ध्येयवेडे निसर्गदूत

आपल्या देशात आज एक अतिशय टोकाचे, अस्वस्थ करणारे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे रातोरात हजारो झाडांची बेसुमार कत्तल करून निसर्गाचे लचके तोडणारे ‘नकोसे’ उद्योजक आणि त्यांचे पाठीराखे राज्यकर्ते पुढे सरसावले आहेत, तर दुसरीकडे एक झाड तुटल्याच्या वेदनेने व्याकूळ होऊन प्रत्येक झाड जगविण्यासाठी आपले प्राण तळहातावर घेऊन लढणारे ध्येयवेडे निसर्गदूतही तितक्याच ताकदीने कार्यरत आहेत.
ध्येयवेडे निसर्गदूत
ध्येयवेडे निसर्गदूत
Published on

दुसरी बाजू

प्रकाश सावंत

आपल्या देशात आज एक अतिशय टोकाचे, अस्वस्थ करणारे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे रातोरात हजारो झाडांची बेसुमार कत्तल करून निसर्गाचे लचके तोडणारे ‘नकोसे’ उद्योजक आणि त्यांचे पाठीराखे राज्यकर्ते पुढे सरसावले आहेत, तर दुसरीकडे एक झाड तुटल्याच्या वेदनेने व्याकूळ होऊन प्रत्येक झाड जगविण्यासाठी आपले प्राण तळहातावर घेऊन लढणारे ध्येयवेडे निसर्गदूतही तितक्याच ताकदीने कार्यरत आहेत. निसर्गाच्या संरक्षणाचा हा लढा आता सामान्यांच्या हातातून सुटून निसर्गसंपदेवर डोळा असणाऱ्या उद्योजकांच्या हाती गेल्याने आगामी काळात संघर्ष अटळ आहे.

संत तुकाराम महाराजांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या उक्तीलाच आयुष्याचा श्वास आणि ध्यास बनवणाऱ्या बीडच्या सुधाकर देशमुख आणि जुन्नरच्या रमेश खरमाळे यांच्याशी ‘जागतिक पर्यावरण दिना’च्या पार्श्वभूमीवर संवाद साधला असता, या वृक्षमित्रांच्या कष्टाचे, संघर्षाचे दाहक आणि प्रेरणादायी पैलू हळूहळू उलगडत गेले. निसर्ग संरक्षणासाठी लढणारी व मातीशी इमान राखणारी काही कळीजे भर उन्हात धडधडत आहेत. त्यांची ही धडपड प्रेरणादायी आहे.

दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यातील ममदापूरसारख्या एका छोट्या, पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या गावातून सुरू झालेला वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांचा प्रवास अत्यंत खडतर आणि भावनिक संघर्षाने व्यापलेला आहे. एका श्रीमंत घराण्यात जन्म होऊनही वडिलांच्या व्यसनाधीनतेमुळे अफाट जमीन-जुमला डोळ्यांदेखत विरून गेला आणि अवघ्या पाच-सहा वर्षांचे असतानाच आईचे छत्रही कायमचे हरपले. अशा अत्यंत पोरक्या अवस्थेत त्यांनी निसर्गालाच आपली आई मानून तिची सेवा आरंभली. झाडावरून पडलेली फळे गोळा करून खाणे हेच त्यांचे जगण्याचे साधन बनले. त्यांनी झाडांशी मैत्री केली. ते झाडांशी, पशूपक्ष्यांशी बोलू लागले. त्यांच्या व्यथावेदना जाणून घेऊ लागले. त्यांनी निर्सगालाच आपली शाळा मानली. नियमित शाळेत जाऊन शिक्षण घेणे परवडत नसल्याने त्यांनी रात्रीच्या शाळेत जाऊन बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. संगीताच्या आवडीतून त्यांनी शेकडो पोवाडे तयार करून खेडोपाडी साक्षरतेचा प्रसार केला. ज्या निसर्गाने भुकेच्या काळात चिंचेच्या कोवळ्या पाल्यावर जगवले, त्या निसर्गदेवतेला त्यांनी सर्वश्रेष्ठ मातृदैवत मानले. छोटी मडकी रंगवून त्यात सुंदर रोप तयार करून नवदाम्पत्याला ‘रोप प्रसाद’ भेट देण्याचा अभिनव उपक्रम त्यांनी सुरू केला व पुढे त्याचाच त्यांना छंद लागला. वाढदिवस, लग्नकार्य व सेवानिवृत्ती दिनाचे औचित्य साधन आजमितीस त्यांनी सुमारे १८ लाख रोपे मोफत वाटली आहेत, हे विशेष.

जेव्हा लोक बेसुमार झाडे तोडू लागले, तेव्हा देशमुख यांनी घराला कुलूप लावून, खिशात पैसे नसताना लहान मुलांना कडेवर घेऊन नागपूर-मुंबईत तीव्र आंदोलने छेडली. या संघर्षाला अखेर २०२२ मध्ये यश आले. महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायतीच्या रजिस्टरमध्ये वृक्ष गणनेची नोंद ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय जारी केला. माणसांची, पशूंची गणना होते मग झाडांची का नाही, या त्यांच्या प्रश्नाने व्यवस्थेला हलवून सोडले. दरवर्षी ‘संत तुकाराम महाराज वृक्ष दिंडी’ काढून लोकांना पर्यावरणाची वारी ते घडवत आहेत. त्यांची पत्नी शिलाई मशीन चालवून घरगाडा हाकत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आजही ते पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. त्या शेडच्या मागे-पुढे नर्सरी आहे. त्यातच ते रमतात. कोरोनाच्या काळात लोकांनी ऑक्सिजनसाठी घेतलेले जीवघेणे कष्ट पाहून अभिमानाने सांगतात की, मी लोकांना कृत्रिम ऑक्सिजन सिलिंडर देऊ शकत नाही, पण स्वतःच्या कष्टाने १०० झाडे नक्कीच तयार करू शकतो.

