

जगतवारी
मेधा आलकरी
‘नाटक बसवणं आणि गणेशोत्सव साजरा करणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे’ ही भावना उराशी बाळगून जगाच्या पाठीवर कुठेही गेलेला मराठी माणूस आपली संस्कृती सोबत घेऊनच प्रवास करतो. लंडनच्या धुक्यात रुंजी घालणारा ढोल-ताशांचा ठेका असो वा न्यू जर्सीतील नावीन्यपूर्ण ‘ड्राइव्ह-थ्रू’ दर्शन; परदेशी भूमीवरही बाप्पाच्या भक्तीचा हा भावतरंग अजिबात कमी होत नाही. तिथल्या नियम चौकटीत राहून, पण अंतःकरणातील भक्तीचा तोच ठेका जपणाऱ्या अनिवासी भारतीयांच्या या अनोख्या गणेशोत्सवाची ही रसाळ सफर...
आपल्या गावचा आंबा आणि आपल्या घरच्या गणेश पूजेतील मोदक हे प्रत्येकासाठी खास असतात. त्याची चव काही वेगळीच! ती चव मनात असते, जिभेवर नाही. दूरदेशी गेल्यानंतर या दोन्ही गोष्टी आता चुकणार याची हुरहूर मनाला लागून राहते. ‘गणपती बाप्पा’नंतर ‘मोssरया या आरोळीसाठी आसुसलेलं अस्सल मराठी मन चुकचुकतं. पण चार मराठी डोकी एकत्र आली की, ‘नाटक बसवणं आणि गणेशोत्सव साजरा करणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे.’ असं टिळकांच्या थाटात म्हणतात आणि तो मिळवल्यावर त्यांना होणारा आनंद अवर्णनीय असतो.
अमेरिकेत बहुतांश मराठी घरांमध्ये गणपतीची साग्रसंगीत पूजा होते. वाडवडिलांकडून परंपरेने चालत आलेल्या व्रतवैकल्यांमध्ये गणपती पूजन अगदी मनोभावे केलं जातं. आदल्या दिवशी आरास सजते. यूट्यूब गुरुजींचा खडा स्वर घुमत असतो. शाडूच्या छोट्याश्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते. मग झांजा आणि टाळ्यांच्या ठेक्यावरील आरत्यांचा गजर, अथर्वशीर्षाच्या आवर्तनांचा धीरगंभीर सामूहिक स्वर, सुवासिक वरण-भात-तुपाची मूद असलेलं नैवेद्याचं ताट आणि त्यामागून येणारा एकवीस मोदकांचा दरवळ. हे सगळं अमेरिकेत शक्य होतं. कारण तिथे मराठी मंडळी पुष्कळ आहेत; त्याचबरोबर या सणासाठीची सामग्री पुरवणारी दुकानंही भरपूर आहेत. गणेश चतुर्थी शनिवार, रविवारी आली तर उत्तम, नाहीतर छोटीशी पूजा आटोपून साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी त्याचा उत्सव साजरा करायचा ही तिथली पद्धत. मात्र काही हौशी मंडळींना या घरगुती पूजेव्यतिरिक्त काही सांस्कृतिक कार्यक्रम, लहानग्यांसाठी स्तोत्रपठण स्पर्धा, पारंपरिक वेशभूषा परेड, जमलं तर एखादं नाटुकलं असा खास सार्वजनिक गणेशोत्सव करण्याची हुक्की येते. स्थानिक महाराष्ट्र मंडळं तर हे काम मोठ्या प्रमाणावर करतातच; पण छोट्या छोट्या ग्रुपमध्येही हा उत्साह दिसून येतो. अमेरिकेत राहणाऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीतील मराठी मुलांना आपल्या मूळ संस्कृतीशी जोडून ठेवण्यासाठी गणेशोत्सव हे एक प्रभावी साधन बनलेलं आहे. मुंबईत वाढलेले अमराठी लोकही आपल्या गल्लीबोळांमधले गणपती उत्सव आठवून या समारंभात सहभागी होतात.
अमेरिकेतील घरांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ठिकठिकाणी फायर अलार्म लावलेले असतात. आरतीच्या जोशात आणि कापूर पेटवण्याच्या नादात त्या अलार्मची बॅटरी काढून ठेवण्याची खबरदारी घेतली नाही, तर दारात घंटा वाजवत फायर ब्रिगेड येऊन उभी राहण्याची फजिती होऊ शकते. त्या कर्मचाऱ्यांना कापूर का पेटवला हे समजावून सांगण्याचं महत्कर्म मग सोवळं सावरत यजमानांना करावं लागतं.
