

साधक-बाधक
क्रांती गोडबोले-पाटील
महनीय व्यक्तीच्या निधनाने फक्त बातमी निर्माण होत नाही; समाज आणि कुटुंबासाठी तो वेदनादायी क्षण असतो. आजच्या टीव्ही आणि सोशल मीडियाच्या गोंगाटात, या क्षणाची माणुसकी, हळहळ आणि संवेदनशीलता जपली जाते का.. ?
जन पळभर म्हणतील, ‘हाय हाय!’ मी जातां राहील कार्य काय?’
भा. रा. तांबे यांच्या या ओळी केवळ कविता न राहता आजच्या वास्तवाचं अचूक भाष्य वाटतात. पूर्वी एखादी महनीय व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली, की तिच्या जाण्याचं दुःख समाजमनाला पचवायला वेळ दिला जायचा. वृत्तपत्रांतून त्यांच्या आयुष्याचा, कार्याचा, विचारांचा शांतपणे आढावा घेतला जायचा. लोकांच्या मनात हळहळ असायची; कुटुंबीयांच्या दुःखालाही एक सन्मानाचं अवकाश मिळायचं. पूर्वी निधनाची बातमी ही मर्यादित शब्दांत, सुसंस्कृत पद्धतीने मांडली जायची. त्या व्यक्तीच्या कार्यावर, सामाजिक योगदानावर भर दिला जायचा. दूरदर्शनने ही संवेदनशीलता कायम जपलेली होती आणि आहे. मला आजही आठवतं- अमुक एक थोर व्यक्ती गेल्यावर दूरदर्शनवर अत्यंत संयमितपणे त्यांचे अंत्यविधी, मानवंदना, आठवणी दाखवल्या जायच्या. बातम्यांचा तो एक तास जणू मौन पाळत होता. कुटुंबीयांच्या दुःखाचा सन्मान राखत त्यांची खासगी जागा जपली जायची. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. बातमी देणं आणि सनसनाटी निर्माण करणं यातील सीमारेषा पुसट होत चालली आहे. विशेषतः सोशल मीडियाच्या युगात, दुःखालाही ‘कंटेंट’ म्हणून पाहिलं जाऊ लागलं आहे. तेव्हा गुगलबाबा आणि सोशल मीडिया नसल्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ छापून आलेल्या विशेष पुरवण्यांतील कात्रणं कापून जपून ठेवावीशी वाटायची. जणू ती आठवण नव्हे, तर एक ठेवा असायचा.
पण आज चित्र बदललं आहे. टीव्ही मीडिया आणि सोशल मीडियाच्या झपाट्याने माणसाच्या जाण्यालाही वेग आला आहे. दुःखाला थांबायची उसंत नाही, आठवणींना स्थिरावायला वेळ नाही. सगळं गुगलमय झालं आहे, माहिती सहज मिळते, पण अनुभूती हरवते आहे. व्यक्तीपेक्षा बातमी मोठी ठरते, आणि कार्यापेक्षा क्षणिक हाय-हाय जास्ती असतो.
मी जाता राहील कार्य काय? हा प्रश्न आता केवळ जाणाऱ्या व्यक्तीचा नाही, तर आठवण ठेवणाऱ्या समाजाचाही आहे. महनीय, लोकप्रिय किंवा समाजावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीचं निधन ही केवळ एक बातमी नसते. तो एक सामाजिक क्षण असतो- ज्यात स्मृती जाग्या होतात, योगदानाचा आढावा घेतला जातो आणि सामूहिक शोक व्यक्त होतो. अशा प्रसंगांत समाजाचं एकत्र येणं, भावूक होणं, श्रद्धांजली वाहणं हे नैसर्गिक आणि अपेक्षितच आहे. मात्र गेल्या काही वर्षांत या दुःखद घटनांचं माध्यमांतून जे सादरीकरण होत आहे ते केवळ अस्वस्थ करणारं नाही, तर आपली सामूहिक संवेदना कुठल्या दिशेने चालली आहे, याचा गंभीर विचार करायला भाग पाडणारी आहे.
प्रसिद्ध व्यक्ती गेल्यानंतर जनसमुदाय जमा होतो, चाहते अश्रू ढाळतात, वातावरण भावूक होतं. हे स्वाभाविक आहे. परंतु त्याक्षणी माध्यमांची भूमिका काय असावी, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. शोकाकुल कुटुंबीयांच्या डोळ्यांतील अश्रू कॅमेऱ्यात टिपणं, त्यांना भावना शब्दांत मांडायला सांगणं, ‘तुम्हाला कसं वाटतंय?’ असे प्रश्न विचारणं हे पत्रकारितेच्या कुठल्या मूल्याशी सुसंगत आहे?