निसर्ग संवर्धनाचा असाच एक अत्यंत महत्त्वाचा, वैज्ञानिक आणि आधुनिक पैलू जुन्नर तालुक्यात पाहायला मिळतो. जिथे रमेश खरमाळे व त्यांच्या कुटुंबाचे केवळ वृक्षलागवडच नाही तर जलसंधारण आणि वन्यजीवांच्या संरक्षणावर युद्धपातळीवर काम सुरू आहे. बिबट प्रवण क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नर भागात उन्हाळ्यात वन्यजीवांसाठी पाण्याच्या थेंबाथेंबाची टंचाई भासू नये म्हणून ‘पाणवटे’ आणि कृत्रिम तळी निर्माण करण्याची मोहीम त्यांनी राबवली आहे. धामणखेल माथ्यावरील पाण्याच्या मोठ्या पाईपलाईनच्या ‘एअर व्हॉल्व्ह’मधून वाया जाणारे पाणी एकत्र करून त्यांनी जवळपास ९ कृत्रिम तळ्यांची निर्मिती केली आहे. त्याचा थेट फायदा तहानलेल्या चिमणपाखरांना, वन्यजीवांना होत आहे. तसेच, तेथील डोंगरमाथ्यावर ६० ते ७० टक्के झाडे जिवंत ठेवण्याची किमया केली आहे. त्यांनी अवघ्या ९० दिवसांच्या कालावधीत तालुक्यातील ५८९ शाळांना भेटी देऊन लाखो विद्यार्थ्यांना पर्यावरण आणि बिबट्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याचे व्यावहारिक धडे दिले आहेत. जुन्नर परिसरात जखमी किंवा संकटात सापडलेल्या वन्यजीवांना ‘रेस्क्यू’ करण्याचे कामही ते करत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन लष्करप्रमुखांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. तसेच, महाराष्ट्रात ‘वसुंधरा पुरस्काराने’ही त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यांची कोणत्याही अनुदानाशिवाय उभी राहिलेली निसर्गचळवळ हेच सिद्ध करते की, निसर्गाचे रक्षण करण्यासाठी सरकारी योजनांची नाही, तर भर उन्हात उन्हाचे चटके सोसत मातीत हात काळे करणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्यांची गरज आहे.

कालपरवाचेच उदाहरण पाहा. आफ्रिकेच्या सहारा वाळवंटात भरउन्हात एक ट्रक बंद पडला असता, त्या ट्रकमधील जवळपास ४९ प्रवासी पाण्याअभावी तडफडून मृत्युमुखी पडले. ही घटना हेच सांगतेय की हवामान बदलत आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. निसर्गाचा कोप हे आजचे दाहक वास्तव आहे. आपल्या देशातील नैसर्गिक संरक्षणाची भक्कम कवचकुंडले मानल्या गेलेल्या प्राचीन अरावली पर्वतरांगांच्या संरक्षणाचा मुद्दाही आज तितकाच ऐरणीवर आला आहे. अरावली ही उत्तर भारतासाठी वाळवंटाच्या वादळांना रोखणारी एकमेव अभेद्य नैसर्गिक ढाल आहे. जर आपण केवळ खाणकाम, बांधकाम व्यावसायिक आणि बेकायदेशीर बांधकामांच्या पैशांसाठी या निसर्गाच्या ढालीलाच खिंडार पाडले, तर येणाऱ्या पिढ्यांना आपण वाचवू शकणार नाही. निसर्गाने निर्माण केलेले कांदळवनांसारखे नैसर्गिक अडथळे आणि पर्वत जेव्हा माणूस स्वतःच्या तात्पुरत्या फायद्यासाठी आणि लोभासाठी नष्ट करतो, तेव्हा तो आपल्या स्वतःच्या विनाशाचा महामार्ग स्वतःच मोकळा करत असतो.

निसर्गदूत सुधाकर देशमुख, रमेश खरमाळे यांच्यासारख्या जमिनीवर प्रत्यक्ष काम करणाऱ्या आणि मातीशी इमान सांगणाऱ्या ज्ञात-अज्ञात निसर्गदूतांकडून प्रेरणा घेऊन आता प्रत्येक गावामध्ये आणि शहरामध्ये निसर्ग संवर्धनाची लोकचळवळ उभी करण्याची गरज आहे. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि हिरवागार निसर्ग टिकवण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण, जलसंधारण आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संकल्प करण्याची आवश्यकता आहे. जगभरात सौरऊर्जा, पवनऊर्जेचा विस्तार होत आहे. शहरे सायकलस्नेही केली जात आहेत. आपल्याला जीवाश्म इंधनाकडून अक्षय ऊर्जेकडे वेगाने जावे लागेल, कारण वेळ आपल्या हातातून निसटून चालली आहे. काँक्रीटची जंगले तापमानवाढीत नवनवी भर घालत आहेत. महाभयंकर वादळे, जंगलातील वणवे, भीषण पूर आणि वेगाने वितळणाऱ्या हिमनद्यांच्या अक्राळविक्राळ रुपातून निसर्ग मानवाला ओरडून सांगत आहे की, ‘आता तरी तुमचा हा अधाशीपणा, हावरेपणा थांबवा.’ सजीवसृष्टीचे जीवनचक्र चालविण्यासाठी लागणारा प्राणवायू व पिण्यासाठी लागणारे शुद्ध पाणी निसर्ग मोफतच देत असला तरी त्याचे मोल अजूनही आपल्या व्यवस्थेला का समजत अथवा उमजत नाही? हाच एक सवाल आहे.

prakashrsawant@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in