ग्रेट खुर्ची..

परिपाठ संपला तशी लेकरं आपापल्या वर्गात जाऊन बसली. पहिली वीस मिनिटं मौन वाचनाची होती. वाचन संपलं आणि सर्व लेकरं त्यावर चर्चा करू लागली. नंतर सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करणं हा घटक सुरू झाला.
 ग्रेट खुर्ची..
Published on

आनंदाचे झाड

युवराज माने

परिपाठ संपला तशी लेकरं आपापल्या वर्गात जाऊन बसली. पहिली वीस मिनिटं मौन वाचनाची होती. वाचन संपलं आणि सर्व लेकरं त्यावर चर्चा करू लागली. नंतर सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करणं हा घटक सुरू झाला. सर्व लेकरं उत्साहात चर्चेत सहभागी झाली होती. पण ममता गुमसुम गुमसुम होती. तिच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. ती पुन्हा पुन्हा आपल्या दप्तरात काहीतरी पाहत होती. हे गुरुजींच्या लक्षात आलं अन् चर्चा थांबवून ते ममताजवळ गेले. तिला जवळ घेत म्हणाले, “काय झालं बाळा? तू अशी गप्प का आहेस?”

ममता रडत रडत सांगू लागली, “मी शाळेत येताना वही, पेन घेण्यासाठी वडिलांकडून १०० रुपये आणले होते. ते पैसे मी आज तुम्हाला देणार होते. पण आता ते माझ्या पिशवीत दिसत नाहीत.”

मुलांना लागणाऱ्या वह्या, पेन, पुस्तकं, पेन्सिल अशा शैक्षणिक वस्तू गुरुजी तालुक्याच्या गावावरून आणून देत. ममतालाही वह्या व पेन हवे होते. त्यासाठीच हट्ट करून तिनं वडिलांकडून ते पैसे आणले होते. मात्र दप्तरात ठेवलेले पैसे आता दिसत नाहीत म्हणून ती रडू लागली. पैसे दप्तरातून पडले असावेत आणि वर्गातल्या मुलांपैकीच कुणी तरी ते घेतले असावेत, याचा अंदाज गुरुजींना आला.

खरं तर दप्तरातून पडलेले ते पैसे प्रामाणिकपणे मुलांनी आपल्याला आणून द्यायला हवे होते, ही गुरुजींची अपेक्षा होती; पण शेवटी लेकरंच ती! आता गुरुजींच्यासमोर प्रश्न होता, की पैसे तर लेकरांकडून काढायचे आहेत पण कसे काढावे? लेकरांना त्यांनी आवाहन केलं की, “कुणाला पैसे सापडले असतील तर आणून द्या. त्याला आपण शाबासकी देऊ.”

पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आता दुसरा एकच उपाय शिल्लक होता, तो म्हणजे मुलांच्या खिशांची आणि दप्तरांची तपासणी करणं. त्यांनी लेकरांना तसं सुचवलं, तर लेकरंही तयार झाली. पण गुरुजींना त्यांचं आंतरिक मन तसं करण्याची परवानगी देत नव्हतं. कारण या तपासणीत एखादं लेकरू सापडलं, तर त्या लेकराच्या कपाळावर आयुष्यभरासाठी ‘चोर’ असा शिक्का बसेल. हा विचार मनात येताच गुरुजींच्या काळजात चर्रर्र झालं. बालपणापासून आपण मुलांच्या कपाळावर वेगवेगळे शिक्के मारत असतो; पण त्याचे परिणाम त्या लेकराला आयुष्यभर भोगावे लागतात. हे आपल्या विद्यार्थ्यांच्या नशिबी यायला नको म्हणून गुरुजी सतत काळजी घेत असतात. शिक्षक म्हणून त्यांची ‘प्रेम’ या गोष्टीवर अपार निष्ठा आणि विश्वास होता. ‘प्रेमाची भाषा’ शिकणं हीच शिकण्याची खरी सुरुवात असते, हे त्यांनी जाणलं होतं. लेकरांना जवळ घेऊन ते बोलू लागले, “मुलांनो, ममताच्या वडिलांना १०० रुपये कमावण्यासाठी किती मेहनत करावी लागली असेल. त्यांनी आठ दिवसांनंतर ममताला हे पैसे दिले होते. तिला ते पैसे खाऊसाठी नाही, तर शिक्षणासाठी दिलेले होते. ममता शिकून मोठी व्हावी म्हणून दिले होते. तुमच्यासाठीही तुमचे आईवडील असेच कष्ट करतात. तुम्ही मोठं व्हावं असं त्यांना वाटतं. त्यांना जर कळलं, की माझा मुलगा/मुलगी चोरी करते, ती चोर आहे, तर त्यांना किती वाईट वाटेल. बरोबर ना?”