आपल्या गल्लीतून तालासुरात ढोल-ताशे वाजवून, लेझीम खेळत मिरवत आणलेल्या गणेशाच्या मूर्तीच्या मुखकमलावर एक वेगळंच तेज असतं. मुंबई-पुण्याच्या गावीही नसलेल्या ‘डेसिबल’ या आवाजाच्या परिमाणाचं इथे भलतंच प्रस्थ! वेळेचं गणित आणि या ध्वनिप्रदूषणाची काळजी घ्यायलाच लागते इथल्या आयोजकांना.
मराठी सून असलेली एक जपानी सासू मला अमेरिकेतील एका गणेशपूजेला भेटली. तिने सांगितलं की जपानी बौद्धपरंपरेत गणपती पूजनाचं अतिशय महत्त्व आहे. आमच्या जपान भेटीत टोकियोत असाकुसा येथील सेन्सो-जी मंदिरात गणेशाचं एक छोटं मंदिर पाहिल्याची आठवण ताजी झाली. जपानमधील मराठी मंडळं सार्वजनिक गणेशोत्सवात स्थानिक जपानी नागरिकांना आवर्जून आमंत्रित करतात. ती जपानी बाई आरती म्हणताना माझ्या शेजारी उभी राहून टाळ्यांचा व्यवस्थित ठेका धरत होती आणि मोदक तर तिला फार आवडतो म्हणाली.
अगदी सुरुवातीच्या काळात लंडन येथील महाराष्ट्र मंडळाने गणपती उत्सव साजरा करण्याचे ठरविले; तेव्हा उघड्यावर मंडप घालून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास परवानगी नव्हती. तेव्हा लंडनच्या भुयारी रेल्वे स्टेशनजवळील एका बेसमेंट हॉलमध्ये गणपतीची स्थापना केली जायची. बाहेर मुसळधार पावसाचे ताशेरे, आत त्या भूमिगत हॉलमध्ये त्याच तालावर वाजणारे ढोल-ताशे आणि त्यापाठोपाठ येणारी ‘मोरया’ ही आरोळी ऐकून तर गोऱ्यांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचत असे. आयर्लंडमध्ये डब्लिन या त्यांच्या राजधानीत साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवात तिथली स्थानिक पोलीस यंत्रणा मिरवणुकीला सुरक्षा पुरवते. तिथली मराठी मंडळी सांगतात की मिरवणुकीदरम्यान बंदोबस्तावर असलेल्या काही पोलीस मंडळींना ढोल- ताशाचा ठेका ऐकून ते वाजवण्याचा प्रचंड मोह होतो. ड्युटीचं बंधन नसणारे आयरिश नागरिक मात्र मुक्तहस्ते ढोल-ताशांवर काठ्या वाजवून आपली हौस पुरवून घेतात.
कोविडच्या काळात बंदिस्त जागेत एकत्र येण्यावर बंधनं होती आणि सोशल डिस्टंसिंगचे कडक नियम पाळणं अनिवार्य होतं. त्यावर तोडगा म्हणून न्यू जर्सीमधील महाराष्ट्र मंडळ आणि इतर काही मंदिरांनी ‘ड्राइव्ह थ्रू गणेश दर्शन’ आयोजित केलं होतं. पार्किंग लॉट किंवा मंदिराच्या आवारात गणपतीची मूर्ती एका उंच व्यासपीठावर स्थापित केली जायची. भाविक आपापली कार चालवत एका रांगेत यायचे. कारच्या खिडकीची काच खाली करून दर्शन घ्यायचे, नमस्कार करून, आरती ओवाळून, लांबूनच प्रसादाचं पाकीट स्वीकारून पुढच्या गाडीला वाट मोकळी करून द्यायचे. भक्तीची परंपरा चालू ठेवण्यासाठी अनिवासी भारतीयांनी हा नावीन्यपूर्ण मार्ग शोधून काढला होता. त्याकाळी अनेक प्रसारमाध्यमांनी त्याचं कौतुक केलं होतं.
