जागतिक दिन ठरताहेत दीनदुबळे!

जगभरात २१ मार्चला जागतिक वन दिन, २२ मार्चला जागतिक जल दिन आणि २३ मार्चला जागतिक हवामान दिन साजरे केले जात असले, तरी ते केवळ उपचारापुरते उरले आहेत. किंबहुना इस्रायल/अमेरिकाविरुद्ध इराण युद्धाने हे आंतरराष्ट्रीय दिन अधिकच दीनदुबळे झाले असून त्यात विश्वबंधुत्व, विश्वकल्याण, विश्वशांतीच्या मानवतावादी मूल्यांचेच अवमूल्यन होत आहे.
जागतिक दिन ठरताहेत दीनदुबळे!
Published on

दुसरी बाजू

प्रकाश सावंत

जगभरात २१ मार्चला जागतिक वन दिन, २२ मार्चला जागतिक जल दिन आणि २३ मार्चला जागतिक हवामान दिन साजरे केले जात असले, तरी ते केवळ उपचारापुरते उरले आहेत. किंबहुना इस्रायल/अमेरिकाविरुद्ध इराण युद्धाने हे आंतरराष्ट्रीय दिन अधिकच दीनदुबळे झाले असून त्यात विश्वबंधुत्व, विश्वकल्याण, विश्वशांतीच्या मानवतावादी मूल्यांचेच अवमूल्यन होत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर जगाची शांतता व सुव्यवस्थाच हरपली आहे. ‘सर्वप्रथम अमेरिका’ या घोषवाक्याला अनुसरून त्यांनी ‘स्वदेशी’चा नारा दिला. परिणामी, अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या, संशोधन करीत असलेल्या व नोकऱ्या करीत असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांना/कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर त्यांनी ‘टॅरिफ वॉर’ सुरू करून अनेक देशांच्या नाकी दम आणला. आता त्यांनी इस्रायलला फूस लावून इराणविरुद्ध युद्ध पुकारले आहे. या युद्धाच्या भडक्यात जवळपास पाच हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. त्यात शाळेत जीवनाचे धडे गिरवत असलेल्या १७० निष्पाप चिमुकल्या जीवांचा दुर्दैवी अंत ओढवला असून हे कृत्य आहे अत्यंत घृणास्पद, लाजिरवाणे आणि तितकेच निषेधार्हसुद्धा.

या ट्रम्प महाशयांचे वागणे किती दुटप्पी आहे बघा. आपणच भारत-पाकिस्तान युद्ध थांबवले आहे अशी स्वगर्जना त्यांनी सातत्याने केली. आपणच जगायचे कैवारी असल्याचा आवही त्यांनी आणला. आपणच जागतिक ‘शांतिदूत’ असल्याचे त्यांनी स्वतःच जाहीर केले. आपल्यालाच शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले आहे. त्यासाठी त्यांनी संबंधितांवर दबाव आणून त्यांना धमक्या देण्यासही मागेपुढे पाहिलेले नाही. आता हेच जागतिक शांततेचे स्वयंघोषित पुरस्कर्ते युद्ध थांबवायचे सोडून इस्रायल-इराण युद्धाच्या विद्वेषाच्या आगीत आपल्या अहंकाराचे तेल ओतत आहेत. काय म्हणावे या प्रवृत्तीला? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पार पाडावयाच्या कर्तव्यात कसूर झाली आहे, म्हणून आपल्याच नागरिकांचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी त्यांनी घडवून आणलाय हा युद्धाचा बनाव. आपणच महासत्ता असल्याच्या वृथा अभिमानाच्या दिखाऊ राजकारणाचाच हा आहे अपयशी परिपाक.