दुःख हा अनुभव अत्यंत वैयक्तिक असतो. त्याला शब्दांची गरज नसते; कधी कधी शांतताच त्याचं सर्वात प्रामाणिक रूप असतं. मात्र टीआरपीच्या स्पर्धेत, त्या शांततेचाही भंग केला जातो. कॅमेऱ्याचा प्रकाश जिथे थांबायला हवा, तिथेही तो सुरूच राहतो. परिणामी बातमी देण्याऐवजी दुःख उघड्यावर आणलं जातं; जणूकाही तोही एक कार्यक्रमच आहे.
अंत्ययात्रेचे थेट प्रक्षेपण, रडतानाचे व्हिडीओ, घरच्यांच्या अश्रूंवर भावनिक संगीत लावून बनवलेले रील्स, श्रद्धांजलीच्या नावाखाली तयार होणारे मीम्स हे सगळं पाहिलं की प्रश्न पडतो- आपण संवेदनशील समाज आहोत की भावनांचं प्रदर्शन करणारा समूह? कुणाच्या मृत्यूवर कंटेंट तयार करून फॉलोअर्स वाढवणं, प्रसिद्धी मिळवणं, कधी कधी आर्थिक लाभ मिळवणं ही प्रवृत्ती नेमकी कुठून येते? या प्रक्रियेत टीव्ही मीडिया आणि सोशल मीडियाने तर कहरच केला आहे.
या सगळ्यात आणखी एक बाब प्रकर्षाने जाणवते- ढोंगी भावनांचा उद्रेक. ज्या व्यक्तीबद्दल जिवंतपणी कधी शब्द काढला गेला नाही, त्यांच्या निधनानंतर अचानक सोशल मीडियावर प्रेम, आदर आणि आठवणींचा महापूर येतो. श्रद्धांजली देण्याची स्पर्धा सुरू होते. कोणाचा स्टेटस अधिक भावनिक, कोणाचा व्हिडीओ अधिक व्हायरल याची तुलना केली जाते. इथे दुःखाचा केंद्रबिंदू माणूस न राहता, पोस्ट बनते.
याचवेळी एक विसंगती स्पष्ट दिसते. प्रसिद्ध व्यक्तीच्या दुःखाला मोठं व्यासपीठ मिळतं, पण सामान्य माणसाचं दुःख अदृश्य राहतं. अपघातात गेलेला मजूर, आजाराने गेलेली आई, कर्जबाजारीपणातून आत्महत्या करणारा शेतकरी त्यांच्या वेदनांना ना टीआरपी असतो, ना व्ह्यूज. म्हणजेच दुःखाचं मोल ठरवताना प्रसिद्धी हा निकष बनतो, ही गोष्ट आपल्या सामाजिक मूल्यांबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करते.
दुःख व्यक्त करणं चुकीचं नाही. अश्रू ढाळणं, हळवं होणं, आठवणी शेअर करणं हे सगळं मानवी आहे. पण ते सगळं सार्वजनिक करावंच लागेल का? प्रत्येक भावना जगासमोर मांडणं ही गरज आहे की सवय? खासगी दुःखाला सार्वजनिक करण्यामागे संवेदनशीलता आहे की असुरक्षितता, की प्रसिद्धीचा हव्यास हा प्रश्न टाळता येत नाही.
अगदी चार दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं. दादांचं जाणं हे सर्वांसाठी धक्कादायक होतं. अनेकांनी शांतपणे, शब्दांची मर्यादा राखून श्रद्धांजली वाहिली. मात्र काहींनी या प्रसंगाचाही उपयोग स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केल्याचं दिसलं. कोणतीही शहानिशा न करता फोटो, व्हिडीओ, भावनिक मजकूर शेअर करण्यात आला. रडतानाचे व्हिडीओ शेअर केले गेले, याधीचे जग सोडून गेलेले महनीय नेते दादांच्या स्वागताला उभे आहेत असे AIच्या मदतीने व्हिडीओ बनवले गेले, टीव्हीवर तर सतत तेच तेच दाखवून हैराण करणं सुरू होतं. त्याचबरोबरीने हा घातपात तर नाही ना? जाण्याआधीचे कॉल रेकॉर्ड आहेत असं सांगून लोकांची दिशाभूल करणाऱ्या पोस्ट, रील शेअर केल्या गेल्या. मात्र या सगळ्या गदारोळात मूळ प्रश्न बाजूला पडला, आपण त्या व्यक्तीच्या कार्यातून काय शिकलो? त्यांच्या विचारांचा पुढे काय वारसा आपण जपणार?
