निसर्गाचा नवचैतन्य सोहळा

वसंताच्या आगमनाने निसर्ग नव्या पालवीने बहरतो आणि चैत्राच्या पहाटेसोबत मराठी संस्कृतीत नवचैतन्याची चाहूल लागते. या नवउत्साहाचे मंगल प्रतीक म्हणजेच गुढीपाडव्याचा आनंदसोहळा.
निसर्गाचा नवचैतन्य सोहळा
निसर्गाचा नवचैतन्य सोहळा
Published on

विशेष

क्रांती गोडबोले-पाटील

वसंताच्या आगमनाने निसर्ग नव्या पालवीने बहरतो आणि चैत्राच्या पहाटेसोबत मराठी संस्कृतीत नवचैतन्याची चाहूल लागते. या नवउत्साहाचे मंगल प्रतीक म्हणजेच गुढीपाडव्याचा आनंदसोहळा.

शिशिराच्या बोचऱ्या थंडीने जेव्हा निसर्ग काहीसा शुष्क आणि विरक्त वाटू लागतो, तेव्हा चराचराला एका अनामिक सुगंधी लहरीचा स्पर्श होतो. झाडांची जुनी, पिवळीधमक पानं गळून पडतात आणि वाळलेल्या फांदीवर रक्तासारखा लाल-तांबूस एखादा कोवळा अंकुर डोकावू लागतो. हा अंकुर म्हणजेच वसंत ऋतूचं पहिलं पाऊल! वसंत ऋतू म्हणजे केवळ ऋतू बदलणं नव्हे, तर तो पृथ्वीच्या पुनर्जन्माचा, सर्जनशीलतेचा महासोहळा असतो. या सोहळ्याचं पहिलं मंगल तोरण म्हणजेच आपला 'गुढीपाडवा'. चैत्र महिना हा खऱ्या अर्थाने निसर्ग आणि संस्कृतीच्या अद्वैताचं प्रतीक आहे. कवी कुसुमाग्रजांनी वसंताचे वर्णन करताना किती सुंदर म्हटले आहे—

'हसते आहे सृष्टी सारी,

नववसंताच्या स्वागताला,

चैत्रपालवी नटली आहे,

या धरणीच्या अंगणाला.'

हे केवळ शब्द नाहीत, तर तो एक जिवंत अनुभव आहे जो आपल्याला चैत्राच्या पहाटे अनुभवता येतो. वसंताच्या आगमनाने सृष्टी जणू आपली 'कात' टाकते. जुनं गेल्याशिवाय नवं येत नाही, हा सृष्टीचा शाश्वत नियम इथे प्रकर्षाने जाणवतो. फाल्गुनाच्या रणरणत्या उन्हात जेव्हा झाडं निष्पर्ण होतात, तेव्हा मानवी डोळ्यांना ते दृश्य कदाचित उदासवाणं वाटू शकतं. परंतु, निसर्गाच्या या प्रक्रियेतच उद्याच्या नवचैतन्याचं बीज दडलेलं असतं. वाळलेल्या फांदीतून जेव्हा एखादी तांबूस रंगाची छोटी पालवी डोकावते, तेव्हा समजायचं की वसंताचे पैंजण वाजले आहेत. लहान असल्यापसून ते आतापर्यंत हे निसर्गाचे बदल कायमच माझं मन मोहून टाकतात.

वसंताचा खरा दूत म्हणजे आम्रवृक्ष. चैत्राच्या सुमारास आंब्याला मोहोर येतो. तो मोहोर केवळ फुलोरा नसून ती येणाऱ्या समृद्धीची चाहूल असते. त्या मोहोराचा मादक, मधुर सुगंध वाऱ्यावर स्वार होऊन साऱ्या आसमंतात दरवळू लागतो. याच काळात कोकिळेचं कुहू-कुहू अधिक स्पष्ट ऐकू येतं. आंब्याचा मोहोर आणि कोकिळेचा स्वर हे वसंताचे अविभाज्य घटक आहेत. जणू काही कोकिळा आपल्या सुरावटीने आंब्याच्या मोहोराला साद घालत असते. निसर्गातील हा 'नाद आणि रंगांचा' सोहळा अनुभवायला मिळणं हे मोठं भाग्य आहे.

वसंतातील पक्षीजगत तर डोळ्यांचं पारणं फेडतात. जेव्हा निसर्ग रंगांची उधळण करतो, तेव्हा पक्षीही मागे राहत नाहीत. वसंत ऋतू हा पक्ष्यांच्या मिलनाचा आणि घरटं बांधणीचा काळ असतो. कोकिळेचा उल्लेख वर केलाच, पण या दिवसात दयाळ (Oriental Magpie Robin) नावाचा पक्षी आपल्या मधुर आवाजाने पहाट सुखावह करतो. पहाटेच्या शांत वातावरणात त्याचा शिट्टीसारखा आवाज मनाला उभारी देतो. तांबट पक्ष्याची 'टुक-टुक' ऐकू येते, तर सुतार पक्षी झाडाच्या खोडावर आपली चोच मारून लयबद्ध संगीत निर्माण करतो.

