हितगुज
डॉ. शुभांगी पारकर
एका विशिष्ट काळात जन्म घेतलेली पिढी ही त्या काळाचे अपत्य असते. तिची जडणघडण ज्या विशिष्ट काळात होते त्याचे गुणधर्म घेऊनच या पिढीचे व्यक्तिमत्त्व आकाराला येते. २०२५ साली जन्माला येणाऱ्या जनरेशन बीटामध्ये भविष्याची बीजे आहेत.
प्रत्येक पिढी ही त्या काळाचा आरसा असते. जग बदलते ते केवळ तंत्रज्ञानामुळे नाही, तर त्यात जगणाऱ्या पिढ्यांच्या विचारांमुळे. प्रत्येक पिढी स्वतःसोबत एक नवीन स्वप्न, नवा संघर्ष आणि नव्या मूल्यांची बीजे घेऊन येते. मिलेनियल्स (१९८१-१९९६), जनरेशन झी (१९९७-२०१०), जनरेशन अल्फा (२०१०-२०२४) आणि आता येणारी जनरेशन बीटा (२०२५-२०३९) या चार पिढ्या म्हणजे केवळ कालक्रम नव्हे, तर मानवजातीच्या मानसिक उत्क्रांतीचा प्रवास. जिथे संवाद बदलतो, मूल्य पुनर्रचित होतात आणि 'कनेक्टेड' असूनही आपण किती दूर गेलो आहोत, हा प्रश्न नव्याने जागा होतो.
मिलेनियल्स 'जनरेशन वाय'
संधींच्या जगात हरवलेली आत्मशोधक पिढी मिलेनियल्स ही पहिली खरी 'जागतिक विचार करणारी' पिढी मानली जाते. त्यांचे आयुष्य म्हणजे एका विशाल ग्लोबल सोशल नेटवर्कचा अनुभव असून जिथे काळ, अवकाश आणि शरीरभानाच्या मर्यादा त्यांच्या वाढीवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. सोशल मीडियाच्या जाळ्यांनी, डेटिंग अॅप्सनी आणि वाढत्या साक्षरतेने जोडलेले हे जग, या पिढीला सतत जोडतेही आणि तितकेच एकाकीही करते. या पिढीला मूळ डिजिटल पिढी मानले जाते, कारण त्यांनी समाजातील विज्ञान आणि तंत्रज्ञानातील झपाट्याने घडणाऱ्या प्रगतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. कोविड-१९ महामारीने मिलेनियल्स पिढीला सर्वाधिक फटका दिला. कॉलेजचे शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या बाजारात पाऊल टाकताना या पिढीला आर्थिक मंदीचा सामना करावा लागला, नोकऱ्या गेल्या, शिक्षणात खंड पडला, प्रवास आणि व्यवसाय थांबले. कर्जाचे ओझे आणि अस्थिर अर्थव्यवस्था यामुळे स्वतःच्या पायावर उभे राहणे कठीण झाले. अमेरिका, युरोपमध्ये अनेकांना पुन्हा पालकांकडे राहावे लागले. वाढता ताण आणि वर्क-लाइफ बॅलन्सचा अभाव यामुळे या पिढीमध्ये असंतोष आणि निराशा वाढली आहे.
मिलेनियल्सच्या नातेसंबंधांमध्येही आमूलाग्र बदल झालेला दिसतो. लग्न उशिरा करणे, लिव्ह-इन रिलेशनशिप, घटस्फोटांचे वाढलेले प्रमाण आणि मूल नको असलेले विवाह हे त्यांच्या जीवनाचे वास्तव बनले आहे. जैविक मानवशास्त्रज्ज्ञ हेलन फिशर यांनी या पिढीच्या जाणीवपूर्वक, विचारपूर्वक पण अधिक वेळ घेऊन विणल्या जाणाऱ्या प्रेमसंबंधांना 'मंद प्रेम' (Slow Love) असे नाव दिले आहे. पूर्वी नात्यांचे मोजमाप लग्न, जबाबदारी आणि सामाजिक अपेक्षा अशा ठराविक चौकटींनी होत असे. मात्र सोशल मीडियाच्या अतिरेकात लिंगभेदाचे आणि सामाजिक नियमांचे अर्थच बदलले आहेत. ही पिढी आता भावनिक बुद्धिमत्ता, संवादकौशल्य आणि समानतेचे नाते अधिक महत्त्वाचे मानते.
