चाळी, होळी आणि पुरणाची पोळी

गिरणगाव आणि गिरगावातील मराठी लोक चाळीतली घरं विकून, रोजगार गेल्याने, कुटुंब वाढल्यानं वा घरांतील भांडणातून उपनगरांत वा पार त्या पलीकडे गेले आहेत. त्यातले काही आजही होळी, गणपतीला येतात इथं. पण चाळी, होळी आणि घरोघरी पुरणपोळी हे समीकरण संपत चाललंय.
चाळी, होळी आणि पुरणाची पोळी
चाळी, होळी आणि पुरणाची पोळी
Published on

विशेष

संजीव साबडे

गिरणगाव आणि गिरगावातील मराठी लोक चाळीतली घरं विकून, रोजगार गेल्याने, कुटुंब वाढल्यानं वा घरांतील भांडणातून उपनगरांत वा पार त्या पलीकडे गेले आहेत. त्यातले काही आजही होळी, गणपतीला येतात इथं. पण चाळी, होळी आणि घरोघरी पुरणपोळी हे समीकरण संपत चाललंय.

होळीच्या खूप आठवणी आहेत. गोरेगावच्या ४८ एकरातील पत्रा चाळीत राहत असताना १०-१५ रोडवर मिळून किमान २०-२५ होळ्या असत. गिरगाव, गिरणगाव या बरोबरच जोगेश्वरी, गोरेगाव, दहिसर, कुर्ला, भांडुप वगैरे ठिकाणी कोकणातील लोकांची मोठी वस्ती होती. या सणाचा उत्साह जसा कोकणात असे, तसाच मुंबईतील कोकणी मंडळींच्या वस्त्या आणि भागामध्येही असे. तेव्हा गिरगाव असो, गिरणगाव असो की मुंबईची उपनगरं, तिथल्या वेगवेगळ्या चाळीमध्ये कोकणातल्या लोकांची घरं होती. त्यामुळे अर्थातच होळी मराठी वस्त्या असलेल्या मुंबईतील सर्वच चाळीत मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने पेटवल्या जात आणि धुळवडही जोरात, पण आध्यात्मिक रंगानेच खेळली जाई. मुंबईतील चाळी यांचं होळी आणि पुरणाची पोळीशी नातं अगदी पूर्वापार. होळी जशी वर्षातून एकदा, तशीच पुरणपोळी ही फक्त त्याच दिवशी होत असे. त्यामुळे त्या पोळीचं अप्रूपही मोठं असे. या चाळी आणि मुंबईतले वरळी, वेसावे, खार दांडा अशा सर्व कोळीवाड्यातली होळीही खूप जोरात.

होळीच्या दोन तीन दिवस आधीच मुंबईत राहणारे कोकणातले कामगार व कर्मचारी एसटीने गावाला निघून जात. होळी व गणपती गावातच असं त्यांचं ठरलेलं असे. होळीला ग्रामदेवतेच्या पालखीचा मान यंदा आमच्या घरी आहे, असं त्यांचं म्हणणं असे. त्यामुळे ग्रामदेवतेच्या व पालखीच्या पूजेच्या सर्व सामानासह ते रवाना होत. वर्षभर पैसे वाचवून गावात आपल्या घराण्याचा मान वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असे. पगार कापला तरी चालेल, पण होळीच्या, गणपतीच्या दिवशी गावात पोहोचायला हवं, असं त्यांचं म्हणणं. जे गावी जायचे नाहीत, ते तितक्याच जोशात मुंबईच्या आपल्या चाळीतल्या होळीच्या तयारीला लागत. लहान मुलांपर्यंत सारे बापे त्यात गुंतून जायचे. होळीसाठी छोटा खड्डा केलाय ना यापासून पुरेसा लाकूडफाटा, गोवऱ्या यावर त्यांचं बारीक लक्ष. त्या रात्री किमान चिवडा व कडक बुंदी लाडू असायलाच हवेत, असा आग्रह असे.

आमच्या गोरेगावच्या चाळीमध्ये होळीची तयारी महिनाभर आधीच सु्रू होई. त्यात शाळकरी पोरांचा पुढाकार आणि त्यातल्या त्यात मोठा तो लीडर. नारळाच्या करंट्या जमा करायच्या, म्हशीच्या तबेल्यातून शेण आणून गोवऱ्या तयार करायच्या. दोन-चार महिने आधीच एखादं सुकलेलं झाड हेरून ते कुऱ्हाडीने तोडायचं. ताडाची, पोफळीची अनेक झाडं होती. त्यांच्या झावळ्या फेब्रुवारीपासून पडायला सुरुवात होते. त्या व इतर झाडांच्या फ़ांद्या जमा करून ठेवायच्या. होळीची तयारी अशी पूर्ण झालेली असे. तरीही चार दिवस आधी घरोघरी होळीच्या वर्गणीसाठी ‘होळी रे होळी, पुरणाची पोळी, साहेबाच्या पाठीत बंदुकीची गोळी’ म्हणत गँगने जायचं. चाळीतले लोक १० पैशांपासून एक रुपयापर्यंत वर्गणी द्यायचे. एखादं दुसरा गेला की त्याला कटवायचे.