पळसाच्या आणि सावरीच्या झाडांवर तर पक्ष्यांची जणू मेजवानीच असते. पळसाच्या लालभडक फुलांमध्ये मकरंद (मध) पिण्यासाठी शिंजीर (Sunbird), बुलबुल आणि साळुंखी यांची एकच झुंबड उडते. लालभडक सावरीच्या फुलांवर जेव्हा पिवळाधमक शिंजीर बसतो, तेव्हा निसर्गाच्या कुंचल्यातून उतरलेलं ते चित्र पाहून शब्द थिटे पडतात. मला तर हा निसर्गाचा 'फूड फेस्टिव्हल' वाटतो. हे पक्षी केवळ स्वतःचं पोट भरत नाहीत, तर परागीभवन करून निसर्गाच्या पुनरुत्पादनाचं कार्यही चोख पार पाडतात. वसंत ऋतूत पक्ष्यांचा किलबिलाट वाढतो कारण हा त्यांच्या जीवनातील सर्वात उत्साहाचा काळ असतो. वसंत, चैत्र, गुढीपाडवा याचा खरा आनंद तर गावात जास्ती असतो.

ग्रामीण जीवनात वसंताचं रूप अधिकच लोभस आणि वास्तववादी दिसतं. शहरात वसंताची चाहूल कदाचित फक्त कॅलेंडरमधून लागते, पण गावात मात्र माती आणि वारेच वसंताचं आगमन सांगतात. गुढीपाडव्याची लगबग ग्रामीण भागात आठवडाभर आधीच सुरू होते. घरांची झाडलोट केली जाते, अंगणे शेणाने सारवून स्वच्छ केली जातात. वाळलेल्या गवताचा वास आणि उन्हाच्या झळांनी तापलेल्या मातीचा गंध गावात एक वेगळीच प्रसन्नता निर्माण करतो.

ग्रामीण भागात वसंताचा संबंध शेतीशी आणि कापणीशी असतो. रब्बी हंगामाची पिकं घरात आलेली असतात, त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान असतं. चैत्र महिन्यात शेतं रिकामी असली तरी, वावरात असलेल्या वड-पिंपळाच्या झाडांना नवी पालवी फुटलेली असते. दुपारच्या उन्हात शेतकरी या झाडांच्या सावलीत बसून पेज, पन्हं, कोकम सरबत, नाचणीची आंबील असे शरीराला थंड करणारे पदार्थ खातो, पेय पितो. तेव्हा त्याला मिळणारा आनंद कोणत्याही पंचतारांकित सुखापेक्षा मोठा असतो. वसंत ऋतु आणि गुढी पाडवा यांचंही मैत्रीचं नातं आहे .

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. हा आपला मराठी नूतन वर्षाचा पहिला दिवस. ग्रामीण भागात गुढी उभारण्याचं स्वरूप आजही पारंपारिक आणि भव्य आहे. घरासमोर उंच बांबूची काठी, त्यावर भरजरी वस्त्र, कडुनिंबाची पानं, साखरेच्या गाठी आणि तांब्याचा कलश... ही गुढी म्हणजे विजयाचा ध्वज तर आहेच, पण तो निसर्गाला दिलेला सन्मानही आहे. कडुनिंबाचा डहाळी शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या फुलांचा आणि पानांचा प्रसाद खाण्याची परंपरा आजही गावागावात जपली जाते.

चैत्रातील दुसरी महत्त्वाची परंपरा म्हणजे 'चैत्रगौर'. चैत्र शुद्ध तृतीयेला गौर बसवली जाते. ही गौराई म्हणजे समृद्धीचे रूप. ग्रामीण स्त्रिया या काळात 'हळदी-कुंकवा'चा मोठा कार्यक्रम करतात. चैत्रगौरीच्या निमित्ताने कैरीचे पन्हं, हरभरा डाळीची कोशिंबीर हा मुख्य प्रसाद असतो. मला आठवतं की लहानपणी रानातून जांभळं, करवंद गोला करून आणायची. घरी फणस, काजुगर, आंबे असायचे. मग या पंचफळांच्या फोडी करून कुडाच्या पानाचा द्रोण करून त्यात ह्या पंच फळांच्या फोडी ठेवायच्या. हे काम आम्हा मुलांचं असायचं. मग ही सर्व फळं, पन्हं, डाळीची कोशिंबीर किंवा कोकम सरबत यावर ताव मारायचा. हेच जेवण. चैत्र महिन्याची वाट आम्ही यासाठीच आतुरतेने बघयचो. चैत्रात ऊन वाढलेलं असतं, अशा वेळी पन्हं शरीराला नैसर्गिक थंडावा देतं. निसर्गातील बदल आणि मानवी आहार यांचा किती सुरेख मेळ आपल्या पूर्वजांनी घातला आहे, याची प्रचिती आता येते.

