सिन्नरच्या शिवमंदिराचा ठेवा जपायचा कुणी?

या तीर्थस्थानी आत्मस्तुतीचे भाट नाहीत. अंधश्रद्धेचे पूजापाठ नाहीत. ‘पकड मुंडी, ठेव चरणी नि ढकल बाजूला’ अशी पुजाऱ्यांची दंगामस्ती नाही. दर्शनरांगांचा भेदभाव नाही. देणग्यांची सक्ती नाही की ऑनलाइन दर्शनाचा बाजार नाही, असे अप्रतिम कलासौंदर्याविष्काराने सजलेले जनमनातील शिवतीर्थ म्हणजे नाशिकच्या सिन्नर येथील श्री गोंदेश्वर शिवमंदिर.
सिन्नरच्या शिवमंदिराचा ठेवा जपायचा कुणी?
Published on

दुसरी बाजू

प्रकाश सावंत

या तीर्थस्थानी आत्मस्तुतीचे भाट नाहीत. अंधश्रद्धेचे पूजापाठ नाहीत. ‘पकड मुंडी, ठेव चरणी नि ढकल बाजूला’ अशी पुजाऱ्यांची दंगामस्ती नाही. दर्शनरांगांचा भेदभाव नाही. देणग्यांची सक्ती नाही की ऑनलाइन दर्शनाचा बाजार नाही, असे अप्रतिम कलासौंदर्याविष्काराने सजलेले जनमनातील शिवतीर्थ म्हणजे नाशिकच्या सिन्नर येथील श्री गोंदेश्वर शिवमंदिर.

कुंभमेळ्याचे वेध लागलेल्या नाशिकपासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर आणि बहुचर्चित मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गालगतच्या सिन्नर फाट्यापासून अगदी जवळच श्री गोंदेश्वराचे साजिरे, गोजिरे शिवमंदिर आहे. बाराव्या शतकाच्या प्रारंभी राजा राजगोविंद यांनी या शिवमंदिराची उभारणी केल्याची आख्यायिका आहे. गुलाबी छटा असलेल्या ठिसूळ दगडात अत्यंत कौशल्याने कोरलेले अन् नाजूक नक्षीकामाने साकारलेले हे हेमाडपंथी मंदिर आहे. या ठिकाणी एका बाजूला गणपती, पार्वतीची, तर दुसऱ्या बाजूला सूर्य देवता व विष्णू देवता यांची सारख्याच आकाराची छोटी छोटी मंदिरे आहेत. या चारही छोट्या मंदिरांच्या मधोमध आकाशाची उंची गाठणारे भव्य शिवमंदिर आहे. पाच मंदिरांचा समूह असलेले हे शिवमंदिर पंचायतन मंदिर म्हणूनही ओळखले जात आहे.