त्या पैशातून होळीच्या दिवशी सकाळी तूप, हार, उदबत्त्या, थोडंसं चंदन, धूप, नारळ, पेढे, केळी, अबीर, गुलाल, काड्यापेटी हे आणायचं. संध्याकाळी होळी दहनासाठी काठीला जुनं कापड गुंडाळून टेम्भा तयार करायचा. कॉलनीतल्या दोन चार होळ्या पेटल्या की मग आमचीही याच्या, त्याच्या नावानं बोंबा मारत, अमक्याच्या तमक्याचा ढोल अशी साधी आणि काही वेळा अर्वाच्य शिवीगाळ करत होळी रात्री साडेदहाच्या सुमारास पेटायची. तोपर्यंत कबड्डी, आबादुबी, उभा खोखो खेळायचं आणि होळी दहनानंतर गाण्याच्या भेंड्या वा पुन्हा खेळ. कोकणातले अनेक लोक तिथं राहत असल्यानं त्यांच्या उत्साह जोरात. मग पुलाव, भजी, पुरीभाजी असं भरपूर खाणं. पण होळी पेटली की काही जण दिसेनासे व्हायचे आणि रात्री उशीरा कोणाच्या घराबाहेरचं जुनं कपाट, टमरेल, चपला, बाहेर वाळत घातलेले कपडे होळीत पडत.

सकाळी उठताच चोरी झालेल्यांच्या घरच्या शिव्या सु्रू होत. शिमगाच तो, शिवाय चोरीचा राग. त्याच वेळी पुन्हा ‘आयना का बायना, घेतल्या शिवाय राह्यना, पेटी को चावी लगता है, हम को पैसा मंगता है...एक आना, दो आना, तीन आना, चार आना’ असं काही तरी गाणं म्हणत लोकांच्या दाराशी पैसे मिळेपर्यंत नाचतं राहत असू. पोरं घरात शिरून रंग लावतील, या भीतीने पटकन पैसे देऊन फुटवलं जायचं. हे दुपारी एक वाजेपर्यंत झालं की मग त्या पैशातून मिठाईची पार्टी आणि मग घरात येऊन आंघोळ. तेव्हा होळीची पूजा, ब्राह्मणाला बोलावणं वगैरे प्रकार नसायचे. काही कोकणी लोक तिथं उदबत्ती लावून आत नारळ फेकताना दुसऱ्याच्या नावानं ठणाणा करत शिमगा साजरा करायचे. चाळीतल्या असंख्य घरी रात्री पुरणाची पोळी, कटाची आमटी असे. काही जण होळीच्या पूजेला येताना दोन-चार पोळ्या घेऊन आले की त्या लगेच फस्त होत. मुंबईकरांना रंगपंचमी जणू माहीतच नाही. त्यामुळे धुळवडीलाच रंग खेळायचं. त्या दिवशी सुट्टी असल्याचा परिणाम. त्या धुळवडीत आता लहान मुलं, तरुण-तरुणी सहभागी होत असली तरी तो प्रकार भयावह वाटू लागलाय. धूळवडीला उत्तर भारतीय वस्त्यात थंडाई, भांग ठरलेली. एडवर्ड सिनेमाजवळच्या एका गल्लीत आजही मस्त थंडाई मिळते. बोरीबंदरच्या खाऊ गल्लीजवळचा व केम्पस कॉर्नर, झवेरी बाजारच्या पानवाल्यांकडे भांगही मिळायची. भांग हा प्रकार दारूपेक्षाही डेंजर.

लालबाग, परळ, नायगाव, भोईवाडा, काळाचौकी, भायखळा, डिलाईल रोड, बकरी अड्डा, भायखळा, सातरस्ता अशा सर्व पट्ट्यातली होळी खऱ्या अर्थाने मुंबईतील कामगारांची. तेव्हा चाकरमानी हा शब्द सर्रार वापरला जाई. हा सारा भाग गिरणगावचा. त्यामुळे तिथं होळी अगदी पूजा वगैरे सांग्रसंगीत होत असे. लालबाग, नायगाव, काळाचौकी, भोईवाड्यातील कामगार तर आट्यापाट्या खेळत, काही ठिकाणी खेळे, नमन हेही होई. त्यासाठीची तयारी आधीपासून चाले. चाकरमान्यांची असंख्य मंडळं जन्मली. त्यामुळे गावातील होळी असो की चाळीतली, तयारी या मंडळांमार्फत व्हायची. खेळे, नमन यांची प्रॅक्टिस गिरणीतली शिफ्ट अड्जस्ट करून व्हायची. घराघरात पुरणाची पोळी असायची आणि शक्यतो कडक बुंदी लाडू घरी आणले जायचे. गिरण्या बंद झाल्याने त्यांच्या अनेक चाळी दिसेनाशा झाल्या, बीडीडी, बीआयटी चाळीही पाडल्या जाऊन तिथं टॉवर येत आहेत. तिथं मोकळी जागा नसेल तर होळी पेटवणार कुठे?

