आजीच्या हाताची चव

घराच्या स्वयंपाकघरातून दरवळणारा आजीच्या हातच्या स्वयंपाकाचा सुगंध हा केवळ भूक भागवणारा नव्हता; तो घराला घरपण देणारा होता. त्या चवीत माया होती, संस्कार होते आणि अनेक पिढ्यांना जोडून ठेवणारं नातं होतं.
आजीच्या हाताची चव
आजीच्या हाताची चव
Published on

प्रासादिक म्हणे

प्रसाद कुळकर्णी

घराच्या स्वयंपाकघरातून दरवळणारा आजीच्या हातच्या स्वयंपाकाचा सुगंध हा केवळ भूक भागवणारा नव्हता; तो घराला घरपण देणारा होता. त्या चवीत माया होती, संस्कार होते आणि अनेक पिढ्यांना जोडून ठेवणारं नातं होतं.

घराच्या उंबरठ्यावर पाऊल टाकताच स्वयंपाकघरातून येणारा ताज्या फोडणीचा सुगंध, चुलीवर मंद आचेवर शिजणारं वरण, तव्यावर फुगणारी गरम भाकरी, खलबत्त्यात वाटल्या जाणाऱ्या चटणीचा खमंग वास आणि त्या सगळ्यांवर प्रेमाची फुंकर घालणारं आजीचं हसरं मुख, हे चित्र आठवलं की बालपण पुन्हा एकदा जिवंत होतं. काळ बदलला, स्वयंपाकघर बदललं, चुलीच्या जागी गॅस आणि आधुनिक उपकरणं आली, पण आजीच्या हातच्या जेवणाची चव मात्र आजही मनाच्या कण्यात ताजी आहे.

असं म्हणतात की, प्रत्येक पदार्थाची चव त्यातील मसाल्यांवर अवलंबून असते. पण आजीच्या हातच्या पदार्थांची खरी चव मसाल्यांत नव्हती; ती तिच्या मायेत, संयमात आणि आत्मियतेत होती. ती जेवण बनवत नव्हती, ती माणसं घडवत होती. तिच्या हातची भाजी, आमटी, भाकरी, लाडू, लोणची किंवा पापड हे केवळ खाद्यपदार्थ नव्हते, तर ते प्रेम, काळजी आणि संस्कार यांचं रूप होतं.

पुलंनी एका ठिकाणी म्हटलंय, पुरणपोळी ही घरातल्या ज्येष्ठ हातांनी करावी आणि आपण खावी. आज्जीच्या हाताच्या पुरणपोळीची चव आईच्या हाताला नाही आणि बायकोच्या हाताला तर नाहीच नाही. अर्थात यात स्पर्धा करण्याचा उद्देश नाही, तर आजीच्या हाताच्या चवीची महती सांगणं इतकाच उद्देश आहे.

पूर्वीच्या काळात स्वयंपाक हा घाईघाईचा कार्यक्रम नव्हता, तर तो एक विधी होता. पहाटे उठून अंगण झाडणं, दारासमोर सुबक रांगोळी रेखाटणं, प्रातः कर्म आटोपून सुस्नात होऊन देवाला नैवेद्य दाखवणं, धान्य निवडणं, जात्यावर दळणं, मसाले भाजणं, खलबत्त्यात कुटणं आणि मग स्वयंपाक करणं, या प्रत्येक कामात शांतपणा आणि मनापासूनची तन्मयता असे.

आजी सांगायची, "अन्नावर कधी राग काढायचा नसतो; अन्न देव आहे." हा एक साधा विचार आयुष्यभरासाठी पुरणारा संस्कार ठरायचा.

आजीच्या हातची पुरणपोळी का एवढी मऊ असायची ? तिच्या आमटीला अशी वेगळी चव कशी यायची? तिने केलेलं लोणचं वर्षभर खराब का होत नसे ? या प्रश्नांची उत्तरे कोणत्याही पाककृतीच्या पुस्तकात सापडत नाहीत. त्याचं रहस्य होते, अनुभव निरीक्षण आणि प्रेम. किती मीठ, किती तिखट, किती वेळ शिजवायचं वासाठी तिच्याकडे मोजमापाचे चमचे नव्हते, तिचा अनुभवच तिचे माप होतं.