सिन्नरच्या गोंदेश्वर महादेव मंदिराच्या चारही बाजूंनी दगडी तटबंदी आहे. गोंदेश्वर मंदिराच्या पूर्वदिशेला सर्वप्रथम लागतो तो आकाशाशी नाते जोडणारा विलोभनीय स्वर्गमंडप. हा स्वर्गमंडप कोल्हापूरजवळच्या खिद्रापूर येथील प्राचीन कोपेश्वर मंदिरातील स्वर्गमंडपाच्या आठवणी ताज्या करतो. या दोन्ही मंदिरांमधील स्वर्गमंडपाचा फरक इतकाच की, कोपेश्वर मंदिरातील स्वर्गमंडप हा मुख्य मंदिराचाच एक भाग आहे, तर गोंदेश्वर मंदिराचा स्वर्गमंडप मुख्य मंदिरापासून काहीशा दूर अंतरावर आहे. आपल्या देशातील बहुसंख्य मंदिरांत नंदी पाहायला मिळत असला तरी गोंदेश्वर मंदिराबाहेरील आवारात स्वतंत्र नंदीगृह आहे. त्यापुढे प्रवेशगृह, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिर समूहाची नितांतसुंदर रचना आहे. लक्ष्मीचे वाहन असलेल्या हत्तींची मंदिराच्या सभोवताली रांग असून त्यांच्या अंबारीवरच जणू काही महादेव मंदिर विराजमान आहे, असे जाणवते. गर्भगृहातील जलाभिषेकानंतरचे पाणी थेट मंदिराबाहेरच्या गोमुखातून बाहेर पडत असल्याची अनेक उदाहरणे असली, तरी या मंदिरातील अभिषेकयुक्त पाणी मंदिराबाहेर गंगेचे वाहन असलेल्या अलंकृत मकरमुखातून बाहेर पडते, हे या मंदिराचे आगळेवेगळे वैशिष्ट्य. काहीशा ठिसूळ व्हेसिक्युलर दगडात मोठ्या मेहनतीने, कौशल्याने व आपल्या ज्ञानसंपन्न अनुभवातून शिल्पकारांनी साकारलेल्या गोंदेश्वर मंदिराची आतील व बाहेरील प्रत्येक भिंत, खांब, पायऱ्या आणि छतावर कोरलेल्या शिल्पाकृती मंदिराच्या सौंदर्याला नवा आयाम देत आहेत. संपूर्ण मंदिर कोरीव शिल्पाकृतींनी, नक्षीकामाने सजले आहे. रामायण, महाभारतामधील पौराणिक कथांवर आधारित शिल्पचित्राकृती अगदी बोलक्या आहेत. मुख्य मंदिराच्या भिंतीवर ब्रम्हा, पार्वती, शिव, भैरवाच्या मूर्ती विराजीत आहेत. देवीदेवता, अप्सरा, गंधर्व, यक्षिणी, वादन, गायन, नर्तन करणाऱ्या सूरसुंदरींच्या देखण्या नि बोलक्या दगडीशिल्पांनी मंदिर जिवंत झाले आहे. नंदी, वराह, कासव, हत्ती, मोर, वेलीबुट्टी, फुले यांनी मंदिराच्या नजाकतभऱ्या सौंदर्यात मोलाची भर घातली आहे. ऊन-सावल्यांच्या रंगछटांमधून मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. गर्भगृहातील शिवलिंगही आखीव- रेखीव आहे. नंदी मंडपावरील वराह व नरसिंह या प्रतिमासुद्धा आपल्याला पौराणिक काळात घेऊन जातात. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर द्वारपाल, द्वारपालिकांचा शिल्पाकृती जागता व खडा पहारा आहे, तोही मनोवेधक. शेकडो कीर्तिमुखेही जागोजागी कोरण्यात आली आहेत. देवकोष्टकांवर नक्षीकाम आहे. चौकोनी, गोलाकार, आयताकृती द्वारशाखा आहेत. अंतराळाचे वर्तुळाकार छतही नानाविध फुलांच्या पाकळ्यांनी बहरले आहे. या मंदिराचे खांब ‘इंटरलॉक’ पद्धतीने जोडण्यात आले असून तेथील प्रत्येक खांब पौराणिक कथांमध्ये रममाण झालेला आहे, तोही भावभोळ्या भक्तांप्रमाणे. विशिष्ट दिवशी या मंदिराच्या गर्भगृहातील शिवलिंगावर होणारा सूर्यकिरणोत्सव आणि स्वर्गमंडपातून होणारा चंद्रकिरणोत्सव आपल्याला आनंदाची वेगळीच अनुभूती देऊन जातो, हे अगदी खास.

सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिराला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला असला तरी स्थापत्य कलाशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेले, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि शांतचित्त ध्यानधारणेचा उत्तुंग वारसा जपणारे हे शिव मंदिर काहीसे दुर्लक्षितच राहिल्याचे दिसून येत आहे. समृद्धी महामार्गालगत हे मंदिर असूनही तेथे मंदिराची माहिती देणारा दिशादर्शक फलक नाही. तो लावल्यास पर्यटकांना मंदिराकडे जाणे सहजसोपे होईल. ज्या शेकडो हत्तींच्या पाठीवर मंदिर उभे आहे, त्या सर्व हत्तींची सोंड परकीयांच्या आक्रमणादरम्यान छाटली गेलेली आहे. या मंदिराचा दगड कालौघात जीर्ण होऊन झिजला आहे. मंदिराच्या काही भागांमध्ये भेगा पडल्या आहेत. काही मूर्तींचे उरलेसुरले भग्नावशेषसुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या मंदिराच्या देखभाल-दुरुस्तीकडे पुरातत्त्व विभागाने व स्थानिक प्रशासनाने तातडीने, गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. या मंदिरापासून हाकेच्या अंतरावर तहसील कार्यालय असूनही मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यातून स्थानिक प्रशासनाला या गौरवशाली वारशाविषयी काही देणेघेणे नाहीच की काय, असा प्रश्न पडतो. या मंदिराची ढासळलेली संरक्षक भिंत तातडीने दुरुस्त व्हायला हवी. मंदिराच्या प्रवेशद्वारावरच ठाण मांडलेले विक्रेते मंदिराची आगळीच ‘शोभा’ करीत असल्याने त्यांची स्वतंत्र व्यवस्था व्हायला हवी. या मंदिरात तीन पाळ्यांमध्ये तीन सुरक्षारक्षक असले, तरी त्यात वाढ करण्याची आवश्यकता आहे. मंदिराच्या आवारात बागबगीचा निर्माण करण्यासाठी स्वतंत्र माळी नियुक्त व्हायला हवा. या मंदिरात येणाऱ्या पर्यटकांसाठी वाहनतळासोबतच स्वच्छतागृहसुद्धा हवे. या प्राचीन मंदिराच्या माहितीचा खजिना पर्यटकांपुढे उलगडण्यासाठी प्रशिक्षित गाईड नेमायला हवेत. हे मूलभूत प्रश्न सोडवण्याची किमान राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्ती असायला हवी.

समाजातील अनिष्ट रूढीपरंपरा, चालीरीती, धार्मिक कर्मकांडांवर, दांभिकतेवर, चमत्कारांवर आसूड ओढत, भेदाभेद अमंगळ असल्याचे सांगत, विश्वबंधुत्वाचा, समतेचा, ममतेचा महामंत्र देणाऱ्या संत सज्जनांच्या, प्रवचनकारांच्या, कीर्तनकारांच्या, प्रबोधनकारांच्या, समाजसुधारकांच्या वैचारिक पायावर आपला पुरोगामी महाराष्ट्र आजही भक्कमपणे उभा आहे. तथापि, चमत्कारिक भोंदू बाबा-महाराजांना आजकाल राजाश्रय मिळू लागला आहे. त्यांच्या मेळ्यांना राजमान्यता देण्याचे प्रयत्न होत आहेत. दुसरीकडे भारताचा स्थापत्य कलाशास्त्राचा, विज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा, ज्ञानसाधनेचा गौरवशाली वारसा समृद्ध करणाऱ्या प्राचीन मंदिरांच्या डागडुजीकडेच नव्हे, तर ज्या गुरवांनी, पुजाऱ्यांनी फलाची अपेक्षा न बाळगता गडकिल्ल्यांवरील प्राचीन मंदिरांची नि:स्वार्थी भावनेने अहर्निश सेवा केली, त्यांच्याकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ व पैसा सुद्धा नाही, ही देखील शोकांतिकाच म्हणावी लागेल. आपल्या गडकिल्ल्यांचे, प्राचीन मंदिरांचे कलावैभव, तेथील सभ्यता, सुसंस्कृतपणाचा वैचारिक वारसा टिकवायचा, इथल्या शाळारूपी ज्ञानमदिरांना, सेवाधर्मात पुण्याई सांगणाऱ्या रुग्णालयरूपी समाजमंदिरांना, तेथील विद्यार्थी, रुग्णांना मदतीचा हात द्यावयाचा की, अवैज्ञानिक, चमत्कारिक भोंदू बुवा, बाबा, महाराजांच्या कच्छपी लागायचे, त्यांच्या मेळ्यावर सरकारी तिजोरीतून कोट्यवधीची उधळण करत मतपेढीचे राजकारण करायचे यावर विचार करण्याची वेळ आली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आपल्या तिजोऱ्या खुल्या करणाऱ्या सरकारने व स्थानिक प्रशासनाने प्राचीन व अप्रतिम कलासौंदर्याविष्काराने सजलेल्या सिन्नरच्या शिवमंदिराचे अस्तित्वच नव्हे, तर पावित्र्य जपायलाच हवे.

prakashrsawant@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in