गोरिलांच्या मनुष्यलीला...

रवांडाच्या वोल्कॅनो नॅशनल पार्कमधील ‘गोरिला ट्रेक’ हा केवळ जंगलभ्रमण नाही, तर मानवाचे सर्वात जवळचे नातेवाईक मानल्या जाणाऱ्या पर्वतीय गोरिलांच्या जगात डोकावण्याची दुर्मीळ संधी आहे. ‘हाऊस ऑफ बांबूज’मधील हा तास आयुष्यभर स्मरणात राहणारा ठरतो.
गोरिलांच्या मनुष्यलीला...
गोरिलांच्या मनुष्यलीला...
Published on

जगतवारी

मेधा आलकरी

रवांडाच्या वोल्कॅनो नॅशनल पार्कमधील ‘गोरिला ट्रेक’ हा केवळ जंगलभ्रमण नाही, तर मानवाचे सर्वात जवळचे नातेवाईक मानल्या जाणाऱ्या पर्वतीय गोरिलांच्या जगात डोकावण्याची दुर्मीळ संधी आहे. ‘हाऊस ऑफ बांबूज’मधील हा तास आयुष्यभर स्मरणात राहणारा ठरतो.

रवांडा देशातील वोल्कॅनो नॅशनल पार्क येथील विरुंग पर्वताच्या मध्यावर वसलेल्या उमुबानो या गोरिलाच्या कुटुंबाला त्यांच्या नैसर्गिक निवासात पाहण्यासाठी आम्ही हा ‘गोरिला ट्रेक’ करण्याचा घाट घातला होता. अंगाचं मुटकुळं करून झोपलेल्या गोरिलाचं प्रथम दर्शन झालं होतंच. त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आता आमच्याकडे फक्त एक तास होता. त्यापेक्षा अधिक काळ माणसांच्या संगतीत घालवणं गोरिलांच्या आरोग्यासाठी हितकारक नाही म्हणून हे वेळेचं बंधन.

कुटुंबवत्सल, कबिल्यासोबत राहणाऱ्या गोरिला जातीत एकटाच बसलेला, आपल्या मस्तीत जगणारा एकलकोंडा गोरिला पाहिला आणि वाटलं, हा ‘एकला चलो रे’ तत्त्वज्ञानाचा अनुयायी आहे की प्रेमभंग झालेला ‘देवदास’?

“देवदास नाही, तो आपल्या आगाऊपणाची शिक्षा भोगतोय.” गाईडने मौलिक माहिती पुरवली. बुचकळ्यात पडलेल्या पर्यटकांना मग त्याने गोरिलांची कुटुंबपद्धती समजावून सांगितली. कुटुंबप्रमुख असतो अल्फा सिल्व्हर बॅक. सिल्व्हर बॅक म्हणजे पाठीवरचे केस रुपेरी झालेला प्रौढ नर. तीन-चार माद्यांचा जनाना तो जवळ बाळगतो आणि पिलावळही असते बऱ्यापैकी. त्याचं वजन असतं चांगलं दोन अडीचशे किलो आणि खुराक म्हणाल तर ३५ किलोंचा. त्यामानानं माद्या वीस किलो चाऱ्यावर आपली गुजराण करतात आणि वयोमानाप्रमाणे त्यांची कातडी सुरकुतली तरी केस मात्र काळेच राहतात. गोरिलांची वयोमर्यादा असते सेहेचाळीस वर्षं. वयाच्या दहाव्या- बाराव्या वर्षी या नरांना पाठीवर रुपेरी ‘मिसुरडं’ फुटू लागतं आणि ते माद्यांकडे आकर्षित होतात. मात्र त्यांनी लक्ष्मणरेषा ओलांडली तर त्यांचा बाप त्यांना कधी चौदावं रत्न दाखवतो तर कधी कुटुंबाबाहेर राहण्याची शिक्षा ठोठावतो. आम्ही पाहिलेला एकला गडी हा असाच तडीपार! उमुबानो कुटुंबातील नर चार्ल्स याने दुसऱ्या कुटुंबातून लगीन करून नवी नवरी आणली आणि तिच्यावरच या किशोरवयीन मुलाची वाईट नजर पडली. या आगळिकीनं बापाचं पित्त न खवळतं तरच नवल! त्याने पोराला बांबूचा खरपूस चोप दिला. गाईडने आम्हाला त्याचे ताजे व्रणही दाखवले. तेवढ्यावरच न भागता त्याला कुटुंबाबाहेर राहण्याची कठोर शिक्षाही झाली.