युद्ध म्हणजे काय? दुसऱ्यावर विजय मिळवण्याची अहंकारी, विद्वेषकारी, सूडबुद्धीची, विध्वंसक, हिंसक प्रवृत्ती. हा हिंसाचार केवळ जल, जंगल आणि जमिनीपुरताच मर्यादित राहत नाही, तर तो आपले प्रांतिक, आर्थिक व राजकीय अस्तित्व, वर्चस्व प्रस्थापित करीत असतो. त्यात वित्तहानी, मनुष्यहानी किती होते याला सुमारच नाही. युद्ध पुकारल्यानंतर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कायदे पायदळी तुडविले जातात. मानवतावादी मूल्यांना काळिमा फासला जातो. युद्धाची किंमत प्रत्येकाला चुकवावी लागते, मग तो जिंकणारा असो की हरणारा. युद्ध म्हणजे माज, मस्ती आणि खुमखुमी. युद्ध म्हणजे दुसऱ्यावर वर्चस्व, सत्ता गाजवण्याचा अनाठायी हव्यास. त्यात विचार, विवेक, सलोखा, सद्भावना याचा अकारण बळी जाऊन जगभरातील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, पर्यावरणविषयक वातावरण दूषित होते. परिणामी, जग भयभीतीने चिंताक्रांत होते. भूक, दारिद्र्य, बेरोजगारी, महागाई यांसारखे प्रश्न गंभीर होतात. भ्रष्टाचाराला ऊत येतो. एवढे अनर्थ एका युद्धामुळे घडतात. युद्धातला जिंकणाऱ्याचा आनंद क्षणभंगुर ठरतो, परंतु युद्धातल्या पराजयाच्या ठसठसणाऱ्या वेदना बनतात चिरकालीन शोकांतिका.

युद्ध म्हणजे रक्तपात. युद्ध म्हणजे नरसंहार. प्रत्येक युद्ध लाल रक्तानेच माखलेले आहे. युद्ध म्हणजे रक्तरंजित इतिहास. पहिल्या महायुद्धात अंदाजे दोन कोटी लोक मृत्युमुखी पडले होते. दुसऱ्या महायुद्धात पाच कोटी लोक मारले गेले होते. फेब्रुवारी २०२२ मधील रशिया-युक्रेन युद्धात १५ हजार नागरिकांचा बळी गेला होता. मागील २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या इस्रायल/अमेरिका-इराण यांच्यातील युद्धात आजवर सुमारे ५ हजार लोकांना आपले प्राण हकनाक गमवावे लागले आहेत. या युद्धामुळे आसपासच्या देशांमधील नागरिकसुद्धा जीव मुठीत धरून राहत आहेत. आजवरच्या युद्धांच्या रक्तलांच्छित इतिहासामधून आपण काय शिकलो, हा एक प्रश्नच आहे.

युद्ध आणि नैतिकता यांचा बादरायण संबंध नाही. प्राचीन काळी सूर्योदयाला युद्धाचे रणशिंग फुंकले जात होते. सूर्यास्ताला युद्ध थांबवले जात होते. आजकालच्या युद्धाला काळवेळेचे भान राहिलेले नाही. आताची युद्धे रात्री-अपरात्रीसुद्धा मनमानी पद्धतीने लढली जात आहेत. त्यात मुले, महिला व वृद्धांना प्रामुख्याने लक्ष्य केले जात आहे. या युद्धात केवळ राजवाडेच नाहीत, तर त्या देशाची अर्थव्यवस्थाही कोलमडून भुईसपाट होत आहे. युद्ध केवळ बंदुका, शस्त्रास्त्र, दारुगोळ्यापर्यंतच मर्यादित राहत नाही, तर बाधित देशाला विकासाच्या बाबतीत कित्येक वर्षे मागे नेत आहे. सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागास करीत आहे. या युद्धात होणारे वेळ, पैशाचे नुकसान अमर्यादित असते व ते कधीही भरून निघत नाही. या युद्धाच्या विनाशकारी मानसिकतेमधून पैशाचाच नव्हे, तर मानवजातीचा विनाश घडतो. युद्ध म्हणजे उमलत्या स्वप्नांची राखरांगोळी, विकृतीचे थडगे आणि मानवतेला कलंक.

या युद्धाचे केवळ मानव जीवनावरच नव्हे, तर सबंध जीवसृष्टीवर घातक परिणाम होत आहेत. त्यात जागतिक वन दिन सैरभैर झाला आहे. जल, जंगल, जमिनीवर क्षेपणास्त्रांचा मारा होत आहे. त्यांचे अस्तित्वच जगाच्या नकाशावरून पुसले जात आहे. अनामवीराप्रमाणे जखमी पशू-पक्ष्यांचाही होतोय जीवनांत. हे भावभावनांच्या जाणिवा-नेणिवांच्या पलीकडील मूकबळी. त्यात जागतिक वन दिनही झालाय मुका, बहिरा आणि आंधळा.

