

हितगुज
डॉ. शुभांगी पारकर
पिढीगणिक काळ बदलतो आणि काळागणिक पिढी बदलते, हे खरे असले तरी याचा नेमका अर्थ समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या पिढ्यांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते. आज वेगवगेळ्या देशांमध्ये जेन झी सक्रिय होत आहे. असे का होत आहे, हे समजून घ्यायचे तर त्या पिढीचा काळही समजून घ्यावा लागतो. पिढ्यांचा असा मागोवा घेणे का आवश्यक आहे, याची मांडणी विस्तृत असल्याने हा लेख क्रमश: देत आहोत.
या जगात जन्म घेतला की त्या क्षणापासूनच प्रत्येकावर विविध ओळखींचे आणि त्याआधारे होणाऱ्या विभाजनांचे शिक्के उमटत जातात. जात, लिंग, वर्ग म्हणजेच आर्थिक स्तर, भौगोलिक परिसर अशा प्रभावशाली चिन्हांनी आपली ओळख आधीच ठरवलेली असते. प्रत्येक पिढीचे स्वरूप केवळ जन्मवर्षांवर ठरत नाही, तर ते त्या त्या काळातील सामाजिक अनुभवांच्या आधारे ठरते. प्रत्येक पिढी तिच्या काळातील ऐतिहासिक, सामाजिक, तात्त्विक आणि तांत्रिक घटनांनी घडत जाते. स्वीकारले जाण्याच्या आणि नाकारले जाण्याच्या सीमारेषांवर तोल सांभाळत जगते.
अलीकडेच नेपाळमध्ये घडलेले तीव्र आंदोलन आणि तिथल्या हिंसक घटना याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे नेतृत्व १३ ते २८ वयोगटातील तरुणांनी म्हणजेच जनरेशन झी या पिढीने केले. या तरुणाईचा हा प्रचंड उद्रेक पाहून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की, ‘ही कोणती पिढी आहे?’
आजच्या काळात हा प्रश्न सतत ऐकू येतो. काही दशकांपूर्वी ‘बेबी बूमर्स’ या शब्दाने पिढ्यांना नाव देण्याची पद्धत सुरू झाली आणि ती आता ‘जनरेशन अल्फा’ व ‘जनरेशन बीटा’पर्यंत पोहोचली आहे. यात प्रत्येक पिढीला एक वेगळी ओळख, एक नाव, एक ठराविक वैशिष्ट्य दिले गेले आहे. पण या नावांना खरोखर काही अर्थ आहे का? की वयाच्या आधारे केल्या जाणाऱ्या या वर्गीकरणांमुळे आपण समाजात दुरावा निर्माण करतो आहोत?
पिढ्यांचा अभ्यास का आवश्यक आहे?
पिढ्यांचा अभ्यास हा केवळ कालरेषेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न नाही, तर तो मानवजातीच्या बदलत्या प्रवासाचा मानसशास्त्रीय आणि सामाजिक आरसा आहे. प्रत्येक पिढी तिच्या काळातील घटनांनी, विचारप्रवाहांनी आणि परिस्थितीने आकार घेत असते. म्हणूनच पिढ्यांचा अभ्यास म्हणजे वेगवेगळ्या काळांतील माणसाच्या रूपांतराचा शोध होय.
१. समाजातील बदल समजण्यासाठी
प्रत्येक पिढीचा काळ वेगळा असतो. तिच्यासमोरील आव्हाने, संधी आणि तिची विचारपद्धती वेगळी असते. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या स्थैर्याने ‘बेबी बूमर्स’ची मूल्यं घडवली, तर डिजिटल क्रांतीने मिलेनियल्स आणि जनरेशन झीच्या विचारपद्धतीत बदल घडवले. या साऱ्यांचा अभ्यास केला, तर समाजाच्या प्रवासाची दिशा, त्यातील मूल्यांमधील बदल, नातेसंबंधांतील नवे ताणतणाव आणि कामकाजाची बदलती वृत्ती हे सर्व आपल्यासमोर उलगडत जाते.
२. पिढ्यांतील दरी कमी करण्यासाठी
आज अनेकदा आपण म्हणतो, “या नवीन पिढीला काही समजत नाही!” किंवा तरुण म्हणतात, “जुनी पिढी हट्टी आहे, बदलायला तयार नाही.” खरं तर, दोघांच्या मधली ही दरी समजुतीचा अभाव निर्माण करते. पिढ्यांचा अभ्यास केल्याने पिढ्यांमधील फरक हा मूल्यांमध्ये नसून अनुभवांच्या संदर्भात असतो, हे आपल्या लक्षात येते. म्हणूनच हा अभ्यास ‘तू वेगळा नाहीस, फक्त तुझा काळ वेगळा आहे’, हे समजावून देतो.