त्याचवेळी सोशल मीडिया या पिढीसाठी एकाच वेळी एक आशीर्वाद आणि एक ओझे असे दोन्ही बनला आहे. लाइक्स, फॉलोअर्स आणि रिअॅक्शन्स यांच्या जगात ही पिढी स्वतःची खरी किंमत विसरत चालली आहे. जगाला आपले यश दाखवण्याच्या धडपडीत ही पिढी खऱ्या आनंदापासून दूर जाते. म्हणूनच सोशल मीडियाचा वापर करताना मर्यादा ओळखणे आणि वेळोवेळी 'डिजिटल डिटॉक्स' घेणे या पिढीसाठी आज अत्यावश्यक झाले आहे. मिलेनियल्स ही विरोधाभासांची पिढी आहे.
जगभरातील संधींनी वेढलेली, पण आतून एकाकी; तंत्रज्ञानात निपुण, पण नात्यांत असुरक्षित; सकारात्मक आणि सजग, पण सतत थकलेली. हीच ती पिढी जी मोठ्या स्वप्नांनी आणि थकलेल्या डोळ्यांनी जगण्याचं समीकरण पुन्हा लिहू पाहते.
जनरेशन झी डिजिटल स्पर्श लाभलेली पिढी
जनरेशन झीचा उदय हे जगातील एक मानसिक आणि सांस्कृतिक परिवर्तन आहे. ही अशी पिढी आहे जिने तंत्रज्ञानाशिवायचे जग पाहिलेलेच नाही. जगाशी संवाद साधण्यापासून ते शिकण्यापर्यंत आणि स्वतःची ओळख घडवण्यापर्यंत त्यांच्या प्रत्येक क्रियेत स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि इंटरनेटचा डिजिटल स्पर्श आहे.
मागील पिढ्यांच्या तुलनेत जनरेशन झीने वर्क-लाइफ बॅलन्सला सर्वाधिक महत्त्व आहे. त्यांनी आपल्या पालक पिढ्यांच्या अति-परिश्रम आणि बर्नआऊटच्या परिणामांना जवळून पाहिले आहे आणि म्हणूनच संतुलन, विश्रांती आणि आत्मसंतोष यांना ते प्राधान्य देत आहेत. भावनांचे नियमन हे मानसिक आरोग्याचे केंद्रस्थान आहे. पण, पालकांचा व्यस्त दिनक्रम आणि मुलांचा स्क्रीनकडे झुकलेला वेळ या दोन्ही गोष्टींनी या पिढीचा भावनिक जुळवणीचा नैसर्गिक धागा कमकुवत झाला आहे. सोशल मीडियापासून थोडा वेळ दूर राहिलं, तरी एकटेपणा, 'फोमो' (FOMO - फिअर ऑफ मिसिंग आऊट - वगळले जाण्याची, गहाळ होण्याची भीती) आणि रिकामपणाची भावना त्यांना सतावते.
अमेरिकन संदर्भात, ९/११ नंतरच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढलेल्या या पिढीचा उद्योजकतेचा ओघ स्व-पूर्णतेच्या आणि सर्जनशील अभिव्यक्तीच्या इच्छेतून निर्माण झालेला आहे. तंत्रज्ञान हे त्यांच्या कल्पनाशक्तीचे आणि प्रगतीचे आवडते क्षेत्र आहे. बाहेरून पाहता त्यांचे जग अधिक सुरक्षित, आधुनिक आणि संधींनी भरलेले वाटते, तरी या पिढीला मानसिक आरोग्य, राजकीय अस्थिरता आणि आर्थिक अनिश्चिततेचे सावट सतत भेडसावत आहे.