गिरगांवातली होळी ही मध्यमवर्गीय मंडळींची तिथंही उत्साह मोठा, पण तिथल्या होळीला धार्मिक अधिष्ठान असायचं आणि आजही आहे. मराठी सणाच्या निमित्ताने पारंपरिक मराठी वेशात लोक असत. बदामवाडी, फणसवाडी, आंबेवाडी, कांदेवाडी, भाई जीवनजी लेन, ठाकुरद्वार, गुलालवाडी अशा प्रत्येक वाडीची वेगळी होळी. चिरा बाजारच्या ताडवाडीची होळी जवळपास १२५ वर्षांपासूनची. ती नवसाची होळी. लोक नवस बोलायला आणि सोडायला आजही तिथं जातात. मेट्रोसाठी क्रांती नगर गेलं आणि गिरगावही उंच इमारतींचं शहर बनत चाललंय. गिरणगाव आणि गिरगावातील मराठी लोक चाळीतली घरं विकून, रोजगार गेल्याने, कुटुंब वाढल्यानं वा घरांतील भांडणातून उपनगरांत वा पार त्या पलीकडे गेले आहेत. त्यातले काही आजही होळी, गणपतीला येतात इथं. पण चाळी, होळी आणि घरोघरी पुरणपोळी हे समीकरण संपत चाललंय. जोगेश्वरी, गोरेगाव, कुर्ला, भांडुप इथंही होळी, त्यातल्या चोऱ्या, मारामाऱ्या आणि गंमत राहिली नाही. होळीपेक्षा धूळवड हाच सण होऊन बसलाय. पण भलत्यासलत्या रंगांनी त्याचा बेरंग होत चाललाय.

पण मुंबईच्या कोळीवाड्यांची होळी आजही परंपरिक पद्धतीने होते. कमार होळी, पाटलाची होळी असे प्रकार तिथंच पाहायचा मिळतात. होळीला अनेक कोळी व आगरी लोक हावली म्हणतात. त्यातूनच शाहीर बालकराम वरळीकरयांच्या कोळीगीतात ‘हावलू बाय हावलू बाय तुझ्या पाटलाचं नाव काय’ या ओळी आल्या आहेत. हावलीमाता मंदिरही आहे कुठे तरी पालघरजिल्ह्यात. ती कोळी व आगऱ्यांची देवी. वेसाव्याच्या नऊ गल्ल्यात नऊ होळ्या पेटतात. त्याआधी बोटींची पूजा होते. प्रत्येक गल्लीची मिरवणूक निघते. होळीला माशांचं जेवण असतं आणि गुजरातच्या गरबा वा दांडियासारखा गोल फेरातला नाच असतो. 'रावनाची नजर सीतेवरी अण सीतेची नजर रामावरी' किंवा 'चिंचेची डांगली आंब्यावरी' अशी काही भन्नाट गाणी असतात. होळीला सर्व कोळी बायका ठरवून सारख्या रंग व डिझाईनच्या साड्यात व दागिन्यात असतात. खारदांडा, वरळी अशा सर्व कोळीवाड्यांनी होळीची शंभर वर्षांपासूनची परंपरा जपली आहे. एकेकाळी कोकणातील लोकांची चाळीतली आणि कोळ्यांची वाडीतली होळी हे पर्यटकांचंही आकर्षण होतं. नायगाव, ताडवाडी, गुलालवाडी, जोगेश्वरीची मजासवाडी व बांदेकरवाडी, खारदांडा, वेसावे अशा अनेक होळ्या आजही डोळ्यासमोर आहेत.

वाईट गोष्टींची होळी मुंबईत कायम पेटत राहायला हवी. सण मोठा शिमग्याचा, बलम पिचकारी, रंग बरसे भीगे चुनरवाली, होली खेले रघुवीरा अवध में, खेळताना रंग बाई होळीचा, दिल में होली जल रही है, होली के दिन दिल खिल जाते है अशा गाण्यांनी तिच्या रंगांची उधळण आपल्यावर केलीच आहे.

ज्येष्ठ पत्रकार

sanjeevsabade1@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in