३. भविष्याचा वेध घेण्यासाठी
पिढ्यांचा अभ्यास हा भविष्यातील समाजाचा आराखडा समजून घेण्यासाठीही उपयोगी ठरतो. शिक्षण, कार्यक्षेत्र, आरोग्यसेवा आणि संवाद यांसारख्या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांच्या विचारांचा परिणाम होणार आहे. या अभ्यासामुळे धोरणकर्त्यांना, शिक्षकांना आणि सामाजिक संस्थांना भविष्यातील गरजा ओळखून आजच तयारी करण्याची संधी मिळते. दुर्दैवाने याचा विचार आपल्या देशात होताना दिसत नाही.
४. मानसिक आणि सांस्कृतिक सांधेजोड
प्रत्येक पिढीला आपापल्या काळातील संकटांना तोंड द्यावे लागले आहे. कधी युद्ध, कधी आर्थिक मंदी, कधी माहितीचा अतिरेक, कधी महामारी. पिढ्यांचा अभ्यास दाखवतो की त्या त्या पिढीतील माणसाने आपल्या समोरील आव्हानांशी मानसिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या कशा प्रकारे जुळवून घेतले.
यातूनच लवचिकता आणि म्हणजे परिस्थितीनुसार बदलण्याची क्षमता या दोन मूलभूत गुणांचा अभ्यास करता येतो. हा अभ्यास मानसशास्त्र आणि समाजशास्त्र यांचा सुंदर संगम घडवतो.
५. ओळख आणि आपलेपणाचा शोध
पिढ्या समजून घेणे म्हणजे आपली ओळख आणि आपलेपणाची मुळे समजून घेणे.
आपण कोण आहोत, कुठून आलो आणि पुढे कुठे जाणार आहोत, या प्रश्नांची उत्तरे पिढ्यांच्या कथांमध्ये दडलेली असतात.
हा प्रवास आपल्याला काळाच्या पलीकडे एकत्र बांधतो. म्हणूनच या पिढ्यांचा विकास म्हणजेच त्यांच्या मूल्यांचा, विचारसरणीचा आणि समाजावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
बेबी बूमर्स : कष्ट, कुटुंब आणि मूल्यांचा सुवर्णकाळ (१९४६-१९६४)
दुसऱ्या महायुद्धानंतरच्या पुनर्निर्माणाच्या काळात जन्मलेली ही ‘बेबी बूमर्स’ पिढी समाजाच्या विकासाचा कणा ठरली. या काळात कुटुंब, नोकरी आणि समाज यांच्याशी निष्ठा हीच मुख्य मूल्यव्यवस्था होती. त्यांनी ‘अमेरिकन ड्रीम’सारखी संकल्पना जगभर लोकप्रिय केली. ‘अमेरिकन ड्रीम’ या संकल्पनेची मूळ कल्पना लेखक आणि इतिहासकार जेम्स ट्रुस्लो अॅडम्स यांनी १९३१ मध्ये त्यांच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या पुस्तकात ‘द एपिक ऑफ अमेरिका’ (The Epic of America) मध्ये मांडली होती. या अमेरिकन ड्रीमचं वर्णन करताना ॲडम्स यांनी लिहिले होते, “अशी भूमी जिथे प्रत्येक व्यक्तीला आपल्या क्षमता आणि परिश्रमांच्या आधारावर अधिक चांगले, समृद्ध आणि परिपूर्ण जीवन जगता येईल. हे अशा सामाजिक व्यवस्थेचे स्वप्न आहे जिथे प्रत्येक पुरुष आणि स्त्री आपल्या नैसर्गिक क्षमतेनुसार पूर्ण उंची गाठू शकेल आणि तिच्या कर्तृत्वानुसार इतरांकडून मान्यता मिळवू शकेल.”
आरंभी या स्वप्नाचा केंद्रबिंदू लोकशाही, स्वातंत्र्य आणि समानता होता; परंतु नंतरच्या काळात तो अधिकाधिक भौतिक समृद्धी आणि सामाजिक उन्नतीकडे झुकला.
जनरेशन एक्स- सँडविच जनरेशन (१९६५–१९८०)
दोन मोठ्या पिढ्यांमध्ये म्हणजे बेबी बूमर्स आणि मिलेनियल्समध्ये अडकलेली ही पिढी ‘सँडविच जनरेशन’ किंवा अनेकदा ‘फॉरगॉटन मिडल-चाइल्ड जनरेशन’ म्हणून ओळखली जाते. काही माध्यमांनी तिला विस्कळीत आणि दिशाहीन म्हटले; परंतु या पिढीने स्वतःचा आवाज हरवू दिला नाही, उलट ती नेहमी स्पष्ट, ठाम आणि निडर राहिली. या जनरेशनला ‘लॅच-की किड्स’ असेही म्हणतात. म्हणजे कुलूप लावलेल्या घरात वाढलेली मुले, ज्यांच्या पालकांना नोकरीच्या व्यापामुळे मुलांना वेळ देता आला नाही, जे स्वतःच्या जबाबदाऱ्यांमधून शिस्त आणि स्वातंत्र्य शिकले. त्यामुळेच त्यांनी समाजाला ‘वर्क-लाइफ बॅलन्स’चा एक नवा जीवनमंत्र दिला. १९९० च्या दशकात, जेव्हा जनरेशन एक्स मोठ्या प्रमाणावर कामाच्या क्षेत्रात प्रवेश करू लागली, तेव्हा ‘वर्क-लाइफ बॅलन्स’ ही संकल्पना व्यवस्थापन आणि मानसशास्त्राच्या साहित्यामध्ये लोकप्रिय होऊ लागली. कंपन्यांनीही या पिढीच्या मूल्यांचा आदर करून सुविधा सुरू केल्या. तंत्रज्ञानाच्या वाढीला सामोरं जात त्यांनी लवचिकता विकसित केली. वास्तववादी दृष्टी आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची तयारी ही त्यांच्या स्वभावाची मुख्य वैशिष्ट्यं ठरली. म्हणूनच त्यांनी स्वतंत्र व्यवसाय आणि उद्योजकतेच्या प्रवाहाला आकार दिला.
