसारखे शांत होतील; परंतु जर या विशिष्ट दहा दिवसांत आपण एकमेकांना थोडे अधिक समजून घेतले, एखाद्या दुर्बलाला भक्कम आधार दिला, आपल्या भोवतालच्या मूक निसर्गाला थोडे जपले आणि आपल्या काळजात माणुसकीची एक तेजोमय ज्योत जागवली, तर तो आनंदोत्सव चिरंतन ठरेल.
prakashrsawant@gmail.com