माझ्या दृष्टीत वसंत ऋतू हा निसर्गात जणू रंगांची मुक्त उधळण करतो. पळसाच्या फुलांचा उल्लेख केल्याशिवाय वसंताचं वर्णन पूर्ण होऊ शकत नाही. पळस जेव्हा फुलोऱ्याने डवरतो, तेव्हा रानांत आग लागल्यासारखं वाटतं. त्याचं ते भडक केशरी-लाल रंग उन्हाच्या तडाख्यातही डोळ्यांना विलक्षण थंडावा देतात. म्हणूनच त्याला 'Flame of the Forest' असं म्हटलं जातं. बहावा नावाचा वृक्ष तर या ऋतूच्या उत्तरार्धात आपला सुवर्ण सोहळा साजरा करतो. झाडावरून लटकणारे पिवळ्याधमक फुलांचे ते झुंबर म्हणजे निसर्गाच्या मंडपात लावलेली तोरणंच वाटतात. शांता शेळके यांनी वसंताचं वर्णन करताना अतिशय हळुवार लिहिलं आहे—

'ये ग ये ग वसंता,

सुवर्णमयी तू ये ग वसंता,

नटवून ही सृष्टी सारी,

लेवून हिरवा शालू वसंता.'

वसंत आणि कामदेव यांचा धागाही प्राचीन काळापासून या उत्सवांमध्ये गुंफलेला दिसतो. वसंत ऋतूला 'मदनोत्सव' असंही म्हटले जातं. कामदेव हा इच्छा आणि प्रेमाचा देव मानला जातो. जुन्या काळची नाटकं आणि काव्यांमध्ये वसंतातील प्रीतीचे अनेक उल्लेख आढळतात. वसंत पंचमीपासून सुरू होणारा हा उत्सव होळीपर्यंत आणि पुढे अक्षय्य तृतीयेपर्यंत विविध रूपांत साजरा केला जातो.

निसर्गातील हे चैतन्य मानवी मनालाही नवी उभारी देते. पानगळीचा काळ हा जरी दुःखाचा किंवा विरक्तीचा वाटला, तरी वसंत हा आशावादाचा काळ आहे. प्रत्येक नवी पालवी आपल्याला सांगत असते की, संघर्ष कितीही प्रदीर्घ असला, तरी नवीन सुरुवात ही नेहमीच देखणी असते. जुन्या, वाळलेल्या स्मृतींची पानं झटकून टाकून नव्या उत्साहाची लेणी लेवून जगायला वसंत आपल्याला शिकवतो.

आजच्या सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या आपल्याला कदाचित रानातील पळस किंवा बहावा दिसणार नाही, पण आपल्या बाल्कनीतील कुंडीत जेव्हा एखादं छोटं रोपटं त्याला फुटलेलं एखादं कोवळं पान त्यातही वसंताचा अंश असतोच. तो केवळ आपल्याला अनुभवता आला पाहिजे. चैत्रातील ती कोवळी पालवी, गुढीपाडव्याचा तो विजयध्वज, चैत्रगौरीचं ते मांगल्याचं रूप आणि निसर्गातील ती रंगांची मुक्त उधळण—हे सर्व घटक मिळून मानवी जीवन समृद्ध करतात.

वसंत ऋतू हा निसर्गाचा श्वास आहे. तो आपल्याला संयम आणि आनंद या दोघांची शिकवण देतो. वाळलेल्या फांदीला पालवी फुटण्यासाठी जशी थोडी वाट पाहावी लागते, तसाच संयम आयुष्यात हवा. आणि एकदा का ती पालवी फुटली की त्याचा आनंद सर्वांना वाटत सुटावा, हे वसंताचं तत्त्वज्ञान आहे. सृष्टीच्या या नवचैतन्याला मनापासून साद देऊया, कारण वसंत म्हणजे केवळ ऋतू नाही, तर ती एक वृत्ती आहे—सदाबहार राहण्याची, बहरण्याची आणि आपला सुगंध जगाला देण्याची!

निसर्गाच्या या महासोहळ्याची सांगता करताना एवढंच म्हणावंसं वाटतं की, जोपर्यंत चैत्रात कोकिळा गात आहे आणि आंब्याला मोहोर येत आहे, तोपर्यंत पृथ्वीवरचं सौंदर्य आणि आशा जिवंत आहे. आपण फक्त ते पाहण्याचे डोळे आणि अनुभवणारं संवेदनशील मन जपलं पाहिजे. वसंताचा हा वारसा आपल्या पुढच्या पिढीलाही देता यावा, यासाठी निसर्गाचं रक्षण करणं हीच खऱ्या अर्थाने वसंताची मोठी पूजा ठरेल.

वसंताच्या या पवित्र काळात, आपल्याही आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्याची नवी पालवी फुटो, हीच गुढीपाडव्याच्या निमित्ताने सदिच्छा!

krantip183@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in