परदेशात खरी पंचाईत होते ती गणपती विसर्जनाची. लांबलचक समुद्रकिनारे किंवा भलेमोठे नैसर्गिक तलाव असलेल्या देशांमध्ये विसर्जनाची समस्या खरं तर व्हायला नको; पण त्या देशातील जलप्रदूषणाच्या कडक नियमांमध्ये ते बसत नाही. मग त्यावर तोडगा निघाला ‘टब’ विसर्जनाचा. कल्पना करा, स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतांच्या पार्श्वभूमीवर नऊवारी साड्या, केसांचे अंबाडे आणि नाकात नथी घातलेल्या मराठी बायका नि कुर्ता- पायजमा घातलेले पुरुष वाजतगाजत आणलेली मूर्ती एका टबात विसर्जित करत आहेत. त्यावेळी त्यांच्या मनात भारतातला समुद्रकिनारा किंवा गावातील नदी, तलाव आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी गळ घालत गणपती बाप्पाला दिलेला निरोप नक्कीच जिवंत होऊन उठत असेल. परदेशातील ही इको फ्रेंडली पद्धत कोविडपासून आपल्याकडेही रूढ झाली आहे. शाडूच्या मूर्तीचा एकेक अवयव टबातील पाण्यात विरघळताना बघणं क्लेशदायी असलं तरी ते जीवनाच्या क्षणभंगुरतेचं मोठं तत्त्वज्ञान शिकवून जातं. ‘माती सांगे कुंभाराला.. तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी..’
मात्र लंडनमधील टेम्स नदीत अगदी भारतात करतो तसं होडीतून बाप्पाला घेऊन जाऊन विसर्जन केलं जातं. अर्थात त्यासाठी पोर्ट ऑफ लंडन ॲथॉरिटी आणि स्थानिक प्रशासनाकडून रीतसर परवानगी मिळवलेली असते. भाड्याने घेतलेल्या या होडीत मूर्तीसोबत मंडळाची काही मोजकीच माणसं नदीच्या पात्रात अगदी मध्यभागी जाऊन विसर्जन करतात. मूर्ती शाडूचीच असावी आणि कुठल्याही घातक रसायनांनी रंगवलेली नसावी; त्याचबरोबर प्लास्टिक व निर्माल्य नदीत टाकण्यास मनाई अशा नियमांचं उल्लंघन न करण्याची काळजी महाराष्ट्र मंडळं घेतात.
जर्मनीसारख्या शिस्तप्रिय देशात मात्र नदीत प्रत्यक्ष विसर्जन न करता नदीकाठी विसर्जनाची सांकेतिक पूजा केली जाते. मूर्तीला केवळ नदीच्या पाण्याचा स्पर्श करून मग ती घरातील टबात विसर्जित करून त्याचे पाणी बागेतील झाडाझुडुपांना घातले जाते. ‘ताल जर्मनी’सारखी स्थानिक ढोल-ताशा पथके गेल्या काही वर्षांत तिथे खूप प्रसिद्ध झाली आहेत.
गणेश उत्सवात आढळणारा मराठी माणसाचा उत्साह, गणेशावरील सहज स्फुरणारा स्नेह आणि ‘गणपती बाप्पा’ हे दोन शब्द ऐकताच क्षणात जागी होणारी त्यांची अस्मिता, याचं दर्शन जिथे बहुसंख्येने स्थलांतरित भारतीय आहेत त्या देशात तर होतंच; पण जिथे हाताच्या बोटावर मोजण्याइतकी भारतीय कुटुंब असतात तिथेही भाद्रपदात ‘सुखकर्ता दुःखहर्ता’चा गजर अगदी हमखास ऐकू येतो.
परदेशातील या गणेशोत्सवाची रूपं वेगळी असतील, नियम-कायदे कडक असतील किंवा विसर्जनाची जागा टबमधील पाणी असेल; पण त्यामागे धडकणारं मराठी मन मात्र शंभर टक्के ‘अस्सल’ असतं. सात समुद्रापार राहूनही संस्कृतीची ही वीण घट्ट जपणाऱ्या आणि पुढच्या पिढीला ती अभिमानाने देणाऱ्या प्रत्येक अनिवासी भारतीयाच्या मनात, भाद्रपदात जेव्हा हा गजर घुमतो- ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ तेव्हा तिथल्या उत्तुंग इमारती आणि स्वच्छ रस्ते क्षणभरासाठी ओसरतात आणि डोळ्यांसमोर उभा राहतो तो फक्त आपला देश, आपलं घर आणि तोच जुना, आपुलकीचा अन् जिव्हाळ्याचा बाप्पा!
लेखिका आणि ट्रॅव्हलर
medhaalkari@gmail.com