या पार्श्वभूमीवर लिखित वर्तमानपत्रांची भूमिका लक्षात घेण्यासारखी आहे. आजही अनेक वर्तमानपत्रं संयम राखताना दिसतात. शब्दांची निवड, मांडणीतील गांभीर्य आणि कुटुंबीयांच्या गोपनीयतेचा आदर ही मूल्यं अजून पूर्णपणे लोप पावलेली नाहीत, ही दिलासादायक बाब आहे. दूरदर्शन अजूनही सनसनाटीपणाऐवजी माहिती आणि संदर्भावर भर देते. मात्र हे अपवाद होत चाललं आहे आणि हीच खरी चिंतेची बाब आहे. चॅनल टीआरपीच्या रेसमध्ये मूल्य विसरून बसलेत. सोशल मीडियाला तर ताळतंत्र नाहीच आहे. एकंदरीत कोणत्याही व्यक्तीचं जाणं हे पैसे कमावण्याचं साधन होत चाललंय हे वाचताना बोचलं तरी या कलियुगातील ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
माध्यमं समाजाचं प्रतिबिंब असतात, असं म्हटलं जातं. पण माध्यमं समाज बिघडवतात, हेही तितकंच खरं आहे. सतत दुःखाचं प्रदर्शन, भावनांचं बाजारू सादरीकरण आणि संवेदनशीलतेऐवजी स्पर्धेचा अतिरेक याचा परिणाम समाजाच्या मानसिकतेवर होतो. जे काल अस्वस्थ करायचं, ते आज सामान्य वाटायला लागतं. ही असंवेदनशीलतेकडे जाणारी वाट आहे. दुःखद प्रसंग दाखवून टीआरपी वाढत असेल, सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढत असतील, तर अल्पकालीन फायदा नक्कीच होतो. पण दीर्घकालीन नुकसान काय? तर आपली माणुसकी, आपली सामूहिक संवेदना आणि आपली नैतिक पातळी खालावते. हे नुकसान आकड्यांत मोजता येत नाही, पण त्याचे परिणाम खोलवर जाणवतात.
प्रसिद्ध व्यक्तीचं जाणं ही समाजासाठी शोकांतिका असू शकते, पण माध्यमांसाठी तो केवळ ‘इव्हेंट’ ठरू नये. बातमी देणं आणि दुःखाचं भांडवल करणं यात मूलभूत फरक आहे. हा फरक ओळखण्याची जबाबदारी माध्यमांवर आहेच, पण तितकीच जबाबदारी प्रेक्षकांची, वाचकांची आणि सोशल मीडियावरील प्रत्येक वापरकर्त्याचीही आहे. आपण काय पाहतो, काय शेअर करतो आणि कशाला प्रतिसाद देतो यातूनच या प्रवृत्तीला बळ मिळतं किंवा मर्यादा येतात.
दुःखाचे बाजारीकरण कुटुंबीयांकडूनच होते, असा सरधोपट निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. अनेकदा परिस्थितीमुळे काही निर्णय तडकाफडकी घ्यावे लागतात. त्यामागे संवेदनाहीनता असतेच असे नाही. पत्नीला किंवा पतीला आपल्या जोडीदाराला गमावल्याचं दुःख नसतं, असा अर्थ त्यातून काढणं अन्यायकारक ठरेल. दुःख प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने जगत असतो. काहींचं दुःख शांत असतं, न बोलता वाहणारं; तर काहींचं जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दडलेलं. बाहेरून दिसणाऱ्या कृती आणि आतल्या वेदना यांच्यात नेहमीच सरळसोट नातं नसतं. मात्र दुसरीकडे, सार्वजनिक आयुष्यातील काही मंडळी दुःखालाही औपचारिकतेचं रूप देतात, हेही वास्तव नाकारता येत नाही. एक दिवस श्रद्धांजली, एक दिवस शोकसभा आणि मग पुन्हा नेहमीचं राजकारण. जणू एखाद्याचं जाणं इतकं सहज पचवता येण्यासारखं झालं आहे.