मिलेनियल्स आणि जनरेशन झी या दोन सर्वाधिक डिजिटल पिढ्यांना स्क्रीनशिवायच्या आयुष्याची कल्पनाही करता येत नाही. कदाचित म्हणूनच याच पिढ्या तंत्रज्ञानापासून थोडे दूर राहण्यासाठी सातत्याने 'डिजिटल डिटॉक्स'साठी धडपडतात. डिजिटल डिटॉक्स म्हणजे तंत्रज्ञानाविरुद्ध बंड नव्हे, तर त्याच्याशी जाणीवपूर्वक नातं ठेवण्याचा एक साक्षेपी प्रयत्न आहे.
जनरेशन अल्फा 'टेक-इंटिग्रेटेड' पिढी
जनरेशन अल्फा ही पहिली पिढी आहे ज्यांनी जन्मापासूनच इंटरनेटच्या आणि सोशल मीडियाच्या महासागरात डोळे उघडले. कृत्रिम बुद्धिमत्तेसोबत वाढलेली ही पिढी तांत्रिकदृष्ट्या अत्यंत चपळ, स्वावलंबी आहे. स्मार्टफोन, टॅबलेट आणि संगणक, व्हर्चुअल रिअॅलिटी या बाबी म्हणजे त्यांच्यासाठी रोजची खेळणी आहेत. त्यांचे जग सीमाहीन आणि जोडलेले आहे. त्यांचे शिक्षण, खेळ, मनोरंजन आणि संवाद हे सारे काही स्क्रीनवर घडते.
कोविड-१९ च्या काळात घरात घालवलेल्या वेळेमुळे या मुलांमध्ये कौटुंबिक नात्यांबद्दल जिव्हाळ्याची आणि सुरक्षिततेची गरज वाढली, ही सकारात्मक बाजू आहे. मात्र प्रत्यक्ष संवादाचा अभाव आणि माहितीच्या अतिवेगाने त्यांच्या सामाजिक-भावनिक कौशल्यांचा विकास आणि लक्ष केंद्रित ठेवण्याची क्षमता बाधित होत आहे. अत्याधिक स्क्रीनटाइम, डिजिटल व्यसन, सोशल मीडियातील सतत तुलना करणारी संस्कृती, सायबरबुलिंग, एकाकीपणा आणि अगदी लहान वयात दिसणारी चिंता-नैराश्याची भावना ही या पिढीची मोठी मानसिक आव्हानं ठरणार आहेत. परिणामी, भविष्यात मुलं आणि पालक दोघांनाही नातेसंबंधांच्या गुंतागुंती अधिक तीव्रतेने जाणवू शकतात.
ही पिढी अत्यंत मुक्त विचारांची असल्याने त्यांना पारंपरिक करिअरच्या चौकटींमध्ये किंवा शिक्षण प्रणालीमध्ये अडकून राहणे पसंत नाही. ते नवनिर्मितीला घाबरत नाहीत; त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करणे, एकाच वेळी अनेक आव्हाने हाताळणे किंवा इन्फ्लुएन्सर, यूट्यूबर, उद्योजक बनणे या नव्या संकल्पना अधिक आकर्षक वाटतात.
जनरेशन अल्फा पारंपरिक जाहिरातींपेक्षा सोशल मीडिया आणि इन्फ्लुएन्सर्सच्या शिफारसींवर अधिक विश्वास ठेवतात.
अमेरिकेत या पिढीतील ९० टक्के मुले स्वतः पैसे कमावत असली तरी ६१ टक्के जनरेशन अल्फा मुले म्हणतात की, इतरांना मदत करणे हे त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे मूल्य आहे. जनरेशन अल्फा ही आतापर्यंतची आर्थिकदृष्ट्या सर्वात संपन्न, सर्वात तंत्रज्ञान-प्रवीण आणि सर्वाधिक आयुर्मान लाभणारी पिढी मानली जाते. २२व्या शतकाचे स्वागत करणारी ही पिढी विविधतेला सामाजिकदृष्ट्या सजग आणि कुटुंबकेंद्रित असेल. म्हणूनच, पर्यावरणाबद्दल जागरूकता आणि शाश्वततेची भावना ही त्यांच्या आयुष्याची प्रमुख दिशा ठरेल. तंत्रज्ञान आणि संवेदनशीलतेच्या संगमावर उभी असणारी ही पिढी आहे. त्यांच्या हातात जग बदलण्याची शक्ती आहे, परंतु ती टिकवण्यासाठी त्यांना डिजिटल शिस्त, भावनिक स्थैर्य आणि मानवी मूल्यांची जाणीव जपावी लागेल.