या युद्धाने जागतिक जल दिनही झालाय उद्ध्वस्त. एरवी अमृतासमान असणारे जलही झालेय दूषित, कलुषित आणि होतेय प्राणघातक. आगामी युद्ध पाण्यावरून लढले जाईल असे भाकित केले जात असले तरी नळावरल्या भांडणासाठी तरी मानवाचे अस्तित्व शिल्लक राहायला हवे ना? नद्या, खाड्या, समुद्रावरील जलसंस्कृतीवरच क्षेपणास्त्रांचे हल्ले झाले तर त्यावर मानवी जीवन संस्कृती बहरणार तरी कशी? धरणे नष्ट झाली तर ती आसपासची गावे- लोकसंस्कृतीला कायमची जलसमाधी देण्यासाठी पुरेशी ठरेल नाही का? यात देशांतर्गत नद्या जोडणे सोडाच, परंतु आंतरराष्ट्रीय नद्याजोड कार्यक्रमाचीही विल्हेवाट लागत असून युद्धापुढे जागतिक जलनीती ठरत आहे निष्फळ आणि निष्प्रभ.

पृथ्वीवरील हवामान बदलाचे संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालले असून त्याविषयी जगभरातील हवामान तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प महाशयांना हवामान बदलाचे संकटसुद्धा एक थोतांड वाटत आहे. त्याविषयी त्यांचे बोलणे, वागणे तुच्छतेचेच राहिले आहे. एका महासत्तेच्या प्रमुखाला जर जागतिक तापमानवाढीविषयी भूमिकाच घ्यायची नसेल, तर तिथे अन्य विकसित देशांच्या प्रमुखांनी करावे तरी काय? खरे तर हवामान बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी ‘आहे रे’ वर्गातील श्रीमंत देशांनी ‘नाही रे’ वर्गातील गरीब देशांना अर्थसहाय्याबरोबरच सहकार्याचा हात पुढे करणे अपेक्षित आहे. तथापि, मानव कल्याणाच्या या प्रश्नावर कुठेही एकवाक्यता असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे जागतिक हवामान दिनानिमित्त केवळ उत्साही मतलबी वारेच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाहत राहतील. म्हणूनच जागतिक हवामान दिन सोपस्कारापुरतेही न उरल्याने ते ठरताहेत केविलवाणे व दीनदुबळे.

जागतिक दिनांविषयीच्या बोटचेप्या धोरणाला केवळ ट्रम्प जबाबदार नाहीत, तर जगभरातील अन्य विश्वगुरूही तितकेच जबाबदार आहेत. या महाशयांनी आपापल्या देशात अंदाधुंद, मनमानी कारभार आरंभिला आहे. माणसामाणसांमध्ये वर्ण, वर्ग वर्चस्वावरून भांडणे लावत आहेत. विद्वेष, वैरभाव पसरविला जात आहे. त्यात विश्वबंधुत्वाची, विश्वप्रेमाची, विश्व कल्याणाची आणि विश्वशांतीची संकल्पनाच मारली जात आहे. एकेकाळी कोरोना, जागतिक महामारी, जागतिक तापमानवाढीच्या संकटाचा सामूहिक मुकाबला करण्यासाठी सारे मानव समूह एकत्र आले. कोरोनावर लस शोधली गेली. तापमानवाढीवर मात करण्यासाठी जागतिक मोहिमा राबविण्यात आल्या. तथापि, त्यात सातत्य राहिलेले नाही. जागतिक वन, जल आणि हवामान दिन म्हणजे केवळ कॅलेंडरमधल्या तारखा नाहीत, तर तो आहे मानवी कल्याणासाठीचा सामूहिक हुंकार. समृद्धी व शांतता तलवारीच्या धारेवर टिकणार नाही, तर त्यासाठी हवेत जागतिक शांतीचा संदेश देणारे विवेकी विचार आणि माणुसकीचा हृद्य संवाद.

prakashrsawant@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in