एव्हाना आम्ही चालत चालत चार्ल्स सिल्व्हर बॅकच्या ‘हाऊस ऑफ बांबूज’पाशी येऊन पोहोचलो. बांबूच्या झाडांच्या काड्या वाकवून आणि जमिनीवर पाला पसरून मजेत पहुडलेलं त्याचं लेकुरवाळं कुटुंब पाहून आम्ही हरखूनच गेलो. ‘बांबूचे घर, बांबूचे दार, बांबूची जमीन पिवळीशार!’ चार्ल्सची वामकुक्षी चालू होती. बांबूतून डोकावणाऱ्या उन्हाच्या कवडशात त्याची रुपेरी पाठ चमकत होती. घरात एक ओली बाळंतीण होती. दीड महिन्याच्या बाळाचं स्तनपान चालू होतं. पिता पिता त्याने दचकून भेदरलेल्या नजरेनं आमच्याकडे पाहिलं आणि आईच्या पोटाला घट्ट धरून ठेवलं. त्या माऊलीचा सरावला हात आपसूकच त्याच्या पाठीवर गेला. दीड-दोन वर्षांची दोन पिल्लं तर इतकी गोड होती जणू काळ्या लोकरीचे गुंडे. चार वर्षं वयाच्या गोरिला कन्या अगदी गळ्यात गळा घालून झोपल्या होत्या. तीन सवतीही एकमेकींच्या बाजूस शांत पहुडल्या होत्या. लक्ष देऊन न्याहाळू लागल्यावर त्यांच्या मानवसदृश हालचाली, सवयी, लकबी पाहून आम्ही अचंबितच झालो. मोठ्या मालकीणबाई एक हात डोळ्यावर, दुसरा छातीवर आणि उजवं पाऊल गुडघ्यावर ठेवून झोपल्या होत्या. दुसरी सवत हाताची घडी घालून कुशीवर लवंडली होती आणि तिसरी चक्क मर्कटासनात! फतकल मारून बसलेली वयाने थोडी मोठी मुलं आपल्यातच मग्न होती. एकाने नाकात तर्जनी घालून ‘कोरीवकाम’ सुरू केलं होतं; तर त्याचा भाऊ कानात करंगळी घालून अगदी माणसासारखा कान खाजवत होता. थोड्या वेळाने मर्कटजातीच्या आवडत्या कामात, एकमेकांच्या कातडीत गच्चं रुतून बसलेल्या कीटकांना काढून फेकण्यात ते गुंग झाले. गोरिलांच्या हातापायाला मनुष्यासारखीच पाच बोटं असतात. पायाचा अंगठा इतर बोटांपेक्षा मोठा असतो. दातांची बत्तीशी असते. (फळणारी?) पुढे सुळे, मागे दाढा. मनुष्याच्या हातापायांच्या ठशांऐवजी नाकाची ठेवण ही त्यांच्या व्यक्तिविशेषाची ओळख आहे. प्रत्येक गोरिलाच्या नाकाची ठेवण वेगळी. एका परीस दुसरं नाक नाही. शास्त्रज्ञ या नाकावरूनच त्यांना ओळखतात. गोरिला हा माणसासारखाच बुद्धिमान, समाजशील, भावनिक गुंतवणूक असलेला आणि पंचेंद्रिय पूर्ण विकसित झालेला प्राणी आहे.

त्या लोकरीच्या गुंड्यांच्या बाललीला पाहता पाहता पुढचा तास कसा गेला कळलंच नाही. बांबूच्या एका खांबाभोवती ते खेळत होते. मध्येच सरसर वर चढत आणि वरून खाली धप्पकन उडी मारत. ‘कोण दमतंय बघू?’ अशी शर्यतच लावली असावी बहुदा. थोड्याच वेळात ते कंटाळून खांब सोडून जमिनीवर आले. एकमेकांच्या अंगावर लोळण घेत, पाठीवर धबधबा मारत, कुस्ती करत, चिडवत, गुदगुल्या केल्यागत खेळू लागले. आता त्यातला एक रुसला. बाजूला जाऊन पाठ करून बसला. ‘रुसूबाई रुसू’ म्हणत दुसरा त्याला बोटाने डिवचू लागला. परत एकदा घनघोर मुष्ठियुद्ध झालं. ‘मी नाही जा..’ म्हणत जमिनीवर हातपाय आपटले गेले. ‘ ए चीटर चीटर’चा चिवचिवाट झाला. पुढच्या पाचच मिनिटांत राग विरघळला, युती झाली आणि सरसर खांबावर चढणं आणि उड्या मारणं सुरू झालं. या सगळ्यात आपल्या बालगोपाळांसारखा आवाज होता; उणीव होती ती खिदळणाऱ्या हास्याची. विधात्याची फक्त मानवजातीलाच दिलेली ही खास देणगी!

प्रसंगी खूप आकांततांडव करून घाबरवून सोडणारा सिल्व्हर बॅक त्याच्या बच्च्या-कच्च्यांसमोर खूपच मवाळ असतो. आमचा चार्ल्स फक्त एकदाच मुलांवर गुरकावला होता. त्यात ‘येऊ का रे तिकडं?’ अशी गोड धमकी असावी. लहानपण सरलं आणि वजनाचा काटा उजवीकडे झुकू लागला की या बछड्यांचं झाडावर चढणं थांबून जातं. मग तीस टक्के वेळ उदरभरणात, चाळीस टक्के निद्रादेवीच्या कुशीत आणि उरलेला वेळ मार्गक्रमणात जातो. मधूनच माझी नजर वर्गाबाहेर उभे केलेल्या त्या नाठाळाकडे जात होती. ऊस हातात धरून त्याची सालं तोंडाने ओरबाडून, बेदरकारपणे चिपाड थुंकणाऱ्या गावरान खलनायकासारखा तो नेटलची कांडी खाण्यात दंग होता.

