

विशेष
संजीव साबडे
महाराष्ट्राच्या मातीतला गणराया आज देशाच्या सीमा ओलांडून जगभर पोहोचला आहे. भाषा, जात, पंथ आणि धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांना आपलासा वाटणारा गणपती बाप्पा आता खऱ्या अर्थाने ‘युनिव्हर्सल’ झाला आहे. भारतातील विविध राज्यांपासून अमेरिका, युरोप, आशिया आणि आखाती देशांपर्यंत गणेशोत्सवाची रंगत वाढत असून, बाप्पा श्रद्धेसोबतच भारतीय संस्कृती आणि सर्वधर्मसमभावाचे प्रतीक बनला आहे.
भारतातील व जगभरातील सर्व हिंदू आपल्या सर्व देवांना मानतात, पण श्रीराम म्हटलं की अयोध्या आठवते, श्रीकृष्ण म्हणताच डोळ्यासमोर मथुरा दिसू लागते. श्री बालाजी हा तिरुपतीचा, अय्यप्पा केरळचा, विठ्ठल हे रूप पंढरपूरचं, शनि हा शिंगणापूरचा असं म्हटलं जातं. श्रीगणेश म्हणजे गणपती बाप्पा जन्मला कैलाश पर्वतावर, पण त्याची सर्वाधिक आराधना होते महाराष्ट्रात. तो अवघ्या महाराष्ट्राचं दैवत आहे. श्रीगणेश आणि श्रीदत्त हे देव महाराष्ट्रात अधिक लोकप्रिय. श्रीदत्ताचं जन्मस्थान म्हणजे गुजरातच्या गीर पर्वतावर आहे. पण तो अधिक पूजला जातो महाराष्ट्र आणि कर्नाटकात. गणपतीची विविध रूपं महाराष्ट्रात अष्टविनायकाच्या ठिकाणीच पाहायला मिळतात. तो जणू मराठी मातीतील देव असल्याने गणपतीची सर्वाधिक मंदिरं महाराष्ट्रात आहेत. राज्यात सर्वाधिक दर्शन गणपतीचंच घेतलं जातं. त्या खालोखाल कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा आणि केरळमध्ये गणेश मंदिरं आहेत. उत्तर भारतात गणपतीची खूप प्रसिद्ध वा जुनी मंदिरं अतिशय कमीच.
गणेशोत्सव म्हणताच देशा-परदेशातील लोकांना आठवतो मुंबई-पुणे आणि एकूणच महाराष्ट्र. गणरायाच्या दर्शनासाठी कोणी उत्तर प्रदेश वा पश्चिम बंगालमध्ये गेल्याचं कधी आढळणार नाही. गणेशोत्सवात भले त्याची सर्वाधिक उंच मूर्ती हैदराबादमध्ये दिसत असेल, पण गणेशोत्सव पाहायला देशभरातील लोक येतात मुंबई आणि पुण्यातच. गणपती बाप्पाचं वैशिष्ट्य असं की तो द्रविडी राज्यांमध्ये शक्यतो कृष्णवर्णीय किंवा खरं सांगायचं तर तो गजमुख म्हणून ओळखला जात असल्यानं हत्तीच्या रंगात दिसतो. गंमत म्हणजे तामिळनाडूमध्ये नरमूख गणपतीचंही एक मंदिर आहे. तशी ती बहुधा एकमेव मूर्ती असावी. अन्य सर्वत्र वक्रतुंडाय गजमुखाय मूर्तीच आहेत. उत्तरेकडील राज्यांत गणेशाचं रूप शक्यतो भगवं वा केसरी असतं. महाराष्ट्राच्या मंदिरामध्येही गणेश मूर्ती भगवी वा शेंदरी रंगाची असेल, पण तुमच्या आमच्या घरी येणारा आणि सार्वजनिक सोहळ्यात विराजमान होणारा गणपती बाप्पा हा बहुरंगी असतो. विविध गोड रंगात त्याला सजवलेलं असतं. तो कधी क्रिकेटर असतो, कधी वैज्ञानिक असतो, कधी कमळावर, नागावर, डोंगरावर उभा असतो. तो कधी रौद्र रूपात असतो, तर कधी वात्सल्यसिंधू मातेच्या लोभसवाण्या रूपात दिसतो. गणपती हा असा एकमेव देव आहे की त्याला तुम्ही हव्या त्या रूपात सादर करू शकता. तो डाव्या सोंडेचा असतो आणि डाव्या सोंडेचाही. तो कसाही दिसला तरी तो विघ्नहर्ता आणि सुखकर्ता आहे, ही आपली केवळ श्रद्धा नव्हे, तर खात्री आहे.
देशात गणपतीची सर्वाधिक मंदिरं महाराष्ट्रात आणि त्याची सर्वात लोकप्रिय आरतीही मराठीत. जी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलीमहाराष्ट्रात मोरगावचा गणपती, मोरया सर्वात जुना. ज्ञानेश्वरांनी त्याचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांना म्हणे ही आरती सुचली. ती 80-90 टक्के मराठी भाषिक लोकांना पाठ असते वा येते. अमराठी लोकांनाही ती येते. संत सूरदासांनी लिहिलेली ‘सेंदूर लाल चढायो’ ही मवतर अनेक अमराठी लोकांना पाठ नसते. याचं कारण श्री गणेशासाठी ते तेवढं का होईना, मराठी शिकले. महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू लोकमान्य टिळकांनी केला, याचं कारण त्यांना ब्रिटिशविरोधी वातावरण तयार करण्यासाठी एक व्यासपीठ हवं होतं. त्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि त्यानंतर पेशव्याचं राज्य असताना मंदिरात व घरी गणपती हमखास पूजला जात असे. घरी व मंदिरात असलेल्या गणपतीला सार्वजनिक रूप तेल्या-तांबोळ्यांचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकमान्य टिळकांनी दिलं आणि त्यामुळे तो सर्वसामान्यांचा श्रीगणेश झाला. त्याला मंदिरं व घरातून बाहेर आणून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं मोठं कामं त्यांनी केलं. त्याचा भक्त संत मोरया गोसावी याच्यामुळे गणपती बाप्पा मोरया झाला. तो मराठी लोकांचा आहे, पण तो गुजराती, हिंदी, पंजाबी, भोजपुरी, ओडिया, बंगाली, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, कोकणी अशा सर्व भाषिकांचा झाला. शिवाय हिंदूंबरोबर देशात राहणारे बहुसंख्य पारशी, जैन, ख्रिश्चन, मुस्लिमही त्याचे भक्त झाले. हिंदी बाप्पाचा बप्पा झाला, पण श्रद्धेची भावना कायम राहिली. हिंदूंचा गणपती हा आता सर्वधर्मीय देव झाला आहे.
तो एकीकडे सामान्यांचा देव झाला आणि दुसरीकडे तो आंतरराष्ट्रीय गणपती झाला. तो युनिव्हर्सल झाला. हा 14 विद्या आणि 64 कलांचा देव असल्यानं तो अभ्यासात आला, शिक्षण संस्थांच्या प्रतिमांमध्ये आला. गाण्यात आला, नाटकात आला आणि अगदी तमाशा वा लोकांनाट्यातही आला. गणपतीइतकी गाणी अन्य कोणत्याही देवावर नाहीत. ‘गजानना श्री गणराया, आधी वंदू तुझ मोरया’ ‘प्रथम तुला वंदितो तुला गणराया’ या भक्तीगीतांपासून पासून ‘गणा धाव रे, गणा पाव रे’, ‘गणराया पडतो पाया तू धावत ये रे’, ‘शुभ मंगल चरणी गण नाचला’, ‘आधी गणाला रणी आणू या, नाही तर रंग पुन्हा सुना सुना’ ‘गणपती आला अन नाचून गेला हो’ या लोकगीतांपर्यंत तो सर्वत्र आहे. तो आधी गण येतो आणि मग गवळण आणि कृष्ण येतो. तो माणसासारखा धावत येतो आणि नाचतोही. हिंदी चित्रपटात तो ‘देवा हो देवा गणपती देवा’, ‘देवा श्री गणेशा’ ‘शंभू सुताय’ ‘बजा डंका’ अशा गाण्यात असतो. तो ‘मोरया मोरया मी बाळ तान्हे’ अशा बालगीतातही दिसतो. लहान मुलांचा सर्वात आवडता देव हा गणपतीच असतो, याचं कारण त्याचं वेगळं रूप आणि त्याच्यापुढील नैवेद्य. गणपती, हनुमान आणि कृष्ण मूर्तिमध्ये तो कधी युद्ध तयारीत दाखवला असला तरी तो प्रेमळ व खोडकरच भासतो. त्याचं ते गजमुख, ती सोंड, त्याचं मोठं पोट, त्याचा भोळा चेहरा यांमुळे मूर्ती गमतीदार वाटते.
पुणे व मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर तो महाराष्ट्राच्या अन्य भागात जाणं स्वाभाविकच होतं. ती लोकचळवळ होती. त्यानिमित्ताने राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक उपक्रम सुरू झाले. देशभरात विविध देवांच्या यात्रा, जत्रा असल्या तरी तो लोकांनी एकत्र येऊन केलेला असा उत्सव नव्हता. मुंबई ही उद्योग नागरी होती आणि आता आर्थिक राजधानी आहे. रोजगारासाठी देशभरातील लोक इथं येतात. त्यांनाही हा देव खूप भावला. त्यांनी मग बप्पाला आपल्या उत्तर प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, ओदिशा, झारखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा अशा विविध राज्यांतील घरी नेलं, तिथंही त्याचा सार्वजनिक उत्सव सुरू केला. अन्य सणापेक्षा या उत्सवात आपला सहभाग सक्रिय असल्याने गणेशोत्सव अधिक लोकप्रिय झाला, गणरायाच्या उत्सवाचं महत्व वाढलं. दक्षिणेकडील राज्यांमध्ये घरी व मंदिरात श्रीगणेश होतेच. पण तेथील लोकांनीही त्याला उत्सवाचं स्वरूप दिलं. बाप्पाचं आगमन आणि त्याचं गमन आणि त्याची आधीपासूनची तयारी, मूर्तिचे आकार, त्याची सजावट यामुळे एक धार्मिक देवतेचा सण लोकोत्सव झाला आहे. तेथील श्रीगणेश मोदक मिळाले नाहीत तर नाराज होत नाहीत, त्यांना तेथील स्थानिक मिठाईही चालते. अगदी मुंबई व अन्य शहरात अमराठी लोकांच्या घरी दरवर्षी गणपती विराजमान होऊ लागले आहेत. अगदी सात वा दहा दिवस अमराठी वा अन्य धर्माचे लोक मनोभावे पूजा व आरती करतात.
जसं देशाच्या विविध भागात गणपतीचं आगमन सुरू झालं, तसंच अन्य देशांमध्येही घरात वा मंडपात श्रीगणेशाच्या मूर्ती आणणं आणि त्याची पूजा करणं सुरू झालं आहे. आधी हे इथून गेलेल्या मराठी लोकांनी घरी गणपती आणायला सुरुवात केळी. पण पुढे त्यांच्या महाराष्ट्र मंडळासारख्या संस्थांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, स्पेन, जर्मनी, न्युझिलंड, फ्रान्स, मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, सिंगापूर, नेपाळ, श्रीलंका मॉरिशस, दुबई, अबुधाबी, ओमान, तिबेट अशा अनेक देशात घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव जोरात साजरा होऊ लागला आहे. तिथं स्थायिक झालेले वा राहणारे भारतीय हा उत्सव जसा साजरा करतात, तसंच तेथील स्थानिक लोकही गणपती आणू लागले आहेत वा त्या उत्सवात सहभागी होऊ लागले आहेत. मध्यंतरी अमेरिकेतील अटलांटा शहरातील एका मॉलमध्ये अनेक गणेश मूर्ती विक्रीला ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. सोबत आराससाठी लागणाऱ्या वस्तू, नि्रांजन, तबक, समई, धूप, कापूर हे पूजेचं सामानही होतं तिथं. माव्याच्या मोदकांचे बॉक्सही विक्रीला होते. असं चित्र अनेक शहरात पाहायला मिळू लागलं आहे. तिथं भारतीय आणि त्यातही मराठी मंडळींना गणपती बाप्पा दरवर्षी एकत्र आणत असतो. त्यांच्यामुळे स्थानिक लोकांमध्ये मराठी लोकांचा आवडता गणराया प्रिय झाला आहे. आपले शेजारी असलेल्या पाकिस्तान व बांगलादेशातही घरगुती वा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो. पाकिस्तानच्या कराची शहरात एका मुस्लिम कारागिराने गणेशाची मूर्ती तयार केल्याच्या बातम्याही प्रकाशित झाल्या होत्या.
याखेरीज जपान, थायलंड, इंडोनेशिया, चीन, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, सिंगापूर, कंबोडिया, भूतान आदी देशांमध्ये भल्या मोठ्या वा प्राचीन गणेश मूर्ती आहेत वा त्याची मंदिरं आहेत. बौद्ध धर्माच्या लोकांतही गणपतीला महत्वाचं स्थान आहे. मध्यंतरी कर्नाटक व तामिळनाडूच्या सीमेवर असलेल्या तिबेटी निर्वासितांच्या गावांत जाणं झालं. तेथील दुकानांत गौतम बुद्ध, दलाई लामा यांच्याबरोबर भगवान गणेशाची प्रतिमाही दिसली. तिबेटी बौद्धांच्या महासान्हीक, महायान व वज्रयान परंपरेत विघ्नटक गणेशाचं स्थान मोठं असल्याचं दुकानदार म्हणाला. ते गणेशाला समृद्धी व संपत्तीचंरक्षण करणारा देव मानतात. अन्य देशांतील लोक त्यांच्या पद्धतीने श्रीगणेशाची पूजाअर्चा करतात. भारताबाहेरही त्याची सर्वाधिक मंदिरं आहेत, असंख्य मूर्ती आहेत आणि कैक देशात त्याचा उत्सवही साजरा होतो. त्याच्या सोहळ्यात सर्वांना सहभागी होता येतं, हेही त्यामागील कारण म्हणता येईल. परदेशात साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवाची व्याप्ती आपल्याला माहीत नसते. यावर्षी भारतातून तब्बल 5 लाख परदेशी रवाना झाल्या. त्यापैकी बहुतेक सर्व पेणमधून. एका गणेश मूर्ती तयार करणाऱ्या कला केंद्रातूनच सुमारे 20 हजार मूर्ती परदेशी गेल्याचं वाचनात आलं. साधारण सात आठ इंचापासून पाच सात फुटापर्यंतच्या काही लाख मूर्ती दरवर्षी परदेशात जातात, याचं कारण आपले गणपती बाप्पा खरोखर युनिव्हर्सल आहेत आणि ते जात, पंथ, देश आणि धर्माच्या वर्तुळातून केव्हाच बाहेर पडले आहेत. ते सर्वधर्म समभावाचं प्रतीक बनले आहेत.
sanjeevsabade1@gmail.com