लेकरांशी असं बोलत असताना त्यांच्यातल्या अनेकांच्या चेहऱ्यावर रडू आलेलं त्यांना दिसलं. ते पुढे म्हणाले, “बाळांनो, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. मला आज वाईट वाटत आहे, की माझ्या वर्गात चोरी झाली. तुमच्यापैकी कोणीतरी चोर आहे हे आज सिद्ध होईल. माझा विद्यार्थी ‘चोर’ म्हणून पुढे आल्यास मला मुळीच आवडणार नाही. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. ऐका, आता मी तुमच्यासोबत खाली बसलो आहे; पण समोर जी खुर्ची आहे ना, ती मला सहजासहजी मिळालेली नाही. मला त्यासाठी खूप अभ्यास करावा लागला आहे. मी खूप जिद्दीने ती खुर्ची मिळवली आहे. त्या खुर्चीची जादू माहीत आहे का तुम्हाला? गुरुजींच्या या खुर्चीवर जो बसतो तो राष्ट्रपती, पंतप्रधान, जिल्हाधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर अशी अनेक मोठी माणसं निर्माण करू शकतो. मात्र ही खुर्ची ‘चोर’ कधीच निर्माण करत नाही. चोर निर्माण झाले, तर तो या खुर्चीचा अपमान आहे. बाळांनो, माझी माझ्या या खुर्चीवर खूप निष्ठा आहे. खूप प्रेम आणि मोठा विश्वास आहे. मी काय बोलतो आहे हे तुम्हाला नक्कीच कळलं असेल असं मला वाटतं.”

गुरुजींचं बोलणं ऐकून सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. कल्याणी, खुशी, प्रतीक, प्रयास, कोमल अशी अनेक लेकरं तर भावूक होऊन रडत होती. गुरुजींनी मुलांना जिंकलं होतं.

लगेच गुरुजी मुलांना म्हणाले, “चला, एक काम करू. आपण सर्वजण बाहेर जाऊ. वर्गात फक्त ही खुर्ची असेल. बाहेरून प्रत्येकानं आत यायचं, या खुर्चीचं दर्शन घ्यायचं आणि ज्यानं पैसे घेतले आहेत त्यानं ते इथे ठेवून जायचं. एका वेळी एकानंच वर्गात जायचं. पैसे ठेवून एखादा मुलगा गेला, तरी कोणी कोणाला सांगणार नाही, चर्चा करणार नाही.”

ठरल्याप्रमाणे प्रत्येक लेकरू आत जाऊ लागलं आणि खुर्चीचं दर्शन घेऊन बाहेर येऊ लागलं. गुरुजी प्रत्येक लेकरांचं निरीक्षण करू लागले. शेवटी होती ममता. गुरुजी तिला विश्वासानं म्हणाले, “ममता, जा त्या खुर्चीवरचे १०० रुपये घेऊन ये.” ममता गुरुजींच्या तोंडाकडे पाहू लागली; पण गुरुजी निश्चिंत होते, कारण त्यांचा त्यांच्या गुरुजीपणावर पूर्ण विश्वास होता. ममता आत गेली अन् १०० रुपये घेऊन पळतच वर्गाबाहेर आली. तिने गुरुजींना घट्ट मिठी मारली. गुरुजींचा जीव भांड्यात पडला. गुरुजींच्या डोळ्यात आनंदाचे, जिंकल्याचे अश्रू होते.

“आज माझं एक लेकरू चोर होण्यापासून, चोर नावाचा शिक्का लागण्यापासून वाचलं. आज गुरुजींच्या खुर्चीची किमया माझ्या लेकरांना कळली.” असं म्हणत म्हणत गुरुजी खुर्चीकडे पाहू लागले.

प्रयोगशील शिक्षक व शिक्षणविषयक लेखन

logo
marathi.freepressjournal.in