या सगळ्या गदारोळात खरा प्रश्न उरतो तो संवेदनशीलतेचा, दुःख समजून घेण्याचा, त्याला वेळ देण्याचा. कारण जाणं हे क्षणाचं असलं, तरी मागे राहणाऱ्यांसाठी ते आयुष्यभराचं असतं. या सगळ्या प्रक्रियेत माध्यमांची भूमिकाही दुर्लक्ष करता येत नाही. काही प्रश्न, काही शंका अनावश्यकपणे पुढे रेटल्या जातात. ‘किंतु-परंतु’ची बीजं लोकांच्या मनात पेरली जातात आणि भावनिक मुद्दे सतत चघळले जातात. परिणामी, समाजाला विचार करायला नव्हे, तर संशय घ्यायला, प्रतिक्रिया द्यायला अधिक प्रवृत्त केलं जातं. अशा वेळी वास्तव, संदर्भ आणि माणुसकी मागे पडते. व्यक्तीच्या जाण्यापेक्षा चर्चेचा गोंगाट मोठा ठरतो. दुःख समजून घेण्याऐवजी त्याचं विश्लेषण केलं जातं. मात्र जो माणूस लोकनेता असतो, त्याच्या बाबतीत खरी श्रद्धांजली ही भाषणात, पोस्टमध्ये किंवा क्षणिक भावनांत नसते. त्याने आयुष्यभर ज्या मूल्यांसाठी, ज्या कामासाठी स्वतःला वाहून घेतलं, ते काम सातत्याने पुढे नेणं यातच त्या व्यक्तीप्रतिचा खरा सन्मान असतो. स्मरण हे नावापुरतं नव्हे, तर कृतीतून जिवंत राहिलं, तरच त्याला अर्थ उरतो.
अलीकडे घडणाऱ्या या सगळ्या प्रकारांकडे पाहिलं की, ‘स्मशानातील सोनं’ हा धडा नकळत आठवतो. मरणाच्या क्षणीही स्वार्थ शोधणारी वृत्ती आणि मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खायची हपापलेली मानसिकता आज अधिक उघडपणे दिसून येते. त्याचं सातत्यानं प्रदर्शन केलं जातं आणि माध्यमंही अनेकदा त्या प्रवृत्तीचीच वाहक बनतात, असं वाटू लागतं.
दुःख, शोक आणि हळहळ या सगळ्या मानवी भावना माध्यमांच्या अखंड चर्चेत गिळंकृत होत चालल्या आहेत, हे वास्तव नाकारता येत नाही. संवेदनशीलतेच्या जागी सनसनाटीपणा येतो आणि शांततेच्या जागी आवाज. परिणामी, माणसाच्या जाण्यापेक्षा त्यावर होणारी चर्चा अधिक महत्त्वाची ठरते.
शेवटी प्रश्न माध्यमांचा नाही, तर आपलाच आहे. आपण दुःखाला सन्मान देणार आहोत की त्याचं प्रदर्शन करणार आहोत? आपण शांततेला जागा देणार आहोत की गोंगाटाला प्राधान्य देणार आहोत? या प्रश्नांची उत्तरंच आपली सामाजिक दिशा ठरवतील. दुःख अपरिहार्य आहे. पण त्या दुःखात आपण कसं वागतो, हेच आपली संस्कृती सांगते. म्हणूनच या क्षणी थांबून आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आपण माध्यमांचा वापर कसा करतो आहोत, टीव्ही- मीडिया नेमकं काय साध्य करू पाहत आहे आणि आपण त्या प्रवाहात वाहून तर जात नाही ना, हा विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे. कारण अखेरीस माध्यमं जितकी आपली, तितकीच ती आपल्या मूल्यांचीही प्रतिबिंबं असतात.
‘सगेसोयरे डोळे पुसतील।
पुन्हा आपल्या कामी लागतील।।
उठतील बसतील हसुनि खिदळतील।
मी जातां त्यांचें काय जाय।।’
भा. रा. तांबे यांच्या या ओळी माणसाच्या जाण्यानंतरचं अपरिहार्य वास्तव सांगतात. दुःख कितीही खोल असलं, तरी जीवन थांबत नाही. आप्तस्वकिय डोळे पुसतात आणि पुन्हा जगण्याच्या प्रवाहात सामील होतात हे मानवी आहे, स्वाभाविक आहे. मात्र माध्यमांनी या वास्तवाचं भान ठेवणं अधिक आवश्यक आहे. कारण दुःख हे क्षणिक दृश्य नसून, अंतःकरणात दीर्घकाळ रूतून बसलेली वेदना असते. त्या वेदनेला सनसनाटीपणाचं, चर्चेचं किंवा प्रदर्शनाचं स्वरूप दिलं गेलं, तर उरते ती केवळ पोकळी. शेवटी, एखाद्याचं जाणं जगासाठी एक बातमी असू शकतं; पण त्याच्या आप्तांसाठी ती आयुष्यभराची जखम असते. माध्यमांनी ही सीमारेषा ओळखणं आणि माणुसकी जपणं यातच त्यांच्या भूमिकेचं खरं मोल आहे.
krantip183@gmail.com