हीच ती पिढी जी किशोरवयात एमटीव्ही (MTV) च्या उदयासह वाढली. एमटीव्ही कितीही वादग्रस्त आणि टीकास्पद ठरले तरी तो जनरेशन एक्ससाठी पॉप कल्चरचा दीपस्तंभ ठरला. तिथे संगीत, फॅशन आणि अभिव्यक्ती यांनी एकत्र येऊन तरुणाईचा नवा चेहरा घडवला. याच माध्यमाने जगाला मॅडोना, प्रिन्स आणि मायकेल जॅक्सन दिले. तीन अशी व्यक्तिमत्त्व, ज्यांनी संगीताला केवळ ऐकण्याचे नव्हे, तर पाहण्याचे आणि जगण्याचे माध्यम बनवत, एक संस्कृती निर्माण केली. बंडखोरी, स्वातंत्र्य आणि स्वतःच्या आवाजाला अभिव्यक्त करणारी संस्कृती. म्हणूनच या पिढीला ‘एमटीव्ही जनरेशन’ असंही म्हणतात.
जग हस्तलिखित पत्रांच्या आणि मिक्सटेप्सच्या दिवसांपासून दूर गेलेले असले, तरी त्या काळाने मनात उमटवलेली भावनांची ऊब, उत्सुकता आणि सर्जनशीलता अजूनही जिवंत आहे. फक्त ती पुन्हा जागवण्याची गरज आहे. म्हणून या पिढीचा आतला आवाज कुजबुजत असतो, थोडा श्वास घ्या, जिथे आहात तिथेच स्वतःचा प्रवास साजरा करा. किती दूर आलात हे जाणून घ्या आणि हे लक्षात ठेवा, जीवनातील सर्वात सुंदर अध्याय अजून लिहायचे आहेत.
पूर्वी ‘फॉरगॉटन जनरेशन’ म्हणून विस्मृतीत गेलेली ही पिढी आता नव्याने ओळखली जात आहे ‘कूलनेस’साठी. जीवनसंतुलनाचं प्रतीक म्हणून. एका सर्वेक्षणानुसार, या पिढीच्या तरुणपणी म्हणजे ८० आणि ९० च्या दशकात, जीवनमान अधिक सुलभ, स्थिर आणि आनंदी होतं; जे आजच्या डिजिटल व्यग्रता, चिंता आणि सतत तुलना करणाऱ्या पिढ्यांच्या तुलनेत वेगळं होतं.
‘जनरेशन एक्स’साठी भूतकाळ म्हणजे एक लेदर जॅकेटसारखा आहे. कधी जड वाटणारा, पण अजूनही थोडा स्टायलिश, आकर्षक असणारा. त्या जॅकेटच्या सुरकुत्यांमध्ये त्या काळाच्या असंख्य गोष्टी दडलेल्या आहेत, ज्या अनुभवांनी त्यांना घडवलं, काही जखमा दिल्या, पण त्याचबरोबर जगण्याची लवचिकता आणि सहनशक्ती शिकवली. त्यांच्या आठवणी कधी ओझे बनतात, तर कधी त्या उबदार प्रकाशासारख्या वाटतात. त्या त्यांना पुन्हा स्वतःकडे परत नेतात. त्या ‘कूल’ दिवसांची झलक, जिथे साधेपणाचेही एक वेगळे सौंदर्य होते, आजही त्यांच्या मनात ताजी आहे.
जनरेशन एक्स म्हणजे काळाच्या दोन काठांवर उभी असलेली पिढी, एकीकडे जुन्या मूल्यांचा भूतकाळातील पाया आणि दुसरीकडे नव्या जगाचे वर्तमान. ही पिढी अजूनही आयुष्याचा नवा अर्थ शोधत राहते.
आजच्या तरुणांना या पिढीकडे पाहताना जाणवते की, या पिढीने तंत्रज्ञान आणि समाजातील बदलांना पाय जमिनीवर ठेवत किती सहजपणे आत्मसात केले आहे. त्यांचा हा शांत आत्मविश्वास, ना अति-महत्त्वाकांक्षा, ना अस्थिरतेचा गोंगाट, आज पुन्हा एकदा नव्या पिढ्यांसाठी आकर्षक आणि प्रेरणादायक ठरतो आहे.
आजच्या जनरेशन झीने या जनरेशन एक्सकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. (क्रमशः)
ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ आणि वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता