

दुसरी बाजू
प्रकाश सावंत
इराण-इस्रायल, अमेरिका यांच्यातील युद्धामुळे पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाचे साठेच नव्हे, तर जागतिक शांततेच्या, समृद्धीच्या अनमोल ठेवीच आटत चालल्या आहेत. जगभरात भय, भूक, महागाई, ताणतणावात कमालीची भर पडत आहे. कॅन्सरची औषधे वाहून नेणारी जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकल्याने त्याविना रुग्ण तडफडत आहेत. दक्षिण इराणमधील मिनाब शहरात मुलींच्या शाळेवर झालेल्या हल्ल्यात अंदाजे १७० विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत ओढवल्याने युद्धाची काळी बाजू समोर आली आहे. या भयभीषण नरसंहाराला, विनाशाला कारणीभूत आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सत्तेचा उन्माद, अहंकारी, लहरी, जुलमी आणि बेजबाबदार कारभार.
इराणविरुद्धचे युद्ध पुढील तीन-चार आठवड्यांत संपवण्याचे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात दिले होते. यावरून ते माघार घेतील असे वाटत असतानाच अचानक त्यांनी घुमजाव करत पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता तर त्यांनी इराणला थेट अश्मयुगाकडे नेण्याची धमकी दिली आहे. या धमकीला इराणनेही तेवढेच तडफदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे आगामी काळात युद्धाची तीव्रता अधिक वाढण्याची चिन्हे आहेत. या युद्धासोबतच सुडाची, विद्वेषाची आणि अहंकाराची आग भडकल्याने आता लष्करी ठाण्यांबरोबरच रस्ते, वीज, शाळा, रुग्णालये यांसारख्या मूलभूत, पायाभूत सेवासुविधांच्या मोक्याच्या ठिकाणांवर, नागरी वस्त्यांवर हल्ले करण्यास सुरुवात झाली आहे. या हल्ल्यात देशोदेशीच्या शांततेच्या प्रयत्नांना खीळ बसत आहे. हवामान बदलाच्या संकटावर मात करण्याच्या उपाययोजना मागे पडत आहेत. एवढेच नव्हे, तर परस्परांवर अवलंबून असलेल्या सर्वच देशाच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण होत आहेत. ज्या लोकवस्त्या, शाळा आणि रुग्णालयांवर क्षेपणास्त्रे डागली जात आहेत, तिथे केवळ इमारती कोसळत नसून संवेदनशीलतेची मानवी मूल्येही जमीनदोस्त होत आहेत.
मुळात, डोनाल्ड ट्रम्प हे उद्योजक. आपल्या व्यवसायात तब्बल सहा वेळा दिवाळखोरी जाहीर करूनही स्वतःला यशस्वी उद्योजक म्हणवून घेणारे ट्रम्प आता देशांतर्गतच नव्हे, तर जागतिक राजकारणातही त्याच दिवाळखोर मानसिकतेने वावरताना दिसत आहेत. ट्रम्प यांच्या राजकीय सत्तेचा पाया हाच ध्रुवीकरणाच्या विखारी डोलाऱ्यावर उभा आहे, जिथे ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या घोषणेला देशभक्तीचे वेष्टन लावले जात आहे. त्यातून अमेरिकन समाजात वंश आणि वर्गाच्या आधारावर भेदभाव होत आहे. मेक्सिकोच्या सीमेवर उभारलेली भिंत केवळ विटा-मातीचे बांधकाम नसून, ती मानवी मनांमध्ये पेरलेल्या द्वेषाचे आणि ‘आम्ही विरुद्ध ते’ या हिंसक मानसिकतेचे जिवंत स्मारक बनली आहे.
अण्वस्त्रांच्या धोक्याचा बागुलबोवा निर्माण करून प्रत्यक्षात इराणसह अन्य देशांच्या तेल विहिरींवर ताबा मिळवण्याचा हा हीन, दीन साम्राज्यवाद आहे. यंदाच्या वर्षात पेटलेले ‘इराण-इस्रायल युद्ध’ हे ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ या धोरणाचे रक्तरंजित आणि अघोरी रुपडे आहे. इराणला ‘अश्मयुगात नेऊन सोडण्याची’ धमकी देणे किंवा त्यांच्या नागरी वस्त्यांवर, महत्त्वाच्या पायाभूत सेवासुविधांच्या ठाण्यांवर बी-२ बॉम्बर्सचा वर्षाव करणे, हे कोणत्याही सुसंस्कृत राष्ट्राध्यक्षाला न शोभणारे कृत्य आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्रम्प यांच्या ‘बार्गेनर’ वृत्तीने ७५ वर्षांची ‘नाटो’ची सुरक्षा व्यवस्था मोडीत निघाली असून, मित्रराष्ट्रांना धमकावून त्यांनी अमेरिकेला जागतिक स्तरावर एकाकी पाडले आहे. इंग्लंड, स्पेन, जर्मनी आणि फ्रान्ससारख्या जुन्या मित्रांचा सल्ला धुडकावून ‘नाटो’मधून बाहेर पडण्याची अमेरिकेने दिलेली धमकी ही ‘नाटो’ सदस्य राष्ट्रांच्याच नव्हे, तर जागतिक ऐक्य, सामाजिक बंधुभाव व सुरक्षाच धोक्यात आणणारी आहे. स्पेनने अमेरिकन विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद करणे हा ट्रम्प यांच्या मुत्सद्देगिरीचा दारुण पराभव आहे. त्यांनी जागतिक राजकारणाला बाजारू, गल्लाभरू स्वरूप आणले आहे, जिथे सामंजस्याच्या चर्चेऐवजी केवळ गुंडगिरीच्या अटी आणि अमानवी शर्तींचीच सक्ती आहे. स्वतंत्र प्रसिद्धी माध्यमांना ‘जनतेचे शत्रू’ ठरवून लोकशाहीचा चौथा स्तंभ उद्ध्वस्त करणे, हे एका हुकूमशहाचेच लक्षण आहे. त्यात अमेरिकेची प्रशासकीय स्वायत्तता पूर्णपणे लयाला गेली आहे. जेव्हा एखादा सत्ताधीश स्वतःलाच देशाचा एकमेव तारणहार मानू लागतो, तेव्हा त्या राष्ट्राच्या लोकशाहीचा अंत हा अटळ असतो आणि नेमके ट्रम्पसुद्धा त्याच विनाशाचे शिल्पकार ठरू पाहत आहेत.
