खोडत रहा...खोडत रहा

मनू बेटा, मी तुला म्हटलं होतं ना सारखं सारखं बदल करत जाऊ नकोस, ते चूक होतं. आता तू हवं तितके वेळा बदल कर, खोड, परत लिही, जोपर्यंत तुला ते परफेक्ट वाटत नाही तोपर्यंत लिहित रहा,” सुवर्ण आपल्या मुलीला म्हणाले.
खोडत रहा...खोडत रहा
Published on

आगळंवेगळं

उदय कुलकर्णी

मनू बेटा, मी तुला म्हटलं होतं ना सारखं सारखं बदल करत जाऊ नकोस, ते चूक होतं. आता तू हवं तितके वेळा बदल कर, खोड, परत लिही, जोपर्यंत तुला ते परफेक्ट वाटत नाही तोपर्यंत लिहित रहा,” सुवर्ण आपल्या मुलीला म्हणाले.

त्यांची सुविद्य पत्नी सुवर्णा ते एकूण चकित झाली, “काय आमिर खानचा सिनेमा बघितला की त्याची एखादी मुलाखत ऐकली, परफेक्शन वगैरे म्हणताय म्हणून म्हटलं,” ती म्हणाली.

“हेच चुकतं तुमचं. नेहमी सिनेमातील लोकांचीच का आठवण काढायची आणि त्यांचीच उदाहरणं का द्यायची?” त्यांनी त्राग्याने विचारलं.

“बरं मग काय बालमानसशास्त्रावरचा एखादा लेख वाचला काय?” सुवर्णा म्हणाली.

त्यांचा वाद वाढणार इतक्यात मनू म्हणाली, “पप्पा, तुम्ही खोडायला नको म्हणत होता म्हणून माझे आधीचे दोन्ही निबंध मी तसेच ठेवून दिले होते, तेही खोडून परत लिहू का?”

“लिही मनू बेटा, लिही. तुला हवं तसं हवं तितक्यांदा खोडून लिही. हवे तितके खोडरबर वापर. लेखक लोक तर सात-आठ ड्राफ्ट करतात, तूसुद्धा तुझं समाधान होईपर्यंत खोडत रहा.” पप्पा म्हणाले.

“हे चांगलंच आहे, पण हा बदल कशामुळे झाला तुमच्यात ते तर सांगाल का?” त्यांची सुविद्य पत्नी सुवर्णा म्हणाली.

“हेच तर आहे, आर्थिक विषयावरच्या बातम्या वाचायच्याच नाहीत, मग कळणार कसं जगात काय होतंय? कोणत्या धोरणाचा, बदलाचा आर्थिक परिणाम काय होतोय, हे आधीच कळायला हवं. वाचलं असतंस तर कळलं असतं, खोडरबरवरचा जीएसटी आधी पाच टक्के होता, तो आता शून्य केला आहे. कितीही खोडलं तरी आता आपल्याला परवडणार आहे ते.” सुवर्ण म्हणाले.

“त्याने काय होतंय?” सुवर्णाचा नकारात्मक सूर.

“पुन्हा तीच चूक, इतकं निराशावादी कशाला रहायचं? अमेरिकेच्या टॅरिफ वाढीमुळे असो की आणखी कशाने, सरकार काही तरी बरं करतंय ना? असं बघ, आपली मनू जास्त लिहिणार म्हणजे पेन्सील पण जास्त झिजणार, जास्त पानं लागणार. सरकारने याचाही विचार केला आहे. पेन्सील, वह्या यावरचा जीएसटी आधी बारा टक्के होता तो आता शून्य केला आहे.” सुवर्ण म्हणाले. त्यांच्या स्वरात उत्साह होता.

पण त्याची लागण सुवर्णाला झाली नाही. “करकटक वगैरे असतो तो कंपास बॉक्स, रंगांसाठीचा कलर बॉक्स याचा जीएसटी आधी बारा टक्के होता, तो आता पाच टक्के केला आहे. एवढी मुलांची काळजी तर तो का नाही शून्य केला?” ती म्हणाली. “सगळ्या गोष्टी एकदम कशा होतील? पुढच्या निवडणुकीसाठी काही शिल्लक ठेवायला नको का?” सुवर्ण अनवधानाने बोलून गेले.

“बरं झालं तुम्हीच बोललात ते”, सुवर्णाने फायदा उचलला आणि म्हणाली, “आता मला एकच सांगा, खासगी शाळांची फी जी वार्षिक एक एक लाख रुपये असते त्यावर कॅप लावणार का, की वार्षिक फी दहा हजारांच्या वर नको, असा काही?”

“तुझ्यासमोर बोलायची काही सोयच नाही.” सुवर्ण म्हणाले आणि मग मुलीकडे वळत ते म्हणाले, “मनू बेटा, तू काही काळजी करू नकोस. तू खोडत खोडत व्यवस्थित अभ्यास कर म्हणजे झालं. आपल्या मायबाप सरकारने उदार होत म्हणा किंवा भानावर येत म्हणा, तुम्हा विद्यार्थ्यांसाठी खोडरबरांची व्यवस्था केली आहे.”

एक खोडकर भक्त

logo
marathi.freepressjournal.in