बालमैफल
सुरेश वांदिले
मागरिट मावशीला झोपच येईना. आता करावं काय बरं ? तिला प्रश्न पडला. ती या कुशीवरून त्या कुशीवर होऊ लागली.
"मावशे तुला झालं तरी काय?" तळमळणारी मावशी पाहून रॉबिन्सन मामा तिला कुरवाळत म्हणाला.
"मला झोप कां येत नाही?" मावशीने त्याला विचारलं.
"मुझे क्या पता ?"
"रॉब्या, मला झोप का येत नाही, हे तुला माहीत नाही नि मलाही ठाऊक नाही. गंमतच म्हणायची."
"यात कसली आलीय गंमत. उलट ज्याला 'झोप' नाही, त्याला 'होप' नाही, असं तुझी आजी नव्हती का म्हणाली."
"कधी? मला कसं ठाऊक नाही. उगाच फोका ताणू नकोस."
"मी कशाला फोका ताणू? ती परवा माझ्या स्वप्नात आली होती."
"स्वप्न?" मावशी जोरात ओरडली.
"मावशे, तू भूत दिसल्यासारखी कां ओरडतेस ?"
"माम्या, मला पडलेल्या प्रश्नांचं उत्तर मिळालं." "तुझं उत्तर स्वप्नात दडलंय?" मामाने आश्चर्याने विचारलं.
"एस्स."
"मग पुन्हा जा की स्वप्नात"
"एस्स."
"मग पुन्हा जा की स्वप्नात"
"जाते की. मला काय कुणाची भीती." मावशी म्हणाली. तिने डोळे मिटले. मामा तिचे पाय चेपू लागला. स्वप्न पडू दे देवा, अशी प्रार्थना मावशी करू लागली. थोड्याच वेळात तिची प्रार्थना फळली. तिला झोप लागली नि स्वप्नही पडलं. या स्वप्नात ती आणि रॉबिन्सन थेट जपानलाच गेल्याचं तिला दिसलं. तिने मामाची हळूच पापी घेतली. मग दोघेही नाच नाच नाचले. थोड्याच वेळात दोघांनांही दणकून भूक लागली. मावशीने जिभल्या चाटत मामाकडे बघितलं. मावशीचा दुष्ट हेतू मामाच्या लक्षात आला.
"मावशे, माझ्यावर ताव मारशील तर जपानमध्ये एकटी पडशील. येथील एखाद्या नेपोटल्या डॉगोबाच्या तावडीत सापडशील." मामा डोळे मिचकावत म्हणाला. "छे रे मामू, तुला उगाच येते माझी शंका. तू तो मेरा फ्रेंड खास. बाकी सारे बकवास." मावशी हसत म्हणाली. "बरं, बरं मावशे. बकवास तर बकवास. पण आपल्या भुकेचं काय ? उपाय सुचला पाहिजे खास."
"हं" मावशीने दीर्घ श्वास घेतला. ते दोघेही पुढे निघाले. कुठे काही खायला मिळत का ते बघू लागले. एके ठिकाणी त्यांना पेट शॉप दिसलं. त्यामध्ये डॉगी,
मांजरी, उंदीरमामा यांच्यासाठी असलेलं खास खाद्य होतं. ते बघून दोघांच्याही तोंडाला पाणी सुटलं. दोघांनी एकमेकांकडे बघितलं. दुकानात शिरण्यासाठी एक फट त्यांना दिसली. त्यातून ते दोघे आत शिरले. आतले पदार्थ बघून त्यांची भूक आणखीनच चाळवली. मागचा पुढचा विचार न करता ते दोघेही त्यावर तुटून पडले. त्यांचं खादाडणं सुरू असतानाच त्यांच्या कानावर कुणाचा तरी आवाज पडला.
"थांबा, माझ्या दोस्तांनो थांबा. हारा हाची बू... हारा हाची बू."
"आँ! हे कोण करतंय, बू चू फू चू!" मामा घाबरून मावशीला म्हणाला.
"मामू, कुणीतरी शत्रू आपल्या मागावर दिसतो. पळ आता."
"दोस्तांनो, मी तुमचा शत्रू नाही. पण, 'हारा हाची बू' केलं नाही तर, तुम्हीच व्हाल तुमचे शत्रू."
"हे..हे.. हे.. सांगणारा कोण रे तू?" मावशी घाबरून म्हणाली. मामाची बोलतीच बंद झाली. त्याचे पाय लटपटू लागले.