जनरेशन बीटा (२०२५-२०३९)
उद्याचे बीज असलेली ही पिढी आता जन्म घेत आहे, पण तिचे जग आधीच तिचे रूप घडवू लागले आहे. या पिढीचे बालपण, त्यांचे खेळ, त्यांचे शिकणे आणि संवाद सगळे व्हर्चुअल आणि इंटरॅक्टिव्ह जगात आकार घेणार. हे जग तंत्रज्ञानाशी एकरूप, सीमाहीन आणि आकर्षक असेल; पण त्याचसोबत गुंतागुंतीचं, एकाकी आणि भावनिकदृष्ट्या नाजूकही असेल जनरेशन बीटा म्हणजे मानवी उत्क्रांतीच्या नव्या पर्वाची सुरुवात. त्यांच्यासमोरचे खरे आव्हान कृत्रिम बुद्धिमत्ता, गोपनीयता, मानसिक आरोग्य आणि पर्यावरणीय जबाबदारीचे आहे.
अखंड डिजिटल संपर्क त्यांना अनंत संधी देईल, पण त्याचबरोबर सायबरबुलिंग, तुलना संस्कृती, शरीरप्रतिमा विकृती, फोमो, चिंता आणि नैराश्य अशा छुप्या सावल्याही घेऊन येईल. सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेमिंगचे व्यसन त्यांच्या झोपेच्या लयीत, शारीरिक हालचालीत, एकाग्रतेत आणि मानवी संवादात सूक्ष्म पण खोल बदल घडवेल.
ही अशी पिढी असेल, ज्यांच्या पालकांनी आर्थिक आणि सामाजिक संघर्षांचा काळ अनुभवला आहे. त्या अनुभवांनी त्यांच्यात लवचिकता, धैर्य आणि अनिश्चित काळात योग्य प्रतिसाद देण्याची क्षमता रुजवली आहे. त्यांचं जीवन तंत्रज्ञान आणि हवामान या दोन शक्तींनी साकारले जाईल आणि म्हणूनच साठवणूक, पुनर्वापर आणि शाश्वततेकडे झुकणारी जीवनदृष्टी हीच त्यांची ओळख बनेल.
जनरेशन बीटा मानवजातीचा पुढचा प्रयोग आहे, जिथे बुद्धिमत्तेपेक्षा जाणीव आणि वेगापेक्षा संतुलन अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.
पालकांसाठी एका नव्या युगाचा इशारा
जनरेशन अल्फा आणि बीटा या पिढ्या म्हणजे तंत्रज्ञानात विलीन होत चाललेल्या बालमनांचा काळ आहे. त्यांचं बालपण म्हणजे मातीचा ताजा सुगंध नाही, तर ते पिक्सेलच्या प्रकाशात फुलते आणि कधी कधी जळतेही. तुम्ही त्यांच्या हातात भन्नाट वेग असलेले जग देत आहात. सदैव ऑनलाइन राहण्याचा मानसिक ताण, सायबरबुलिंगची झळ, डिजिटल थकव्याचा भार, माहितीच्या पुरात बुडालेलं मन आणि सतत भीतीचे वातावरण या सगळ्यांतून मार्ग शोधायची तीव्र गरज त्यांना भासणार आहे. या आजच्या पिढीला मानसिक आरोग्याची जाणीव, सजगता, शांततेचं महत्त्व आणि चिंतनशील जीवनाची कला आत्मसात करणे अत्यावश्यक आहे. पण लक्षात ठेवा, त्या असंवेदनशील जगाला पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड आहे संवेदना. तंत्रज्ञान विकासाचे दार उघडू शकते, पण त्यांच्या संयमित जीवनाचे दार उघडण्यासाठी त्यांना लागेल हृदयाची किल्ली. ती तुमच्याच हातात आहे.
ज्येष्ठ मनोचिकित्सक आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता