गोव्यातील 'ग्लोइंग फॉरेस्ट' !

पावसाळी रात्री गोव्याच्या जंगलात अनुभवलेला हिरव्या प्रकाशाचा तो क्षण आजही डोळ्यांसमोर ताजा आहे. निसर्ग किती अद्भुत असू शकतो, याची जाणीव करून देणारा हा अविस्मरणीय अनुभव.
गोव्यातील 'ग्लोइंग फॉरेस्ट' !
गोव्यातील 'ग्लोइंग फॉरेस्ट' !
Published on

डोळस भटकंती

मुक्ता नार्वेकर

पावसाळी रात्री गोव्याच्या जंगलात अनुभवलेला हिरव्या प्रकाशाचा तो क्षण आजही डोळ्यांसमोर ताजा आहे. निसर्ग किती अद्भुत असू शकतो, याची जाणीव करून देणारा हा अविस्मरणीय अनुभव.

पावसाळ्यात रात्री चमकणारं जंगल तुम्ही पाहिलंय? हो की नाही..? हा मात्र निसर्गाचा हा आविष्कार मी गोव्यातील जंगलात पाहिलाय. गोव्याला जसे सुंदर समुद्रकिनारे लाभले आहेत तसेच नेत्र सुखावणारे जंगलही गोव्यात आहे. मी जो अनुभव सांगणार आहे तो आहे गोव्यातील भगवान महावीर वन्यजीव अभयारण्याच्या जवळ असणाऱ्या जंगलातील. या जंगलात सकाळी फिरतानाही उजेड कसाबसा जमिनीवर पोहोचतो; इतकं घनदाट जंगल इथे आहे. पावसाळ्यात तर हे जंगल हिरवकंच असतं. डोंगराच्या अंगाखांद्यावर ढग उतरलेले दिसतात, झाडीत धुकं अडकलेलं दिसतं. धबधबे, नद्या अगदी ओसंडून वाहत असतात. दिवसाउजेडा हा परिसर पाहणं म्हणजे पर्वणी असतेच; पण रात्री हे जंगल पाहणं एक संस्मरणीय अनुभव ठरतो.

गोव्याच्या या जंगलाची भटकंती करण्यासाठी मी भगवान महावीर वन्यजीव अभयारण्याच्या बफर झोनमध्ये असणाऱ्या सुर्ला या गावात राहिले होते. तिथे 'नेचर्स नेस्ट' या सुंदरशा निसर्गरम्य रिसॉर्टमध्ये माझा मुक्काम होता.

त्यादिवशी दुपारी अगदी मुसळधार पाऊस पडून गेला. संध्याकाळपर्यंत मग हलक्या हलक्या सरी कोसळत होत्या. उजेड निघून काळोख पसरू लागला तसं बेडकांचं डराव डराव, किटकिटकिट असे नानाविध जंगलाचे आवाज कानावर पडू लागले. पावसाची सर आली की, हे आवाज बंद व्हायचे आणि सर निघून गेली की पुन्हा ही रात्रीची सिंफनी जंगल सुरू करायचं. हा रात्रीच्या जंगलाचा आवाज मी रूमच्या पडवीत बसून कानात साठवत होते. साधारण आठ वाजले असतील. रिसॉर्टचा निसर्ग मार्गदर्शक आला आणि म्हणाला- “आता निघूयात आपण. तुमचे बूट, रेनकोट घेऊन रिसेप्शनजवळ या. मीसुद्धा तयारी करतो आणि जीप रेडी करतो.”

शूज, रेनकोट घालून मी तयार झाले. थोड्या वेळात रिसेप्शनजवळ पोहोचले. पुढे मग निसर्ग मार्गदर्शकाने (naturalist) टॉर्च बरोबर घेतली आणि जीपने जंगलातील त्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो. तिकडे जातानाही वाटेत सांबर, गवे यांचं दर्शन झालं. उद मांजरही झाडावर दिसत होतं. थोड्याच वेळात आम्ही ठरलेल्या स्थळी पोहोचलो. गाडी बंद केल्यावर कुठलाही उजेड आजुबाजूला नव्हता. काळाकुट्ट अंधार चारी बाजूला होता. जंगलाच्या वातावरणाची तीव्रता अधिक जाणवू लागली. मन थोडं कावरबावरं झालं. तितक्यात निसर्ग मार्गदर्शकाने टॉर्च सुरू केली. एक टॉर्च माझ्या हातात दिली. टॉर्चच्या त्या वर्तुळाकार उजेडात दिसेल तितकंच जंगल दिसत होतं. निसर्ग मार्गदर्शक म्हणाला, “पुढे १० मिनिटांचा हा वॉक आहे. मग आपण पोहोचू.” टॉर्चच्या उजेडात त्या वाटेवरून चालू लागलो. भवताली उंच झाडं होती, उंचीएवढी झुडुपं होती. सारा परिसर ओलेता झाला होता. वाटही इतकी ओलसर होती की, शूज घालूनही तो थंड स्पर्श पायाला जाणवत होता. जाताना आम्हाला वाटेत झुडुपावर वेटोळे घालून बसलेला एक हिरवा सर्प दिसला. हरणटोळ त्याचं नाव. दिसतोही तो अगदी नाजूक वेलीसारखाच. रात्रीचं हे जंगल अनुभवत पायपीट सुरू असताना निसर्ग मार्गदर्शक म्हणाला, “इथे आता थांबूया आपण.”

आम्ही जिथे थांबलो होतो तिथे समोर एक उंच झाड होतं. बाजूला काही झुडुपं होती आणि जमिनीवर पालापाचोळा, काही काटक्या पडलेल्या होत्या.

पुन्हा त्याने लगेच उत्साहाने पण जंगलाचा मान राखत हळू आवाजात सूचना केली की, “आता जे आपण पाहणार आहोत ते उजेडात बिलकुल दिसत नाही. असेच डोळे उघडे ठेवले तरीही पटकन दिसणार नाही. आपण काय करूयात. आता टॉर्च बंद करूया.” त्याच्या सूचनांचं पालन केलं. टॉर्च बंद केल्यावर तो म्हणाला, “आता डोळे मिटा. मी ५ पर्यंत आकडे म्हणतो. मग सावकाश डोळे उघडायचे.”

मी डोळे बंद केले. रात्रीचे काळोख्या जंगलाचं ते वातावरण मला जाणवत होतं. थोडी भीती वाटत होती. १.२..३..४..५..असे हळुवार आकडे त्याने म्हटले. मी सावकाश डोळे उघडले. पाहते तर त्या काळोखात मगाशी पाहिलेल्या झाडाच्या खोडावर अस्फुटसा हिरवा चमकदार प्रकाश दिसू लागला. डोळे जसे जसे सरावले तसा तो हिरवा चमकदार प्रकाश अगदी लख्ख दिसू लागला. थोड्या वेळात अगदी विस्तवासारखा चमकू लागला. निम्म झाड त्या हिरव्या चमकदार प्रकाशात उजळत होतं. त्याच्या पायथ्याशी असलेल्या काटक्याही त्या हिरव्या रंगात चमकत होत्या. माझा माझ्या डोळ्यावर विश्वास बसेना. निसर्गाचा हा आविष्कार मी थक्क होऊन पाहत होते. चित्रपटात असे काहीसे प्रसंग vfx मधून घडवून आणतात, पण निसर्गाची ही किमया मी याचि देही याची डोळा अनुभवत होते.

“हा प्रकाश येतो कुठून?” असा प्रश्न माझ्याकडून बारीक आवाजातच विचारला गेला. त्याचे शब्द कानावर पडले की- “ही जादू झाडावर उगवलेल्या Bioluminescence Fungi मुळे बघायला मिळते.”

Bioluminescence Fungi म्हणजे?

“मृत स्थितीतील झाडावर एक विशिष्ट जीवदिप्तीमान कवक वाढतं. यांच्यात ल्युसिफेरीन रसायन असतं. त्याचा संयोग ऑक्सिजनसोबत झाला की ही प्रकाशनिर्मिती होते.” त्याचे शब्द कानावर पडत होते, पण मला अगदी जादुई विश्वात गेल्यासारखं वाटत होतं.

निसर्गाची ही किमया मी त्या काळ्याकुट्ट अंधारात डोळे भरून पाहिली. निघायची वेळ झाली. मी कॉटेजवर परत आले. माझे डोळे, माझे मन आनंदाने चमकत होते, जणू त्या चमकदार हिरव्या प्रकाशाचा अंश मी माझ्यात घेऊन आली आहे. सारं काही चैतन्यमयी वाटत होतं. ही सगळी निसर्गदेवतेची कृपा आहे.

पहा ना!! आपण आपल्या गाडीतून जंगलाच्या शेजारून जाणाऱ्या रस्त्याने प्रवास करत असतो. त्याची हिरवाई, तिथले नजारे ओझरते पाहत जातो. कधी तरी ठरवून अशी निसर्ग भटकंती करायची. ती सुद्धा एका Naturalist सोबत करायची. या हिरव्यागार लोभस दिसणाऱ्या जंगलात किती प्रजातीचं जीवन आहे, त्यांचीही वर्तने आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. मग निसर्ग कधी कधी असे अनमोल क्षण आपल्या पदरात टाकतो. यातूनच मग भटकंती अनुभवसंपन्न होऊन जाते.

ट्रॅव्हल व्लॉगर

muktanarvekarofficial@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in