स्वयंपाकघर हे आजीचं विद्यापीठ होते. ती पोळ्या लाटताना गोष्टी सांगायची. भाजी चिरताना मागी शिकवायची. जेवताना अन्नाचा आदर करायाला सांगायची, ताटात अन्न उरवू नये, आधी दुसऱ्याला वाढावं, पाहुण्याला देव मानावे, दारी आलेल्या अतिथीला पोटभर जेवू घालावं, अऋतूनुसार खावं, शेतकऱ्याच्या कष्टांचा सन्मान करावा, हे सारे धडे पुस्तकातून नव्हे, तर तिच्या वागण्यातून मिळायचे.

प्रत्येक सणाची चव वेगळी असायची. नागपंचमीचे दिंड, गणेशोत्सवातील उकडीचे मोदक, दिवाळीचा फराळ, मकरसंक्रांतीचे तिळगूळ, होळीची पुरणपोळी- या प्रत्येक पदार्थामागे एखादी कथा, श्रद्धा आणि कुटुंबाला एकत्र आणणारी भावना दडलेली असे. आजी प्रत्येक पदार्थाचा अर्थ समजावून सांगायची. त्यामुळे सण हा केवळ उत्सव न राहता संस्कृतीचा अनुभव बनायचा.

आमच्या आजीच्या हाताच्या स्वयंपाकाला अमृताची चव होती, वाचा अर्थ काय? तर निगुतीने, प्रेमाने, मावेने केलेला स्वयंपाक, इथे आपल्या स्वयंपाकाचं कौतुक व्हावं, सगळ्यांनी त्याच्या चवीला चारचौघात नावाजावे अशी इच्छाच नसायची, तर सगळ्यांनी पोटभर खाऊन जेवून तृप्त व्हावं हा एकच भाव असायचा.

आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्व काही झटपट झालं आहे. तयार मसाले, तयार पीठ, तयार पदार्थ आणि घरपोच जेवण सहज उपलब्ध आहे. पण या सोर्वीच्या जगात आजीच्या हाताच्या चवीतील आत्मियता मात्र कुठेच मिळत नाही. आधुनिक स्वयंपाकघरात सुविधा आहेत, वेग आहे; पण अनेकदा त्या चुलीच्या धुरात मिसळलेली माया हरवलेली दिसते. हे खरं आहे की, प्रत्येक पिढी बदलते. जीवनशैली बदलते. परंतु काही गोष्टी काळाच्या पलीकडे जातात. त्यापैकी एक म्हणजे घरगुती जेवणाची ऊब. आजीने शिकविलेल्या पाककृती, घरगुती मसाले, लोणची, पापड, चटण्या आणि ऋतूनुसार बनणारे पदार्थ हे आपल्या सांस्कृतिक वारशाचे जिवंत दस्तावेज आहेत. ते जपणं म्हणजे केवळ चव जपणं नव्हे, तर कुटुंबाचा इतिहास जपणं आहे.

आज अनेक तरुण पुन्हा पारंपरिक पाककृती शिकू लागले आहेत. आजीच्या वहीतील रेसिपी शोधत आहेत. तिच्या हातच्या चवीचा मागोवा घेत आहेत. ही आनंदाची बाब आहे. कारण जेव्हा एखादी जुनी पाककृती पुन्हा आपल्या स्वयंपाकघरात तयार होते, तेव्हा ती केवळ भूक भागवत नाही; ती आठवणींना उजाळा देते आणि पिढ्यांना जोडते.

आजीच्या हातची चव ही कधीही मोजता येत नाही. ती अनुभवावी लागते. ती प्रत्येक घासात प्रेमाची गोडी, कष्टाची जाणीव आणि संस्कारांची ऊब देत राहते. म्हणूनच आजीची आठवण आली की तिच्या चेहऱ्याबरोबर तिच्या हातच्या वरणभाताचा सुगंध, तुपाची धार, गरम भाकरी आणि प्रेमाने केलेला आग्रहही डोळ्यांसमोर उभा राहतो.

आजी कदाचित आज आपल्यासोबत नसेल; पण तिच्या हातची चव अजूनही आपल्या स्मृतीत जिवंत आहे. तीच चव आपल्याला आपल्या मातीशी, आपल्या संस्कृतीशी आणि आपल्या माणुसकीशी जोडून ठेवते. म्हणूनच आजीच्या हातचं जेवण ही केवळ एक आठवण नसून, ती आपल्या आयुष्याला मिळालेली सर्वात सुंदर संस्कारांची शिदोरी आहे.

लेखक, निवेदक, कवी

kprasad 1959@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in