"घाबरू नका." असं म्हणत एक डॉगोबा त्यांच्यासमोर उभा ठाकला. मामा आणि मावशी त त प प करू लागले. 'च छ ज' तो डॉगी हसत म्हणाला. "अरे, घाबरू नका. मी चाव टॉव डॉगी. या दुकानाचा रखवालदार. तुम्ही भरपूर खा प्या, पण, 'हारा हाची बू' लक्षात ठेवा."
"चाँव टॉव दादा, हे मघापासून तू सारखा हा हा बू काय करतोस?" मामाने धिटाईनं विचारलं. "हे आहे तरी काय ?" मावशीने हिंमत करून विचारलं.
"सांगतो ना. मघा तुम्ही कसे बकाबका खादाडत होतात. तसं नसतं करायचं. त्यामुळे आपलं पोट डच्च भरतं."
"मग काय करायचं?"
"दोस्तांनो आम्ही जपानी म्हणजे मी, माझे मालक, मालकीणबाई, पंतप्रधान सारेच जण स्वतःचं पोट ८० टक्के भरेल एवढंच खातात. थोडीशी भूक कायम ठेवतो आम्ही."
"अरे पण, चाव मॉव, त्यामुळे डोकं दुखत नाही का?"
"छे छे, कमी खाल्ल्यानं डोकं दुखत नाही, तर उपाशी राहिल्याने दुखतं. आम्ही जपानी उपाशी राहत नाही. पण पोटात थोडी जागा शिल्लक ठेवतो. थोडं कमी खाल्लं की हलकं हलकं वाटतं. पोट फुगत नाही. आळस येत नाही. जास्त अन्न पोटात गेलं तर ते पचायला जड जातं. जे पचत नाही ते अंगाला लागत नाही. उलट ते विषासारखंच असतं."
"विष..." मावशी जोरात ओरडली. मामाने डोळे विस्फारले.
"हो, हो, विषच. न पचलेलं अन्न तसंच असतं. त्याचा शरीराला त्रास होतो. वेगवेगळ्या व्याधी पाठीमागे लागतात. गुडघे दुखतात. हृदयावर परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही गचकूही शकता. म्हणूनच, हारा हाची बू, हारा हाची बू करायचं असतं."
"याचा अर्थ तरी काय?"
"याचा अर्थ असा की, फक्त ८० टक्के पोट भरेल एवढंच खा. त्यामुळे होतं छान पचन. वाढत नाही वजन. कायम राहते शरीरातील ऊर्जा. शंभर वर्ष जगण्याचं मिळतं वरदान. जगू शकतो आनंदात." असं म्हणत चाव मॉव, शेपूट हलवू लागला. आतापर्यंत प्रेमळ वाटणाऱ्या चावच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. लांब जीभ करून तो दोघांकडे येऊ लागला. हा आता आपल्यावर ताव मारणार हे दोघांच्याही लक्षात आलं. एक, दोन, तीन म्हणत मावशी आणि मामाने धूम ठोकली. दुकानाचा दरवाजा बंद असल्याचं त्यांच्या लक्षातच आलं नाही. त्यामुळे ते धाडकन दरवाज्याला आदळले नि खाली पडले.
"ओय..ओय.." मावशी आरडाओरड करत जागी झाली. डोळे चोळत इकडे-तिकडे भेदरलेल्या नजरेनं बघत हारा हाची बू, हारा हाची बू, असं जोरात म्हणू लागली.
"मावशे, मावशे. असं भूत बाधल्यावानी का बडबडतेस ? काय झालं तुला?" मावशी त्याच्याकडे डोळे वटारून बघू लागली. हिला खरोखरच भूतबाधा तर झाली नाही ना, असं वाटून मामाने पळण्याचा पवित्रा घेतला. मावशीने त्याच्यावर उडी मारण्याचा पवित्रा घेतला. मामा घाबरून जोरात ओरडला... "हारा हाची बू, हारा हाची बू."
मावशी थबकली. स्वतःशीच हसली. कमी खाण्याचं महत्त्व इतक्या लवकर कसं बरं विसरली गड्या, असं स्वतःशीच पुटपुटत तिने मस्त ताणून दिली. मामाने सुटकेचा निःश्वास घेतला. हारा हाची बू.. मंत्र भलताच पॉवरफूल असल्याचं त्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही.
ज्येष्ठ बालसाहित्यिक