गुरुजीतली आई

गुरुजी, तुम्ही एकही पुस्तक वाचून पूर्ण करत नाहीत!” मनीषा रागात मोठ्याने म्हणाली. पण तो राग खरं तर राग नव्हता. त्यात हक्क होता, अपेक्षा होती… आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे- प्रेम होतं. तिच्या त्या वाक्यानंतर जणू वर्गात स्फोटच झाला. तिच्या सर्व मैत्रिणींनी तिच्या सुरात सूर मिसळला- “हो… हो… तुम्ही कोणतंच पुस्तक वाचून पूर्ण करत नाहीत!”
गुरुजीतली आई
Published on

शिक्षणगुज

युवराज माने

गुरुजी, तुम्ही एकही पुस्तक वाचून पूर्ण करत नाहीत!” मनीषा रागात मोठ्याने म्हणाली. पण तो राग खरं तर राग नव्हता. त्यात हक्क होता, अपेक्षा होती… आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे- प्रेम होतं. तिच्या त्या वाक्यानंतर जणू वर्गात स्फोटच झाला. तिच्या सर्व मैत्रिणींनी तिच्या सुरात सूर मिसळला- “हो… हो… तुम्ही कोणतंच पुस्तक वाचून पूर्ण करत नाहीत!”

क्षणात वर्ग गोंगाटाने भरून गेला. लेकरांचे आरोप स्पष्ट होते, ठाम होते. पण त्या आरोपांच्या आत दडलेलं लडिवाळ, निरागस प्रेम मला स्पष्ट जाणवत होतं. मी हसलो… पण मनात एक प्रश्न उमटला- यांना काय सांगू? कसं सांगू? मला माहीत होतं… वाचनाचं एक तत्त्व असतं- एक पुस्तक पूर्ण झालं की, मगच दुसरं पुस्तक हातात घ्यायचं. पण माझं वाचन तसं नव्हतं. आणि माझं शिक्षकपणही तसं नव्हतं. माझ्यातल्या मातृत्वभावाचा लेकरांना अंदाज कसा येणार? आईपण शब्दांनी समजावता येत नाही, ते अनुभवावं लागतं. आणि गुरुजीतली आई ती फक्त लेकरांच्या डोळ्यांत पाहिल्यावरच हळूच उमगते.

आमच्या वर्गात दररोज वाचनाचा एक छोटासा आनंदसोहळा असतो. कधी ‘किशोर’मधली गोष्ट, कधी ‘वयम्’मधली कविता, कधी ‘छात्र प्रबोधन’मधला विचार, तर कधी ‘रानवारा’, ‘जीवन शिक्षण’, ‘जडणघडण’, ‘महाअनुभव’, ‘शिक्षणयात्री’ यांमधले अनुभव… मी वाचत असताना लेकरांचे चेहरे न्याहाळत असतो- कोण विचारात हरवतंय, कोणाच्या डोळ्यांत प्रश्न चमकतोय, कोणाच्या ओठांवर हसू उमटतंय… शनिवार-रविवारी आलेल्या वृत्तपत्र पुरवणीतलं निवडक काहीतरी सोमवारसाठी ठरलेलंच असतं. हे सगळं वाचताना एखाद्या लेखकाचं पुस्तक हळूहळू, क्रमशः वाचलं जातं. पण ते पूर्ण होईपर्यंत माझ्या हातात दुसरं पुस्तक येतं, मग तिसरं… आणि असंच हे चक्र अखंड सुरू राहतं. काल मात्र लेकरांनी मला चांगलंच कोंडीत पकडलं. भाऊ गावंडे यांचं ‘प्रकाशाच्या उंबरठ्यावर’ अगदी शेवटच्या टप्प्यावर आलं होतं. आणि नेमकं त्याच वेळी नामदेव माळी यांचं ‘एका कोंबड्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ मी मधेच वाचायला घेतलं. बस्स… इतकंच पुरेसं होतं.

“गुरुजी, हे काय? एक पुस्तक संपत आलंय, आणि तुम्ही दुसरं सुरू केलं!”

त्या क्षणी मला जाणवलं- आता उत्तर द्यावंच लागणार. मी शांतपणे लेकरांकडे पाहिलं आणि म्हणालो, “आपली आई असते ना, ती आपल्या बाळाला मोठं करण्यासाठी वेगवेगळे पोषक पदार्थ खाऊ घालते. दूध, भाजी, भाकरी, फळं… सगळं काही देते. आई स्वतःही तेच खाते, कारण तिला माहीत असतं- बाळाला बळकट करायचं असेल, तर सर्व प्रकारचं अन्न द्यावंच लागतं. आईला बाळ गुटगुटीत, तंदुरुस्त आणि आयुष्यात तग धरायला सक्षम बनवायचं असतं.”

क्षणभर थांबलो… आणि मग पुढे म्हणालो- “तसंच मलाही माझी ही लेकरं- म्हणजे तुम्ही सगळे फक्त अभ्यासातच नाही, तर विचारांनी मोठं व्हावं असं वाटतं. नवे-नवे विषय समजून घ्यावेत, समाजातील प्रत्येक स्तराची ओळख व्हावी, आणि जगाच्या स्पर्धेत तुम्ही कुठेही मागे पडू नये…” “म्हणूनच,”

मी हळूच हसत म्हणालो, “मी हावरटासारखा मिळेल ते सगळं गोळा करत असतो. पुस्तकं, लेख, कविता, विचार… हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्यासाठी बाळांनो! कारण तुम्ही माझी लेकरं आहात. आणि आईचं मन आपल्या लेकरांसाठी नेहमीच नवं शोधत राहतं…”

हे ऐकताच वर्गात शांतता पसरली. लेकरांचे डोळे बोलत होते. चेहऱ्यावरचा राग कधीच विरघळून गेला होता. आणि मग टाळ्यांचा कडकडाट! तो आवाज आजही माझ्या कानात गुंजतो आहे. पण त्या टाळ्यांपेक्षा माझ्या मनात खोलवर उमटलेला एक विचार अधिक ठळक होता आई कधी आपल्या बाळाला “आज तू एवढंच खा” असं सांगते का? की ती प्रत्येक वेळी थोडं अधिक, थोडं नवं त्याच्या ओंजळीत घालायचा प्रयत्न करत राहते?

कदाचित म्हणूनच माझं वाचन कधीच एका पुस्तकावर थांबत नाही. कारण माझ्या हातात पुस्तकं असली, तरी माझ्या मनात नेहमी माझी लेकरंच असतात. आणि म्हणूनच- मी पुस्तकं वाचत नाही, मी लेकरांना घडवत राहतो…

आईसारखं, शब्दांशिवाय.

शिक्षणगुज- खरं शिक्षण हे ‘पुस्तकं पूर्ण करणं’ नाही, तर ‘मुलांना पूर्ण घडवणं’ आहे. आईसारखा शिक्षक वेगवेगळ्या वाचनातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवतो.

लेखक, प्रयोगशील शिक्षक आहेत, ‘आनंदाचं झाड’ या टोपणनावाने ते शिक्षणातील अनेक बाबींवर लेखन करतात

logo
marathi.freepressjournal.in