हळूहळू कबिल्याला जाग आली. मघापासून शांत झोपलेल्या त्या बहिणी उठल्या. उभं राहून एक जोरकस आळस देत पुन्हा एकमेकींच्या गळ्यात पडल्या. मला वाटलं आता फुगडी घालतात की काय? ‘आम्ही दोघी बहिणी जोडीच्या…’ तेवढ्यात तो लोकरीचा गुंडा येऊन आईच्या पाठुंगळी बसला. घरात वर्दळ सुरू झाली तरी बाबा ढिम्म हलत नव्हते. घड्याळाचे काटे वेळ संपत आल्याची टिकटिक करत होते. सिल्व्हर बॅकला पूर्ण आवेशात उभा ठाकलेला पाहायला मिळणार नाही अशी चुटपुट मनाला लागली असतानाच मनकवड्या चार्ल्सनं झोप आवरून एक झक्कास आळस देत, आपलं विराट रूप आम्हाला दाखवलं. फोटो घेण्यासाठी बहुदा कुणीतरी सुरक्षित अंतर पार केलं असावं. त्याने तत्क्षणी डोक्यावरील बांबूची फांदी कचकन तोडून आमच्यासमोर आपटत शत्रुघ्न सिन्हासारखी ‘खामोश!’ अशी डरकाळी फोडली आणि आपल्या तान्हुल्याची खबरबात घ्यायला तो आपल्या पट्टराणीजवळ पोहोचला. आमचा जादुई तास या क्लायमॅक्सवर येऊन संपला.

मानवाशी साधर्म्य असलेल्या आपल्या या पूर्वजांचा निरोप घेणं खरंच खूप जड गेलं. पर्वतीय गोरिला हे विनाशाच्या पदचिन्हांवर उभे आहेत हे ऐकून तर मन खूपच हळहळलं. रवांडा, युगांडा आणि कांगो या तिन्ही देशांची सरकारं त्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी प्रयत्नशील आहेत ही बाब खरंच प्रशंसनीय आहे. जंगलं साफ करून शेती करणं, सरपणासाठी व लाकूडफाट्यासाठी जंगलतोड करणं हे गोरिलांच्या राहत्या घरावर अतिक्रमण आहे. त्यांना जिवंत ठेवायचं तर त्यांच्या मुक्त विहारासाठी हवं मोकळं, घनदाट रान. ते अबाधित ठेवण्यासाठी सरकार आणि स्थानिक एकत्रितपणे काम करत आहेत. हे प्राणी काळाच्या पडद्याआड गेले काय, न गेले काय आपल्याला इतक्या लांब काय फरक पडतोय? असा प्रश्न कदाचित कुणाच्या मनात उद्भवू शकतो. परंतु आपण सगळे या सृष्टिरूपी माळेचे मणी आहोत, एकत्र गुंफलेले आहोत. ही माळ अभंग राहण्यासाठी प्रत्येक मण्याची काळजी घ्यायलाच हवी. गेल्या काही वर्षांत रवांडा सरकारनं या वन्यप्राणी संरक्षण व संवर्धन कार्यक्रमात नागरिकांना सामील करून घेण्यासाठी नवनवीन क्लुप्त्या काढल्या आहेत. त्यातील एक नावीन्यपूर्ण कार्यक्रम म्हणजे गोरिलांचं बारसं. रवांडात बारसं खूप थाटामाटाने साजरं होत असल्यामुळे गोरिलांच्या बाळांची नावं ठेवण्याच्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद मिळाला. लोकांमध्ये जागरूकता वाढली आणि शिकारीचा आकडा घसरला. म्हणता म्हणता या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालं आणि सप्टेंबरमध्ये होणाऱ्या या सोहळ्यात ‘तुझं बारसं जेवलोय’ असं सांगायला जागतिक कीर्तीचे नामवंत सहभागी होऊ लागले. पर्वतीय गोरिला हे प्राणिसंग्रहालयात जिवंत राहू शकत नाहीत. तसा प्रयत्न त्यांच्या घटत चाललेल्या संख्येत अधिकच भर घालतो. म्हणून माऊंटन गोरिलांना भेटायचं असेल तर रवांडालाच गेलं पाहिजे. ‘बांबूच्या घरात जायला हवे, बांबूचे घर पाहायला हवे.. हाऊस ऑफ बांबूज…!’

लेखिका आणि ट्रॅव्हलर

medhaalkari@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in