अमेरिकेतील काही अब्जाधीशांना हाताशी धरून प्रशासकीय यंत्रणा आपल्या मुठीत घेण्याचा ट्रम्प यांचा डाव हे हुकूमशाहीच्या दिशेने पडलेले पाऊल आहे. ‘वन बिग ब्युटीफुल बिल’सारख्या कायद्यांतून केवळ ‘कॉर्पोरेट’ जगताचे लाड होत असल्याने सामान्य अमेरिकन नागरिक महागाई, बेरोजगारी आणि दारिद्र्याच्या गर्तेत फेकला जात आहे. आर्थिक आघाडीवर ट्रम्प यांच्या धोरणांनी तेलाच्या किमतीत ४० टक्क्यांची वाढ करून महागाईचा वणवा पेटवला आहे, ज्याचा फटका जगभरातील सामान्य माणसाला बसला आहे. पुरेशा गॅसअभावी हॉटेलच्या चुलीही विझण्याची भीती व्यक्त होत आहे. घरगुती सिलिंडरसाठी ग्राहकांच्या लांबच्या लांब रांगा लागत आहेत. त्यांच्या एका चिथावणीखोर पोस्टमुळे जागतिक शेअर बाजार कोसळतो, हे सत्तेचे अफाट सामर्थ्य नसून ते त्यांच्या बेजबाबदारपणाचे केविलवाणे निदर्शक आहे. अर्थव्यवस्था जेव्हा आकड्यांच्या खेळासाठी आणि श्रीमंतांच्या तुष्टीकरणासाठी राबवली जाते, तेव्हा ती विकास नसून विनाशाची संथ गतीने चाललेली वाटचाल असते यात दुमत असण्याचे काही कारण नाही. पर्यावरणासारख्या पृथ्वीच्या अस्तित्वाच्या प्रश्नाला केराची टोपली दाखवणे आणि मानवाधिकारांची पायमल्ली करणे हा ट्रम्प यांच्या कारकीर्दीतील सर्वात मोठा कलंक आहे. मुस्लिम प्रवाशांवरील बंदीपासून ते सीमेवर मुलांची पालकांपासून केलेली ताटातूट, हे सर्व त्यांच्या संकुचित आणि हिंसक राष्ट्रवादाचे विषारी फळ आहे. ‘ट्रम्पिझम’ ही विचारसरणी कदाचित त्यांच्या समर्थकांसाठी विजयाचा उन्माद असेल, पण जगाच्या इतिहासातील ते एक कलंकित
पान आहे.
आता कितीही उसने अवसान आणून ते इराणला नमवण्याचा प्रयत्न करीत असले तरी इराणने त्यांची लढाऊ विमाने पाडून त्यांचा अवसानघात केलेलाच आहे. तसेच, ट्रम्प यांच्या युद्धखोरीला जवळपास ८० लाख अमेरिकन नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र विरोध दर्शविला आहे. या बाबी त्यांच्या आक्रमक स्वभावाला मुरड घालण्यासाठी पुरेशा आहेत. तथापि, ज्यांना कोणाचेच ऐकायचे नाही, कुणाशीच संवाद साधायचा नाही, कुणाचाच सल्ला घ्यायचा नाही. केवळ ‘हम करे सो कायदा’चीच ‘री’ ओढायची असेल, तर त्यांचे पुढे कुणीच ऐकेनासे होते. त्यामुळे ते एकाकी पडल्यास नवल नसावे. सत्तेचा सरताज हा काही कायमस्वरूपी नसतो. त्यांच्या अहंकाराचा हा डोलारा कधी ना कधी कोसळणारच आहे, तेव्हा जगाच्या इतिहासाच्या पानात ट्रम्प यांचे नाव लहरी बेबंदशहा म्हणूनच नोंदवले जाईल. भारत- पाकिस्तान यासह जगभरातील अनेक युद्ध आपण थांबवल्याचा दावा करून ज्यांनी जागतिक शांततेचे ‘नोबेल’ मिळविण्यासाठी जीवाचा आटापीटा केला, तेच युद्धखोर ट्रम्प जागतिक शांततेचेच नव्हे, तर मानवतेचे मारेकरी ठरत आहेत.
prakashrsawant@gmail.com